मिलिंद गवळी यांनी त्यांच्या पोस्टमधून दिला ‘सवतीचे कुंकू’ चित्रपटाच्या आठवणींना
…..एका क्षणात सर्व मतभेद मिटले आणि रफी व ओपी नय्यर पुन्हा एकत्र आले!
आपल्या अनोख्या शैलीत सिनेमाला संगीत देणारे संगीतकार ओ पी नय्यर (O. P. Nayyar) आणि पार्श्वगायक मोहम्मद रफी यांच्यात एक जबरदस्त ट्युनिंग होते. पुरुष गायकांमध्ये जास्तीत जास्त गाणी रफी यांनीच त्यांच्याकडे गायली होती. रफीने ५७ चित्रपटातून २०२ गाणी त्यांच्याकडे गायली होती आणि ही सर्व गाणी प्रचंड लोकप्रिय ठरली होती. आंचल में सजा लेना कलिया जुल्फो में सितारे भर लेना, यूं तो हमने लाख हंसी देखे है तुमसा नही देखा, बहुत शुक्रिया बडी मेहरबानी मेरी जिंदगी में हुजूर आप आये, आपके हसीन रुख पे आज नया नूर है मेरा दिल मचल गया तो मेरा क्या कसूर है, ये चांद सा रोशन चेहरा जुल्फो का रंग सुनहरा, आना है तो राह में कुछ देर नही है, फिर मिलोगे कभी इस बात का वादा करलो…
अशी एकाहून एक सुंदर गाणी रफीने त्यांच्याकडे गायली होती. पण एकदा मात्र एका छोट्याशा गैरसमजातून या दोघांमध्ये वितुष्ट निर्माण झालं होतं. हे मतभेद इतके टोकाला गेले होते की यापुढे रफीला माझ्या संगीतात कुठलेही स्थान नसेल असं ओ पीने जाहीर सांगितलं होतं. इतके टोकाचे मतभेद का झाले होते? आणि नंतर या दोघांतील मतभेद कसे मिटले आणि त्यांच्यात दिलजमाई कशी झाली याचा खूप भावस्पर्शी असा किस्सा आहे.
१९६६-६७ सालची गोष्ट असावी. तेंव्हा ओ पी नय्यर जॉय मुखर्जी दिग्दर्शित ‘हमसाया’ चित्रपटातील गाण्याचे रेकॉर्डिंग करत होते. यातील ‘दिल की आवाज भी सून मेरे फसाने पे न जा…’ हे रफीचे गाणे रेकॉर्ड झाले होते. पण आणखी एका गाण्याचं रेकॉर्डिंग बाकी होतं. त्या काळात रफी प्रचंड बिझी कलाकार होते. त्यामुळे नय्यर (O. P. Nayyar) साहेबांनी रफीच्या घराजवळच्या स्टुडिओमध्ये रेकॉर्डिंग ठेवलं होतं. त्यांना येण्या-जाण्याला फारसा त्रास होऊ नये म्हणून. पण त्या दिवशी रफी नेमके दुसऱ्या एका संगीतकाराच्या रेकॉर्डिंगमध्ये इतके अडकले की त्यांना ओ पी यांच्या गाण्याच्या रेकॉर्डिंगला यायला प्रचंड उशीर झाला. ओ पी हे तसे खूप तापट स्वभावाचे होते. त्यांना रफीचा प्रचंड राग आला होता.
सकाळपासून सर्व म्युझिशियंस स्वतः ओ पी रफीची वाट पाहत बसले होते. पण रफीचा पत्ताच नव्हता. संध्याकाळी जेव्हा रफी स्टुडिओमध्ये आले त्यावेळेला मात्र ओ पीच्या रागाचा पारा चढला होता आणि ते तावा तावाने रफीला सर्वां समक्ष बोलू लागले. रफी वारंवार ‘सॉरी सॉरी’ म्हणत होते. पण ओ पी (O. P. Nayyar) ऐकून घ्यायला तयारच नव्हते. शेवटी त्यांनी सांगितले, ”आजपासून तुमचा आणि माझा काही संबंध नाही यापुढे माझ्या संगीतात मी तुम्हाला गायला देणार नाही!” रफी सॉरी म्हणून निघून गेले. त्या रात्री मात्र रफीला झोप लागली नाही. एका छोट्याशा क्षुल्लक कारणावरून इतकं मोठं असोसिएशन कसं काय ओपी नय्यर झटक्यात तोडू शकतात? याचे त्यांना आश्चर्य वाटलं.
नक्कीच आपल्याविषयी कोणीतरी ओ पी (O. P. Nayyar) चे कान भरले असावेत असं त्यांना वाटलं होत. रफी यांनी पॅचअप करण्याचा प्रयत्न केला पण तो व्यर्थ ठरला. नंतर रफी परदेश दौऱ्यावर निघून गेले आणि दोघांमधील अंतर वाढतच गेलं. ओ पी यांनी नंतर रफीच्या ऐवजी महेंद्र कपूर यांचा स्वर वापरायला सुरुवात केली. पुढचे सी आय डी ९०९, कही दिन कही रात, नसीहत, संबंध, किस्मत हे ओपी नय्यर यांचे सर्व सिनेमे रफी च्या गाण्यांशिवायचे होते! परंतु रफी यांना मात्र हे काही पटत नव्हतं. रफी खूप दिलदार वृत्तीचे कलाकार होते. ओ पी ला ते आपला धाकटा भाऊ मानत. आपण मोठे आहोत आपणच समजून घ्यायला पाहिजे असे त्यांना वाटत होते.
========
हे देखील वाचा : फिरोज खानची रुपेरी पडद्यावरील ‘वेलकम’मधील शेवटची भूमिका !
========
या दरम्यान एकदा रमजान ईदच्या दिवशी रफी स्वतः मिठाई आणि शीरखुर्मा घेऊन ओ पी यांच्या घरी गेले. योगायोगाने ओ पी घरीच होते. रफीला पाहून ओपी यांना खूप आश्चर्य वाटलं. रफी यांनी त्यांना मिठी मारली आणि ईदच्या शुभेच्छा दिल्या. मिठाई दिली. ओपीचे देखील मन भरून आले. शेवटी दोघेही संवेदनशील कलाकार! पुढची काही मिनिटे हे एकमेकांच्या गळ्यात पडून अक्षरशः रडत होते.
मधल्या काळात निर्माण झालेल्या समज, गैरसमज, कटूता एका क्षणात गळून पडले होते. त्या क्षणी मागचा वर्ष दीड वर्षाचा काळ जणू लुप्त झाला. दोन मित्रांची दिल जमाई झाली. त्यानंतर मात्र पुन्हा रफी आणि ओ पी (O. P. Nayyar) यांचे संबंध सुधारले आणि ओ पी यांच्या पुढच्या प्रत्येक चित्रपटात रफी जाऊ लागले हा सिलसिला रफीच्या मृत्यूपर्यंत चालू होता!