
Jaya Bachchan : गुड्डी ते खासदार
अगदी कालपरवाचीच गोष्ट. एका चाहतीने आपल्यासोबत फोटो काढण्याची केलेली विनंती नाकारल्याने जया बच्चन (Jaya Bachchan) यांच्यावर सोशल मिडियातून बर्याच नकारात्मक प्रतिक्रिया उमटल्या. जया बच्चन यांचे या क्षणीचे वागणे अजिबात योग्य नव्हते यापासून अशा चाहत्यांच्या निस्सीम प्रेमाची निदान काही जाणीव ठेवण्यात यावी अशा अनेक प्रकारच्या उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त झाल्या.
जया बच्चन (Jaya Bachchan) यांच्याबद्दल असे काही घडणे नवीन नाही. रोझ मुव्हीज निर्मित “द्रोण” या चित्रपटाच्या एका पंचतारांकित हॉटेलमधील इव्हेंटमध्येही “हम हिंदी मे बात करेंगे” असे त्यांनी म्हटल्यावर मराठी मन विलक्षण दुखावले (आणि याच नाराजीचा फटका त्या चित्रपटाला बसला) यापासून त्या एकदा पाप्पाराझी फोटोग्राफर्सनाही उद्देशून काही बोलल्यावरही वाद उफाळला होता. समाजवादी पक्षाच्या राज्यसभेतील खासदार म्हणून Jaya Bachchan यांची मते हा आणखीन एक वेगळा विषय.

“गुड्डी” जया भादुरी ते आजच्या डिजिटल मिडियाच्या काळातील जया बच्चन यात फरक आहे. तो वयपरत्वे आहे की बर्यावाईट अनुभवातून आला आहे हा वेगळाच विषय. आपण ९ एप्रिल या वाढदिवसानिमित्त जया बच्चन यांना शुभेच्छा देवूयात. “अभिनेत्री” जया बच्चन (Jaya Bachchan) यांचा चाहतावर्ग खूपच आहे.
जयाजींच्या चित्रपटसृष्टीतील वाटचालीवर “फोकस” टाकायचा तर, जया भादुरी म्हटलं की, हृषिकेश मुखर्जी दिग्दर्शित ‘गुड्डी‘ (१९७१) आठवते, जया बच्चन म्हटलं की, हृषिकेश मुखर्जी दिग्दर्शितच ‘अभिमान‘ (१९७३) आठवायला हवाच,
अमिताभ बच्चनची पत्नी म्हटलं की, यश चोप्रा दिग्दर्शित ‘सिलसिला‘ (१९८१) आठवायला हवाच.
ऐश्वर्या राय म्हटलं की, तिची जया बच्चन (Jaya Bachchan) नावाची सासू आठवायला हवीच. फरक इतकाच की, ती पारंपरिक कौटुंबिक चित्रपटाप्रमाणे खाष्ट नाही. तरीही या दोघींचे फारसे काही पटत नाही अशी अधूनमधून कूरकूर, कुजबूज असतेच. त्या सेलिब्रिटीज असल्या तरी नाते सासू सूनचे आहे. अर्थात या नात्यातही गोडवा जपणारी उदाहरणे आहेत.
==============
हे देखील वाचा : म्हणून Divya Bharti अस्खलित मराठी बोलायच्या…
==============
पुणे शहरातील फिल्म ॲण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटमध्ये (FTII) अभिनयाचे प्रशिक्षण घेतले तरीही जया भादुरीचा अभिनय अगदी नैसर्गिक. ऋषिकेश मुखर्जी यांनी दूरदर्शन व चित्रपट अभिनय प्रशिक्षण केंद्रात जावून जया भादुरीची भेट घेऊन “गुड्डी” साठी निवड केली.
राज्यसभेतील चित्रपट कलाकार खासदार म्हटलं की, जया बच्चन (Jaya Bachchan) चेही नाव यायलाच हवं (सोबतच रेखाचेही येते हेही सांगायला हवे का? हे असं असते. एकदा जे पेरले जाते, ते वारंवार उगवते. चिकटून राहते.) पण जया बच्चन खासदार असली तरी राजकारणी नाही. जया भादुरी हिंदी चित्रपटसृष्टीत आली तो एक प्रकारचा हिंदी चित्रपटाच्या नायिकेचा चेहरा बदलण्याचा अथवा स्थित्यंतराचा काळ होता. (एखाद्या क्षेत्रात आपला प्रवेश नेमका कधी होतो हे खूप महत्त्वाचे असते हो. ही गोष्ट अनेकदा दुर्लक्षित का राहते?)
मीनाकुमारी, वहिदा रहेमान , वैजयंतीमाला, माला सिन्हा, नंदा, आशा पारेख, नूतन यांच्या कारकिर्दीचे ते दुसरे टोक होते. (उताराचा काळ होता असे म्हणणे बरे नाही. कारण त्यांनी अनेक प्रकारच्या भूमिकेतून आपला ठसा उमटवलाय.) तनुजा, सायरा बानू, शर्मिला टागोर, मुमताज, कुमकुम यांचाही बराच रुपेरी प्रवास झाला होता. हेमा मालिनी, लीना चंदावरकर, राखी, रेखा, बबिता अशा अगदी नवीन ग्लॅमरस आणि तजेलदार अभिनेत्रींचे आगमन झाले होते.
पाश्चात्य लूकची झीनत अमान आली होती, परवीन बाबी, आशा सचदेव, योगिता बाली येत होत्या. मौशमी चटर्जीही त्याच सुमारास आली. जया भादुरीचे सोबर व्यक्तिमत्व हिंदी चित्रपट आणि समाज अशा दोन्ही बाबतीत पारंपरिक वळणाचे, परंपरा, सभ्यता, संस्कृती जपणारे, पदर संस्कृतीचे आणि तीच तिची ताकद होती, तरी कदाचित…. कदाचित बदलत्या वातावरणात ती मर्यादाही ठरली असती. गाॅसिप्स मॅगझिनमधून बरेच काही खमंग प्रसिद्ध होत होते. हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकारांची लफडी, कुलंगडी रंगवून रंगवून खुलवून शिजवून पानभर/अंकभर प्रसिद्ध होत होती. (Entertainmnet mix masala)
ऋषिकेश मुखर्जी आणि Gulzar या दिग्दर्शकांच्या चित्रपटात जया भादुरी यांना हुकमी स्थान होते. याचे कारण म्हणजे, त्यांचे चित्रपट हे मध्यममार्गी स्वच्छ मनोरंजन करत (त्या काळाचा विचार करता मसालेदार मनोरंजक चित्रपट वा देमार चित्रपट आणि समांतर अर्थात नवप्रवाहातील चित्रपट, या दोन्हीच्या मधला चित्रपट). सत्तरच्या दशकातील हिंदी चित्रपट बहुस्तरीय होता. या काळात बरेच काही घडले. चित्रपटगृहावर अनेकदा हाऊसफुल्लचा फलक असे.

जया भादुरी (Jaya Bachchan)चा (जन्म. ९ एप्रिल १९४८ जबलपुर, मध्य प्रदेश येथे) “गुड्डी” चित्रपटातील साधेपणा, निरागसता प्रेक्षकांना एवढा भावला की बस्स.. आपल्या शेजारी रहाणा-या मुलीबद्दल जशी आत्मियता असते तशीच त्यांना प्रेक्षकांकडून मिळाली. खरं तर जया भादुरीला सर्वप्रथम बंगाली दिग्दर्शक सत्यजीत रे यांनी ‘महानगर‘ (१९६३) या चित्रपटात संधी दिली. तेव्हा तिचे वय पंधरा होते. त्यात तिने अनिल चटर्जी आणि माधबी मुखर्जी यांच्यासोबत भूमिका साकारली. त्यानंतर तिने Dhanyee Meye या आणखीन एका बंगाली चित्रपटात भूमिका साकारली.
Hrishikesh Mukherjee यांनी ‘सुमन‘ या बंगाली चित्रपटातील जया भादुरीचा अभिनय पाहिला आणि आपल्या ‘गुड्डी’ या चित्रपटासाठी शालेय विद्यार्थिनीची भूमिका दिली. यात तिचा नायक होता, समित भांजा. हा चित्रपट गाजला आणि जया भादुरीला लागलीच राजश्री प्रोडक्शनच्या ‘उपहार’ या चित्रपटात स्वरुप दत्तची नायिका बनण्याची संधी मिळाली. पारंपरिक पेहराव, सामान्य वागण्याने तिने प्रेक्षकांची मने जिंकली. मुंबईत या चित्रपटाचे मेन थिएटर ऑपेरा हाऊसमध्ये या चित्रपटाने रौप्यमहोत्सवी यश संपादले. असे यशच कलाकाराला एखादी प्रतिमा अर्थात इमेज देते आणि त्यानुसार नवीन चित्रपटात भूमिका मिळतात.
त्या काळात तर प्रामुख्याने इमेजच चालायची. जया भादुरी (Jaya Bachchan) ला असाच एक चित्रपट मिळाला, बासू चटर्जी दिग्दर्शित “पिया का घर”. यात अनिल धवन तिचा नायक होता. राजा ठाकूर दिग्दर्शित ‘मुंबईचा जावई’ (१९७०) या चित्रपटाची हा चित्रपट रिमेक होता. ग्रामीण भागातील युवती मुंबईतील युवकाशी लग्न झाल्यावर मुंबईतील चाळीत संसार थाटते त्यात तिची होणारी कुचंबणा असा सामाजिक विषय त्यात होता. त्या काळातील ते वास्तव आजही कायम आहे.

जया भादुरी (Jaya Bachchan) ची आता या चित्रपटांतून वाटचाल आकार घेऊ लागली. एकीकडे ती सोबर व्यक्तिरेखा साकारायची (गुलजार दिग्दर्शित ‘कोशिश’ हा मुका बहिरा नायक नायिका असलेला चित्रपट होता. संजीव कुमार तिचा नायक होता, तर ऋषिकेश मुखर्जी दिग्दर्शित ‘बावर्ची’ खेळकर, खोडकर कौटुंबिक चित्रपट), तसेच तिने काही मसालेदार मनोरंजक चित्रपटात भूमिका साकारल्या. (नरेंद्र बेदी दिग्दर्शित ‘जवानी दीवानी’मध्ये ती रणधीर कपूरची नायिका होती, तर चिन्नाप्पा देवरच्या ‘गाय और गौरी’मध्ये शत्रूघ्न सिन्हाची आणि रघुनाथ झालानी दिग्दर्शित ‘अनामिका’मध्ये संजीव कुमारची नायिका होती. गुलजार दिग्दर्शित ‘परिचय’मध्ये ती जितेंद्रची नायिका होती. अनिल गांगुली दिग्दर्शित ‘कोरा कागज’मध्ये ती विजय आनंदची नायिका होती. विशेष म्हणजे हे चित्रपट सुपर हिट ठरले.) यशाप्रमाणे काही चित्रपट फ्लाॅपही ठरले.
रणधीर कपूरसोबतचा दिल दिवाना, संजीव कुमारसोबतचा ‘नया दिन नयी रात, अनिल धवनसोबतचा ‘अन्नदाता’, डॅनी डेन्झोपासोबतचा ‘अभी तो जी ले’, (या चित्रपटातील या जोडीवरचे ये लाली है सवेरेवाली हे रोमॅन्टीक गाणे यू ट्यूबवर अवश्य पहा.) विजय अरोराबरोबरचा ‘फागून ‘रोमेश शर्मासोबतचा ‘दुसरी सीता’) याबरोबरच अमिताभ बच्चनसोबत तिने ‘एक नजर’, ‘बन्सी बिरजू’ या चित्रपटात भूमिका साकारताना ते खूप जवळ आले (या दोन्ही चित्रपटात तिचे मुजरा नृत्य आहे. जया भादुरीच्या इमेजला ते शोभणारे नव्हते. पण चित्रपटसृष्टीत कार्यरत राहण्यासाठी असेही चित्रपट आणि अशाही भूमिका स्वीकाराव्या लागतात.)
अमिताभलाच दिग्दर्शक प्रकाश मेहरा यांनी ‘जंजीर’ (१९७३) मध्ये निश्चित करावे म्हणून जया भादुरीनेच ‘समाधी’च्या सेटवर आग्रह वाढवल्याचे किस्से आहेत. त्याबरोबरच ऋषिकेश मुखर्जी दिग्दर्शित ‘अभिमान’मध्येही या दोघांना एकत्र येण्याची संधी मिळाली आणि ते असे व इतके एकत्र आले की, ‘अभिमान’चे शूटिंग संपले आणि ३ जून १९७३ रोजी ते विवाहबध्द झाले. जया भादुरी आता जया बच्चन झाली आणि काही दिवसातच रिलीज झालेला ‘जंजीर‘ सुपर हिट ठरला आणि अमिताभ बच्चन नावाचे वादळ जन्माला आले.

तेव्हा सेटवर या जोडीचा ऋषिकेश मुखर्जी दिग्दर्शित ‘चुपके चुपके’ होता तर ३ ऑक्टोबर १९७३ रोजी रमेश सिप्पी दिग्दर्शित सर्वकालीन सुपर हिट ‘शोले‘ (रिलीज १५ ऑगस्ट १९७५) चा मुहूर्त झाला. तो पडद्यावर येईपर्यंत जया बच्चन सिनेमापासून दूर जात जुहूच्या प्रतिक्षा बंगल्यात संसारात रमली आणि तो सांभाळतच तिने संजीव कुमार बरोबरचा ‘नौकर’ हा चित्रपट पूर्ण केला. तसाच तिचा एक विनोद मेहराबरोबरचा चित्रपट ‘आहट’ जवळपास वीस बावीस वर्षांनी पूर्ण होऊन प्रदर्शित झाला. दिग्दर्शक किशोर रेगे यांच्या अथक प्रयत्नानेच ते शक्य झाले. असेही अतिशय चिवट निर्माते या चित्रपटसृष्टीत आहेत. अमिताभप्रमाणेच संजीव -+कुमारसोबत जयाने सातत्याने भूमिका साकारल्या. अमिताभ बच्चन आणि जया बच्चन (Jaya Bachchan) यांची पहिली भेट पुण्याचा फिल्म अँड टेलीव्हिजन इन्स्टीट्यूटमध्ये झाली. त्यानंतर ते ‘गुड्डी’च्या सेटवर भेटले. त्यांची प्रेमकथा कायमच चर्चेत असते.

जया बच्चन (Jaya Bachchan) नी पत्नीची जबाबदारी उत्तम रितीने बजावल्यावर चरित्र भूमिकेतून आपल्या करियरची सेकंड इनिंग सुरु केली. तेव्हा गोविंद निहलानी दिग्दर्शित ‘हजार चौरासिकी माॅ’ (१९९८) या चित्रपटाचा मुहूर्त राजकमल कलामंदिर स्टुडिओत Amitabh Bachchan च्या शुभ हस्ते झाला, तेव्हा ‘पुनरागमनातील जयाचा आत्मविश्वास पहायला’ मी आवर्जून शूटिंग रिपोर्टीगसाठी हजर होतो. तेव्हा मधला काही काळ आपण कॅमेरासमोर नव्हतो असे जयाजींच्या एकूणच देहबोलीत कुठेच जाणवले नाही.
त्यानंतर जया बच्चननी फिजा, कभी खुशी कभी गम, कल हो ना हो, द्रोण, लागा चुनरी मे दाग वगैरे चित्रपटात भूमिका साकारली. अगदी बांगलादेशी चित्रपट ‘मेहेरजान ‘मध्ये व्हीक्टर बॅनर्जीसोबत भूमिका साकारली. एव्हाना अभिषेक बच्चनही अभिनय क्षेत्रात आला. आज बच्चन परिवार म्हणजे जगातील ग्लॅमरस, वलयांकित, बहुचर्चित प्रसिद्ध आणि श्रीमंत परिवार असे घट्ट समीकरण असून जया बच्चन (Jaya Bachchan) त्याचा मजबूत कणा आहे. “बच्चन फॅमिली” ही आदर्श गोष्ट आहे. त्यांच्यातील नातेसंबंध ही एक छान बांधणी आहे. जुहू परिसरातील या कुटुंबाचे प्रतिक्षा, जनक, जलसा हे बंगले असा हा विस्तार आहे.
आता तुम्हालाही माहीत आहे, सुसंस्कृत अमिताभच्या आयुष्यातील एकाच वेळेस नाजूक आणि अवघड प्रकरण म्हणजे रेखा! तो दोन मुलांचा (अभिषेक आणि श्वेता) पिता आणि प्रतिष्ठित बच्चन कुटुंबातील सुपुत्र असूनही रेखामय कसा बरे झाला यावर त्या काळात उभे आडवे, तिरके, वाकडे असे बरेच काहीना काही लिहिले गेले (त्यात तथ्य किती हे कधीच समोर आले नाही. पण वेगळं प्रकरण नक्कीच होते.) आणि त्यात जया बच्चनची अवस्था विचित्र होती. सुपर स्टारची पत्नी असल्याचा आनंद होता तरी तोच सुपर स्टार विवाहबाह्यसंबंधात रुतलाय हेही पचवायचे होते.

यश चोप्रा दिग्दर्शित ‘सिलसिला’ (१९८१) हा चित्रपट याच सगळ्या नातेसंबंधाची स्टोरी असल्याचा गाॅसिप्स मॅगझिनचा विलक्षण गवगवा होता. प्रत्यक्षात हा चित्रपट बी. आर. चोप्रा दिग्दर्शित ‘गुमराह’ची रिमेक होती. (पण मूळ चित्रपटातील नाट्य नि उत्कंठता हरवली होती. जया आणि रेखा ‘सिलसिला’मध्ये अमिताभच्या नायिका होत्या इतकीच नोंद राहिली. या सगळ्या गदारोळात अमिताभ म्हटलं की जयाबरोबरच रेखाही सहज आठवते हो. (या नात्यावर, गाॅसिप्सवर एकादे पुस्तक वा वेबसिरीज नक्कीच होईल. काय हरकत आहे?)
त्या बीग बीची पत्नी असल्या तरी त्यांचं आपलं स्वतंत्र व्यक्तीमत्व आहे, ओळख आहे आणि ते कायमच अधोरेखित होत असते. कौन बनेगा करोडपती या पंचवीस वर्ष लोकप्रिय राहिलेल्या खेळात अनेकदा तरी अमिताभ बच्चन यांनी संसारातील गोष्टी सांगितल्यात.
==============
हे देखील वाचा : Dada Kondke यांचे हिंदीतील पहिलेच पाऊल ज्युबिली हिट
==============
त्या एका विश्व सुंदरीची सासू असल्या तरी त्यांचं आपलं एक वैशिष्ट्य आहे. त्या एक दोनदा नव्हे तर पाचवेळा समाजवादी पक्षाच्या वतीने उत्तर प्रदेशातून राज्यसभेत खासदार म्हणून निवडून आल्या तरी त्यांची आपली स्वतःची मते आहेत, त्यांना सामाजिक जाणीव आहेत. सर्वप्रथम त्या २००४ साली खासदार झाल्या. तेव्हा त्यांना फक्त दोन वर्षांचा कालावधी मिळाला. त्यानंतर २००६ ते २०१०, मग २०१० ते २०१२ आणि २०१८ ते २०२२ आणि आता २०२३ ते २०२८ असा प्रवास सुरु आहे. महत्वाचे म्हणजे, इतका काळ ‘दिल्लीतील सत्तेच्या राजकारणात’ राहूनही त्या राजकारणी झाल्या नाही. त्या हिंदी सिनेमाच्या जगात तब्बल पंचावन्न वर्षे वावरुनही फिल्मी झाल्या नाहीत. अनेकदा तरी त्या सामाजिक गोष्टींवर आपलं मत सडेतोडपणे व्यक्त करत असतात.
जया बच्चनचा (Jaya Bachchan) एकदा मराठी चित्रपटाशी संबंध आला. अमिताभचे मेकअपमन दीपक सावंत यांनी “आक्का” (१९९४) या मराठी चित्रपटाची निर्मिती केली तेव्हा अमिताभ आणि जयाजींनी या चित्रपटात श्रीगणेश भक्तीचे गीत ‘तू जगती अधिपती नमन तुला पहिले श्री गणपती’ हे साकारले. गोरेगावच्या चित्रनगरीत याचे शूटिंग झाले होते. त्यानंतर याच चित्रपटाच्या ध्वनिफिती प्रकाशनाचा सोहळा जयाजींच्या शुभ हस्ते जुहूच्या एका पंचतारांकित हाॅटेलमध्ये पार पडला तेव्हा वयात येत असलेला अभिषेक बच्चनही हजर होता. एक म्हणजे, अभिषेकला पहिल्यांदा मी तेथे पाहिले आणि जया बच्चनला मराठी बोलता येते हेही यानिमित्ताने लक्षात आले..
अशी एक वेगळी आठवण सांगतच जया बच्चन (Jaya Bachchan) यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा… अर्थात, त्यांच्या एखाद्या क्षणातील वागण्या बोलण्यातून वाद निर्माण होत राहिले तर त्यात आश्चर्य नाही. आज कशाचीही बातमी होण्याचा काळ आहे म्हटल्यावर ते दररोज होणार आणि दुसरा दिवस उजाडल्यावर मागे पडणार.. पण जया बच्चन यांचे रुपेरी पडद्यावरील अभिनय क्षेत्रातील काम सिंगल स्क्रीन थिएटर्स अर्थात एक पडदा चित्रपटगृह ते ओटीटी असे पाहिले जात आहे. मग तो चित्रपट “गुड्डी” असो वा “कोशिश”…