चॉकलेट बॉय आता झाला व्हिलन..
प्रेक्षकांच्या मनात घर करून राहणारा अतिशय गुणी अभिनेता म्हणजे शशांक केतकर.(Shashank Ketkar) आतापर्यंत नवरा, मुलगा, जावई, मित्र, प्रियकर अशी अनेक नाती, आदर्श कशी असावीत हे नेहमीच त्याने आपल्या अभिनयातून दाखवलं. पण आता ‘पाहिले न मी तुला’ (Pahile Na Me Tula) या सिरीअल मध्ये त्याची समरप्रताप जहागीरदार ही भूमिका त्याला व्हिलनच्या वाटेवर नेऊन ठेवते आहे, म्हणूनच म्हणावसं वाटतं की असे आधी पाहिले न मी तुला…
१) चॉकलेट बॉय ते व्हिलन या प्रवासाबद्दल काय सांगशील? निगेटीव्ह कॅरॅक्टर करण्याची पहिलीच वेळ आहे का?
मुळात एखादी भूमिका मला प्रेक्षक म्हणून आवडली तरच मी त्यात ऍक्टर म्हणून इन्व्हॉल्व्ह होतो. व्हिलन मी पहिल्यांदा करतोय अशातला भाग नाही पण हो, टेलिव्हिजन साठी पहिल्यांदा करतोय. कारण कुसुम मनोहर लेले या नाटकात मी ग्रे शेड भूमिका साकारली आहे. व्हिलन करताना मजा येते. व्हिलन करणं अवघड आहे तितकच पॉझिटीव्ह भूमिका करणं अवघड आहे. प्रेक्षकांना सतत प्रेमात पाडणं अवघड आहे कारण एका पॉईंटला येणारा तोचतोचपणा जाणवू न देता, मालिकेतील प्रेम फ्रेश ठेवणं गरजेचं असतं. व्हिलन पण तेवढाच pivotal रोल आहे कारण मेणबत्तीचं महत्व तेव्हाच जेव्हा अंधाराचं अस्तित्व. गेल्या दहा वर्षात प्रेक्षकांनी त्यांच्या घरात, मनात मला हिरो म्हणून स्थान दिलंच आहे पण आता मला एक अँटि हिरो प्ले करून पाहायचं होतं. त्यातून ऍक्टरची व्हर्सेटॅलिटी दिसते म्हणून मी समर प्रताप हा रोल स्विकारला.
२) समर प्रताप जहागीरदार या कॅरॅक्टर साठी काय विशेष मेहनत घेतलीस? या लूक बद्दल तुझ्या फॅन मध्ये खूप चर्चा आहे.
मी या लुकसाठी केस वाढवले, अजून वाढवत आहे आणि त्या शिवाय मला नेहमी ही प्रतिक्रिया मिळते की मी डोळ्यातून खूप बोलतो. रोमँटीक सीन म्हटलं की डोळ्यातून एक वेगळं भावविश्व उभं करावं लागतं तर व्हिलन म्हटलं की एक नजर सुद्धा पुरेशी असते. त्या नजरेतून खूप काही कळतं. समोरच्या अभिनेत्रीलासुद्धा आणि प्रेक्षकांनासुद्धा. तर त्यावर कसं काम करता येईल ते पाहतोय. समर सारखा शशांक केतकर म्हणून मी नाही. त्यामुळे हि भूमिका करायला मजा येतेय. आपल्यात दडलेली अनेक कॅरॅक्टर असतात. त्यातले कप्पे कधी उघडायला मिळतात हे एक ऍक्टर बघत असतो. मी असं म्हणू शकतो माझं निरीक्षण चांगल आहे, त्यामुळे आजूबाजूला जी माणसं पटकन चिडतात, विचित्र वागतात ते मी पाहतो आणि टिपून ठेवतो. जे समरचं कॅरॅक्टर करण्यासाठी उपयोगी ठरतंय.
३) या सिरीअलच्या कॅरॅक्टर साठी प्रेक्षकांकडून येणारया प्रतिक्रिया किंवा दाद कशी आहे?
एकतर प्रेक्षक प्रचंड उत्सुक आहेत. सगळया कमेंट्सचा सूर एकच आहे की, तुझे डोळे सगळं काही सांगतात. मनूकडे पाहताना तुझ्या डोळ्यातून कळतं तुला काय सांगायचं आहे. एक कमेंट अशी वाचली की, अहो सर ३१ मार्च आलाय, आम्हाला आमच्या बायकोला द्यायला वेळ नाही तुम्हाला मनूच्या पाठी फिरायला बरा वेळ आहे. तुमच्या ऑफिस मध्ये नोकरी द्या. अशा इंटेलेक्चुअल कमेंट्स, ट्रॉलिंग पेक्षा जास्त आवडतात.
४) हे कॅरॅक्टर स्वीकारतांना प्रेक्षक आपल्याला अशा रूपात छोट्या पडद्यावर स्विकारतील का अशी भीती होती?
नाही अजिबात नाही. कारण आता आपला प्रेक्षकवर्ग खूप सुज्ञ आहे. त्यांना वेगवेगळ्या ऍक्टर कडून वेगवेगळा कन्टेन्ट पाहायचा असतो. त्यामुळे मला असं वाटतं की लोकांना माझ्याकडून वेगळं बघायचं असेल. मला माझ्यावर भूमिकेत तोचतोचपणा आणून कुठलाच शिक्का बसवायचा नाही. मालिका चालू असली तरी मी वेगळ खूप काही करत असतो. आणि शशांक केतकर खूप वेगवेगळ्या भूमिका करू शकतो हे मला अभिनयातून पोहोचवायचं आहे.
५) तुला तुझी आवडलेली भूमिका कोणती?
खरं तर असं सांगणं म्हणजे स्वतःच स्वतःच कौतुक करण्यासारखं आहे. एक नाटक होतं अबालाल अडकित्ते आणि मुमताज महल नावाचं. त्याचं स्क्रिप्ट आणि भूमिका मला फार आवडली होती. त्या नाटकाचं दुर्दैवाने पुढे काही घडलं नाही पण घडायला हवं असं अजूनही मला वाटतं. कारण त्या नाटकाच्या प्रत्येक प्रयोगानंतर मी पुढचे दोन तीन तास एक्सहॉस्ट असायचो. इतके भयानक इमोशनल कंगोरे त्या नाटकाला होते.
६) तुझा अभिनय क्षेत्राचा प्रवास पाहता तुझ्या यशाचा ग्राफ उंचावताना दिसतो. या यशाचं नेमकं रहस्य काय आहे ?
यशस्वी किती हे सांगण सब्जेक्टिव्ह आहे. पण जे काही आतापर्यंत मिळवू शकलोय ते सगळं आईवडिलांच्या संस्कारामुळे आणि बायकोच्या प्रेमामुळेच आहे. आणि दुसरं म्हणजे कामाविषयी असलेला प्रामाणिकपणा असं मला वाटतं. बरेच कलाकार मी असे पाहिले आहेत की प्रेक्षकांचं जरा प्रेम मिळालं की वेगळ्या ट्रॅक वर जातात आणि ग्रीप सुटते पण मी ती सुटू न देता कायम रिऍलिटी चेक करत राहतो. आज जे हे प्रेम आहे ते तात्पुरतं आहे माझं नाटक, फिल्म, सिरीअल बंद झाली की माझी जागा घेणारं दुसरं कोणी असेल. हे स्वतःला सांगत राहिलं की, काम नसेल, फ्लॉप झालं तरी फारसा त्रास होत नाही. आणि दुसर म्हणजे मी लोक रिलेट करतील असंच काम नेहमी करतो.
७) आगामी प्रोजेक्ट बद्दल काय सांगशील?
प्लॅनेट मराठीसाठी एक वेबसिरीज केली आहे. मृण्मयी देशपांडे, अभिजित खांडकेकर असे सहकलाकार सोबत आहेत. या वेबसिरीमध्ये असा विषय मांडलाय ज्यावर मराठीत पहिल्यांदा भाष्य केलं जाणार आहे. हा विषय आजच्या तरूण पिढीसाठी २१ व्या शतकात खूप महत्त्वाचा आहे. मी वाट पाहतोय वेबसिरी रिलिज होण्याची कारण मराठीत अशा वेबसिरीज फार कमी आहेत.
-सिध्दी सुभाष कदम