ऋतुजा बागवेला मिळाला मानाचा उस्ताद बिस्मिल्लाह खाँ युवा पुरस्कार
सेलिब्रिटीजची ऑनलाईन मुलाखत…. प्लॅस्टिक संस्कृती
मुलाखत देता देता देव आनंद डोळे मिचकावत आपल्या पुढच्या चित्रपटाबाबत बोलण्यात अधिक उत्सुक आहे, राजेश खन्नाच्या मुलाखतीसाठी खारच्या त्याच्या ऑफिसमधे अगदी सहजपणे दीड तास वाट पाहताना संपूर्ण चित्रपटसृष्टीतील चविष्ट चहा प्यायचा योग सुखावतो आणि समोरच्या टेबलावरचा लोकसत्ता पाहताना त्याच्या ऑफिसमधे मराठी वृत्तपत्र येतेय याचा आनंद होतो आणि मग आपण महाराष्ट्रीय असल्याचे आणि गिरगावकर असल्याचे समजल्यावर तो आपण गिरगावातील सरस्वती निवासमध्ये लहानाचा मोठा झालो असे अतिशय आनंदाने मराठीत बोलणार…
असे आणखी अनुभव सांगता येतील. महत्वाचे आहे ते, अशा स्टारच्या मुलाखतीतील हे छोटे छोटे वाटणारे महत्वाचे क्षण. मुलाखत म्हणजे फक्त आणि फक्त प्रश्नोत्तरे ही व्याख्या मला कधीच मान्य नव्हती आणि नाही देखिल. त्या कलाकाराचा एखाद्या गोष्टीवरचा दृष्टिकोन, मते, विचार पध्दती जमेल तेवढी लक्षात यायला हवी.
सेलिब्रिटीजची (मला खरं तर ‘चित्रपट कलाकार’ म्हणायचंय. पण ग्लोबल युगात ते सेलिब्रिटी म्हणून ओळखले जातात) मुलाखत म्हणजे त्याचे एक्सप्रेशन, संपूर्ण देहबोली बोलत असते. त्याच्या उत्तरावर प्रश्न करण्यात कस लागतो, कसब असतो. अगदी सगळ्याच मुलाखती तशा होणे शक्य नसले तरी त्याचे प्रमाण अधिक असावे अशी अपेक्षा ठेवायला हरकत नाही. ऐंशीच्या दशकात मी मीडियात आलो तेव्हा अनेक मुलाखती अशाच होत. हा संवाद आजच्या ऑनलाईन मुलाखतीत अजिबात नाही. हे अगदीच प्लॅस्टीक कल्चर वाटते. लाॅकडाऊनच्या दिवसात प्रत्यक्षातील भेटीगाठीवर खूपच मर्यादा आल्या, पण भविष्यात सेलिब्रेटिजच्या मुलाखती घेण्याचे हेच महत्वाचे माध्यम तर असणार नाही ना? आपण आपल्या घरात (वर्क फ्राॅम होम) आणि सेलिब्रेटिज त्याच्या प्रशस्त घरात अथवा व्हॅनिटी व्हॅनमध्ये (कदाचित विदेशात शूटिंग स्पाॅटवर… अर्थात हे भविष्यात) असा संवाद साधताना एकमेकांना दिसत असलो तरी त्यात संवाद नाही, नुसतेच बोलणे. अशा मुलाखती वाचक/प्रेक्षकांना नक्की काय देतात? त्या न पाहताच वाढत असलेल्या लाईक्सचा कोणाला आनंद होत असेल तर होऊ देत.
फार पूर्वी फिल्मवाल्याची मुलाखत म्हणजे तो आम्हा सिनेपत्रकाराना घरी बोलावायचा ही संस्कृतीच अथवा प्रथाच होती. अश्विनी भावे आपल्या चुनाभट्टीच्या घरी कसे यायचे हे इतकं आणि असे तपशीलवार सांगायची की कोणालाही पत्ता विचारण्याची गरजच नसे. प्रत्यक्ष प्रश्नोत्तरांना सुरुवात होण्यापूर्वी अनेक कलाकारांशी इतर अनेक गोष्टी होत हे खुद्द ते कलाकारही सांगतील आणि पाऊण तास, एक तास मुलाखत झाल्यावर पुन्हा काही इकडच्या तिकडच्या गप्पा होतच. (ऑनलाईन मुलाखतीत असा ‘आगापीछा’ अजिबात नाही), उर्मिला मातोंडकरकडे तर अशी मुलाखत रंगवल्यावर तिच्या आईच्या हातची छान पुरणपोळी खायला मिळे. (सिनेपत्रकार म्हणून अशा अगणित छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद मी घेतलाय).
त्या काळात कधी एखाद्या स्टारच्या ऑफिसमध्ये भेट होई. दादा कोंडके ताडदेवच्या बाॅम्बे एअर कंडीशन मार्केटमधील ऑफिसमध्ये हमखास भेटत आणि ‘मुलाखत किती वेळ घ्यायची’ याला वेळेची मर्यादा नसे. ते इतके आणि असे काही मनसोक्त मनमुराद बोलत की फ्रेश होऊन जायचो. काही स्टार सेटवर बोलावत. ते करताना आपले दिवसभरचे शेड्युल विचारात घेत की, आज किती बोलणे होईल. त्यानिमीत्ताने शूटिंग रिपोर्टिंगही होई. फिल्मालय स्टुडिओत ‘रिटर्न ऑफ ज्वेल थीफ’च्या सेटवर सदाशिव अमरापूरकरशी अशाच गप्पा रंगल्या. हे होताना सद्य सामाजिक स्थितीवरही गप्पा होत. वर्षा उसगावकरची मुलाखत कायमच दिलखुलास आणि मनमोकळ्या गप्पा. आणि अशातच गोव्यातील आपली एखादी छान आठवण. अनेकदा तरी मला वाटते की, मुलाखतीच्या अवतीभवतीच्या गोष्टीनी मला अनेक स्टार्सचे अंतरंग समजले, बरीच माहिती मिळाली आणि इतकेच नव्हे तर अनेक स्टार्सच्या नातेवाईकांशीही कायमची ओळख झाली. ऑनलाईन मुलाखतीत यातील काहीही शक्य नाही अथवा कल्पनाही करता येत नाही.
साधारणपणे वीस वर्षांपूर्वी या मुलाखत कल्चरमध्ये काही गोष्टी आल्या. बदल होतच असतो आणि होणारच असतो. आता स्टारचे सेक्रेटरी अथवा पीआरओ मुलाखतीची वेळ आणि जागा (बहुदा निर्मात्याचे ऑफिस) ठरवताना ‘फक्त वीस मिनिटे’ अशी अट (कटकट) सुरु झाली. (याच काळात अनेक स्टार्सनी पत्रकाराचे नाव विचारण्याचे सौजन्य सोडून दिले हा स्वानुभव आहे. त्यांना ते गरजेचे वाटत नसावे. कदाचित ते योग्यही असेल. मुलाखत दिली, संबंध संपला असा थेट बाणा असेल. विशेषतः हिंदीत ते अनेकदा अनुभवले) हळूहळू फोनवर मुलाखतीचे फॅड आले. एखाद्या ताज्या घडामोडीवरची प्रतिक्रिया अथवा सणावरची मते/आठवणी यासाठी फोन/मोबाईल माध्यम उपयुक्त.
याचीच पुढची पायरी म्हणजे लॅपटॉप/मोबाईलवर झूम अथवा अन्य ऑनलाईनने मुलाखत. यातही समोरासमोर दिसतोय, प्रश्नोत्तरे होतात. पण तो ‘लाईव्ह’पणा नाही. त्यात सेलिब्रेटिजचे एक्सप्रेशन पकडता येत नाही. एखाद्या प्रश्नावर ‘ऑफ द रेकॉर्ड’ उत्तर मिळत नाही (पूर्वी तेही मिळत असे काही कलाकारांशी विश्वासाचे नाते निर्माण कधी झाले हे समजलेच नाही. प्रत्यक्ष भेटीत त्याची कळत नकळतपणे गुंफण होत जाते).
टेक्नोसॅव्ही युगात आता अशा ऑनलाईन मुलाखतीला पर्याय नाही (अन्यथा, तुम्ही मागील पिढीत जमा झालात की काय असा उगाच प्रश्न पडायचा). तरी प्रत्यक्षात मुलाखत करायची आणि ती ॲपवर शेअर करायची हे योग्य वाटते. फरक इतकाच की, पूर्वी गोविंदाच्या मुलाखतीसाठी बराच काळ वाट पहावी लागे (अनेक निर्मातेही त्याच्या तारखा मिळाव्यात म्हणून त्याच्या भेटीसाठी ताटकळत असत, त्यापुढे आपले सुख दुःख ते काय?) आणि हे वाट पाहणे लेखनात रंगवता येई, तसे काही अशा ‘शूटिंगवाल्या मुलाखतीत’ नाही, याचे कारण म्हणजे हे माध्यम वेगळे आहे. पण एखाद्या सेलिब्रेटिजची वाट पाहून कंटाळलोय आणि आता तोच त्रागा दाखवत मुलाखत घेतोय असं होणं योग्य नाही. कारण, कॅमेरा जास्त बोलतो. तो नेमके ते टिपत असतो. शूटिंग केलेल्या मुलाखतीचे एडिटींग होतेच हो, पण कॅमेराने टिपलेली मुद्रा जास्त बोलते. डिजिटल मिडियात हा एक प्लस पाॅईंट आहे, पण मुलाखत प्रत्यक्षात हवी.
खुद्द सेलिब्रेटिजनाही ‘आपण ऑनलाईन मुलाखती त्या किती बरे द्यायच्या?’ एक मुलाखत प्रत्यक्षात शूट करुया, आपल्या उत्तरात अधिक सहजता येईल, मोकळेढाकळे बोलता येईल असे वाटायला हवे. कोरोनानंतरच्या काळात तर तेच वागण्या बोलण्यातील खरेपण ऑनलाईन मुलाखतीपेक्षा जास्त महत्वाचे आहे. मुलाखत देणे म्हणजे आपल्याबद्दलची माहिती देणे, आपल्या नवीन चित्रपटाचे गोडधोड प्रमोशन करणे हीच ठराविक चौकट नसते तर त्यापलिकडे जात बरेच काही नक्कीच असते. स्टारही पत्रकाराला व्यवस्थित जोखत असतातच. अनेक प्रकारच्या व्यक्तिरेखा साकारताना माणसे ओळखण्याची त्यांची क्षमता वाढलेली असते. संवेदनशील सेलिब्रेटिजनाही ऑनलाईन मुलाखत म्हणजे प्लॅस्टिक संस्कृती असल्याचे पटत असेलच. ही गोष्ट आजच्या डिजिटल पिढीतील सिस्टीमचा एक भाग आहे म्हणून ते करायला हवे, असे करणे व्यावहारिकदृष्ट्या योग्यही आहे. पण आपण मुलाखत दिली आणि कोरडेच राहिलो तर त्यातून काही निष्पन्न होत नाही हेदेखील खरेच.
मुद्रित माध्यमाच्या काळात (अर्थात प्रिन्ट मिडिया) अनेक कलाकार आपल्या मुलाखतीची कात्रणे जमवून ठेवत. ती मुलाखत वाचल्याचे त्यांचे फॅन्स आवर्जून सांगत. त्यातील काही फॅन्स तर आपल्या आवडत्या कलाकाराच्या मुलाखती/ बातम्या/ फोटोची कात्रणे जमवून ठेवत. असे अनेक संग्राहक आहेत आणि याचा मुलाखत घेत असलेल्या सिनेपत्रकारालाही आनंद होई.
एक चांगली मुलाखत आणि त्याचे हे असे अनेक सकारात्मक साईड इफेक्ट हे ऑनलाईन मुलाखतीत खरंच आहे का? आता सगळ्याच गोष्टीत कृत्रिमपणा येत चालला आहे तो यातही येणारच असेच म्हणुया का? म्हटलं ना, बरा वाईट बदल होतच असतो आणि तरीही त्यातून काही चांगले निष्पन्न होतेय का पाह्यचे. होय ना? काही असो, वृत्तपत्र अथवा मासिकासाठी पूर्वी केलेल्या मुलाखती कायमच आठवणीत नेतात. मग ती हैद्राबादच्या अन्नपूर्णा स्टुडिओत डेव्हिड धवन दिग्दर्शित ‘याराना’च्या सेटवरची लोकप्रभासाठीची माधुरी दीक्षितची मुलाखत असो अथवा कुलाबा येथील मुकेश मिलमधील मुकुल आनंद दिग्दर्शित ‘हम’च्या शूटिंगच्या वेळी तेथील मेकअपरुममध्ये घेतलेली अमिताभ बच्चनची मुलाखत असो. एक मुलाखत एक नवीन अनुभव असे आणि त्यातून नवीन गोष्टी शिकता येत अथवा आल्या. अशोक सराफला बोलते करण्यात कसब आहे, पण जुना एखादा रेफरन्स त्याला व्यवस्थित सांगितला तर तो खुलतो.
किती मुलाखती घेतल्या, त्यापेक्षा त्या कशा ठरल्या हे महत्वाचे आहे. रमेश देव यांच्या तल्लख आठवणीचा अनुभव असाच येतो आणि जुन्या चित्रपटाच्या गोष्टी समजून घेता येतात. आपलेही ज्ञान वाढते, वेगळे तपशील मिळतात. किस्से अथवा गोष्टी माहित होतात. हे सगळे प्रत्यक्ष भेटीतील मुलाखतीने शक्य होत असते. हे पैलू डिजिटल मिडियात नाहीत.