वेबसिरीजला LGBT बोल्ड सीन्सचा तडका खरंच आवश्यक आहे का?
सध्याच्या काळात ओटीटी प्लॅटफॉर्ममुळे प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचं एक नवीन द्वार खुलं झालं आहे. वेगवेगळ्या विषयांवर वेबसिरीज तयार होत असतात. यात बोल्ड सीन्स, अश्लील भाषा, शिव्या हे प्रकार असतात हा भाग वेगळा, पण काही वेबसिरीजमध्ये समलिंगी संबधांचाही पुरस्कार केला जातोय. हा पुरस्कार करण्यावर अजिबात आक्षेप नाही. पण तो ज्या पद्धतीने केला जातोय ते खटकतंय. कथानकाची गरज नसताना त्यामध्ये विनाकारण समलिंगी संबंधांची दृश्य दाखवली जातात. यामुळे या समूहाबद्दल समाजामध्ये अनेक गैरसमज निर्माण होत आहेत. (LGBT Bold Scene and Indian Web Series)
LGBT म्हणजेच लेस्बियन, गे, बायसेक्सयूअल, ट्रान्सजेंडर. सप्टेंबर २०१८ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने आयपीसीच्या कलम ३७७ मधील LGBT संदर्भातील तरतूद कालबाह्य ठरवून रद्द केली आणि या समूहाबद्दल नव्याने चर्चा सुरु झाली. न्यायालयाच्या निर्णयावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली असली तरी कायद्याच्या दृष्टीने विचार करता हा निर्णय योग्यच होता.
वेबसिरीज असो किंवा चित्रपट या माध्यमातून LGBT समूहाच्या समस्या लोकांसमोर मांडणं, या समूहाबद्दल लोकांच्या मनात असणारा राग, तिरस्कार दूर करण्यासाठी प्रयत्न करणं अपेक्षित असताना प्रत्यक्षात तसा प्रयत्न क्वचितच होताना दिसतोय. उलट अशा प्रकारचे संबंध कथानकाची गरज नसताना विनाकारण दाखवले जात आहेत. यामधून या समूहाच्या समस्यांवर चर्चा करणं हा उद्देशच नसतो. सिरीजमध्ये बाकीच्या ‘बोल्ड सीन्स’सोबत LGBT समूहाचा खास करून ‘लेस्बियन बोल्ड सिन’चाही तडका मारण्यात येतो.
चित्रपटांमधून अनेकदा कथानकाची गरज या कारणास्तव ‘बोल्ड’ दृश्य दाखवली जातात, पण चित्रपटांना सेन्सॉरशिप असल्यामुळे तिथे अनेक मर्यादा येतात. पण वेबसिरीजला सेन्सॉरशिपचा प्रश्नच येत नसल्यामुळे त्यामध्ये काहीही दाखवावं, असा जणू एक प्रघातच पडला आहे. त्यामुळे कथानकाची गरज असो किंवा नसो, आजकाल बहुतांश वेबसिरीजमध्ये ‘अशाप्रकारचे’ बोल्ड सिन आवर्जून दाखवले जातात. (LGBT Bold Scene and Indian Web Series)
काही वर्षांपूर्वी आलेल्या ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ या वेबसिरीजमध्ये प्रिया बापटने असाच एक लेस्बियन बोल्ड सिन दिला होता. अर्थात तो ‘कथानकाची गरज’ या टिपिकल कारणाखाली खपूनही गेला. मात्र ही गरज नसतानाही अनेक वेबसिरीजमध्ये अशी दृश्य दाखवण्यात येतात. अलीकडेच प्रदर्शित झालेल्या ‘गिल्टी माईंड’ या वेबसिरीजमध्ये लेस्बियन बोल्ड सीन दाखवण्यात आले आहेत. खरंतर यामध्ये कथानकाची गरज म्हणाल, तर ती अजिबातच नव्हती.
१९९६ साली आलेला फायर चित्रपट कोणाला आठवत असेल, तर त्यामध्ये पतीकडून लैंगिक सुख न मिळाल्यामुळे ‘लेस्बियन’ झालेल्या दोन स्त्रियांची कहाणी मांडण्यात आली होती त्या काळात या चित्रपटांच्या कथेने ‘सनसनाटी’ निर्माण केली होती. या चित्रपटाविरोधात अनेक तक्रारी दाखल झाल्या होत्या. अर्थात तो काळ वेगळा होता. सध्याच्या काळात अशा विषयासाठी तक्रारी वगैरे दाखल होत नाहीत कारण कायदा बदलला आहे आणि LGBT समूहाकडे बघण्याचा दृष्टिकोनही काही प्रमाणात बदलला आहे. पण हे जरी खरं असलं तरी अद्यापही अशा व्यक्तींना समाज स्वीकारत नाही; त्यांना समाजात मानाचं स्थान मिळत नाही, हे देखील तितकंच खरं आहे. (LGBT Bold Scene and Indian Web Series)
LGBT समूहाची मानसिकता, त्यांची जडणघडण त्यांच्या समस्या यासारखे अनेक पैलू वेबसिरीजद्वारे उलडून दाखवणं सहज शक्य आहे. या समूहाला समाजाने स्वीकारावं, त्यांच्याबद्दलचे गैरसमज दूर व्हावेत यासाठी या माध्यमातून प्रयत्न करता येतील; पण इथे कोणाला कशाशीच देणंघेणं नाही. उलट ‘अशा’ बोल्ड सीन्सचं समर्थन करण्यासाठी दोन चार ‘डायलॉग्ज’ कलाकारांकडून वदवून घेऊन या समूहाबद्दल सहानुभूती दाखवली की झालं, संपली जबाबदारी…आम्ही जागृती करतोय असं अगदी बिनधास्त सांगता येईल… सगळाच दिखाऊपणा.
अर्थात काही वेबसिरीज याला अपवाद आहेत. यामध्ये आवर्जून उल्लेख करायला हवा तो २०१६ साली प्रदर्शित झालेल्या ‘द अदर लव्ह स्टोरी’ या वेबसिरीजचा. ‘द अदर लव्ह स्टोरी’ या वेबसिरीजमध्ये LGBT समूहाच्या समस्या प्रभावीपणे मांडण्यात आल्या नसल्या तरी ही वेबसिरीज या समूहाबद्दल लोकांच्या मनात असणारा तिटकारा दूर करून ‘सॉफ्ट कॉर्नर’ नक्की निर्माण करते. ही भारतातील पहिली लेस्बिअन वेबसिरीज आहे. (LGBT Bold Scene and Indian Web Series)
सोशल मीडियावर LGBT समूहाची उघड उघड टिंगल टवाळी केली जाते; अर्वाच्च भाषेत त्यांना ट्रोल केलं जातं. एकीकडे कोणत्याही विषयावर व्यक्त होताना मनाला वाट्टेल तसं बेताल लिखाण करताना व्यक्तिस्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, मूलभूत अधिकार अशा मोठ मोठ्या शब्दांचा आधार घेतला जातो, तर दुसरीकडे LGBT समूहाच्या बाबतीत मात्र व्यक्तीस्वातंत्र्य, मूलभूत अधिकार वगैरे गोष्टींचा अनेकांना सोईस्करपणे विसर पडतो. जणू या लोकांना व्यक्तिस्वातंत्र, मूलभूत अधिकार नाहीतच…या गोष्टींवरही वेबसिरीजमध्ये प्रकाश टाकायला हवा. पण नाही…आम्हाला LGBT समूह फक्त बोल्ड सीन्सपुरताच महत्त्वाचा आहे.
==========
हे देखील वाचा – सुरभी भावे – लहान वयातच एकामागून एक संकटे आली, पण मी हार मानली नाही…
=========
वेबसिरीज मधल्या अशा दृश्यांना भरभरून प्रतिसाद देणारा प्रेक्षकवर्ग आहे म्हणूनच ती दाखवली जातात, हा मुद्दाही अगदीच दुर्लक्षित करून चालणार नाही. पण कसं आहे ना चित्रपट, मालिका, वेबसिरीज हे फक्त मनोरंजनाचे पर्याय नाहीयेत, तर त्यामधून समाजप्रबोधन करणं, किमान त्याचं भान असणं आवश्यक आहे. ते भान कितीजण ठेवत असतील, हा संशोधनाचाच मुद्दा आहे.