सोनाली कुलकर्णी ती कधी कधी स्टार असते, अनेकदा माणूसच!
प्रत्येक व्यक्ती ‘स्टार’ अजिबात नसते, तसेच प्रत्येक ‘स्टार’ मधला ‘माणूस’ भेटेलच याची खात्री नसते. खरं तर आम्ही ‘मिडिया’वाले स्टारची मुलाखत घेत असतो (ज्या ‘स्टार’ ची चलती ओसरते, त्याच्या मुलाखती घेण्याचेही प्रमाण कमी कमी होत जाते, तेव्हा त्याच्यातील ‘माणूस’ काय बरे विचार करत असेल?) हा बहुपदरी विषय आहे. काही ‘स्टार’ अगदी दीर्घकाळपणे आपले ‘स्टार’ डम जपतात याचे कौतुक वाटते (उदा. देव आनंद, राजेश खन्ना, रेखा) तर काही ‘स्टार ‘मधला बरा वाईट माणूस जास्त दिसत राहतो. (हा स्वतंत्र विषय आहे.)
सोनाली कुलकर्णीबद्लचा माझा अनुभव तसाच आहे. इतरांचा कदाचित वेगळा असू शकतो आणि त्यात आश्चर्य नाही. सगळीच माणसं सगळ्याना सारखीच ‘दिसली’ तर जगण्यात मजा नाही. प्रत्येकाची आपली एक ‘नजर’ असते आणि एखाद्या व्यक्तीमधला पॉझिटीव्ह गुण इतरांना निगेटिव्ह वाटू शकतो.
सोनाली कुलकर्णीत मला ‘स्टार’ क्वचितच दिसली अथवा दिसतेय असे का होत असावे याचा विचार करताना अजूनही नेमके उत्तर सापडत नाही आणि तेच चांगले आहे. काही काही प्रश्नांची उत्तरे माहित झाली की आणखीन प्रश्न निर्माण होतात. एखादे कोडे सोडवणे त्यापेक्षा सोपे.
सोनालीने कन्नड (त्या भाषेतील ‘चेलुवी’ या गिरीश कर्नाड दिग्दर्शित चित्रपटात सर्वप्रथम भूमिका साकारली म्हणून हा उल्लेख सर्वप्रथम केला) मराठी, हिंदी, इटालियन, इंग्रजी, तमिळ, तेलुगू, बंगाली आणि गुजराती इतक्या भाषेतील चित्रपटात भूमिका साकारत आपली वाटचाल आणि अनुभव चौफेर ठेवले. त्यातही पारंपरिक लोकप्रिय मनोरंजक चित्रपटात भूमिका साकारत असताना सेटवर ‘गरजेपुरते फिल्मी’ असावे लागते, वेगळ्या पठडीतील चित्रपटात भूमिका साकारत असताना सेटवर थट्टा मस्करी करायची नसते असेही अजिबात नसते. पण व्यक्तिरेखेचा ग्राफ, दिग्दर्शकाच्या ‘माईंडसेट ‘मधला चित्रपट, आपली पूर्ण क्षमता याचे भान ठेवावे लागते, तर अन्यभाषिक प्रादेशिक चित्रपटात भूमिका साकारत असताना त्या भाषेची गरजेपुरती ओळख करुन घेत घेत भूमिकेला न्याय द्यावा लागतो. आपण किती भाषांच्या चित्रपटात भूमिका साकारली हे फक्त ‘प्रगती पुस्तका’त गुण वाढावे यासाठी नसते. तर त्यातून अनेक प्रकारचे बरे वाईट अनुभव येतात ते व्यक्ती म्हणून जास्त गरजेचे असतात. प्रभाव टाकत असतात. सोनालीचे तेच झाले आहे असे मला वाटते.
नेमके सांगायचे तर १९९५ साली भारताचा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव मुंबईत असताना डॉ. जब्बार पटेल दिग्दर्शित ‘मुक्ता’ ने इंडियन पॅनोरमाचे न्यू एक्सलसियर थिएटरमध्ये उदघाटन असताना बाहेरच माझी वैद्य नावाच्या एका फिल्मवाल्यानी सोनाली कुलकर्णीशी माझी ओळख करुन दिली. जब्बार पटेल यांच्या दिग्दर्शनातील कलाकारांची निवड अतिशय पारखून होते ही ‘सामना’ ( १९७५) पासूनची अप्रत्यक्ष शिकवण. म्हणून सोनालीकडे पाह्यची दृष्टी तत्क्षणी वेगळी होती पण पहिल्या भेटीतील सोनालीवर फेस्टीवल फिवर अथवा आपण एका मान्यवर दिग्दर्शकाच्या चित्रपटात भूमिका साकारलीय याचा कोणताही गुण आढळला नाही आणि नवखेपणही जाणवले नाही. तिचे मोकळे हसू आजही आठवतेय. यावेळी औपचारिक गप्पात तिने ‘चेलुवी’ मध्ये भूमिका साकारलीय एवढेच समजले. ‘ती पुण्याची आहे बरं’ असे पटकन कोणी म्हणाले पण मी कायमच ‘संपूर्ण चित्रपटसृष्टी’ असाच फोकस कायम ठेवत नवोदितांच्या आणि नामवंताच्या छोट्या मोठ्या भेटी घेतो. सोनालीला त्याच वर्षी राज्य चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्राप्त झाला तेव्हा तिने आपल्या नातेवाईकांसोबत सेन्ट्रल रेल्वे लोकल ट्रेनने सेकंड क्लासमधून प्रवास केला अशी सांज लोकसत्ताने फोटो न्यूज केली.
सोनालीचा प्रवास खूप खूप वळणे घेत सुरु आहे. त्यात ‘एक दिशा मार्ग’ नाही, अन्यथा तिची एखादी विशिष्ट प्रतिमा अथवा चौकट तयार झाली असती. तिचं मराठी चित्रपटसृष्टीत करियर सुरु झाल तेव्हा मराठी चित्रपटाचा खूप अवघड काळ सुरु होता. ती हिंदी चित्रपटात भूमिका साकारु लागली तेव्हा मुख्य प्रवाहात चकाचक सिनेमाचे युग सुरु झाले होते (त्याचे श्रेय हम आपके है कौन, दिलवाले दुल्हनिया ले जाऐंगे यांनाच), अशा वेळी कधी मानसिक आनंद देणारे वेगळे तर कधी चांगले पैसे देणारे व्यावसायिक असे दोन्ही प्रकारचे चित्रपट स्वीकारत वाटचाल करावी लागते.
कधी वेगळ्या मनोरंजक चित्रपटातही खूप आनंद मिळतो (दिल चाहता है). खरं तर सिनेमाच्या जगात ‘अमूकच पध्दतीचे चित्रपट करेन’ असा सगळ्यांनाच निश्चय करता येत नाही. तर मध्येच जेव्हा जब्बार पटेल दिग्दर्शित डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या चित्रपटात रमामाई आंबेडकर यांची व्यक्तिरेखा साकारायची संधी मिळते तेव्हा ती भूमिका आपल्या संपूर्ण शक्तीनुसार अंतर्बाह्य करायची भावना आपोआप एकवटते. आणि अशा व्यक्तिरेखांचा फक्त अभिनय करायचा नसतो. तर त्या व्यक्तीला आपल्यात अधिकाधिक सामावून घ्यावे लागते. बायोपिक ही एकीकडे खूप अवघड आणि आव्हानात्मक निर्मिती असते, त्याच वेळेस अशा कलाकृतीशी संबंधित प्रत्येकाला बरेच काही ना काही शिकता येते, जाणून घेता येतं (अमक्या तमक्या बायोपिकने किती कोटी कमावले यापेक्षाही ही मिळकत खूप मोठी आहे).
सोनालीने समृध्दी पोरे दिग्दर्शित ‘डॉ. बाबा आमटे द रिअल हीरो’ या चरित्रपटात मंदाकिनी आमटे, अभिजित देशपांडे दिग्दर्शित ‘…. आणि काशिनाथ घाणेकर’ या चरित्रपटात सुलोचनादीदी अशा विविध प्रकारच्या व्यक्तिरेखा साकारत आपले अनुभव विश्व व व्यक्तीमत्व शक्य तितके समृद्ध केले. आणि अशा वेळी ज्यांची व्यक्तिरेखा साकारतोय त्यानाच भेटून आपण त्या भूमिकेचे होणे खूपच कसोटीचे असते (‘सामना’च्या एका दिवाळी अंकासाठी सोनालीची यावरच मुलाखत घेतली)
दुसरीकडे ‘घरखर्चासाठी, आपल्या लाईफस्टाईलसाठी ‘भारत’ सारखे काही मराठी आणि हिंदी चित्रपटात भूमिका करायच्या असतातच. कधी उपग्रह वाहिनीवर ‘झलक दिखला जा’ मध्ये सहभाग घ्यायचा. तिने ‘पोस्टर बॉईज’ (हिंदी), ‘सिंघम ‘मध्ये भूमिका का बरे केली अशा मला पडलेल्या प्रश्नाचे उत्तर असते ते थोडे रिलॅक्स होण्यासाठी! एकीकडे देवराई, कच्च्या लिंबू, गाभ्रीचा पाऊस, रेस्टॉरंट अशा चित्रपटात भूमिका साकारत असताना अधिकाधिक फोकस्ड असावेच लागते, तेव्हाच ‘थोडा चेंज’ म्हणून व्यावसायिक चित्रपटात भूमिका साकारावी. त्यात तो ‘गुलाब जाम’ सारखा मिस्कील, मार्मिक असा असतानाच वेगळे वळण घेणारा असेल तर कामाचा आनंद आणि मग रिलॅक्स मूड असा छान समतोल.
लोकसत्तातील व्हीवा पुरवणीतील “सोकुल” म्हणजे तिने आपल्या आजूबाजूच्या जगावरचा, लहान मोठ्या अनुभवाचा वाचकांशी केलेला सुसंवादच. ती स्वतः चांगली वाचक आहे (ती माणूसही वाचते असे अलिकडे मला वाटू लागलेय), सर्व प्रकारच्या अनुभवासाठी पारदर्शक आहे, ती मोकळेपणे व्यक्त व्हायला कचरत नाही (त्यासाठी आपले ‘स्टार’ पण विसरावे लागते), ती सामाजिक आंदोलनात सहभागी होते (पानसरे, दाभोळकर हत्या प्रकरणीच्या मूकमोर्चात ती सहभागी झाली), असे करता करता ती सोशल मिडियातही अॅक्टीव्ह आहे. विशेषतः अनेकांना ट्वीटने वाढदिवसाच्या शुभेच्छा देते (गतवर्षी मलाही दिल्या), अलका आठल्येला शुभेच्छा देतांना ‘आपण एकत्र काम करायला आवडेल’ असे मोकळेपणे सांगणे, पुणे शहरातील आपल्या सायकल फेरीचे फोटो शेअर करणे तर कधी पवईतील नवीन घरातील गुढीपाडवा वगैरे सणाचे फोटो शेअर करणे, आपला पती नचिकेत पंतवैद्य आणि आपल्या मुलीसोबतचे फोटो शेअर करणे, विदेशी शूटिंगसाठी जाताना विमानतळावरचा/विमानातील फोटो शेअर करणे या सगळ्यात तिचे खरेपण आणि उत्साह दिसतो. सोशल मिडिया म्हणजे आपल्या ग्लॅमरस लूकचा फोटो शेअर करणे हा अलिखित नियमही ती अंमलात आणते.
तिच्या ‘सोकुल’ लेखनाचे राजहंस प्रकाशनने पुस्तक प्रकाशित केले आहे, आता याच सदराचे तिचे दुसरेही पुस्तक येईल तेवढ्यात लॉकडाऊन सुरु झाला. सर्वसाधारण माणसांप्रमाणे अनेक सेलिब्रेटिजनाही कोरोनाने गोंधळवून टाकले. सोनालीला अशा वेळी ‘आपले कुटुंब, आपले वाचन, आपली जगभरातील चित्रपट पाहण्याची आवड यासाठी भरपूर वेळ देता आला. या काळात व्हाॅटसअपवर दोन तीनदा आमचा झालेला संवाद पुरेसा होता. उगाच, फोन करून ‘लॉकडाऊनच्या दिवसात काय करते’ असा प्रश्न करणे योग्य वाटले नाही.
काही वर्षांपूर्वी एका मराठी वृत्तवाहिनीवर मराठी चित्रपटविषयक चर्चेत महेश कोठारे, अवधूत गुप्ते यांच्यासह आम्ही दोघे होतो. आम्हा सर्वांचेच चित्रपट माध्यमावर प्रेम असल्याने अनेक मुद्दे आणि गुद्दे समोर आले. तर चित्रपट व्यसनी सुरेश शेलार याने अगदी आवर्जून आयोजित केलेल्या अमोल पालेकर दिग्दर्शित ‘दायरा’ या चित्रपटाच्या शोला सोनालीने आवर्जून हजर राहून सुरेशचा हुरुप वाढवला. अशा निष्ठेने ‘सिनेमामय’ झालेली व्यक्तीमत्वे समाजात आज खूप कमी आहेत याची सोनालीला नक्कीच जाणीव आहे.
आजच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सोनालीला शुभेच्छा देताना वाटतेय, आज मराठी आणि हिंदी चित्रपटात विविध प्रकारचे चित्रपट निर्माण होताहेत, त्यात तिच्या वाटेला विविध प्रकारच्या व्यक्तिरेखा साकारण्याची संधी नक्कीच मिळेल. तशी तिची चांगले काम करण्याची भूक खूप मोठी आहे आणि तेवढी तिची क्षमता, सातत्य आहेच. बदलता सिनेमा सोनालीसारख्या बुध्दीवादी कलाकारांना पर्वणीच असते. हे होत असतानाच तिला हुलकावणी देत असलेला अभिनयाचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त व्हायलाच हवा. त्यासाठी शुभेच्छा!