यांच्या हट्टापाई राजकुमारीने १९७८ साली ही लोरी गायली…
गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या रवींद्र संगीताचे गारुड संपूर्ण भारतीय चित्रपट संगीतावर फार पूर्वीपासून पडलेलं आहे. या रवींद्र संगीताचा वापर जवळपास प्रत्येक संगीतकारांनी आपल्या कुठल्या न कुठल्या गाण्यात नक्कीच केलेला दिसतो. संगीतकार पंचम तथा राहुल बर्मन यांना अनेक गाण्यांमध्ये रवींद्र संगीताचा फार सुंदर वापर केला होता. त्यापैकी एका गाण्याची ही कहाणी.
ही कहाणी जितकी गुलजार यांची आहे तितकीच गायिका राजकुमारी हिची देखील आहे. हा चित्रपट होता गुलजार यांनी दिग्दर्शित केलेला १९७७ साली आलेला ‘किताब’. खरंतर हा चित्रपट अतिशय सुंदर बनला होता पण या सिनेमाला अजिबात व्यावसायिक यश मिळाले. या चित्रपटामध्ये उत्तम कुमार, विद्या सिन्हा, दिना पाठक आणि मास्टर राजू यांच्या प्रमुख भूमिका होत्या. (Rajkumari)
मूळ बंगाली कथा (समरेश बासू यांची ‘पथिक’) असलेला हा चित्रपट गुलजार यांनी खूप चांगल्या पद्धतीने बनवला होता. या चित्रपटामध्ये एकूण चार गाणी होती. यापैकी एक गाणं ‘धन्नो कि आंखो में…’ हे गाणं स्वतः पंचम यांनी गायलं होतं. या चित्रपटात ‘मास्टर जी की चिठ्ठी आई….’ हे गाणं शिवांगी कोल्हापूरे आणि पद्मिनी कोल्हापुरे या दोन बहिणीनी गायले होते. चित्रपटातील तिसरे गाणे सपन चक्रवर्ती यांनी गायलेले ‘मेरे साथ चले न साया….’ गायले होते. या चित्रपटात एक लोरी होती. हे अंगाई गीत कुणाकडून गावून घ्यावे यावर पंचम आणि गुलजार यांची चर्चा होत होती. त्यांना ही लोरी गाण्यासाठी प्रस्थापित गायिका म्हणजे लता मंगेशकर किंवा आशा भोसले नको होत्या म्हणून त्यांनी वेगळ्या गायिकेचा शोध सुरू केला परंतु त्यांच्या असं लक्षात आलं की, हे गाणं चित्रपटामध्ये दिला पाठक या चरित्र अभिनेत्रीवर चित्रित होणार आहे. त्यामुळे कुठला तरी प्रौढ किंवा पोक्त स्वर त्यांना हवा होता. त्यावेळी गुलजार यांचे सहाय्यक म्हणून प्रदीप दुबे होते या प्रदीप दुबे यांची आई म्हणजे तीस आणि चाळीसच्या दशकातील ख्यातनाम गायिका राजकुमारी ! (Rajkumari)
तेव्हा प्रदीप दुबे आपल्या आई सोबत मुंबईला एका चाळीमध्ये राहत होते. अवस्था खूप वाईट होती. गरिबीचे दिवस होते. तीस आणि चाळीस च्या दशकांमध्ये राजकुमारी या गायिकेचा फार मोठा बोल बाला होता. विजय भट यांच्या प्रकाश पिक्चर्सच्या त्या अभिनेत्री आणि गायिका होत्या. त्या काळी अनेक चित्रपटातून भूमिका देखील केल्या होत्या. पण चाळीस च्या दशकातील त्यांनी आपले लक्ष गाण्यावर केंद्रित केले होते. ‘महल’ (सं. खेमचंद प्रकाश) या चित्रपटातील ‘घबराके जो हमसे…’ हे गाणे खूप लोकप्रिय झाले होते.
१९५१ साली ‘मल्हार’ (सं रोशन) हा चित्रपट आला होता. या चित्रपटातील ‘सुन बैरी बलम सच बोल ईब क्या होगा….’ हे गीत मुकेश सोबत त्यांनी गायले जे प्रचंड लोकप्रिय झाले होते. परंतु पन्नासच्या दशकात लता आणि आशा लोकप्रिय झाल्यावर साहजिकच चाळीसच्या दशकातील गायिका मागे पडल्या. राजकुमारीला देखील काम मिळेनासे झाले. तीसच्या दशकातील टॉपची गायिका अभिनेत्री पुढे अक्षरश: मुंबईतल्या चाळी मध्ये राहू लागली. खायचे वांधे होवू लागले. (Rajkumari)
साठच्या दशकाच्या अखेरीस जेव्हा कमाल अमरोही यांनी आपल्या ‘पाकीजा’ या चित्रपटाचे पुन्हा शूटिंग सुरू केले तेव्हा त्याच्या राहिलेल्या संगीताच्या कामासाठी नौशाद यांना त्यांनी पाचारण केले. नौशाद चित्रपटाचे पार्श्व संगीत करत होते. तेव्हा काही कोरस त्यांना गायिका हव्या होत्या. संगीतकार नौशाद यांना कोरस मध्ये गाताना राजकुमारी दिसल्या. त्या तोंड लपवून गात होत्या. नौशाद यांना खूप वाईट वाटले. कारण जेव्हा नौशाद संगीत देण्यासाठी मुंबईला आले होते त्यावेळी तीसच्या दशकामध्ये राजकुमारी प्रख्यात गायिका होत्या आणि नौशाद यांना तिच्याबद्दल खूप आदर होता.
आज राजकुमारी यांना या अवस्थेत पाहताना खूप वाईट वाटले त्यांनी राजकुमारीला जवळ बोलावले. राजकुमार यांनी आपली ‘दुख भरी दास्तान’ त्यांना सांगितली. त्यांनी ताबडतोब ‘पाकीजा’ या चित्रपटासाठी तिच्या करता एक स्वतंत्र गीत बनवले. हे सोलो गीत राजकुमारीने गायले होते. गाणे होते ‘नजरीया की मारी…’ या गाण्याने राजकुमारी हिला खूप वर्षानंतर स्वतंत्र गाणे गायला मिळाले. याचा तिला फारसा फायदा झाला नाही पण तिचं आयुष्य काही अर्थाने सुकर झालं.(Rajkumari)
आता येवू मूळ किस्स्याकडे. जेव्हा ‘किताब’ या चित्रपटासाठी लोरी गाण्याबाबत चर्चा चालू होती त्यावेळी गुलजार यांना प्रदीप दुबे यांच्या आईला या गाण्यासाठी बोलवावे असे वाटले. ते राजकुमारी यांच्याकडे गेले. राजकुमारीला सुरुवातीला खूप आनंद झाला. आनंदाने डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती घाबरली आणि म्हणाली,” मला पुन्हा तसे गाता येईल का ?” परंतु गुलजार आणि राहुल देव बर्मन यांनी त्याला धीर दिला आणि तुम्ही व्यवस्थित गाऊ शकाल याचा विश्वास दिला. राजकुमारीने मोठ्या तन्मयतेने ही लोरी गायली. गाण्याचे बोल होते ‘हरी दिन तो बीता शाम हुई….’ आज इतक्या वर्षानंतर देखील हे अंगाई गीत रसिकांच्या लक्षात आहे.
============
हे देखील वाचा : हेमाला एकमेव फिल्म फेअर पुरस्कार मिळवून देणारा सिनेमा
===========
आता थोडसं या गाण्याबद्दल ! हे मूळ गाणे बंगाली होते. गुलजार यांनी हेच गाणे थोडाफार बदल करून अनुवादित करून घेतले. याला चाल मूळचीच रवींद्र संगीताची होती. ख्यातनाम चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रे यांनी त्यांच्या ‘पाथेर पांचाली’ या चित्रपटात हे गाणं वापरलं होतं. नंतर बंगालमध्ये अनेक गायकांनी हे गाणं गायलं होतं. आज देखील बंगालमधील अनेक कार्यक्रमातून हे गाणं गायलं जातं. राजकुमारीला या गाण्याचा फारसा फायदा झाला नाही पुढे हलाखीच्या अवस्थेतच १८ मार्च २००० साली त्यांचे मुंबईमध्ये निधन झाले. (Rajkumari)
आज ४ डिसेंबर! गायिका राजकुमारीचा जन्मदिन. १९१७ साली त्यांचा याच दिवशी जन्म झाला होता. (गुगल विकिपीडिया वर जन्म वर्ष १९२४ दाखवले आहे!) त्यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने या विसरलेल्या गायिकेला कलाकृती मिडिया कडून भावपूर्ण आदरांजली.