दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
गीतकार ए आझम- शकील बदायुनी!
हिंदी सिनेसंगीतसृष्टीत अनेक जोडया लोकप्रिय झाल्यात. त्यामध्ये शकिल बदायुनी व संगीतकार नौशाद यांची जोडी प्रातःस्मरणीयच म्हणावी अशी आहे. हसरत जयपुरी व शंकर जयकिशन, मजरुह सचिनदा, एस एच बिहारी व ओ.पी प्रमाणेच शकिल नौशाद ही गीतकार – संगीतकारांची जोडी अजरामर आहे. गीतकार शकिल बदायुनी यांना आज आपल्यातून जाऊन ५० वर्षे झालीत. २० एप्रिल २०२१ रोजी त्यांच्या निधनास ५० वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या सुवर्ण पुण्यतिथी निमित्त त्यांच्या सुवर्णमय गीतांचा नव्हे तर गीतकाराच्या कारकिर्दीचा हा रम्य आढावा..
हिंदी सिनेसंगीतसृष्टीतील ज्येष्ठ दिवंगत गीतकार पै. शकिल बदायुनी (Shakeel Badayuni) तसं एकूणच फिल्मी दुनियेत गीतकार या जमातीला अनुल्लेखानेच मारले जाते. बघा ना आता हिंदी सिनेसंगीत रसिकांचीच गोष्ट घ्या. काही हाताच्या बोटावर मोजता येतील इतपत सन्माननीय अपवाद सोडले तर सगळ्यांना गाण्याचे गायक, संगीतकार व नायक नायिका किंवा चित्रपटाचेही नाव सांगता येतात पण हे गाणे कुणी लिहीले विचारले तर दहापैकी एकालाही गीतकाराचे नाव ठामपणे सांगता येईल याची खात्री नाही. जिथे सर्वसामान्य रसिकांनाच जे गाणे ते आपुलकीने एक चित्ताने समरसून गुणगुणतात व क्वचित गीतकारांच्या प्रतिभेलाही दाद देतात त्यांना गीतकाराचे नाव ठाऊक नसते वा ते माहित करुन घ्यावेसे वाटत नाही तिथं निर्माते, दिग्दर्शक वा अन्य मंडळींनी या जमातीकडे दुर्लक्ष केले तर नवल नाही. असो. हे सर्व सांगण्याचे कारण गीतकार शकिल बदायुनी… यांच्या ५० व्या सुवर्ण पुण्यतिथीची. कुणीही गांभिर्याने दखल घेतली नाही इतकेच होते.
उत्तर प्रदेशातील बदायुन गावात जन्मलेल्या अन काव्यशास्त्र विनोदाची कुठलीही कौटुंबिक वारसाहक्काने येणारी पूर्वपिठीका नसतानाही केवळ उर्दू भाषेवरील नितांत प्रेमामुळे त्यातील काव्य, हृदयाला भिडल्याने योगायोगाने हिंदी चित्रपटसृष्टीतील ख्यातनाम गीतकार बनलेले शकिलसाब हे उर्दूतील जानेमाने शायर होते. त्यांच्या वडिलांनी त्यांना उर्दू, अरेबिक हिंदी तसेच पर्शियन भाषेच्या सखोल शिक्षणासाठी या क्षेत्रातील तज्ञ शिक्षकाची लहानपणीच शिकवणी ठेवली होती. या भाषेचे शकील यांच्यावर झालेले संस्कार त्यांच्या शेरो शायरीतून मधाप्रमाणे स्त्रवले. १९३६ मध्ये अलिगड विद्यापीठातून बी ए ची पदवी घेऊन ते बदायुनीहून दिल्लीत गेल्यावर तिथे पोटासाठी पुरवठा अधिकारी म्हणून किरकोळ स्वरुपाचे काम करत असतानाच ते तेथील मुशाहि-यातून भाग घेऊन आपल्या शेरोशायरीतील प्रतिभेचा आविष्कार करत असत. शाळा-कॉलेजपासूनच काव्यशास्त्र विनोदाची जाण व आवड असलेल्या शकिल बदायुनीची लेखणी व प्रतिभा उर्दू साहित्यात विहार करू लागली. त्यांच्या शेराशायरीने या प्रांतातील भले भले शायर, जाणकार प्रभावित होऊ लागले. त्यांच्या या शायरीचा डंका दिल्लीतच नव्हे तर मुंबापुरीपर्यन्तही गेला. अन आपल्या पुढच्या वाटचालीचा विचार करुन त्यांनी आपले प्रस्थान मुंबईला केले. आपल्या प्रतिभेचे चीज झाले तर इथेच होईल या विश्वासाने ते मुंबापुरीत दाखल झाले. तेथील उर्दू मुशाय-यांममध्ये ते उत्साहाने शरिक होऊ लागले.
चित्रपटसृष्टीत प्रवेश करेपर्यन्त एक अत्यंत प्रतिभाशाली उर्दू शायर (Urdu Poet) म्हणून शकिल बदायुनी यांचे नावं देशभर झालेले होते परिणाम स्वरूप त्यांची एका अशाच मैफिलीत संगीतकार स्व. नौशाद आली यांच्याशी गाठ पडली. जे त्यांना निर्माता दिग्दर्शक ए. आर कारदार यांच्याकडे घेऊन गेले. कारदार त्यावेळी त्यांच्या नव्या ‘दर्द’ या चित्रपटासाठी जुळणी करत होते. त्यांनी फरमाईश केल्यावरुन शकील बदायुनी यांनी बसल्या बैठकीत एक नज्म कारदार यांना पेश केली “हम दर्द का अफसाना दुनियाको सुना देंगे, हर दिलमे मुहोबतकी एक आग लगा देंगे” त्यांच्या या प्रतिभेने प्रभावित झालेल्या कारदार यांनी दर्द साठी त्यांना गीतकार म्हणून मुकर्र केले. याच चित्रपटातून कारदार यांनी शकील बदायुनी यांच्याप्रमाणेच उमादेवी या होनहार गळ्याच्या गायिकेलाही पेश केले. दर्द मधील संगीतकार नौशाद यांनी संगीतबध्द केलेली आणि शकीलसाहेबांच्या लेखणीतून उतरलेली सर्व गाणी लोकप्रिय झाली. शमशाद बेगम व उमादेवी यांनी गायलेल्या या चित्रपटातील सर्व गाण्यांतून शकील घरोघरी पोहाचले. आणि सुरु झाला नौशाद शकिल यांच्या अजरामर, सुपरहिट जोडीचा न संपणारा सिलसिला. काव्यावर मनस्वी प्रेम करणारा हा कवी हा शायर आपल्या आयुष्याबद्दल कोणत्या शब्दात व्यक्त होतो ते बघा..
“मेरी जिंदगी है जालिम तेरे गमसे आशिकाना तेरा गम है दर हकिकत मुझे जिंदगी से प्यारा”
शकील बदायुनी एकसे बढके एक गीते लिहीत होते अन संगीतकार नौशाद त्यांना सुमधुर सदाबहार चाली लावत होते. हिंदी चित्रपटसृष्टीत तशा जोडया जमायला वेळ लागत नाही. मग ते कलाकार असोत, संगीतकार असोत वा गीतकार किंवा दिग्दर्शक राज-नर्गिस, शंकर-जयकिशन, सलिम जावेद, फत्तेलाल साहेबराव यांच्याप्रमाणेच नौशाद व शकील यांचीही जोडी जमली, गाजली अन लोकांना अतोनात भावलीही. दर्द नंतर दिदार, शबाब दुलारी, अमर अशा प्रत्येक चित्रपटागणिक शकिल यांची नौशाद यांच्याशी केमिस्ट्री बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवत असतानाच त्यांच्याकडे बैजुबावरा चित्रपट आला. निर्माता दिग्दर्शक स्व. विजय भट बैजू बावरा चित्रपटासाठी कवी प्रदीप यांना घ्यायच्या विचारात होते. पण नौशाद यांच्या आग्रहावरुन त्यांनी मनात नसताना शकील यांच्याकडे बैजु बावरा या मोगल पार्श्वभूमीवरील एका प्रख्यात हिंदू गायकावरील चित्रपटाची गाणी लिहीण्याची जबाबदारी सोपवली. शकिल यांनी आव्हान समजून लिहीलेल्या या चित्रपटातील गाण्यांनी इतिहास घडवला. शकील यांनी “भगवानका मंदिर है ये इन्सानका घर है, तू गंगाकी मौज मै जमानाकी धारा, यासारखी अस्सल हिंदू कवीलाही लाजवेल अशी काव्यरचना करून आपले नाणे वाजवून घेतले.
संगीतकार, गायक व गीतकार सर्व मुस्लीम असूनही त्यांनी या बैजूबावरा च्या लोकप्रितेमध्ये आपल्या कर्तृत्वाने जे चार चांद लावले ते ऐकून आजही आपला उर अभिमानाने भरुन येतो. असो. शकिल यांनी त्यांच्या कारकिर्दीत अंदाजे शंभरएक चित्रपटासाठी गीतलेखन केले. चित्रपटगीतांव्यतिरिक्त त्यांनी असंख्य गैरफिल्मी गझल लिहील्या. त्यांच्या या गैरफिल्मी गजल ज्येष्ठ गायिका बेगम अख्तर, पंकज उधास आदि गायकांनी अमर करुन ठेवल्या आहेत. त्यांचे काव्यसंग्रह अनेक पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. भारत सरकारने त्याने गीतकार ए आझम हा किताब देऊन त्यांच्या शायरीचा उचित गौरवही केलेला आहे. २०१३ च्या मे मध्ये भारत सरकारने शकिल बदायुनी यांच्या नावे पोस्टाचे तिकिटही जारी केले होते.
गीतकार शकिल यांचे नांव घेतले की संगीतकार नौशादच असणार हे आपण आज स्वप्नातही सांगू शकतो इतके समिकरण पक्के झाले होते. जवळपास ऐशी-नव्वद टक्के गाणी शकील यांनी नौशाद यांच्यासाठी लिहीली असली तरी त्याशिवाय त्यांनी संगीतकार गुलाम महंमद, रवी, हेमंतकुमार वा सचिनदेव बर्मन यांच्याही संगीतात आपल्या शेरोशायरीची चमक दाखवली आहे. संगीतकार रवी यांचे दो बदन, चौदहवीका चांद, घराना, गृहस्थी तर हेमंतकुमार बरोबर बिस साल बाद, बिन बादल बरसात, साहब बिबी और गुलाम तर सचिनदेव बर्मन यांच्याबरोबर कैसे कहू, बेनजिर. सी राम चंद्र यांच्याबरोबर जिंदगी और मौत, रोशन बरोबर बेदाग व नूरजहाँ, हे शकिल बदायुनीच्या गाण्यांनी गाजलेले काही उल्लेखनीय चित्रपट होय. रोमेंटिझम प्रेम आणि तत्वज्ञान ही त्यांच्या काव्याची प्रमुख वैशिष्ट्ये. त्यांच काव्य हृदयाला हात घालणारं असे. संगीतकार नौशाद, दिलीपकुमार, जॉनीवॉकर, संगीतकार रवी हे त्यांचे अत्यंत जीवलग मित्र होते ज्यांच्याबरोबर ते वेळ असेल तेंव्हा बॅडमिंटन वा पतंग उडवण्याचा शौक पूर्ण करत.
शकिल बदायुनी यांची संगीतकार नौशादसह रवी, गुलाम महंमद आदि संगीतकारांकडील अक्षरशः असंख्य गाणी केवळ लोकप्रियच नव्हे तर सदाबहार व अविस्मरणीय ठरले आहेत. त्यांच्या काव्यमय, रोमांटिक गीतलेखनाला फिल्मफेअर सारख्या मात्तबर संस्थेने एकदा दोनदा नव्हे तर तिनदा लागोपाठ उत्कृष्ट गीतकार म्हणून गौरव करून जणू कुर्निसातच केला आहे. १९६१ मध्ये चौदहवीका चांद मधील ‘चौदहवीका चांद हो…’ या गीताबददल १९६२ मध्ये गृहस्थी मधील ‘हुस्नवाले तेरा जबाब नही..’ या गीताबददल तर १९६३ मध्ये बीस साल बाद या चित्रपटातील ‘कही दिप जले कही दिल..’ या हॉण्टिग सॉंगसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट गीतकार म्हणून फिल्मफेअरने गौरवले आहे. आपल्या शेरोशायरीवर त्यांचे अतोनात पोटच्या मुलाप्रमाणे प्रेम होते. आपली शेरोशायरीशी नाळ किती खोलवर आहे हे सांगताना ते सांगत असत की, “मै शकील दिल का हूँ तर्जुमान, के मुहोब्बतका हूँ राजदान, मुझे फक्र है मेरी शायरी मेरी जिंदगी से जुदा नही…”
२० एपिल १९७० रोजी अल्लाला प्यारा झालेल्या गीतकार शकिल बदायुनी यांच्या निधनाला आज ५० वर्षे झालेली असली तरी आजही त्यांची गाणी रेडिओ वा दूरदर्शनवर कानी पडल्याशिवाय सूर्य मावळत नाही, अन त्यांच्या गीतांशिवाय सूर्य उगवत नाही..
- दिलीप कुकडे- मुक्त पत्रकार