‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
‘यांनी’ पाठवले बिमल रॉय यांना खास अभिनंदनाचे पत्र!
स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचे पन्नासचे दशक भारतीय समाजासाठी खूप महत्त्वपूर्ण होते. कारण या दशकातच नव्या भारताची मुहूर्तमेढ रोवली गेली. प्रत्येक क्षेत्रामध्ये चांगलं घडू लागलं. पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू सरकार दृष्टा नेता देशाला लाभला होता आणि त्यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र भारताची यशस्वी वाटचाल सुरू झाली होती. प्रत्येक क्षेत्रामध्ये नव्हे मन्वंतर घडत होते. चित्रपट क्षेत्र देखील यासाठी अपवाद नव्हते. १९५२ साली भारतात पहिल्यांदा जागतिक चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात आला. (Bimal Roy)
जगभरातील उत्तमोत्तम चित्रपट आणि सिनेसमीक्षक, कलावंत या सोहळ्याला उपस्थित राहिले. भारतीय प्रेक्षकांना जागतिक चित्रपटांची ओळख यातून निर्माण झाली. एक सांस्कृतिक घुसळण यातून होत गेली. राशोमान, बायसिकल थीफसारखे क्लासिक चित्रपट रसिकांना पाहता आले. त्यातील कलाकारांशी संवाद साधता आला. यातून भारतीय सिनेमाला एक चांगली दिशा मिळाली. सत्यजित रे, बिमल रॉय, ऋत्विक घटक यासारखे नव्या विचारांनी भारावलेले कलावंत चित्रपटाच्या दुनियेत आमूलाग्र असे बदल घडवून आणवू लागले. सत्यजित रे यांचा ‘पाथेर पांचाली’, बिमल रॉय (Bimal Roy) यांचा ‘दो भीगा जमीन’ ही त्याचीच फळे होती.
बिमल रॉय यांनी त्या नंतर देवदास, मधुमती, यहुदी हे चित्रपट बनवले. हे सर्व पॉप्युलर श्रेणीतील सिनेमे होते पण त्यांचा महत्त्वकांक्षी चित्रपट १९५९ साली आला होता. हा चित्रपट त्यांच्या कारकीर्दीतील एक माईल स्टोन सिनेमा होता. या चित्रपटाने भारतीय सिनेमाला एक नवी ओळख मिळवून दिली. हा चित्रपट पाहिल्यानंतर पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्यांच्या ऑफिशियल लेटरहेडवर निर्माता दिग्दर्शक बिमल रॉय (Bimal Roy) यांना एक अभिनंदनाचे पत्र पाठवले. या पत्रात त्यांनी बिमलदा यांचे कौतुक करत त्यांच्या नवीन कलाकृतीला शुभेच्छा दिल्या. पंतप्रधानांनी स्वतः पत्र पाठवणे ही त्या काळात खूप मोठी गोष्ट होती. हा चित्रपट होता ‘सुजाता’.
या चित्रपटात सुनील दत्त, नूतन, सुलोचना, शशिकला, ललिता पवार, तरुण बोस यांच्या प्रमुख भूमिका होत्या. चित्रपटाची गाणी मजरूह सुलतानपूरी यांनी लिहिली होती तर संगीत सचिन देव बर्मन यांचे होते. चित्रपटांमध्ये बिमलदा (Bimal Roy) यांनी त्या काळाची सुसंगत असा एक फार मोठा विषय हाताळला होता. हा चित्रपटात अस्पृश्यतेच्या प्रश्नावर भाष्य केले होते. या चित्रपटाचा नायक अधीर (सुनील दत्त) एक ब्राह्मण युवक असतो. त्याचे एका अस्पृश्य जातीतील मुलगी सुजाता (नूतन) वर प्रेम असते. या दोघांची एक हटके प्रेम कहानी या चित्रपटात दाखवली होती.
तसं म्हटलं हा विषय खूप काळाच्या पुढचा होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन करताना बिमल रॉय यांनी कुठेही प्रचारकी किंवा आपण फार काही मोठा संदेश देतो आहोत असा आव आणला नाही. चित्रपटाचे कथानक इतके सहज सोप्या आणि नैसर्गिक गतीने पुढे जाते की प्रेक्षक आपोआप त्यातील दिग्दर्शकाकडून मिळालेला मेसेज समजून घेत होते. हा चित्रपट पंडित जवाहरलाल नेहरू यांनी बघितला आणि ते खूप भारावून गेले. त्यांनी बिमल रॉय यांना त्यांच्या ऑफिशियल लेटरहेडवरून एक पत्र पाठवले. पंतप्रधानांच्या पत्रांनी बिमलदा देखील खूप भारावून गेले.
========
हे देखील वाचा : शहीद: मनोजकुमारचा पहिला देशभक्तीपर चित्रपट!
========
पंतप्रधान नेहरू यांनी एका ज्वलंत सामाजिक प्रश्नाला सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या पुढे आणल्याबद्दल कौतुक केले होते. सिनेमा या माध्यमाची ताकत खूप मोठी असते आणि तिचा वापर अशाच पद्धतीने व्हायला हवा हि आशा देखील त्यांनी व्यक्त केली होती. यानंतर बिमलदा (Bimal Roy) काबुलीवाला, बंदिनीसारखे अप्रतिम चित्रपट रुपेरी पडद्यावर आणले. बिमलदा यांची कला कारकीर्द तशी दहा वर्षाची पण या दहा वर्षात त्यांनी पुढच्या शंभर वर्षाचे काम करून ठेवले होते. कारण त्यांच्या सोबत काम केलेले सहकाऱ्यानी पुढे भारतीय सिनेमातील खूप भरीव अशी कामगिरी केली. त्यांनी बिमल रॉययांच वारसा पुढे चालवत उत्तम चित्रपटांची निर्मिती केली.
‘सुजाता‘ चित्रपट सुबोध घोष यांच्या एका बंगाली लघुकथेवर बनला होता. सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला. तसेच कांस फिल्म फेस्टिवलमध्ये या चित्रपटाचा समावेश होता. फिल्मफेअरचे सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (Bimal Roy) (बिमल रॉय) सर्वोत्कृष्ट नायिका (नूतन) सर्वोत्कृष्ट कथा (सुबोध घोष) ही चार पारितोषिके मिळाली. या चित्रपटातील ‘जलते है जिसके लिए तेरी आंखो के दिये..’ हे तलत मेहमूद यांनी गायलेला गीत तसेच सचिनदा यांच्या स्वरातील ‘सून मेरे बंधू रे..’ ही गाणी आज देखील रसिकांच्या मनात ताजी आहेत.