धर्मेंद्रने गुरुदत्तच्या उपकाराची जाणीव कशी ठेवली?
संघर्ष काळातील मदतीची जाणीव प्रत्येक जण ठेवतोच असे नाही पण काहीजण असे असतात की ते आपल्या पहिल्या पायरीला कधीच विसरत नाही. अभिनेता धर्मेंद्र (Dharmendra) त्यापैकी एक. निर्माता दिग्दर्शक गुरुदत्त यांनी धर्मेंद्रला सुरुवातीच्या काळात आत्मविश्वास दिला. त्याला प्रोत्साहन दिले. त्यामुळे तो अभिनयाच्या क्षेत्रात मोठ्या विश्वासाने पाय ठेऊ शकला. धर्मेंद्रने गुरुदत्तच्या या उपकाराची जाणीव कायम ठेवली. तो कायम कृतज्ञ राहिला. मात्र या उपकाराची परतफेड करण्याची संधी आली तेंव्हा मात्र गुरुदत्त या जगात राहिला नव्हता. खूप भावस्पर्शी असा हा किस्सा आहे.
१९५८ साली फिल्मफेअर आणि युनायटेड प्रोड्युसर गिल्ड यांच्यावतीने नवीन कलावंतांचा शोध घेण्यासाठी एक टॅलेंट हंट स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेसाठी पंजाबतून एक हँडसम तरुण आला होता. हा पंजाबी गब्रू जवान देखणा तर होताच; तब्येतीने देखील मजबूत होता. हिरो होण्याचं सगळं मटेरियल त्याच्यामध्ये होतं. नव्हता तो फक्त आत्मविश्वास. कारण पंजाबातील एका ग्रामीण भागातून तो मुंबईत आला होता. मुंबई मधील चकाचौंध पाहून तो बावरला होता. (Dharmendra)
या स्पर्धेत भाग घेण्यासाठी देशभरातून तरुण आले होते. त्यांच सफाईदार इंग्रजी बोलणं पाहून धर्मेंद्रला (Dharmendra) खूपच न्यूनगंड वाटत होता. त्याचं हे वागणं गुरुदत्त यांच्या नजरेत आलं. या स्पर्धेचे अनेक जज होते. त्यापैकी एक होते विमल रॉय आणि दुसरे होते गुरुदत्त. गुरुदत्त यांनी धर्मेंद्रची गोंधळलेली अवस्था ओळखली. त्यांनी त्याला आत्मविश्वास दिला. त्याला सांगितले,” तुझ्या मध्ये सर्व पोटेन्शिअल आहे. तू पोपटपंची करणाऱ्यांमुळे विनाकारण घाबरू नकोस. तुझ्यामध्ये इनबिल्ट टॅलेंट आहे. त्याचा तू वापर कर. ही स्पर्धा तू नक्की जिंकशील.”
त्या दिवशी गुरुदत्त यांच्या शब्दाने धर्मेंद्र (Dharmendra)याला खूप बरे वाटले. एका क्षणात त्याच्यातील आत्मविश्वास जागा झाला. मोठ्या विश्वासाने तो स्पर्धेत उतरला आणि ती स्पर्धा जिंकला. १९६० साली अर्जुन हिंगोरानी यांच्या ‘दिल भी तेरा हम भी तेरे’ या चित्रपटातून तो सिनेमात देखील आला. बिमल रॉय यांनी त्याला आपल्या ‘बंदिनी’ या चित्रपटांमध्ये भूमिका दिली. गुरुदत्त आणि बिमल रॉय यांचे उपकार धर्मेंद्र (Dharmendra) आयुष्यभर विसरू शकला नाही. गुरुदत्त सोबत काम करण्याची त्याला खूप इच्छा होती पण ती इच्छा पूर्ण झाली गुरुदत्त गेल्यानंतर.
१० ऑक्टोबर १९६४ या दिवशी गुरुदत्त यांचे निधन झाले. गुरु तेव्हा प्रचंड नैराश्यग्रस्त होता त्यातूनच त्याचा मृत्यू झाला. या काळात गुरुदत्त फिल्मचा ‘बहारे फिर भी आयेगी’ हा चित्रपट फ्लोअरवर होता. बऱ्यापैकी त्याच शूट झालं होतं. पण गुरुदत्तच्या निधनामुळे चित्रपट बंद पडला. गुरुदत्त फिल्म्स वर भरपूर कर्जाचा डोंगर होता. त्यामुळे हा चित्रपट पूर्ण करणे गरजेचे होते. गुरुदत्तचा भाऊ आत्माराम आणि गुरुदत्तचे लेखक अब्रार अल्वी यांनी हा चित्रपट पूर्ण करण्याची तयारी दाखवली. ते गुरुदत्त साकारत असलेल्या भूमिकेसाठी अनेक अभिनेत्यांकडे अप्रोच झाले. (Dharmendra)
सुरुवातीला ते सुनील दत्त कडे गेले. परंतु सुनील दत्त यांनी नकार दिला. त्यानंतर आणखी पाच-सहा कलाकार झाले पण कोणीही गुरुदत्तच्या अर्धवट राहिलेल्या चित्रपटात काम करायला तयार होत नव्हत. शेवटी धर्मेंद्रचा (Dharmendra) नंबर आला. धर्मेंद्र तेंव्हा पंजाबला एका चित्रपटाच शूट करत होता. अब्रार अल्वी पंजाबला गेले आणि धर्मेंद्रला भेटले. त्याला सर्व परिस्थिती सांगितली. धर्मेंद्रला गुरुदत्तच्या उपकाराची जाणीव होती. त्यामुळे ठरवले की हीच वेळ आहे गुरुदत्त फिल्म्सला मदत करण्याची. त्याने ताबडतोब कुठलीही अट न घालता चित्रपटात काम करण्याची तयारी दाखवली आणि आपल्या सर्व चित्रपटाच्या तारखा पुढे ढकलून या चित्रपटाला पूर्ण करण्यासाठी अग्रक्रम दिला.
============
हे देखील वाचा : मराठमोळ्या तनुजाने पंजाबचा पुत्तर धर्मेंद्रला शिकवला धडा
============
धर्मेंद्र (Dharmendra), माला सिन्हा आणि तनुजा यांच्या या चित्रपटात भूमिका होत्या. संगीत होते ओ पी नय्यर यांचे. चित्रपटाचे दिग्दर्शन शाहिद लतीफ यांनी केले होते. धर्मेंद्रने आपल्यावर केलेल्या उपकाराची जाणीव ठेवून गुरुदत्त फिल्म्सचा अर्धवट राहिलेला सिनेमा पूर्ण केला. १९६६ साली हा चित्रपट प्रदर्शित झाला. चित्रपटाला फारसं यश मिळालं नाही पण धर्मेंद्रने हा अर्धवट राहिलेला चित्रपट पूर्ण केला आणि गुरुदत्त फिल्म्सच्या डूबणाऱ्या नौकेला वाचवले हे महत्त्वाचे!