गोल्डी विजय आनंद दिग्दर्शक कसा बनला?
अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक देव आनंद आणि निर्माता दिग्दर्शक चेतन आनंद यांचा धाकटा भाऊ म्हणजे विजय आनंद (Vijay Anand). आपण सर्वजण त्यांना ‘गोल्डी’ या नावाने ओळखतो. ‘गाईड’, ‘जॉनी मेरा नाम’, ‘ज्वेल थीफ‘, ‘राम बलराम’, ‘ब्लॅकमेल’… असे अनेक चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केले. त्यांच्या दिग्दर्शनाची एक वेगळीच शैली होती. आज देखील ‘तिसरी मंजिल’ या चित्रपटातील गाण्यांच्या पिक्चरायजेशनची विस्तृत चर्चा होत असते. गोल्डी यांनी दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट कोणता आणि त्यांना हा चित्रपट कसा मिळाला याची एक मजेशीर गोष्ट आहे.
गोल्डी विजय आनंद (Vijay Anand) यांनी मुंबईला कॉलेजमध्ये असताना ते रंगभूमीवर ऍक्टिव्ह होते. नंतर ते आपले थोरले बंधू चेतन आनंद यांना असिस्ट करू लागले. पण त्यांना स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करायची होती. त्यांच्यात एक कुशल दिग्दर्शक लपला होता. तो त्यांना बाहेर काढायचा होता. म्हणून ते आपल्या दोन्ही भावांकडे आपला चित्रपट दिग्दर्शन करायला द्या असं सांगायचे. पण दोघेही भाऊ त्याकडे दुर्लक्ष करायचे. कारण त्यांच्या दृष्टीने गोल्डी विजय आनंद अजून खूप लहान होता.
एकदा एक स्क्रिप्ट विजय आनंद (Vijay Anand) यांनी लिहिली आणि नवकेतनच्या कृ मेंबर्सला ती ऐकवली. सर्वांनी खूप आवडली. काहींनी ही स्क्रिप्ट देव आनंद यांना दाखव असेही सांगितले. पण देव आनंद त्याकडे फारसे लक्ष देत नव्हता. शेवटी गोल्डीने नवकेतनचे छायाचित्रकार व्ही रात्रा यांना ती स्क्रिप्ट ऐकवली. रात्रा ही स्क्रिप्ट ऐकून ते खूप प्रभावित झाले. रात्रा नवकेतनचे सिनियर छायाचित्रकार होते. त्यांच्या शब्दाला कंपनीत मान होता. गोल्डीने त्यांना सांगितले, ”तुम्ही एकदा देव आनंदशी बोलून घ्या. तुमचा शब्द ते टाळणार नाहीत.” व्ही रात्रा यांनी देव आनंदला भेटून सांगितले की, ”गोल्डीच्या स्क्रिप्ट मध्ये खरोखरच खूप दम आहे.” त्यावर देव आनंद म्हणाला, ”पण मला अजून तो खूप इमॅच्युअर आणि लहान वाटतो. अजून थोडा मोठा होवू दे अनुभव घेऊ दे. मग त्याला आपण सिनेमा दिग्दर्शन करायला देऊ.” परंतु रात्रा म्हणाले, ”तसे नाही. तू ही स्क्रिप्ट नक्की ऐक आणि मग ठरव.”
पुढच्या आठवड्यात देव आनंद महाबळेश्वरला जाणार होते. जाताना ते गोल्डीला म्हणाले, ”तुझी स्क्रिप्ट मला दे. मी प्रवासात वाचून काढेन.” त्यावर गोल्डी म्हणाला, ”नको ती स्क्रिप्ट मी स्वतः तुम्हाला नरेट करतो. जर तुम्हाला आवडली तर तुम्ही हा चित्रपट बनवा. अन्यथा फेकून द्या.” गोल्डीचा आत्मविश्वास पाहून दुसऱ्या दिवशी देव आनंद आणि गोल्डी विजय आनंद महाबळेश्वरला निघाले. संपूर्ण प्रवासात फ्रेम बाय फ्रेम ती संपूर्ण स्क्रिप्ट गोल्डीने देव आनंदला समजावून सांगितली. गोल्डीच्या डोक्यात सिनेमा इतका पक्का बसला होता की त्यातील बारकावे, गाण्याच्या जागा, क्लायमॅक्स ह्या सगळ्या गोष्टी तो देव आनंदला कथन करत होता. सोबत त्याने काही स्केचेस बनवल्या होत्या त्या देखील दाखवल्या. देव आनंदला आपल्या धाकट्या भावाचे खूप कौतुक वाटले.
देवच्या आवडत्या महाबळेश्वरच्या फ्रेडरिक हॉटेल पोहोचल्यानंतर लगेच त्यांनी मुंबईच्या आपल्या नवकेतन ऑफिसला फोन केला आणि प्रोडक्शनच्या लोकांना सांगितले, ”आपण सध्या ज्या सिनेमावर काम करतो आहोत. तो सिनेमा जरा बाजूला ठेवा त्याआधी आपण एक नवीन चित्रपट करणार आहोत आणि या चित्रपटाचा दिग्दर्शक असेल विजय आनंद !” अशा रीतीने गोल्डी विजय आनंद (Vijay Anand)च्या दिग्दर्शनातील पहिला सिनेमा बनला.
===========
हे देखील वाचा : हकीकत: भारतातील पहिला युद्धपट, ज्याची जादू अद्याप कायम आहे.
===========
हा चित्रपट होता ‘नौ दो ग्यारह’. या चित्रपटात देव आनंद आणि कल्पना कार्तिक यांच्या प्रमुख भूमिका होत्या. हम है राही प्यार के हम से कुछ न बोलिये (किशोर) आजा पंछि अकेला है (रफी आशा), कली के रूप में चली हो धूप में (रफी आशा),आंखो में क्या जी (किशोर आशा) ढलती जाये चुन्दरिया (आशा)जान ए जिगर हाय हाय (आशा) हि गाणी खूप गाजली.