द वझे फॅक्टर !
भाडिपाच्या स्टँडअप कॉमेडी मंचावरून सगळ्यांना खळखळून हसवत भाटुपा सह विषय खोल मंचाद्वारेही आपली छाप उमटवणार्या सावनी वझेशी मारलेल्या या गप्पा !
१. वकिलीचे शिक्षण ते स्टँडअप कॉमेडी हा प्रवास कसा होता?
मी सोशल मीडियावर एक पोस्ट पाहिली होती. ‘तुम्हाला स्टँड अप कॉमेडी करायची असल्यास तुमचा कॉमेडी व्हिडिओ पाठवा’ अशी एकंदरीत ती पोस्ट होती. तेव्हा माझी एक इंटर्नशिप सुरू होती. सिनियर्स आणि आम्ही एकमेकांना डेअर देऊन व्हिडिओ पाठवायला भाग पाडलं होतं. शेवटी व्हिडीओ मेल केला आणि त्यातून त्यांनी मला सिलेक्ट करून फीडबॅक सेशन साठी बोलवण्यात आले आणि माझ्या या प्रवासाची सुरुवात झाली.
२. स्टँडअप कॉमेडीची आवड निर्माण होण्यामागचं कारण कोणतं?
मी सतत युट्युब वर स्टँड अप कॉमेडी पाहत राहायची. तसा काही फॅमिली बॅकग्राऊंड नाहीये. व्हिडिओ पाहून पाहूनच आवड निर्माण झाली.
३. स्टँड अप कॉमेडी व्यतिरिक्त तुझ्या आवडी-निवडी काय आहे? किंवा तू एकंदरीत कोणकोणत्या क्षेत्रात काम करतेस, याबद्दल आम्हाला ऐकायला नक्की आवडेल!
मला लिहायला फार आवडतं. ह्युमर हा माझा आवडता विषय आहे. भाडिपा साठी देखील मी वेगवेगळ्या स्क्रिप्ट लिहीत असते.
४. हे सगळं करत असताना भाटुपा आणि विषय खोल कडे कसा काय मोर्चा वळला?
भाडिपा चालू असताना वेगवेगळ्या स्क्रिप्टचं लिखाण चालू होतं. ‘मिस मॅनर्स’, ‘आई आणि मी’ आणि अन्य काही विषयांवर लेखन सुरू होतं. भाटुपा सुरू झालं तेव्हा आम्ही पाँडीचेरीला एक रँडम सुरुवात केली होती. त्यानंतर बॅग पॅकिंग व्हिडीओ, पॉडकास्ट असं करत एकेक गोष्टी सुरु होत गेल्या. पण खरं सांगायचं तर भाडीपा नंतर भाटुपा हे काही प्लॅन केलेलं नव्हतं.
हे करता करता ‘विषय खोल’ मध्येही मला प्रवेश मिळाला तो CAA आणि NRC मुळे! या दोन विषयांमध्ये मला खूप इंटरेस्ट असल्याकारणाने आम्ही वेगवेगळे पॅनल डिस्कशन्स केले. लॉकडाऊन मध्येही दोन – तीन एपिसोड केले.
५. भाटुपा आणि तुझ्यातलं नक्की नातं काय?
मुंबई आणि महाराष्ट्रातील खाद्यपदार्थ शोधून चाखणे, हे माझं मुख्य काम. मराठी, गुजराती, पंजाबी, साउथ इंडियन अशा वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ खाणे आणि ते कसे आहेत हे कॅमेर्यासमोर सांगत त्याचे व्हिडिओ बनवणे.. असं एकंदरीत आमच्यातलं नातं आहे.
६. आत्तापर्यंत चाखलेल्या चविष्ट खाद्यपदार्थांपैकी पैकी तुझा आवडता पदार्थ कोणता किंवा कुठला?
मला तरी मराठी थाळीच फार आवडली. सगळे मराठी जेवण एकत्र असलेली मस्त कम्फर्टेबल थाळी होती ती! मसाले भात, रस्सा भाजी, पुऱ्या , मोदक वगैरे सगळं..!
त्याबरोबर गुजराती पदार्थही मला आवडले. ते खाण्यासाठी आम्ही अहमदाबादला गेलो होतो. २०० वर्षे जुन्या रेस्टॉरंट मध्ये जाऊन आम्ही नाष्टा केला (ज्या ठिकाणी एकेकाळी सरदार वल्लभाई पटेल बसले होते!).
७. या प्रवासातील सर्वात भारी अनुभव कोणता होता?
असे अनेक भारी अनुभव आहेत. त्यातला पहिला म्हणजे साबरमती रिव्हरफ्रंटचा ! तिथे आम्ही डबल सायकलिंग केलं होतं.
खाण्याबद्दलचा एक अनुभव देखील मला सांगावा वाटतो. चेंबूर मध्ये एका ठिकाणी आम्ही अमृतसरी छोले आणि कुलचे खाल्ले होते. गुरुद्वारामध्ये जाऊन आम्ही लंगर खाल्लं होतं. त्यामुळे या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी खूप आनंददायी आणि अमूल्य आहेत.
८. खाण्याबद्दलचे इतके सारे व्हिडिओ करत असताना त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा असला पाहिजे, याबद्दल आपल्या वाचकांना काय सांगशील?
आम्ही गुजरातला स्पेशल थाळी खाण्यासाठी गेलो होतो. त्या थाळीतल्या भाज्या या गुजरातच्या दोन वेगवेगळ्या प्रांतांतून आल्या होत्या. ज्या प्रांतात जास्त काही पिकत नाही, तिथून शेवेच्या भाजीची पद्धत सुरू झाली. अशाप्रकारे खाद्यपदार्थांवरून तिथल्या भौगोलिक परिस्थितीचा, तिथल्या हवामानाचा अंदाज आम्हाला घेता आला.
त्यामुळे काहीही खाताना या गोष्टींचा विचार देखील आपण करायला हवा. हे कुठून आलं, का आलं, आपल्यापर्यंत कसं पोहोचलं या सगळ्याचा विचार व्हायला हवा.
आम्ही जेव्हा पूर्ण टीम खाद्यपदार्थांचे व्हिडिओ बनवण्यासाठी फिरत असतो, तेव्हा कधीच अन्न वाया घालवत नाही. अगदी शेवटचा घासही नाही! ऑर्डर केलेलं संपवल्याशिवाय आम्ही तिथून उठलोय, असं कधीच झालं नाही. हा एक अलिखित नियम आम्ही कटाक्षाने पाळतो.
९. तुझ्या आयुष्यातली एखादी फॅन मोमेंट !
माझ्या मैत्रिणीचा वाढदिवस होता. तेव्हा आम्ही सगळ्याजणी फोर्टला गेलो होतो. तिथे आम्ही खात बसलो होतो. तेव्हा एक मुलगा पूर्णवेळ आमच्याकडे पाहत होता. कदाचित त्याने मला ओळखलं, पण तो ठाम नव्हता. जेव्हा मी इंस्टाग्राम वर स्टोरी टाकली, तेव्हा तो येऊन माझ्याशी बोलला (तेव्हा त्याचा विश्वास बसला की ती मीच आहे!).
हॉंगकॉंग एअरपोर्टला मला एक मराठी बाई भेटली होती. आम्ही भाडीपा वर एक पॉडकास्ट केलं होतं. माझ्या व्हिडिओज पैकी सर्वात कमी व्ह्यू असलेलं ते पॉडकास्ट. ते तिने पाहिलं होतं. आम्ही मुंबईतून एकाच फ्लाइटने हॉंगकॉंगला गेलो होतो. पण तिने तिथे पोहोचल्यावर मला विचारलं की ‘तुम्ही या पॉडकास्ट मध्ये होतात ना!’
१०. मोठमोठ्या प्रसिद्ध कलाकारांसोबत तुला काम करायला मिळालं, हा अनुभव कसा होता?
खूपच छान होता. बऱ्याच सेलिब्रेटिंसोबत काम करायला मिळालं! त्यांना भेटेपर्यंत असं वाटतं की ‘अरे बापरे, कसे असतील हे’. पण एकदा भेटल्यावर समजतं की तेही आपल्यासारखेच साधे असतात. डाऊन टू अर्थ असतात. फ्रेंडली असतात.
११. तुझी स्टॅंडअपची सुरुवात अगदीच अचानक झाली! मग स्टॅन्डअप परफॉर्मन्स कशाप्रकारे पॉलिश केलेस ?
व्हिडिओज पाहत होते मी खूप! त्यातून शिकत होते. पण ‘तृप्ती खामकर’ हिने मला खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले. माझ्या पहिल्या स्टँड अप आधी मी तिला भेटायला गेले होते. तेव्हा तिने मला स्टँड अप मधील अनेक नियम सांगितले. बघताना आपल्याला ते जाणवत नाही, पण स्टँडअप मध्येही साचेबद्धपणा असतो. नियम, पद्धती असतात! पण सादरीकरण करताना असं जाणवू न देणे ही खरी कसोटी असते.
१२. भाडिपा, भाटुपा किंवा इतर प्लॅटफॉर्म सोबत तुझे फ्युचर प्लॅन्स काय आहेत?
मी सध्या लिखाणावर फोकस करत आहे. नवीन गोष्टी नवीन फॉर्ममध्ये लिहिण्याचा सराव सुरू आहे. कायद्याचं (लॉ) शिक्षणही पूर्ण झालं आहे त्यामुळे आता तीही प्रॅक्टिस सुरू होईल. मग दोन्ही गोष्टींचा समतोल साधण्याचा प्रयत्न करेन.
१३. रॅपिड फायर राउंड
ड्रीम प्रोजेक्ट – लॉ बद्दल स्टँड अप कॉमेडी करणे
फेवरेट स्टँड अप कॉमेडियन – नवीन रीचर्ड
स्वतःला रिचार्ज करण्याचा मार्ग – झोपणे
लाइफ लेसन – प्लॅन ए सोबत प्लॅन बी आणि सी सुद्धा तयार ठेवावा!
कलाकृती मीडिया तर्फे सावनी वझे हिला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा !
- मुलाखत आणि शब्दांकन : सोनल रमेश सुर्वे