‘थलाईव्हा’ ची वाटचाल आता थेट राजकारणात
दक्षिणेकडील प्रादेशिक चित्रपटातील ‘स्टार’ ने राजकारणात प्रवेश करणे, आमदार, खासदार, मंत्री, अगदी मुख्यमंत्रीदेखिल होणे हे आता तेथील राजकारणात, समाजकारणात, सांस्कृतिक क्षेत्रात फारच मुरले असल्याने रजनीकांत राजकीय पक्षाची स्थापना करणार या गोष्टीचे विशेष आश्चर्य वाटले नाही. ती ‘चाल’ अथवा ‘खेळी’ अपेक्षितच म्हणायला हवी. ते तिकडच्या परंपरेनुसारच झाले आहे. महत्वाचे आहे ते, त्याचा पक्ष फक्त तमिळनाडूतील राजकारणात कार्यरत राहणार की आजूबाजूच्या अन्य राज्यातही हातपाय पसरणार?
स्वबळावर सर्व प्रकारच्या (म्हणजे पालिका, विधानसभा, लोकसभा वगैरे) निवडणुका लढवणार की कोणत्या एकाद्या प्रादेशिक अथवा राष्ट्रीय पक्षाशी युती करणार? जागांचे वाटप करणार? आणि एकदा का निवडणूक लढवणे आले की रजनीकांतही स्वतः उमेदवार असेल, तो त्याच्या पक्षाचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असेल आणि तसे करणेच त्याच्या पक्षाला आपला जनाधार वाढवता येईल. ही मोठी महत्वाकांक्षा ठरेल. तो राजकारणात कार्यरत राहण्याचा त्याच्या फिल्मी करियर, इमेज, लोकप्रियता, गल्ला पेटी यावर कसा आणि किती परिणाम होईल? रुपेरी पडद्यावरील त्याचे हुकमी आणि साहसी महापराक्रम हमखास टाळ्या वसूल करणारे असले तरी तसे प्रत्यक्षात अजिबात शक्य नसल्याची त्याला जाणीव असेलच पण हा विरोधाभास तो कसा हाताळणार? ऑन रिल आणि ऑफ रिल अशा दोन्ही भूमिका तो कशा स्वीकारणार? एक प्रकारचा हा आव्हानात्मक खेळच तर आहे.
हे वाचलंत का: लता मंगेशकर : एक विद्यापीठ
रजनीकांतचा राजकीय पक्ष असे एकात एक अनेक प्रश्न गुंतत नेणारे आहेत. दक्षिणेकडील राजकारणात एम. जी. रामचंद्रन, करुणानिधी, टी. रामाराव, जयललिता वगैरे बरेच फिल्मवाले यशस्वी ठरले. मूळ राजकारण्यांच्या जोडीने सिनेमावाले राजकारणी सत्ताकारणात मुरले. (कधी काही फिल्मवाल्यानी तेथे राजकीय अपयशही पचवले, राजकारणातही सगळे दिवस सारखे नसतातच. त्यातच राजकारण आहे) तरी रजनीकांत प्रकरण त्यापेक्षाही वेगळे आहे. या दशकात तर त्याचे मूळ तमिळ चित्रपट एकाच वेळेस कन्नड, तेलुगू, मल्याळम आणि हिंदी भाषेत डब होऊन जगातील अनेक देशांत प्रदर्शित होताहेत. त्यामुळे तो आता फक्त एका राज्यापुरता अथवा प्रांतापुरता स्टार राहिलेला नाही.
जगात जेथे दक्षिण भारतीय माणूस गेला आणि स्थिरावला, त्यासह रजनीकांतचा अतिरंजित अतिसाहसी असा रुपेरी अवतारही पोहचला आहे. त्याच्या हिंदी चित्रपटामुळे त्याला अन्यभाषिक चाहतेही लाभलेत. आणि त्या सगळ्यांना ‘रुपेरी पडद्यावरचा रजनीकांत एके रजनीकांत’ हा त्या चित्रपटाचे नाव, कथा, पटकथा, संवाद अगदी पोस्टरपर्यंतचा रजनीकांत ठसा पसंत आहे. ते चित्रपटात फक्त आणि फक्त पडदाभरचा रजनीकांत अतिशय आवडीने पाह्यला जातात म्हणूनच तर त्याचे बरेचसे चित्रपट त्याच्या फॅन्स आणि फॉलोवर्सपलिकडे पोहचलेत नाहीत. एकादा ‘काला’ वगळता अन्य चित्रपटभर रजनीकांत संचारला असतो. त्याची एक वेगळी चित्रपट संस्कृती आहे.
तोच फॉर्मुला राजकारणात यशस्वी ठरतोय काय हे निवडणुकीच्या निकालात दिसेल. तोच तर राजकीय भवितव्य ठरवतो. तोपर्यंत मिडियात त्याला भरभरून कव्हरेज मिळत राहिलच. ग्लॅमरस क्षेत्रातील अशी स्वतःचा खूप मोठा हुकमी ऑडियन्स असलेली सेलिब्रेटिज तशाच जनताचा कौल महत्वाच्या क्षेत्रात कार्यरत होते तेव्हा मिडियासाठी तो ‘फोकसमधला हीरो’ असतो. महत्वाचे म्हणजे, रुपेरी नायक रजनीकांतचा फार मोठा ऑडियन्स हा कष्टकरी, कामकरी, स्वप्नाळू वर्ग आहे. हाच ‘मास’ रजनीकांतच्या नवीन चित्रपटाच्या रिलीजच्या दिवशी भल्या पहाटे उठून बॅन्ड बाजा, ढोल ताशे वाजवत थिएटरवर जाऊन (मुंबईत अनेकदा तरी माटुंगा येथील अरोरा थिएटर अथवा सायन/वडाळ्याचे मल्टीप्लेक्स) रजनीकांतच्या प्रचंड मोठ्या कटआऊटला चक्क दुधाने आंघोळ घालणारच. आपल्या आवडत्या स्टारवरचे हे विलक्षण पराकोटीचे प्रेम झाले. काही जण त्याला आंधळी भक्ती म्हणत असले तरी त्या चाहत्यांना याच रजनीकांतमुळे भावनिक आनंद आणि आधार मिळतोय ही रियॅलिटी अजिबात विसरता येत नाही.
ऐशीच्या दशकात अभिनेते टी. रामाराव यांची आंध्र प्रदेशात अशीच जबरदस्त क्रेझ होती. त्यांच्या देवदेवतांच्या भूमिकांवर समाजातील तळागाळापर्यंतचा माणूस खुश होता. रामाराव यांनीही असाच प्रादेशिक अस्मिता जागी करतच तेव्हा ‘तेलगू देसम’ हा पक्ष स्थापन केला आणि पहिल्याच विधानसभा निवडणुकीत त्यांचा पक्ष बहुमताने विजयी झाला आणि टी. रामाराव आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री झालेदेखिल. सगळे कसे दक्षिणेकडील प्रादेशिक चित्रपटासारखे झाले.
तिकडे सिनेमा आणि राजकारण यांची वेगळीच युती आहे. तेथील समाजमनाला ते बरेच मानवलेय. असाच ‘शो’ रजनीकांतबद्दलही झालाच तर अजिबात आश्चर्य नको. त्यानंतर आपल्याबाबतच्या जनसामान्यांच्या वाढलेल्या अपेक्षा कशा पद्धतीने आणि कितपत पूर्ण करायच्या हे मात्र खूपच कसोटीचे असते. तेथे पटकथा, संवाद आणि अभिनय उपयोगी पडत नाही. एकीकडे शासकीय यंत्रणा सक्षमतेने हाताळावी लागते तर दुसरीकडे पक्षांतर्गत व विरोधी पक्ष अशा दोन्ही पातळ्यांवर राजकीय सामना करावा लागतो. रजनीकांतला हे कसब आणि कौशल्य आत्मसात करावे लागेल. दक्षिणेकडील अनेक स्टार राजकारणातही यशस्वी ठरले असल्याने रजनीकांतचाही या सगळ्याबाबत आपला एक दृष्टिकोन आणि अभ्यास असेलच.
आपल्यासाठी आनंदाची गोष्ट म्हणजे, रजनीकांत मुळात महाराष्ट्रीय आहे. मूळ नाव शिवाजीराव रामोजीराव गायकवाड. आईचे नाव जिजाबाई. मूळ गाव पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील मावळे कडेपठार. तर जेजूरीचा खंडेराय या कुटुंबाचे कुलदैवत. जन्म कर्नाटकातील बंगलोर येथे झाला. पत्नीचे नाव लता रंगाचारी तर रजनीकांतला ऐश्वर्या आणि सौंदर्या अशा दोन मुली आहेत. विशेष म्हणजे महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने २००७ साली राज कपूर पुरस्काराने रजनीकांतला सन्मानित करण्यात आले. तर केन्द्र शासनाच्या वतीने रजनीकांतला पद्मभूषण (२०००) आणि पद्मविभूषण (२०१६) या मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. म्हणजे, शासनाकडून रजनीकांतच्या रुपेरी वाटचालीचा गौरव करण्यात आला आहे. एका मूळच्या मराठी माणसाची ही खूपच मोठी कौतुकास्पद वाटचाल सुरु आहे. त्याच्या राजकीय प्रवासासाठी मराठी मनाच्या शुभेच्छा निश्चित असणारच.
रजनीकांत ऐशीच्या दशकात हिंदी चित्रपटातून भूमिका साकारत असताना त्याच्या दोन चित्रपटांच्या मुहूर्तांचे लाईव्ह अनुभव घेता आले. मुकुल आनंद दिग्दर्शित ‘हम’ च्या मेहबूब स्टुडिओतील मुहूर्ताला हजर राहतानाच अमिताभ बच्चन, गोविंदा आणि रजनीकांत अशी अगदी हटके त्रिमूर्ती कशी बरे एकत्र आणली याचे कुतूहल होते. एका भव्य डेकोरेटिव्ह स्टेजवर एकामागोमाग एक असे हे तिघे आले. त्या दिवसांत अमिताभच्या नवीन चित्रपटाच्या मुहूर्ताचा धडाका लागला होता आणि हा चित्रपट वेगळा वाटला. रजनीकांत मात्र अमिताभच्या हिंदी चित्रपटसृष्टीतील ‘उंची’ पुढे फारसा दबलेला वाटला नाही. (या चित्रपटाच्या मुहूर्तापर्यंत त्यातील नायिका निश्चित झाल्या नव्हत्या).
हे देखील वाचा: बेअर ग्रिल्सबरोबर रजनीकांत चा मॅन व्हरसेस वाईल्ड हा टीव्ही शो डिस्कव्हरी चॅनेलवर झाला…
तर निर्माते के. सी. बोकाडियानी ‘असली नकली’ साठी अंधेरीच्या नटराज स्टुडिओत जेलचा सेट लावून शूटिंगलाही सुरुवात केली. गंमत म्हणजे त्या काळात रजनीकांतला दक्षिणेकडचा शत्रुघ्न सिन्हा असे म्हटले जाई (आणि त्या उलट शत्रुघ्न सिन्हाला हिंदी चित्रपटसृष्टीतील रजनीकांत म्हणत. कारण तुम्हालाही माहित्येय. काहीशी चेहरेपट्टी आणि बोलताना अधिकाधिक हातवारे करणे. कालांतराने रजनीकांतने अधिकाधिक हातवारे करणेच त्याची ओळख झाली तो भाग वेगळा). या चित्रपटात हे दोघेही असल्याने ‘असली’ कोण आणि ‘नकली’ कोण असा मुहूर्तालाच पडलेला प्रश्न के. सी. बोकाडियानी हसण्यावारी नेला.
याच रजनीकांतच्या शुभ हस्ते विक्की फिल्मचा मराठी चित्रपट ‘एक फूल चार हाफ’ (१९९१) चा गोरेगावच्या फिल्मीस्थान स्टुडिओत मुहूर्त झाला तेव्हा आपल्या लक्ष्मीकांत बेर्डेमुळे रजनीकांतच्या औपचारिक भेटीची संधी मिळाली. त्याच्याशी हंस्तादोलन करतानाच त्याच्या हाताची ताकद समजली. निर्माते आनंद गायकवाड आणि बाबा इस्माईल मिस्री निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन पुरुषोत्तम बेर्डेचे आहे तर प्रिया बेर्डे या चित्रपटाची नायिका आहे. मुहूर्ताला हजर असलेल्या किमी काटकरचे या चित्रपटात लक्ष्यासोबत एक गाणेही आहे. महत्वाचे काय तर रजनीकांतची उपस्थिती.
रजनीकांतचा मराठी चित्रपटाशी असा एक संबंध आलाच. दक्षिणेकडील तेलगू, तमिळ, कन्नड या तीन भाषेत आणि हिंदी व इंग्रजी याही भाषेतील चित्रपटात भूमिका साकारण्याचा रजनीकांतचा दीर्घकालीन अनुभव त्याला आता राजकारणात यशस्वी ठरावा. पण एकच सांगावेसे वाटते, रुपेरी पडद्यावरची हातचलाखी, कोलांट्या उड्या, अतिसाहसी दृश्ये, व्हीएफएक्सचा वापर, पडदाभरची प्रतिमा, थिएटरवरचे डेकोरेशन यापेक्षा राजकारण खूपच वेगळे आहे. दक्षिणेकडील राजकारणातही भव्य कटआऊट संस्कृती मुरलीय, आश्वासनांचा स्वप्नाळू प्रवास आहे, राजकीय सभाना अतिप्रचंड गर्दी होते, मिडियात भरभरून कव्हरेज मिळेलच पण सिनेमाचा पडदा आणि इम्पॅक्ट व राजकारणातील प्रभाव आणि प्रवास यात खूप फरक आहे. दोन्हीच्या मध्ये लोकप्रियतेचा सूक्ष्म पडदा असतोच आणि एकीकडचा फ्लॉप शो दुसरीकडे परिणाम करु शकतो.
‘थलैवा’ रजनीकांत ही फक्त आणि फक्त व्यक्ती नाही, ती जनसामान्यांच्या दृष्टीने शक्ती आहे. झटपट सामाजिक समस्या सोडविण्यासाठी कुठूनही कसाही झेपावणारा तो झंझावात आहे. राजकारणातही त्याचा तोच धडाका कायम राहावा यासाठी खूप खूप शुभेच्छा. एका मराठी माणसाचे पाऊल पुढे पडतेय तर त्याला मनःपूर्वक सदिच्छा द्यायला हव्यातच.