‘आई तुळजाभवानी’च्या पौराणिक गाथेत उलगडणार एक नवा अध्याय; चिंतामणी पाषाणाचा
प्रेक्षकांना हसवणारा सच्चा कलाकार काळाच्या पडद्याआड
आपल्या वाढत्या वजनाचा आणि जाडजूड व्यक्तिमत्त्वाची लाज न बाळगता, त्याचेच भांडवल करुन प्रेक्षकांना हसवणारा सच्चा कलाकार म्हणजे सतिश कौशिक(Satish Kaushik). मिस्टर इंडिया चित्रपटात कॅलेंडर हे पात्र साकारणारा ते Scam1992 या चित्रपटात शेअरब्रोकर मनुभाई…. वाक्यावाक्याला शिव्या देणारा…अशा अनेक भूमिका साकारणारे सतीश कौशिक यांनी या जगातून अचानक एक्झिट घेतली आहे. त्यांच्या मृत्यूची बातमी ही चाहत्यांना धक्का देणारी ठरली आहे. कारण मृत्यूपूर्वी काही तास आधी सतीश कौशिक यांनी जोरदार होळी साजरी केली होती. या होळीचे फोटोही त्यांनी सोशल मिडीयावर शेअर करत आनंद व्यक्त केला होता. त्यानंतर काही तासातच त्यांचे ह्दयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झाले. त्यांच्या मृत्यूची बातमी त्यांचे मित्र, अभिनेते अनुपम खेर यांनी पहिल्यांदा सोशल मिडीयावर शेअर केली. या बातमीनं बॉलिवूडमध्येही खळबळ उडाली असून चाहत्यांना जबर धक्का बसला आहे. वयाच्या 66 व्या वर्षी या जगाचा निरोप घेणा-या सतीश कौशिक (Satish Kaushik) यांच्या लाखो चाहत्यांचा अद्यापही विश्वास बसत नाही.
सतीश कौशिक (Satish Kaushik) यांच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला. या ज्येष्ठ अभिनेत्याने आपल्या अभिनयाने, संवाद फेकीच्या खास स्टाईलने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. जावेद अख्तर, अली फजल यांच्यासोबत त्यांनी होळी साजरी केली होती. बुधवारी रात्री 11.27 वाजता या होळीच्या पार्टीची छायाचित्रे शेअर करताना सतीश कौशिक यांनी लिहिले, जावेद अख्तर, बाबा आझमी, शबाना आझमी आणि तन्वी आझमी यांच्यासोबत जुहू येथे रंगीत आनंदाने भरलेली होळी पार्टी, सर्वांना होळीच्या शुभेच्छा. ही छायाचित्रे शेअर करणारे सतीश कौशिक (Satish Kaushik) आनंदात दिसत होते. मात्र त्यानंतर लगेच गुरुवारी सकाळी 5.16 वाजता अनुपम खेर यांनी कौशिक यांच्या दुःखद निधनाची माहिती दिली. सतीश कौशिक यांच्या होळी उस्तवाची छायाचित्रे पाहून काही तासानंतर त्याच्या मृत्यूच्या बातमीवर विश्वास ठेवणेही चाहत्यांना कठीण झाले आहे.
सतीश कौशिक (Satish Kaushik) यांचा जन्म 13 एप्रिल 1956 रोजी हरियाणातील महेंद्रगड येथे झाला. सतीश कौशिक एक अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता होते. मात्र या सर्वांमागे प्रचंड मेहनत घेणारा कलाकार दडला होता. त्यांना सर्वोत्कृष्ट कॉमेडियनचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला. मिस्टर इंडियामधील त्यांचा उत्कृष्ट अभिनय हा कधीही विसरता येणार नाही. पण या सर्वांसाठी सतीश यांनी घेतलेली मेहनत विसरुन चालणार नाही. अभिनयाच्या वेडासाठी त्यांनी दिल्ली ते पुणे आणि मग मुंबई असा प्रवास केला. कौशिक (Satish Kaushik) यांनी दिल्लीतून शिक्षण घेतले. त्यांनी दिल्ली विद्यापीठाच्या किरोरी माल महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली. यानंतर त्यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून अभिनयचे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर सतीश कौशिक यांनी फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्येही शिक्षण घेतले. 1983 मध्ये ‘जाने भी दो यारो’ या चित्रपटाद्वारे त्यांनी चित्रपट सृष्टीत पदार्पण केलं.
अर्थात या कलाकारानं चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी अनेक नाटकांमध्येही काम केलं. मिस्टर इंडिया हा चित्रपट त्यांच्या कारर्किदीसाठी महत्त्वाचा टप्पा ठरला. सतीश कौशिक (Satish Kaushik) यांनी त्यात कॅलेंडर या व्यक्तीची भूमिका केली होती. ही भूमिका प्रेक्षकांना इतकी आवडली की त्यांना लोक कॅलेंडर या नावाने संबोधू लागले. अभिनयासोबत त्यांनी दिग्दर्शनातही पदार्पण केलं. ‘रूप की रानी’ चोरों का राजा, ‘प्रेम’, ‘हम आपके दिल में रहते है’ आणि ‘तेरे नाम’ यासारख्या चित्रपटांचे त्यांनी दिग्दर्शन केले आहे. ‘मिस्टर इंडिया सोबत ‘दीवाना मस्ताना’, ‘साजन चले ससुराल’सह या चित्रपटांतील त्यांनी साकारलेल्या भूमिका गाजल्या. आपल्या करिअरमध्ये त्यांनी जवळपास 100 चित्रपटांमध्ये काम केले. 1990 मध्ये ‘राम लखन’ आणि 1997 मध्ये ‘साजन चले ससुराल’साठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे.
मोठा पडद्यावर सहज वावरणा-या सतीश कौशिक यांचे पहिले प्रेम म्हणजे रंगभूमी होते. ते कायम रंगभूमीवरील भूमिकांचा उल्लेख करीत असत. ‘सेल्समन रामलाल’ या हिंदी नाटकातील अभिनेता म्हणून त्यांची सर्वात प्रसिद्ध भूमिका होती. कुंदन शाह यांच्या कॉमेडी क्लासिक जाने भी दो यारों साठी त्यांनी संवादही लिहिले आहेत. सतिश कौशिक (Satish Kaushik) यांचा आगामी चित्रपट चर्चेत आहे, तो म्हणजे एमर्जन्सी. भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावरील या चित्रपटात कंगना राणावत प्रमुख भूमिकेत आहे. चित्रपटात त्यांनी जगजीवन राम यांची भूमिका साकारली आहे. ‘एमर्जन्सी’ चित्रपटातील सतिश कौशिक (Satish Kaushik) यांच्या फर्स्ट लूकचा फोटो शेअर करत कंगनाने त्यांच्या भूमिकेबद्दल माहिती दिली होती.
======
हे देखील वाचा : ‘गंगा जमुना डोळ्यात उभ्या कां…’ हे मराठी भावगीत झाले ७५ वर्षांचे!
======
सतीश कौशिक (Satish Kaushik) त्यांच्या कौटुंबिक जीवनाबाबत फारशे बोलत नसत. त्यांनी 1985 मध्ये शशी कौशिक यांच्याबरोबर विवाह केला होता. 1996 मध्ये कौशिक यांच्या दोन वर्षाच्या मुलाचं निधन झालं. या घटनेमुळे त्यांच्यावर मोठा आघात झाला होता. त्यानंतर 56 व्या वर्षी सरोगसीच्या मदतीने ते पुन्हा वडील झाले. 11 वर्षांची मुलगी वंशिकाला ते प्रचंड जपत होते. सतीश कौशिक (Satish Kaushik) यांच्या अचानक निधनानं त्यांचा परिवार जसा धक्यात आहे, तसेच त्यांचे मित्र, अभिनेते अनुपम खेर यांनाही जबर धक्का बसला आहे. अनुपम खेर यांनीच कौशिक यांच्या निधनाची बातमी सोशल मिडीयाच्या माध्यमातून चाहत्यांपर्यंत पोहचवली होती. याबाबत अनुपम खेर यांनी ट्विट केले आहे की, मला माहित आहे ‘मृत्यू हे या जगाचे शेवटचे सत्य आहे!’ पण मी माझ्या जिवलग मित्र सतीश कौशिक (Satish Kaushik) बद्दल असे लिहीन असे स्वप्नातही वाटले नव्हते. 45 वर्षांच्या मैत्रीला असा अचानक पूर्णविराम! ओम शांती सतीश कौशीक आज या जगात नसले तरी त्यांनी पडद्यावर साकारलेल्या पात्रांच्या माध्यमातून ते त्यांच्या चाहत्यांच्या हृदयात सदैव जिवंत राहणार आहेत.