‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
जंपिंग जॅक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जितेंद्र यांची कारकीर्द
यंदाच्या सात एप्रिल रोजी जितेंद्र (Jeetendra) ऐंशीव्या वर्षात पर्दापण करत आहे. १९६० च्या उत्तरार्धात हिंदी सिनेसृष्टीत ‘गीत गाया पत्थरोने’ या चित्रपटाव्दारे पर्दापण करणाऱ्या या उसळत्या फेसाळत्या नायकाने थोडीथोडकी नव्हे तर चक्क साडेतीन चार दशके स्वतःच्या अस्तित्वाने रसिकांना रिझवले. उत्तम कसलेला अभिनेता म्हणून त्याचा कधीच लौकीक नव्हता. खऱ्या अर्थाने दिग्दर्शकाचा नट असणा-या जितेंद्रने जसा दिग्दर्शक तसे कर्तृत्व हे धोरण ठरविल्याने तो गुलजारच्या क्लासिक चित्रपटात जसा ऍक्सेप्टेबल वाटला… तरुणीला आपल्या स्वप्नातला प्रियकर वाटला तसाच दाक्षिणात्य दिग्दर्शकांना तो त्यांच्या कौटुंबिक चित्रपटाचा मध्यमवर्गीय हिरोही दिसला.
जेंव्हा हिंदी सिनेमात राजेश खन्ना, अमिताभ व धर्मेंद्र तथा ऋषिकपूरची हवा होती तेव्हा आपली रोजी रोटी कमवण्यासाठी त्याने सरळ दक्षिणेकडे मोर्चा वळवून “तोहफा, हिम्मतवाला, जस्टीस चौधरी सारख्या चित्रपटाद्वारे दक्षिणविजय मिळवला. परिस्थिती येईल त्याप्रमाणे स्वतःमध्ये बदल घडवून तेल लावलेल्या, कसलेल्या मल्लाप्रमाणे निसटणारा… कोणत्याही विपरित स्थितीत दैवाच्या हाती न सापडणारा हा एक सर्वमान्य अभिनेता म्हणजे जितेंद्र… आज त्याच्या ८०व्या वाढदिवशी त्याच्या या साडेतीन चार दशकाच्या वेगवान कारकिर्दीचा घेतलेला त्याहून अतिवेगवान आढावा म्हणजेच…. आने से उस के आये बहार…
आजही आमच्या मनातील सत्तरच्या दशकातील पांढरी नॅरोबॉटम पॅन्ट, भडक लाल रंगाचा टी शर्ट, गळयाभोवतालचा रुमाल, पांढरे बूट या अवतारातील जितेंद्र पुसला गेलेला नाही. ना ती जेम्सबॉण्ड स्टाईलमधील जितेंद्रची छबी पुसली गेली ना त्याचे फर्ज चित्रपटातील ‘मस्त बहारोका आशिक’ गाण्याद्वारेच अधोरेखित झालेली जंपिंग जॅक ची इमेज पुसली गेली. चित्रमहर्षि व्ही.शांताराम यांचा गीत गाया पत्थरोने हा जरी त्याचा वाच्यार्थाने पहिला चित्रपट असला तरी व मुमताजची डमी म्हणून तो जरी सेहरा मधील घोडस्वारीमध्ये पाठमोरा दिसला असला तरी, तो आम पब्लिकच्या मनात भरला तो फर्ज पासूनच. त्याचा तो देशी जेम्स बॉण्ड अवतार लोकांना जास्त आवडला की त्याने बबिताबरोबर शम्मी कपूर स्टाईलने केलेली मस्त घुसळण आवडली हा कदाचित वादाचा मुद्दा बनू शकेल पण पदार्पणातच प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्याची तेंव्हाची त्यांची क्षमता लाजबावच म्हणावी लागेल. लक्ष्मीप्यारेची जितेंद्रला पहिल्यापासूनलच दमदार साथ मिळाली मग तो जीनेकी राह असो, धरती कहे पुकारके असो वा जिगरी दोस्त.
जितेंद्रचे नांव घेताक्षणी आपल्या कानाभोवती ‘ मस्त बहारोका मै आशिक… आनेसे उसके आये बहार… एक बेचारा प्यारका मारा राहोमे तेरे… ढल गया दिन हो गयी रात… मुसाफिर हूँ यारो ना घर है ना… के हमतुम डोरीसे बंधे इक डोरीसे… किसी मोडपे किसी राहमे कही खो ना जाये… मै बनफूल बनका फूल… अशी असंख्य गाणी रुंजी घालू लागतात. त्याचे रोमांटिक गाण्यातील पदलालित्य, नायिकेची छेडछाड व वेगवान पळापळी जशी आठवते तशीच त्यांची कोत्या आवाजातील डॉयलॉगबाजीही आठवते.
=====
हे नक्की वाचा: जितेंद्रने अपमान गिळून स्वत:ला सिध्द केले त्या मुळेच अभिनयाची मोठी इनिंग तो खेळू शकला.
=====
नायिकेमागे हुंगेगिरी करणे या सुरवातीच्या इमेजमधून तो फार लवकर बाहेर पडला. जीनेकी राह हे त्याचे प्रातिनिधिक उदाहरण म्हणावे लागेल. त्याच्या कारकिर्दीचा पहिला टप्पा वारिस, हमजोली, गुनाहोका देवता, बनफूल, कॉरवा, एक नारी एक ब्रम्हचारी, परिवार सारख्या सामाजिक व पलायनवादी चित्रपटांनी गाजलेला दिसतो तर कारकिदीच्या दुस-या टप्प्यावर आपल्याला भेटतात त्याचे परिचया, किताब, किनारा, एकही भूल वा जस्टीस चौधरी, क्रोधी सारखे निरोगी उदात्त विचारसरणीची किनार लाभलेले, तर कधी बिदाई, जुदाई, सदा सुहागन, हिम्मतवाला, तोहफा सारखे खास मद्रासी मसाल्याने ठासून भरलेले हसू आणि आसू टाईप मेलोड्रॅमॅटिक चित्रपट.
ऐंशीच्या दशकात ड्रीमगर्लने मांडलेल्या स्वयंवरात तोही एक उमेदवार असल्याचे बोलले जात होते. पण हवाईसुंदरी शोभाने चतुराईने या आपल्या बचपनके पियाको अपना शोहर बनवला. असो. पण अत्यंत वक्तशीर अशा दाक्षिणात्य सिनेनिर्मात्याचा तो राजेंद्रकुमारप्रमाणे लाडका हिरो होता. नायिका बबिता, तनुजा, जमना रेखा, मौसमी चॅटर्जी, श्रीदेवी व जयाप्रदा असो दाक्षिणात्य चित्रपटातील त्याचे स्थान एकमेवाव्दितीयच म्हणावे लागेल. गुलजारचाही तो अत्यंत आवडता नायक होता. अन आपली इमेज आमूलाग्र बदलणारा दिग्दर्शक म्हणून जितेंद्रला शायर डिरेक्टर गुलजारला तो शंभरपैकी शंभर मार्क कायम देतो. परिचय मधील मिशीवाला जितेंद्र नव्वदच्या दशकात परत युवतीच्या दिलकी धडकन बनला .त्याचे सोज्वळ, सात्विक, सरळमार्गी, सौम्स रुप तरुणींची मने पुनश्च जिंकून गेले.
प्रेक्षकांच्या सहनशक्तीचा अंत न पाहता काही मोजक्या चित्रपटात चरित्रभूमिका करुन त्याने नव्या पिढीसाठी वाट मोकळी करुन दिली. त्याच्या मुलीने एकता कपूरने ‘क’च्या बाराखडीतील टीव्ही सिरीयलमध्ये लोकप्रियतेचे शिखर गाठले अन तो जणू धन्य झाला. स्वतःला पक्का महाराष्ट्रीय समजणारा जितेंद्र हा मुंबईच्या गिरगाव या हार्ट ऑफ दि सिटीचा सच्चा नागरिक असल्याने तो उत्तम मराठी बोलूही शकतो व मराठी संस्कृती अंगीकारली आहे हे त्याने स्वतःच्या घरातील गणेशोत्सवासारख्या समारंभातून दाखवून दिले आहे.
– दिलीप कुकडे
=====
हे वाचलंत का: राम गोपाल वर्मा: आशिक-ऐ-फिल्ममेकिंग