
Sai Paranjpye यांच्या चित्रपटासाठी किशोर कुमार यांनी कलात्मक गाणे गायले!
सत्तर आणि ऐंशीच्या दशकामध्ये भारतीय सिनेमात कलात्मक चित्रपटांचा एक समांतर प्रवाह मोठ्या वैशिष्ट्यपूर्ण रीतीने प्रेक्षकांच्या भेटीला येत होता. या कलात्मक चित्रपटांचे बजेट खूप कमी असायचं पण त्याचा आशय आणि प्रभाव खूप मोठा आणि दीर्घकाळ प्रेक्षकांच्या मनात राहणारा असायचा. या चित्रपटातून प्रेक्षकांना दिला जाणारा मेसेज खूप महत्त्वाचा असायचा. हे सिनेमे वास्तवदर्शी तर असायचेच शिवाय समाजातील कटू सत्य देखील अधोरेखित करणारे असायचे. या काळात शाम बेनेगल, गोविंद निहलांनी, गौतम घोष, अदुर गोपाल कृष्णन, सई परांजपे (Sai Paranjpye), ऋषिकेश मुखर्जी, बासू चटर्जी, बासू भट्टाचार्य यांनी ॲक्शनच्या जमान्यात देखील हटके असे सिनेमे दिले. ज्या सिनेमांना प्रेक्षकांनी चांगली पसंती दिली.

निशांत, आक्रोश, स्पर्श, सारा आकाश, गोधुली, अविष्कार, भूमिका, २७ डाउन… या आणि अशा कलात्मक चित्रपटांमध्ये फार गाजलेले कलावंत नसायचे पण यातील बव्हंशी कलाकार हे रंगभूमीवरून आल्या असल्यामुळे त्यांचा अभिनय सक्षम असायचा. या चित्रपटांचे बजेटच कमी असल्यामुळे चित्रपटाच्या प्रत्येक गोष्टींवर लिमिटेड खर्च करावा लागत असे. दिग्दर्शिका सई परांजपे (Sai Paranjpye) यांनी १९८२ साली ‘कथा’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या समोर आणला. मध्यमवर्गीय आयुष्य जगणाऱ्या चाळीतील समाजजीवन खूप चांगल्या रीतीने या सिनेमात दाखवलं होतं. मराठी संस्कृती, चाळीतलं सहजीवन, इथली स्वप्ने, परस्परांविषयी असलेलं प्रेम. फार चांगल्या पद्धतीने यात मांडलं होतं. या चित्रपटाला संगीत राज कमल यांनी दिलं होतं. चित्रपटातील सर्व गाणे रेकॉर्ड झाली होती.
फक्त एक गाणं अजून रेकॉर्ड व्हायचं होतं. गीतकार इंदू जैन यांनी हे गाणं लिहिलं होतं. ते गाणं चित्रपटात कोणत्याही कलाकारावर चित्रित होणार नव्हतं. पण दीप्ती नवल आणि नसिरुद्दीन शहा यांच्यातील अव्यक्त प्रेम दर्शवणारा हे एक भावस्पर्शी गाणं होतं. गाण्यातील आशय खूप गंभीर होता. हे गाणं किशोर कुमार यांनी गाव असं सई परांजपे (Sai Paranjpye) यांना वाटलं. पण चित्रपटाचे निर्माते म्हणाले की, “सिनेमाचं बजेट खूप कमी आहे. किशोर कुमारसारखा मोठा गायक आपल्याला परवडणार नाही!” पण तरी ही सई परांजपे किशोर कुमार यांना भेटायला गेल्या आणि त्यांना वस्तुस्थिती सांगितली. ‘आपल्याला एका कलात्मक चित्रपटासाठी गायला मिळते आहे’ हे ऐकून किशोर कुमार खूप खूश झाले. कारण त्या काळात ते फक्त कमर्शियल सिनेमातच गात. होते आर्ट फिल्मची महती त्यांना माहीत होती. परंतू आजवर त्यांना कोणीही आर्ट सिनेमामध्ये गाणे गाण्यासाठी बोलावले नव्हते.

त्यामुळे जेव्हा Sai Paranjpye यांनी त्यांना विचारले त्यावेळेला ते खूप खुश झाले. पण ते सईला म्हणाले, ”मी तुमच्या चित्रपटात नक्की गाईन. फक्त माझी एक अट आहे!” सई परांजपे घाबरल्या. त्यांना वाटलं की आता किशोर कुमार त्यांचं मानधन सांगतील आणि ते आपल्याला अजिबात परवडणार नाही! त्यांनी घाबरतच विचारले, ”काय अट आहे ?” त्यावर किशोर कुमार हसत म्हणाले, ”या सिनेमात मी गाणं गाईन. फक्त माझी एक अट आहे. या गाण्यासाठी मी एक रुपया देखील मानधन घेणार नाही!” सई परांजपे यांना तो सुखद धक्का होता.
त्यांनी कारण विचारले असता किशर कुमार म्हणाले की, ”या चित्रपटातील गाण्यासाठी तुम्ही मला विचारलं; हाच मी माझा मोठा गौरव समजतो. कारण आजवर मला कोणत्याही आर्ट सिनेमामध्ये गाण्यासाठी कोणीही बोलावले नाही. आपल्या सिनेमात मला गायला मिळते आहे हे मी माझे भाग्य समजतो. त्यामुळे माझी ही जर अट मान्य होत असेल तरच मी गाणे गाईन!” अट मान्य न करण्याचा प्रश्नच नव्हता. किशोर कुमार रेकॉर्डिंगला आले आणि एका टेकमध्ये त्यांनी हे सुमधुर गीत गायले. (Sai Paranjpye)
================
हे देखील वाचा : तेरी दुनिया से दूर चले होके मजबूर – Mahipal
================
गाण्याचे बोल होते ‘मैने तुमसे कुछ नही मांगा…’ हे गाणे भलेही आज विसरलेले असले आणि ऐंशीच्या दशकातील किशोर कुमारच्या लोकप्रिय गाण्यांपैकी एक नसेल तरी पण कलात्मक सिनेमांमध्ये किशोर कुमारने धीर गंभीर गायलेलं हे गाणं रसिकांना त्या काळात खूप आवडले होते हे नक्की. हे गाणे हा सिनेमा युट्यूब वर उपलब्ध आहे. नक्की ऐका. किशोर कुमारच्या कंजूषपणाच्या अनेक कपोलकल्पित कथा समाजमाध्यमावर फिरत असतात. पण त्याला छेद देणारा हा किस्सा आहे.