दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
चित्रपटसृष्टीची अक्षय तृतीया
अक्षय्य तृतीयेच्या तुम्हाला सर्वप्रथम शुभेच्छा!
आता अक्षय्य तृतीया म्हटली की सोने खरेदी आली. सध्याच्या लॉकडाऊनच्या दिवसात ऑनलाईन सोने खरेदीचा मार्ग अवलंबला गेला हे आपणासही माहितेय. चित्रपट आणि सोने यांचे नाते विविध स्तरांवर आहे. चित्रपटाचे नाव, मग कथा, पटकथा, संवाद, सेट, गीत, संगीत, नृत्य यापासून ते सोने खरेदीपर्यंत ते आहे. समाजातील कोणतीही गोष्ट आपल्या पारंपारिक लोकप्रिय मनोरंजन चित्रपटाने अपवाद ठरवली नाही. आता हा एक वेगळ्या प्रकारचा वास्तववाद झाला, पण चित्रपटात तो काहीसा अतिरंजितपणे आला. सोने म्हटले की त्यात सोन्याचे दागिने, सोन्याच्या वीटा, चांदी, हिरे असे सगळेच आले.
चित्रपटाच्या नावातील ‘सोन्याची श्रीमंती’ची काही उदाहरणे सांगायची तर, सोने के हाथ, सोने की जंजीर, काला सोना, चांदी सोना, हीरा मोती, हीरा पन्ना इत्यादी हिंदी चित्रपट झालेच पण मराठीतही सोनारानं टोचलं कान, सोना आणि मोना, सोनियाची पाऊले, सोनियाची मुंबई, सोनेरी सावली, सोन्याची लंका असे चित्रपट येत असतात…
हिंदी चित्रपटातील पहिला देखणा ‘काचमहाल’ गाजल्याचे श्रेय के. असिफ दिग्दर्शित ‘मुगल ए आझम’ ( १९६०) मधील मधुबालाने आक्रमकता आणि आकर्षकता अशा संगमाने साकारलेल्या ‘प्यार किया तो डरना क्या ‘ या नृत्य गीताला जाते. या ब्लॅक अॅण्ड व्हाईट चित्रपटात फक्त हे एकमेव गाणे रंगात होते. त्या काळात हे अगदीच दुर्मिळ होते. त्या काळात पडद्यावरचा हा काचमहाल म्हणजे ‘सोन्याचाच महाल ‘ होता. युट्यूबवर हे गाणे पाहिले तरी त्याचा प्रत्यय येईल. ( त्यानंतर २००३ साली हा संपूर्ण चित्रपट नवीन टेक्नोलॉजीने रंगीत करण्यात आला तेव्हा ‘सोन्यासारखा चकाकला’)
सत्तरच्या दशकातील हिंदी चित्रपटात पटकथेच्या केन्द्रस्थानी सोने अथवा हीरे असल्याचे दिसेल. आपण काही महत्वाची उदाहरणे बघू. विजय आनंद दिग्दर्शित ‘ज्वेल थीफ’ला खणखणीत यश मिळाल्याने ‘सोने अथवा हीरे आणि चोर चोर’ अशा गोष्टींचा मार्ग सापडला असावा. त्या काळातील प्रेक्षकांनाही अशाच गोष्टी पाहण्यात विशेष रस असे. बडे नायक नायिका, लोकप्रिय गीत संगीत व नृत्य यांची त्यात जोडणी फोडणी असली की पुरे ठरे. चित्रपट म्हणजे फक्त आणि फक्त दोन घटका छान मनोरंजन अथवा टाईमपास अशीच त्या काळात अघोषित व्याख्या होती आणि त्याबाबत कोणालाही फारसे वावगं वाटत नसे. विजय आनंद दिग्दर्शित ‘जॉनी मेरा नाम’ पासून ब्रीज दिग्दर्शित ‘व्हीक्टोरिया नंबर २०३’ पर्यंत अनेक चित्रपटात ते पहायला मिळतेय. ‘व्हीक्टोरिया नंबर २०३’ मध्ये तर घोडागाडीच्या लालटेन मध्ये हीरे लपवलेले असतात. विजय आनंद दिग्दर्शित ‘छुपा रुस्तम’ मध्ये अफाट आणि अचाट कल्पना होती. हिन्दुस्तान आणि तिबेट यांच्या मार्गावर एका मंदिराच्या तळाशी खूप सोने आहे आणि मग त्याचा शोध घेण्याचा तद्दन फिल्मी प्रयत्न म्हणजे हा चित्रपट आहे. भारत आणि अमेरिका यांच्या संयुक्त विद्यमाने निर्माण झालेल्या कृष्णा शहा दिग्दर्शित ‘शालिमार’ या चित्रपटातही किमती हीरा शालिमार हाच पटकथेच्या केन्द्रस्थानी होता आणि त्यात देशी स्टार धर्मेंद्र, झीनत अमान, शम्मी कपूर, ओ. पी. रल्हन यांच्याप्रमाणेच रेक्स हॅरिसन, जॉन सॅक्सन आणि सिल्व्हिया माईल्स असे विदेशी स्टारही आहेत. म्हणजे त्यांनी हिंदी चित्रपटाच्या संस्कृतीशी जुळवून घेतले आणि ती करामत हीरे करु शकले हे विशेषच आहे.
रमेश सिप्पी दिग्दर्शित ‘शान’ मध्ये प्यार करनेवाले प्यार करते है शान से… गाणे तर बिंदूच्या गळ्यातील किंमती हीरे हार चोरण्याच्या प्रयत्नात आहे. शशी कपूर, अमिताभ बच्चन, परवीन बाबी, बिंदीया गोस्वामी हे सगळेच बिंदूच्या गळ्यावर लक्ष ठेवून हे गाणे गातात. आय. व्ही. ससी दिग्दर्शित ‘करिष्मा’ नावाच्या चित्रपटात स्वरूप संपत आपल्या पायावर शस्रक्रिया करते आणि त्यात हीरे लपवून विदेशातून मुंबईत येते अशी भन्नाट कल्पना आहे. सोने, चांदी, दागिने यांना आपल्या चित्रपटात बहुरंगी स्थान मिळालंय हे लक्षात येईल. देव आनंदने आपल्या ‘हीरा पन्ना’ या चित्रपटातही ‘हीरा’ च महत्वाचे मानले. त्याच्या गाडीच्या डिकीत लपवलेले हीरे झीनत अमानने त्याला प्रेमात पाडून आणावेत असा मेन व्हीलन जीवनचा डाव असतो. रमेश सिप्पी दिग्दर्शित ‘शान’चा व्हीलन शाकालच्या (कुलभूषण खरबंदा) exclusive ड्रेसला खरीखुरी सोन्याची बटणे आहेत असे चित्रपटाच्या पूर्वप्रसिध्दीत जोरजोरात सांगितले गेले, तेवढ्याने व्यक्तिरेखा कशी हो प्रभावी ठरेल? नेमके तेच झाले. अंडरवर्ल्डच्या चित्रपटात ‘भाई’ च्या गळ्यात दागिने हवेतच, तो त्यांचा जणू ड्रेस कोड (‘सत्या’ या चित्रपटातील भिखू म्हात्रे मनोज वाजपेयी आठवा) तर ‘उत्सव’ मधील वसंतसेना व्यक्तिरेखा साकारण्यासाठी रेखाने खरेखुरे दानिगे हवेत असा हट्ट धरल्याचे बरेच गॉसिप्स चघळले गेले. कोणत्याही भाषेतील चित्रपटात खरे सोने अथवा दागिने वापरले जाणे तसे बजेटमध्ये परवडणारे नाही. पण ज्वेलर्सच्या जाहिरातीत स्टार अॅक्ट्रेसना दागिन्यानी सजायला छान संधी मिळते आणि त्या अधिकाधिक खुबसुरत दिसतात याचे ताजे उदाहरण म्हणजे पूजा सावंत, सोनाली कुलकर्णी यांची अशा जाहिरातीमधील देहबोली! मृणाल कुलकर्णी तर अशा दागिन्याच्या जाहिरातीत दीर्घकाळ लक्षवेधक ठरली.
ऐश्वर्या राय, दीपिका पदुकोन यांनाही काही ज्वेलर्सनी आपले जणू ब्रॅण्ड अॅम्बेसेडर केले. अशा ज्वेलर्सची नावे आम्ही का सांगू? पण दागिने खरेदी करण्याची अनेक सेलिब्रेटिजना आवडते हे एकाद्या शाही लग्नाला ते जसे सजून येतात तेव्हा दिसते. संगीतकार बप्पी लाहिरीच्या गळ्यात तर कायमच सोने, चांदी आणि इतर कशा कशाच्या माळा दिसतात हे तब्बल चार दशकातील मोठे सत्य आहे.
गाण्यात ‘सोना’ असल्याचीही उदाहरणे अनेक. ओ मेरे सोना रे सोना (तिसरी मंझिल), सोना कितना सोना है (हीरो नंबर वन) अशी अनेक उदाहरणे देता येतील. गाण्यात सोने असेल पिक्चर हमखास ज्युबिली हिट होतो असे म्हणतात. खरं तर हा केवळ योगायोग असतो.
चित्रपट आणि सोने, चांदी, हिरे यांच्या घट्ट नातेसंबंधाच्या गोष्टीचा हा ट्रेलरच समजावा….चित्रपटात ‘सोन्यासारखी गोष्ट हवी’ तरच प्रेक्षकांना ते जास्त आवडते हे सहजच सांगावेसे वाटते.
दिलीप ठाकूर