टॅक्सी हीरो: शशी कपूर!
हिंदी चित्रपटसृष्टीत कपूर, खान, खन्ना, कुमार, जोहर, भट्ट अशा आडनावाच्या कलाकारांना सहजी रुपेरी पदार्पणाची संधी असली तरी त्यांना आपले कर्तृत्व सिध्द करावेच लागते. याचे उत्तम उदाहरण जंटलमन शशी कपूर. कपूर असूनही त्याला सहजासहजी यश मिळाले नाही आणि कपूर आहे म्हणून त्याला रसिकांनी पटकन स्वीकारले असेही नाही. अगदी पृथ्वीराज कपूरच्या तीन पुत्रांपैकी सर्वात धाकटा आणि राज कपूर व शम्मी कपूर यांचा सख्खा भाऊ असूनही शशी कपूरने आपल्याच मेहनत, गुणवत्ता, शैली आणि नशीब या गुणांवर आपले हुकमी स्थान निर्माण केले. ते देखिल असे की…
राज कपूर “सत्यम शिवम सुंदरम” च्या (१९७८) निर्मिती आणि दिग्दर्शनात गुंतला असतानाची गोष्ट. या चित्रपटासाठी राज कपूरने आर. के. स्टुडिओ आणि लोणी येथील आपली राज बाग येथे आलटून पालटून दीर्घकाळची शूटिंग सत्रे आयोजित केली. तसे सेटही लावले. पण… पण अनेकदा शशी कपूर कधी बरे सेटवर येतोय याची त्याला वाट पहावी लागे. ‘घरचा हीरो’ असूनही हे करावे लागले हो.
शशी कपूर सेटवर यायचा ते दोन तीन तास काम करून आणखीन एखाद्या सेटवर जाण्यासाठीच. राज कपूरची कामाची पध्दत म्हणजे, एकदा का आपले कलाकार सेटवर आले की त्यांनी फक्त याच चित्रपटाचा विचार करावा. पण शशी कपूर त्या काळात इतका आणि असा बिझी होता की, त्याला
‘या चित्रपटाच्या शूटिंगवरुन त्या चित्रपटाच्या सेटवर जायचे’ इतकेच माहित होते. शशी कपूरचे हे असे येणे आणि जाणे पाहून राज कपूरने म्हटले, शशी कपूर म्हणजे ‘टॅक्सी हीरो’! आणि राज कपूरनेच असे म्हटल्याने त्या काळातील मिडियाने नेमके तेच उचलून घेतले.
कपूर म्हटलं की तो देखणाच असावा लागतो, अगदी तस्साच शशी कपूर होता. कपूर म्हटलं की कॅमेराही एक प्रकारचा कम्फर्ट असतो अथवा त्यांच्यावर कॅमेराचा कोणताही दबाव येत नाही अगदी तस्साच शशी कपूर होता. पण कपूर म्हटलं की, कोणत्याही संघर्षाशिवाय यश मिळेल तर ते अजिबात नाही. शशी कपूरला सहज यश मिळाले नाही. तसा तो आपले भाऊ राज कपूर आणि शम्मी कपूरपेक्षा वेगळा. तिघांची आपली स्वतंत्र शैली. आणि तिघांचेही प्रगती पुस्तक अगदी भिन्न.
शशी कपूरचे खरे नाव बलबीर राज. जन्म १८ मार्च १९३८ साली ब्रिटिश इंडियातील कलकत्ता (तेव्हाचे कोलकाता) येथे झाला. १९४८ च्या राज कपूर निर्मित आणि दिग्दर्शित ‘आग’ या चित्रपटात बालकलाकाराची भूमिका करून शशी कपूरने अभिनयाचा श्रीगणेशा केला. ‘आवारा’ मध्ये त्याने राज कपूरची लहानपणीची भूमिका वठवली. यश चोप्रा दिग्दर्शित बी. आर. चोप्रा निर्मित ‘धर्मपुत्र’ (१९६१) चित्रपटात त्याने नायकाच्या भूमिकेत पदार्पण केले. त्यानंतर तब्बल एकशे सोळा हिंदी चित्रपटातून त्यांनी भूमिका केल्या. याच चौफेर वाटचालीतील अगदी दुसरे टोक म्हणजे, द हाऊस होल्डर, शेक्सपिअरवाला, हिट ॲण्ड डस्ट, प्रेटी पॉलीसारख्या काही इंग्रजी चित्रपटातूनदेखिल त्यांनी विविध भूमिका साकारल्या.
नंदासोबतचे त्याचे चार दिवारी, मेहंदी लगी मेरे हाथ, मोहब्बत इसको कहते है, नींद हमारी ख्वाब तुम्हारे, रुठा ना करो या चित्रपटांना साधारण स्वरूपाचे यश मिळाले. सूरज प्रकाश दिग्दर्शित ‘जब जब फुल खिले’ (१९६५) याच्या यशाने शशी कपूर ‘स्टार’ झाला. बी. आर. चोप्रा निर्मित आणि यश चोप्रा दिग्दर्शित ‘वक्त’ने तो स्थिरावला. या चित्रपटात बलराज साहनी, राजकुमार, सुनील दत्त असे आणखीन नायक असूनही शशी कपूरचे अस्तित्व जाणवले. या चित्रपटातील त्याचे शर्मिला टागोरसोबतचे दिन है बहार के हे गाणे लोकप्रिय झाले आणि या चित्रपटापासून शशी कपूर आणि शर्मिला टागोर ही रोमॅन्टीक जोडी जमली.
शशी कपूर आणि राखी हीदेखील हिट जोडी. ‘जानवर और इन्सान ‘, ‘जमीन आसमान’, ‘दुसरा आदमी’ ‘त्रिशूल’ वगैरे चित्रपटात या जोडीच्या स्क्रीन प्रेझेंन्समध्ये खूप सहजता दिसते. समीर गांगुली दिग्दर्शित ‘शर्मिली’ या जोडीचा सर्वोत्कृष्ट चित्रपट. सत्तरच्या दशकात शशी कपूरच्या कारकीर्दीने चांगले वळण घेतले. काही चित्रपटात नायक तर काही मल्टी स्टार कास्ट चित्रपटातील एक सहनायक अशी त्याची वाटचाल सुरु झाली.
गुलशन राॅय निर्मित, यश चोप्रा दिग्दर्शित आणि सलीम जावेद लिखित त्रिमूर्ती फिल्मच्या ‘दीवार’ (१९७५) मधील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता म्हणून त्यांनी फिल्म फेअर अवार्ड पटकावला. एका नाट्यपूर्ण क्षणी शशी कपूर अतिशय शांतपणे ‘मेरे पास माॅ है’ असे म्हणतो आणि अमिताभने अतिशय उंचीवर नेलेल्या प्रसंगात शशी कपूर अनपेक्षितपणे बाजी मारुन जातो. शशी कपूर आणि अमिताभ बच्चन ही जोडी ‘रोटी कपडा और मकान’, ‘कभी कभी’, ‘सुहाग’, ‘शान’, ‘नमक हलाल’, ‘दो और दो पाच’, ‘सिलसिला’, ‘इमान धरम ‘, ‘त्रिशूल ‘, ‘काला पत्थर’, ‘अकेला ‘ अशा एकूण बारा चित्रपटात एकत्र आली हे विशेषच आहे. प्रेम कहानी, चोर मचाये शोर, गौतम गोविंदा, दीवानगी, अतिथी, फकीरा, हीरा और पत्थर, सलाखे, फांसी, पिघलता आसमान, काली घटा, मुक्ती, दो मुसाफिर, शंकर दादा, मान गये उस्ताद, आप बिती, आंधी तुफान, वकिल बाबू, पाखंडी, अपना खून, क्रोधी, भवानी जंक्शन, पाप और पुण्य, अलग अलग, न्यू दिल्ली टाईम्स… शशी कपूरच्या चित्रपटांची नावे सांगावी तेवढी थोडीच.
हे देखील वाचा: कटी पतंग मध्ये शर्मिला ऐवजी आशा पारेखची निवड का केली गेली?
स्वतःच्या ‘फिल्मवालाज’ या चित्रपट निर्मिती संस्थेद्वारे त्याने वेगळी वाट निवडली होती. शाम बेनेगल दिग्दर्शित ‘जुनून’ (१९७८), ‘कलयुग’ (१९८१ ), गिरीश कर्नाड दिग्दर्शित ‘उत्सव’ (१९८४), गोविंद निहलानी दिग्दर्शित ‘विजेता’ (१९८२) या चित्रपटांची निर्मिती केली. सोविएत रशियातील चित्रपटकर्ते गेनाडी वासिलएव यांच्या सहदिग्दर्शनात शशी कपूर यांनी ‘अजूबा’ (१९९१) हा अतिभव्य फॅन्टसी चित्रपट निर्माण केला.
अमिताभ बच्चन, ऋषि कपूर, डिंपल कपाडिया आणि सोनम असे मोठे स्टार असूनही या चित्रपटास म्हणावे तेवढे यश मिळाले नाही. दिग्दर्शक म्हणून शशी कपूर यांचा हा एकमेव चित्रपट होय. पण त्याला व्यावसायिक यश न मिळाल्याने शशी कपूरने चित्रपट निर्मिती आणि दिग्दर्शन असे दोन्ही थांबवले. खरं तर असे व्हायला नको होते. पण आर्थिक सुरक्षितता असल्याशिवाय चित्रपट निर्मितीचे पाऊल टाकता येत नाही. मग तो ‘कपूर’ असला म्हणून काय झाले?
कलकत्ता येथे पृथ्वी थिएटरचे प्रतिनिधित्व करत असताना, शेक्सपिअरिअन ग्रुपच्या जेफ्री केंडल यांच्या जेनिफर या कन्येशी त्यांचे प्रेमसंबंध जुळले. ७८ साली त्यांनी विवाह केला. आपले पिता पृथ्वीराज कपूर यांच्या स्मरणार्थ शशी कपूर यांनी जुहू येथे ‘पृथ्वी थिएटर’ची स्थापना केली. शशी कपूरच्या कुणाल व करण या मुलांनी काही हिंदी चित्रपटात भूमिका केल्या. तर कन्या संजना कपूर यांनी पृथ्वी थिएटरची धुरा यशस्वीरीत्या सांभाळली. १९९८ साली ‘जिन्नाह’ आणि ‘साईड स्ट्रीटस्’ या आंतरराष्ट्रीय चित्रपटात भूमिका केल्यानंतर शशी कपूरने चित्रपट जीवनातून निवृत्ती पत्करली.
एव्हाना चित्रपटसृष्टीत बरेच बदल झाले होते आणि त्याच्याशी जुळवून घेण्याची कसरत करण्यापेक्षा थांबणे योग्य ठरते आणि ग्रेसफुली बाजूला होता येते. शशी कपूरला ते जमले. कपूर असल्याने ती व्यावसायिक मॅच्युरिटी कौतुकाची ठरली. २०१५ साली शासनाने त्यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित केले. भारत सरकारने २०११ साली पद्मभूषण पुरस्काराने त्याचा सन्मान केला.
४ डिसेंबर २०१७ रोजी मुंबईत कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये यकृताच्या विकाराने त्यांचे प्राणोत्क्रमण झाले. आजही ती दुर्दैवी संध्याकाळ मला आठवतेय. विलेपार्ले येथे एका इव्हेन्टसमध्ये मी रमलो असतानाच एकामागोमाग एक मराठी उपग्रह वाहिन्यांचे शशी कपूरच्या निधनावरील माझ्या प्रतिक्रिया अथवा आठवणी याबाबत फोन येत गेले. ‘अजूबा’चे त्याने दिग्दर्शन केले त्यानिमीत्ताने त्यांच्या विशेष मुलाखतीचा योग आला असल्याने ती आठवण मी पटकन सांगितली.
तर सत्तरच्या दशकात प्रेक्षक म्हणून आणि त्यानंतर समिक्षक म्हणून शशी कपूरचे अनेक चित्रपट पाहिल्याचा अनुभव होताच. अखेरच्या काळात तो व्हीलचेअरवर होता. तरीही त्याने राजेश खन्नाच्या निधनानंतरच्या (१८ जुलै २०१२) वांद्र्याच्या एका पंचतारांकित हॉटेलमधील श्रध्दांजली सभेला आवर्जून हजर राहून आपल्या व्यावसायिक साथिदाराला अखेरचा निरोप दिला. शशी कपूरचे हे रुप माणूसपणाचे होते. ‘कपूर’ म्हटला की तो फिल्मीच असतो आणि हिंदी चित्रपटाचा कलाकार म्हणजे केवळ स्टारच असतो असे नव्हे असे अशा प्रसंगात अधोरेखित होत असते. यावेळचे शशी कपूरच्या डोळ्यातील अश्रूच खूप काही सांगत होते. महत्वाचे म्हणजे, खान,कपूर, खन्ना, कुमार असा कोणीही असो, तो अगोदर माणूसच असतो आणि तो असा प्रत्यक्षात दिसतो.