‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
पुराणकथांच्या पायावर उभारलेलं आजचं राजकीय नाट्य
ऑनलाईन ॲप : अमेझॉन प्राईम (Amazon Prime)
पर्व : पहिले
स्वरूप : राजकीय थरारपट
दिग्दर्शक : सुदीप शर्मा
मुख्य कलाकार : जयदीप अहलावत, नीरज काबी, अभिषेक बॅनर्जी, गुल पनाग, स्वस्तिका मुखर्जी, जगदीश सांडू
दिल्लीत प्रख्यात वृत्त निवेदक संजय मेहरावर एकेदिवशी जीवघेणा हल्ला होतो. या हल्ल्याचा तपास करण्याची जबाबदारी हातीराम चौधरी या पोलीस अधिकाऱ्यावर येते. आपली नोकरी टिकविण्याच्या धडपडीत असलेला हातीराम हल्ल्याच्या चार संशयितांची पोलिसी खाक्यानुसार कसून चौकशी करतो. दरम्यान या घटनेतील अनेक पाळेमुळे त्याच्यासमोर उलगडली जातात आणि त्यादृष्टीने त्याच्या तपासाला वेगळी दिशा मिळत जाते. सरतेशेवटी हातीराम गुन्ह्याच्या मुळाशी पोहचतो की नाही किंवा दरम्यान त्याच्यासमोर येणारी आव्हानं सिरीजच्या प्रत्येक भागात उलगडली जातात. खरतरं सिरीजचा साचा हा कुठल्याही पोलिसीखाक्याच्या कथानकासारखाच आहे. पण तरीही गेले काही दिवस या सिरीजची तुफान चर्चा सुरु आहे. यातील विविध पैलूंवर वेगवेगळ्या दृष्टीकोनातून समाजमाध्यमांवर चर्चासत्रे गाजत आहेत. कित्येक समीक्षक आणि प्रेक्षकांना ही सिरीज त्याच्या उत्तम कथानक, दिग्दर्शन आणि संकल्पनेतील नाविन्यामुळे पसंत पडत आहे तर कित्येकांनी सिरीजचं कथानक हिंदूव्देष्ट असल्याची टीकाही केली आहे. त्यामुळे भिन्न प्रकारचे मतप्रवाह या सिरीजला जोडलेले आहेत. कथानकाची सर्वात जमेची बाजू म्हणजे आजच्या काळात घडणाऱ्या या राजकीय आणि गुन्हेगारी नाट्याला लेखकाने पौराणिक संकल्पनांची जोड दिलेली आहे. त्यामुळे कथानकाची व्याप्ती अजूनच वाढली आहे. मधल्या काही काळामध्ये सेक्रेड गेम्स, लैलासारख्या सिरीजमध्ये हा प्रयोग करण्यात आला होतं. त्यामुळे धर्म, पौराणिक कथा यांच्याकडे पाहण्याचा एक नवा दृष्टीकोन प्रेक्षकांपुढे मांडण्याचा प्रयत्न यातून झाला. आता कित्येकांनी हा बदल स्वीकारला पण अनेकांनी याबद्दल विरोधही दर्शवला. कारणे वेगवेगळी असली, तरी यानिमित्ताने या बदलाची दखल घेणे गरजेचे आहे.
स्वर्गलोक, धरतीलोक आणि पाताललोक या संकल्पनेवर दिल्ली शहराच्या विभाजनावर या सिरीजची उभारणी केलेली आहे. अगदी पौराणिक कथांचा संधर्भ घेतल्यास ‘स्वर्गलोक’ म्हणजे जिथे देवांचा, प्रतिष्ठित लोकांचा वास असतो. इथे दिल्लीतील लुटीयंस भागातील उच्चभ्रू जनता या स्वर्गलोकात मोडते. धरतीलोक म्हणजे तुम्हाआम्हा सामान्य जनतेची भूमी. वसंत कुंज, नॉयडामध्ये राहणाऱ्या जनतेचे जन्म आणि मृत्यूचे भोग संपलेले नाहीत. त्यांना आयुष्यात प्रत्येक गोष्ट मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागतोय. तर पाताललोक म्हणजे राक्षस, खलप्रवृत्तीच्या माणसांनी भरलेली जागा. दक्षिण दिल्लीच्या ‘जमुना पार’ भागात दुष्ट लोकांसोबतचं गरिबीने पिंजारलेली जनता आहे, आपलं उभं आयुष्य गुन्हेगारांच्या मागे पळण्यात घालवलेले पोलीस अधिकारी इथे आहेत. संजय मेहरा या स्वर्गलोकचं प्रतिनिधित्व करतो. सरळमार्गी, विलासी आयुष्य उपभोगणाऱ्या वर्गाचा हा नायक आहे. तर हातीराम पाताललोकच्या दुष्टचक्रात अडकलेला आहे. आयुष्यात कुटुंबासाठी काही करू न शकल्याने कायम बायको आणि मुलाचे टोमणे ऐकून घायाळ झालेल्या हातीरामची धडपड असते ती किमान धरतीलोकमध्ये समाविष्ट होण्याची. एखादी चांगली केस सोडवून बढती मिळविण्याच्या त्याच्या धडपडीत संजयवरील हल्ल्याच्या चौकशीची जबाबदारी त्याच्यावर येते. सहाजिकच चौकशीतील पहिलं पाउल म्हणून तो चार संशयितांची ‘कसून’ चौकशी करतो. दरम्यान त्यातील एक संशयित हातोडा त्यागीकडून हातीरामला ‘मास्तरजी’ नामक मुख्य सूत्रधाराची माहिती मिळते आणि त्याच्या तपास मास्तरजीच्या दिशेने सुरु होतो. या सगळ्यात हातोडा त्यागीचा भूतकाळ, त्याची मास्तरजीविषयक अंध भक्ती, गुन्हेगारी विश्व या सगळ्याची उकल व्हायला सुरवात होते आणि कथानकाचे विविध पैलू उलगडत जातात.
कथानकातील हे पैलू उलगडताना तीन लोकांची संकल्पना, स्वर्गलोकमधील रस्त्यांना दिलेल चित्रकुट नाव, आर्य आणि द्रविड यांच्यातील यमुना नदीच्या सीमेवरून नरकलोकाला दिलेलं जमुनापार नावं असे अनेक संदर्भ प्रेक्षकांना पुन्हा एकदा पुराणकथांकडे घेऊन जातात. पण हे करताना सिरीजकर्त्यांनी उच्चभ्रू समाजातील पात्र ही हिंदू जातीव्यवस्थेतील उच्चवर्णीय दाखवली आहेत तर गुन्हेगार, गरीब समाजातील पत्र ही दलित, मुस्लिम धर्मीय, अल्पसंख्याकीत समाजातील दाखवली आहेत. ही जाणीवपूर्वक केलेली योजना वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. उच्चवर्णीय हिंदूंकडून अल्पसंख्य समाजाची होणारी दडपशाही हा हिंदूधर्माला कमी लेखण्याचा प्रयत्न असल्याची आरोळ ठोकण्यात आली आहे. सेक्रेड गेम्स, लैलासारख्या सिरीजमधून अशाचप्रकारे भारतीय समाजात गुंतून राहिलेल्या जातीयवादाला वेगळ्या चेहऱ्याने सादर करण्याचं प्रयत्न याआधीही करण्यात आला आहे. त्याला जोड म्हणून या सिरीजमध्ये मुस्लिम तरूणाची घोळक्याने केलेली हत्या, अल्पसंख्य जातीतील स्त्रियांवर होणारे अत्याचार, या समाजातील तरूणांना गुन्हेगारी विश्वाचं वाटणारं आकर्षण असे अनेक मुद्दे मांडले आहेत.
हे दाखवताना सिरीजमध्ये अंगावर येणारी हिंसक दृश्ये, शिव्या, अश्लिल भाषा यांचा वापर बेमालून केलेला आहे. पण यावर टीका करताना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, की ‘नव्याने आलेल्या वेबसिरीज माध्यमाला सेन्सरशिपचे नियम लागू झाले पाहिजे की नाही?’ यावर कित्येकदा उहापोह झालेला आहे. सुरवातीच्या काळात सिनेमा, मालिकांप्रमाणे या माध्यमाला सेन्सरची बंधनं लावून अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी टाळावी अशी मागणी सर्वच स्तरांमधून झाली. सुरवातीला हे सगळे प्रयोग प्रेक्षकांनी आनंदानी स्विकारले. पण हळूहळू कित्येक सिरीजमध्ये केवळ ‘मिळालेली मुभा’ म्हणून आक्रमक भाषा, संभोगदृश्ये, हिंसक दृश्ये यांचा वापर विनाकारण होऊ लागला. त्यामुळे सहाजिकच हल्ली प्रेक्षकांना या प्रकारावर काही प्रमाणात मर्यादा आणण्याची गरज भासू लागली आहे. सिनेमा, मालिका सेन्सरच्या चाळणीखालून जाताना त्यातील आक्षेपाहार्य प्रसंग वगळले जातात (अर्थात त्यात किती पारदर्शकता असते हा वेगळा वादाचा मुद्दा आहे) पण सिरीजमध्ये ही पायरी वगळली जाते. तसचं सिनेमांना कथानकानुसार दिलं जाणार ग्रेडिंगही सिरीजला नसतं त्यामुळे वयोगटाच्या मर्यादा येत नाहीत.
फक्त पौराणिकचं नव्हे तर सध्या चर्चेत असलेले बरेच मुद्दे सिरीजमध्ये मांडले आहेत. पत्रकारांना समाजमाध्यमांवर होणार ट्रोलिंग, गौरी लंकेशसारख्या पत्रकारांवर होणारे हल्ले, दलितांवरील मॉब लिचिंगच्या घटना, दलित तरुणींवरील बलात्काराचं वाढत प्रमाण, समाजात धर्म-जातीवरून वाढणारी दरी यासारख्या काही मुद्द्यांवर सिरीजमध्ये भाष्य केले आहे. या मुद्द्यांची तीव्रता अधिक असली तरी सध्याच्या परिस्थितीत सिरीजमध्ये त्याची केलेली मांडणी ही काहीजणांना खटकू शकते.
हे मुद्दे पाताललोक पाहताना प्रकर्षाने जाणवतात. त्यामुळे या सिरीजची समाजमाध्यमांवर बऱ्यापैकी चर्चा सुरु आहे. अर्थात ही या चर्चांची सुरवात आहे. हे मुद्दे आणि यांवर प्रत्येक सिरीजकर्त्याची भूमिका ही वेगळी असू शकते. येत्या भविष्यात त्याची झलक प्रेक्षकांना पहायला मिळेलच. पण तोपर्यंत यांवर सर्व बाजूंनी सकस चर्चा करण्यासाठी या सिरीजची दखल घेतली पाहिजे.