प्रेम… प्रेम नाम है मेरा… प्रेम चोप्रा
राज कपूर दिग्दर्शित “बाॅबी”चा क्लायमॅक्स जवळ जवळ येत चालला होता, राजा ( ऋषि कपूर) आणि बाॅबी ( डिंपल कपाडिया) आपापल्या घरातून पळून इकडे तिकडे धावताहेत आणि अशातच एका ठिकाणी अनपेक्षितपणे एक जण लोभी, कपटी भाव चेहऱ्यावर आणत म्हणतो, प्रेम नाम है मेरा… प्रेम चोप्रा ही… ही.. ही… बोलता बोलता छद्मी हसतो आणि सिनेमात रोमांचित क्षण येतो…
‘बाॅबी’ ( १९७३) मध्ये प्रेम चोप्राची एन्ट्री तशी खूपच उशिरा आणि अनपेक्षितपणे होते आणि मग अपेक्षेप्रमाणे त्याला आणि त्याच्या गॅन्गला बेदम मारहाणही होते. ‘बाॅबी’ खणखणीत यशस्वी ठरताना अन्य अनेक गोष्टींसह ‘प्रेम नाम है मेरा’ देखिल सुपर हिट झाले, इतके आणि असे की काही वर्षांनंतर ‘प्रेम नाम है मेरा… प्रेम चोप्रा’ या नावाचे नाटकही संजय मोने यांनी मराठी रंगभूमीवर आणले आणि शुभारंभाच्या प्रयोगाला शिवाजी मंदिरला खुद्द प्रेम चोप्रा हजर राहिला….
खरं तर प्रेम चोप्राच्या करियरला चक्क ६० वर्षे पूर्ण झाली. त्याची भूमिका असलेले ‘मुड मुड के ना देख’, ‘चौधरी कर्नलसिंग’ आणि ‘हम हिन्दुस्तानी’ हे तीनही चित्रपट १९६० साली प्रदर्शित झाले. त्या काळात प्रेम चोप्रा टाईम्स ऑफ इंडिया ग्रुपच्या दक्षिण मुंबईतील कार्यालयात टाईम सेक्शनमध्ये नोकरी करीत होता. अधेमधे सुनील दत्तची डमी अथवा पाठमोरे प्रसंग त्याच्या वाटेला येत. साठच्या दशकात चित्रपट निर्मितीचे प्रमाण आस्ते कदम होते
त्यामुळे प्रेम चोप्राच्या करियर वेग येणे शक्य नव्हते. एस. रामशर्मा दिग्दर्शित आणि केवल कश्यप निर्मित ‘शहीद’ मध्ये सुखदेव ही व्यक्तिरेखा साकारलीय. राज खोसला दिग्दर्शित ‘वह कौन थी’ पासून तो खलनायक झाला आणि मग मनोजकुमार दिग्दर्शित ‘उपकार’ ( १९६७), राज खोसला दिग्दर्शित ‘दो रास्ते’ ( १९६९) या दोन्ही चित्रपटाच्या यशाने प्रेम चोप्रा व्यवस्थित स्थिरावला. टाईम्समधूनही एव्हाना बाहेर पडला होता. खरं तर राज कपूरची पत्नी कृष्णा कपूर ही मेव्हणी तर प्रेमनाथ, राजेन्द्रनाथ आणि नरेंद्रनाथ यांच्या पत्नी म्हणजे प्रेम चोप्रा यांच्या बहिणी. असा नातेगोतावळा असला तरी त्यामुळे फार तर संधी मिळेल, पण स्वतःला सिद्ध करावे लागते तरच “सिनेमाच्या जगात” निभाव लागतो.
प्राणने ‘उपकार’ पासून चरित्र भूमिकांकडे मोर्चा वळवल्याने प्रेम चोप्राला करियर लिफ्टसाठी चांगली संधी मिळाली, पण त्याच सुमारास एकेकाळचे हीरो अजितने ‘सूरज’ पासून तर प्रेमनाथने ‘जाॅनी मेरा नाम’ पासून जबरा डेंजरस व्हीलनगिरी सुरु केली आणि अर्थातच प्रेम चोप्राला पडद्यावर पापं करायला जास्त कपटीपणा करावा लागला.
स्पर्धेत टिकायचे तर भूमिकेत रंग भरायला हवाच. जीवन, मदन पुरी यांचा जम बसला होता, मनमोहन , टकलू शेट्टी असे लहान मोठे व्हीलन स्थिरावले होते आणि डॅनी डेन्झोपा, नरेंद्रनाथ, सुजीतकुमार, रणजित, भरत कपूर, मॅक मोहन असे आणखीन काही व्हीलन भरती झाले. याच काळात विनोद खन्ना आणि शत्रुघ्न सिन्हाही व्हीलनगिरीच करत होते, पण काहीनाकाही कारणास्तव हीरोगिरीकडे वळले. आजूबाजूला अशी जाणवणारी स्पर्धा असताना फक्त आणि फक्त वेगळेपण उपयोगी पडते. साचेबंद मसालेदार मनोरंजक चित्रपटात ते तसे अवघड, पण एकीकडे राजेश खन्नाच्या चलतीच्या काळातील चित्रपटात प्रेम चोप्रा हुकमी व्हीलन झाला तर दुसरीकडे आता हिंदी चित्रपटाची निर्मिती वाढली होती. प्रेम चोप्राने कधी डोळे वटारुन, कधी विचित्र, विक्षिप्त हावभाव करीत तर कधी विशिष्ट शैलीत संवादफेक करत जम बसवला. असे वेगळं असणं त्याला फळले.
राजेश खन्नाच्या ‘डोली’, ‘दो रास्ते’, ‘कटी पतंग’, ‘प्रेम नगर’, ‘अजनबी’, ‘आंचल’, ‘मेहबूबा’, ‘सौतन’ अशा एकूण १९ चित्रपटात भूमिका साकारल्या. प्रेम चोप्राची बिंदूसोबतही जोडी जमली. बी. आर. चोप्रा दिग्दर्शित ‘दास्तान ‘ ( १९७२) मध्ये दिलीपकुमारची दुहेरी भूमिका आहे. एकाची प्रेयसी शर्मिला टागोर तर एकाची पत्नी बिंदू. ती बदफैली, जालिम, कपटी आहे आणि तिच्या प्रियकराच्या भूमिकेत प्रेम चोप्रा आहे. अर्थात अशा व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्याही दृष्टीने व्हीलनच, पण तीच खरी कामाची पोच पावती असते.
सत्तरच्या दशकात प्रेम चोप्रा ऐन भरात असतानाच ‘शोले’ ( १९७५) च्या गब्बरसिंगच्या वादळाने धक्का बसलाच, अमजद खानला मागणी वाढली, आणखीन काही वर्षांनी अमरीश पुरी, मग सदाशिव अमरापूरकर आले. मग एका चित्रपटात तीन चार व्हीलन असले की एक प्रेम चोप्रा असे.
आता हाच प्रेम चोप्रा आशा भोसले यांच्यासोबत गायलाही. ‘नफरत’ या चित्रपटातील ‘लो मेरा प्यार ले लो’ या गाण्यात तोही गायलाय. खरं तर विशिष्ट लयीत डायलॉगबाजीने प्रेम चोप्राचे अनेक संवाद हिट आहेत. “मै वो बला हू जो शीसे से पत्थर को तोडते है” ( सौतन), “जीनके घर शीशे के होते है वो बत्ती बुझाकर सोते है” ( सौतन), “शराफत और इमानदारी का सर्टिफिकेट ये दुनिया सिर्फ उन्हे देता है जिनके पास दौलत है” ( आग का गोला)…
प्रेम चोप्राशी पहिली भेट निर्माते के. सी. बोकाडिया यांच्यामुळे झाली. ते कायमच मिडिया फ्रेन्डली. आपल्या चित्रपटाच्या सेटवर शूटिंग कव्हरेजसाठी आवर्जून बोलावणार. त्यांच्या ‘फूल बने अंगारे’ ( १९९१) च्या सेटवर प्रेम चोप्राच्या सविस्तर मुलाखतीचा योग आला असता जाणवले ते त्यांचा सकारात्मक दृष्टिकोन. आपल्या करियरमध्ये कधीही कसेही चढउतार येऊ शकतात, आपण आपल्या वाटेची भूमिका चोख करावी, रस्ता आपोआप आखला जातो… हे त्यांचे जणू तत्वज्ञान आहे. देव आनंद ( देस परदेस इत्यादी), अमिताभ बच्चन ( दोस्ताना इत्यादी), धर्मेंद्र ( जुगनू वगैरे) अशा अनेक स्टारसोबत भूमिका केलेल्या अनुभवी माणसाचे हे बोलणं महत्त्वाचं आहे. अर्थात अशा दीर्घानुभवी माणसाचं चरित्र परफेक्ट नावाने प्रकाशित व्हायला हवेच. तेव्हाचा हा फोटो. २०१४ साली ते प्रसिद्ध झाले आणि त्या नावातच बरेच काही येतेय…. ते नाव आहे,
प्रेम नाम है मेरा, प्रेम चोप्रा.
– दिलीप ठाकूर