शकुंतलादेवींनी ७६८६३६९७७४८७० आणि २४६५०९९७४५७७९ या दोन संख्यांचा गुणाकार 28 सेकंदात केला!!!
मला कोणी चॅलेंज करत नाही… मीच मला चॅलेंज करते… हे वाक्य आहे ह्युमन कॉम्प्युटर म्हणून गौरव केलेल्या शकुंतलादेवी यांचे… गणित हा शकुंतला देवींचा आवडता विषय… आवडता म्हणजे गणितामधली कठीणातली कठीण उदाहरणं त्यांनी अगदी काही सेकंदात सोडवली आहेत… या शकुंतलादेवींचे सर्व जीवनच अभूतपूर्व होतं… त्यांच्या जीवनावर आधारीत शकुंतलादेवी, हु्यमन कंप्युटर हा चित्रपट लवकरच अमेझॉन पार्ईमवर प्रदर्शित होत आहे. विद्या बालन या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहे.
शकुंतलादेवी यांची प्रतिभा पाहून जगभरातील अनेक गणिततज्ज्ञ आश्चर्यचकित झाले होते. त्यांचा जीवनपट या चित्रपटात उलगडला आहे.
शकुंतलादेवींचा जन्म ४ नॊव्हेंबर १९२९ ला बंगलोरमध्ये झाला. पारंपारिक कन्नड ब्राह्मण कुटुंब… पण वडीलांना भिक्षुकी करायची नव्हती… किंवा मंदिरातही पुजा करण्याची आवड नव्हती… त्यांनी सरळ सर्कसमध्ये काम करायला सुरुवात केली. तिथेच शकुंतलादेवींचे बालपण गेलं. वडील सर्कशीमध्ये पत्यांचा खेळ करायचे.. हे पत्ते त्यांनी सहज म्हणून शकुंतलादेवींना शिकवले… सहा वर्षाच्या शकुंतलादेवींनी त्यानंतर वडीलांना हरवलं… आपली मुलगी अजोड बुद्धीमत्तेची आहे, हे जाणीव झालेल्या पित्यानं मग सर्कस सोडली आणि मुलीला घेऊन स्वतंत्र गणिताचे शो करायला सुरुवात केली. ६व्या वर्षी शकुंतलाने म्हैसूर विद्यापीठात आपल्या अंकगणितीय कौशल्याचे प्रदर्शन केले.
पुढे शकुंतला देवी लंडनला गेल्या. जगभर प्रवास केला. त्यांची बुद्धिमत्ता आणि गणितीय कौशल्याने सर्वच आर्श्चयचकीत होत असत… अमेरिकेच्या दौऱ्यात त्यांनी संगणकापेक्षा अधिक वेगाने आकडेमोड पूर्ण करुन त्याची उत्तरे परीक्षकांसमोर अचूक सादर केली. डलास विद्यापीठात शकुंतलादेवींचा मुकाबला जलद कॉम्प्युटर ‘युनिव्हॅक’ बरोबर झाला. तेथे शकुंतलादेवींनी एका २०१ अंकी संख्येचे २३वे मूळ ५० सेकंदात काढले आणि फळ्यावर लिहिले. हे मूळ काढायला कॉम्प्युटरला ६२ सेकंद लागले.
१८ जून १९८० मध्ये त्यांना ७६८६३६९७७४८७० आणि २४६५०९९७४५७७९ या दोन संख्या गुणाकारासाठी देण्यात आल्या. हे आकडे लंडनच्या इम्पिरियल कॉलेजच्या संगणक विभागाने निवडले. त्यानंतर शकुंतला देवी यांनी या दोन आकड्यांचा अचूक गुणाकार करुन दाखवत केवळ २८ सेकंदामध्ये १८९४७६६८१७७९९५४२६४६२७७३७३० हे उत्तर दिलं. याच कामगिरीमुळे त्या ह्युमन कॉम्प्युटर म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. शकुंतला देवी याचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये दाखल झालं.
त्यांनी अनेक पुस्तकं लिहीली. दोन वर्षात 20 पुस्तकं शकुंतलादेवींनी लिहीली… त्या स्वतः वाद्यवादनही आवडीने करायच्या… २०१३ सालच्या एप्रिल महिन्यात, वयाच्या ८३ व्या वर्षी बंगलोरमध्ये शकुंतला देवी यांनी अखेरचा श्वास घेतला. शकुंतलादेवी शेवटपर्यंत स्वतःच्या अटींवर जीवन जगल्या…. गणितासाठी त्या जग फिरल्या… त्या स्वतंत्र विचारसरणीच्या महिला होत्या… गणित हा विषय शिकण्यासाठी अवघडच… मग शिकवतांना काय तारांबळ होत असेल हे विचारु नका… अशावेळी शकुंतलादेवी दहा ते वीस आकडी संख्याबरोबर खेळत असत. शकुंतलादेवींचा हा अचंबित करणारा प्रवास चित्रपट बघणा-यांनाही तसंच अचंबित करणार आहे. कारण यात विद्या बालनने केलेली शकुंतलादेवींची भूमिका तेवढ्याच ताकदीची असल्याची चर्चा आहे.
या गणिततज्ज्ञ महिलेची भूमिका करणं हे एक आव्हानच होतं. हे आव्हान स्विकारतांना विद्या बालननं शकुंतला देवींचा अभ्यास केला. विद्या सांगते, शकुंतलादेवींचा अभ्यास करतांना या महिलेच्या प्रेमात पडल्यासारखं झालं. त्यांचं कतृत्व अजोड आहे… एका अदभूत उर्जेचं कडं जणू त्यांच्याभोवती होतं… अशा महिलेची भूमिका करतांना आपण कुठेतरी कमी पडू की काय, अशी भीती मनात होती, असंही विद्या सांगते.
चित्रपटात महिला राज आहे. अनू मेनन दिग्दर्शक आहेत. तर एडीटर, पोस्ट प्रोडक्शन, संवाद आदी सर्व जबाबदा-याही महिलांनी सांभाळल्या आहेत. चित्रपटात विद्याबरोबर सानिया मल्होत्रा शकुंतला देवींची मुलगी म्हणून बघता येईल. तर अमित साद जावयाची भूमिका करीत आहे.
एकूण कोरोनामुळे सध्या अनेक चित्रपटांची प्रदर्शनाची गर्दी अमेझॉन प्राईमवर झाली आहे. त्यात या शकुंतलाचा नंबर कधी लागतो हे लवकरच कळेल… पण हा चित्रपट जेव्हा प्रदर्शित होईल तेव्हा अगदी सहकुटुंब हा चित्रपट बघा… अगदी लहान मुलांना आवश्य दाखवा… ज्या विषयाचा कंटाळा असतो, त्या विषयात महारत संपादन करुन संपूर्ण जगाला वंदन करायला लावणा-या महिलेचं कतृत्व प्रत्येकानं बघायलाच हवं…
सई बने