‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
जावेद अख्तर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!
“क्यों डरे ज़िंदगी में क्या होगा… कुछ ना होगा तो तज़ुर्बा होगा!” स्वतः लिहिलेली ही शायरी जगणारे सुप्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांचा आज वाढदिवस. खरंतर जावेद साहेब म्हंटलं की डोळ्यासमोर उभं राहतं प्रतिभावान व्यक्तीमत्व..ते हिंदीत म्हणतात ना चेहरे से नूर झलकता है, तसंच काहीसं जावेद साहेबांकडे बघितल्यावर वाटत. त्यांच्या चेहऱ्यावरच तेज आणि त्यांच्या मुखातून किंवा लेखणीतून निघणारी शायरी ऐकल्यावरच समजतं की कवी किंवा गीतकार होणं हे काय सोप्प काम नाही.
नुसतं यमक जुळवणाऱ्याला आपण कवी म्हणू लागलो तर असे कवी गल्लीतल्या प्रत्येक नाक्यावर दिसतील. पण स्वतःच्या आयुष्यातल्या कित्येक अडचणींवर मात करून आज लोकांना आपण लिहिलेली गीतं किंवा शायरी मधून मंत्रमुग्ध करणारे गुलजार किंवा जावेद साहेब यांच्यासारखे कवी शतकातून एकदा होतात हे आपल्याला मान्य करायलाच लागेल!
१९४५ म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळ, या काळात ग्वालियर येथे एका मुस्लिम कुटुंबात जावेद अख्तर यांचा जन्म झाला. त्यांचे वडील जान निसार खान हे स्वतः चित्रपटसृष्टीत गीतकार म्हणून प्रसिद्ध त्यामुळे ती गोष्ट जावेद अख्तर यांच्यात येणारच, आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल टाकून त्यांनी सुद्धा या क्षेत्रात येण्याचं निश्चित केलं. वडिलांनी लिहिलेल्या “लम्हा लम्हा किसी जादू का फसाना होगा!” या कवितेवरून त्यांनी जावेद यांचं नाव सुरुवातीला जादू असं ठेवलं होतं!
हे देखील वाचा: …आणि ओपींच्या संगीताने सगळ्यांचे आयुष्य घडले
उर्दू साहित्य तसेच गुप्तहेर कथा जावेद अख्तर यांच्या आवडत्या, त्यातूनच त्यांना वाचन लेखनाची आवड लागली, १९५० साली आलेल्या दिलीप कुमारच्या आरजू या सिनेमाने त्यांना प्रचंड प्रभावित केले, त्यानंतर राज कपूर, बिमल रॉय, ख्वाजा अहमद अब्बास, नासिर हुसेन अशा कित्येक फिल्ममेकर्सच्या फिल्म बघून जावेद यांनी याच क्षेत्रात यायचं अशी खूणगाठ बांधली!
जावेद अख्तर हे नाव घेतलं की त्याआधी आणखीन एक नाव हमखास लोकांच्या ओठांवर येतं ते म्हणजे सलीम खान. सध्याच्या सुपरस्टार सलमान खान याचे वडील आणि एक काळ गाजवणारे सलीम जावेद या जोडीतले सलीम खान! १९६६ साली सरहदी लुटेरा या सिनेमाच्या सेट वर प्रथम सलीम खान आणि जावेद अख्तर यांची भेट झाली, त्या सेटवर जावेद अख्तर clap boy चं काम करत होते, आणि सलीम खान त्या सिनेमात अभिनय करत होते, त्या सिनेमाच्या लेखकाला शक्य नसल्याने त्या वेळेस सिनेमाच्या संवाद लेखनाची जवाबदारी जावेद अख्तर यांना देण्यात आली आणि तिथुन या दोघांच्या मैत्रीला सुरुवात झाली!
१९७१ साली या दोघांनी एकत्र येऊन काम करायचं ठरवलं. सलीम हे कथा लिहायचे आणि जावेद हे त्यातले सबप्लॉट आणि संवाद लिहायला सलीम यांना मदत करायचे. १९७१ साली आलेल्या अधिकार आणि अंदाज या दोन्ही सिनेमांसाठी जावेद अख्तर यांनी ऑफिशियली संवाद लिहायला मदत केली, आणि मग या त्या नंतर या जोडीने एका पाठोपाठ एक हिट सिनेमे द्यायला सुरुवात केली. हाथी मेरे साथी, शोले, डॉन, सीता और गीता, दिवार, त्रिशूल, यादों की बारात, जंजिर, दोस्ताना, मजबूर असे कित्येक सिनेमे हे आजही प्रथम सलीम-जावेद यांचे सिनेमे म्हणून ओळखले जातात! नंतर काही मतभेदांमुळे ही जोडी वेगळी झाली आणि सिनेइंडस्ट्री मध्ये जणू लेखकांची उणीव भासू लागली.
कारण ज्या काळात सलीम जावेद ही जोडी तयार झाली त्या काळात लेखकांना एवढं मानधन आणि क्रेडिट दिलं जात नसे. या दोघांनी ज्या प्रकारे स्वतःचं नाव आणि ब्रँड तयार केला होता त्यामुळे त्या काळात लेखकांना योग्य तो मान मिळायला सुरुवात झाली होती! दोघे वेगळे झाल्यानंतर सलीम खान यांनी फारसे सिनेमे केले नाहीत, आणि जे केले ते इतके काही चालले नाहीत! पण जावेद अख्तर यांनी मात्र त्यांच्या शब्दांच्या आणि शायरीच्या माध्यमातून त्यांचं काम सुरूच ठेवल! सिलसिला, मशाल, मिस्टर इंडिया पासून दिल चाहता है, डॉन(रिमेक), लक्ष्य, लगान, नमस्ते लंडन, गली बॉय पर्यंत असंख्य सिनेमांसाठी त्यांनी काम केलं आहे!
हे वाचलंत का: मराठी सिनेसृष्टीवर प्रेम करणारे दिलीप कुमार
१९८५ मध्ये पहिल्या पत्नीशी घटस्फोट घेऊन जावेद अख्तर यांनी सुप्रसिद्ध अभिनेत्री शबाना आझमी हिच्याशी लग्न केले. त्यांची दोन्ही मुलं सुद्धा फिल्म इंडस्ट्री मध्ये स्वतःचं स्थान निर्माण करून आहेत. झोया अख्तर आणि फरहान अख्तर यांच्या दिग्दर्शन तसेच फरहानच्या अभिनय कौशल्याचं गुणगान आज प्रत्येक सिनेप्रेमी करतोय! पद्मभूषण, पद्मश्री आणि साहित्य अकादमी अशा पुरस्कारांनी सन्मानित केलेल्या जावेद अख्तर यांच्या शब्दांची जादू आजही सिनेसृष्टीवर कायम आहे.
आशुतोष गोवारीकर जेंव्हा लगान आणि स्वदेस अशा दोन्ही सिनेमांची कहाणी ऐकवायला जेंव्हा जावेद अख्तर यांच्याकडे गेला त्यावेळेस जावेद अख्तर यांनी त्याला मोलाचा सल्ला दिला की हे सिनेमे बनवू नकोस फ्लॉप होतील, पण झालं नेमकं उलटं हे दोन्ही सिनेमे आज कल्ट क्लासिक म्हणून ओळखले जातात आणि यात जावेद अख्तर यांनी दिलेली प्रत्येक गाणी आजही लोकं अत्यंत आवडीने ऐकतात.
जावेद साहेबांनी २०१० ते २०१६ राज्यसभेचे मेंबर म्हणून सुद्धा काम केलं, राज्यसभेत सुद्धा त्यांनी त्यांच्या भाषेवरच्या प्रभुत्वाच्या जोरावर कित्येक नेत्यांना सुद्धा मंत्रमुग्ध केलं. जावेद अख्तर यांना त्यांच्या पॉलिटिकल आयडियोलॉजीमुळे आणि पाकिस्तान प्रेमामुळे बऱ्याचदा लोकांचा रोष सुद्धा पत्करावा लागला आहे, पण या विरोधाला त्यांनी नेहमीच धैर्याने तोंड दिलं आहे.
अशा या हरहुन्नरी जावेद अख्तर यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा! जावेद साहेब तुम्ही असेच पुढच्या पिढीला सुद्धा तुमच्या गाण्यांच्या आणि शायरीच्या माध्यमातून प्रेरणा देत रहा हीच ईश्वरचरणी प्रार्थना!