‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
अभिनयाचा वटवृक्ष!
आपल्या अभिनय प्रवासात तब्बल साठ वर्षे कायम रसिकाभिमुख राहिलेला कलावंत म्हणजे अशोककुमार! बॉम्बे टॉकीजच्या १९३६ साली आलेल्या ’जीवन नैय्या’ पासून सुरू झालेली त्यांची अभिनयाची यात्रा १९९७ साली आलेल्या ’ऑंखो में तुम हो’ पर्यंत चालू होती. साठ वर्षाची प्रदीर्घ खेळी खेळताना या नटसम्राटाने रसिकांना आपल्या अभिनयाच्या मोहीनी अस्त्रात गुंगवून ठेवले. एवढे नाव कमावलेला, किर्ती/ऐश्वर्याची शिखरे केंव्हाच पादाक्रांत केलेला, मायावी दुनियेतील अनेकानेक स्थित्यंतरे पचविलेला हा कलाप्रेमी कचकड्याच्या भपकेबाज, कृत्रिम, बेगडी वातावरणापासून अलिप्त राहूनही रसिकांच्या मनात घर करून राहिला. अनुभव समृध्द व श्रेष्ठ श्रेणीचा मनस्वी कलाकार रसिकांनी त्यांना आदराने नाव दिले दादामुनी!
आज १३ ऑक्टोबर. आजच्याच दिवशी १९११ साली त्यांचा जन्म झाला. त्यांच खरं नाव कुमुदलाल गांगुली. घरात सर्वच वकील. त्यामुळे साहजिकच त्यांच्यावर वकीली पेशा स्विकारण्याचा दबाव होता. पण त्यांची नजर मुंबईकडे होती. त्यांचे मेहुणे शशीधर मुखर्जी त्यावेळी बॉम्बे टॉकीज मध्ये होते. घरचा विरोध पत्करून ते मायानगरीत दाखल झाले. बॉम्बे टॉकीजच्या लॅबोतेटरीत ते टेक्नीशियन म्हणून रूजू झाले. त्यांना अभिनयात अजिबात रस नव्हता. त्यांच्या रूपेरी पडद्यावरील प्रवेशाचा किस्सा मशहूर आहे. बॉम्बे टॉकीजचे त्या कालचे सर्वेसर्वा होते हिमांशू रॉय आणि त्यांची पत्नी देविकारानी. देविका सिनेमाची नायिका असायची. तिचा नायक होता नजमल हुसेन. १९३६ साली त्यांचा ’जीवन नैय्या’ हा सिनेमा फ्लोअर वर होता. हा नजमल हुसेन आपली पत्नी देविकावर जरा जास्तच फिदा आहे हा संशय हिमांशू रॉय यांच्या मनात होताच. या सिनेमाच्या वेळी हा नजमल आजारी पडला. रॉय यांना निमित्तच मिळाले.त्यांनी ताबडतोब त्याची सुट्टी केली. मग आता नायकाची भूमिका करणार कोण? रॉय यांनी एकदा अशोककुमारला लॅब मध्ये गुणगुणताना बघितले होते. लगेच त्यांनी त्याला बोलावले व त्याच्या नव्या अवताराची कल्पना दिली. अशोकची बोबडीच वळाली.
सिनेमा करायचा तो देखील नायकाच्या रूपात आणि समोर नायिका कोण तर मालकीण दिविका रानी! काहिशा नाराजीने घाबरत, घाबरतच तो सिनेमा पूर्ण केला. त्याचे अशोककुमार हे रूपेरी बारसे देविकानेच केले. या सिनेमातील गाणी अशोकनीच गायली. हळूहळू अशोक तिथे रूळला व त्याची अभिनयाचे जीवन नैया मार्गी लागली. त्याच्या या अभिनयाच्या प्रवासाचे पाच भागात विभाजन करता येईल. ’जीवन नैया’ ते ’बंधन’ पर्यंतचा लाजरा बुजरा गाणारा अशोककुमार, चाळीसच्या दशकातील ’नया संसार’,’किस्मत’ पासून ’हावडा ब्रिज’,’डार्ख स्ट्रीट पर्यंतचा ड‘शींग हिरो,साठच्या दशकातील ’आरती’, ’गुमराह’पासून ज्वेल थीफ पर्यंतचा मधील मध्यवर्ती थाटाच्या चरीत्र भूमिका, आणि पुढे ऋशिदांच्या ’आशिर्वाद’,’गुड्डी’ पासून सदासतेज दादाजी! १९८५ सालच्या ’हमलोग’या दूरदर्शन मालिकेपासून सुरू झालेला प्रवास पुढे ’बहादूर शहा जफर’पर्यंत गेला. अभिनयाच्या या वटवृक्षाचे १० डिसेंबर २००१ साली निधन झाले.