दोन महिने झाले, अंधारात चित्रपटगृहे….
तुम्हाला कदाचित कल्पना नसेल पण सत्तरच्या दशकात ‘मेन पिक्चर’ च्या अगोदर जाहिरातपट संपल्यावर भारतीय समाचार चित्र दाखवले जाई. हे समाचार चित्र अगदी संपण्याच्या टप्प्यावर आले रे आले की हॉलमधील उर्वरित दहा टक्के लाईटसही बंद होत आणि पब्लिक अधिकाधिक पडद्याशी एकरुप होत असत. आता सेन्सॉर सर्टिफिकेटस येईल आणि सिनेमा सुरु होईल अशी त्याला जणू मेंदूकडून सूचना होई. एखादी शिट्टीदेखिल वाजे….. आपल्या सिनेमाच्या प्रेक्षक संस्कृतीची हीदेखील एक खासियत.
हे आठवलं याचे कारण राज्यातील सिनेमा थिएटर बंद ठेवावी लागून दोन महिने तर देशातील थिएटर बंद ठेवावी लागून पन्नास दिवस पूर्ण झाले. हा रिऍलिटी शो आहे. कोरोना प्रतिबंधक उपाय म्हणून, फिजिकल डिस्टन्सिंगची गरज म्हणून पारंपरिक सिंगल स्क्रीन थिएटर्स आणि आजच्या पिढीतील मल्टीप्लेक्स यांचा ‘शो’ थांबला आहे. समाजात पसरलेल्या शांतेतत त्यांचाही सहभाग आहे. सिंगल स्क्रीनबाहेरचा सायकल स्टॅन्ड आज सुना पडला आहे. बाहेरगावच्या थिएटरबाहेर हा सायकल स्टँड खचाखच भरलेला दिसला की पिक्चरमधे दम आहे असाच अर्थ काढला जाई. रिक्षावाले, वडापाव विक्रेते आज नेहमीची सवय विसरुन गेले आहेत. काय करणार बिचारे? आजकालची मल्टीप्लेक्स सिनेमावर नव्हे तर पॉपकॉर्न, समोसा, सॉफ्ट ड्रिंक आणि पार्किंगवर जास्त चाललात. तोही बिझनेस ठप्प झाला आहे. सिनेमाभोवतीचे जग जास्तच मोठे वैशिष्ट्यपूर्ण आहे.
पण आज कल्पनेपलीकडे हे शांत शांत असे सिनेमा थिएटरचे जग दिसतेय. ही शांतता त्या पडद्याचाही जीव गुदमरवून टाकत असेल. अगदी टोटल फ्लॉप फिल्मलासुद्धा समोर मोजकेच पब्लिक असले तरी पडदा मात्र सिनेमा दाखवण्याचे आपले ‘कर्तव्य’ पार पाडतच असतो. के. असिफचा ‘मुगल ए आझम’ आणि राज कपूरचा ‘मेरा नाम जोकर’ असो किंवा आमिर खानचा ‘दंगल’ अथवा सलमान खानचा ‘ट्यूबलाईट’ असो….. सिनेमाचा पडदा कोणावरही अन्याय करीत नाही! सिनेमाचा पडदा कधीच हा चित्रपट धंदेवाईक आणि हा समांतर अथवा कलात्मक असा अजिबात भेदभाव करीत नाही. त्याचे एकच कर्तव्य सिंगल स्क्रीन असेल तर प्रोजेक्शनवर प्रिंट चढवायची आणि मल्टीप्लेक्स असेल तर युएफओने म्हणजे सॅटेलाइटने चित्रपट दाखवायचा. (ही तांत्रिक प्रगती आता सिंगल स्क्रीनलाही आहे) आणि समोरच्या रसिकांत सर्वधर्मसमभाव हा बाणा जपायचा. आपल्या देशात क्रिकेट आणि सिनेमा यांनी राष्ट्रीय एकात्मता वाढवलीय. मास अपिल असलेल्या या लोकप्रिय आणि समाजात दूरवर पोहोचलेल्या दोन्ही गोष्टी.
या दोन महिन्यांत या ‘चिडीचूप’ सिनेमा थिएटरचे दुःख काय सांगावे? बुकिंग क्लार्कपासून डोअरकिपरपर्यंत सगळे शांत शांत. काही जण आपल्या ‘फ्लॅशबॅक’ मध्ये रमले असतीलच. हाऊसफुल्ल शोच्या आठवणी वेगळ्या आणि एकेका प्रेक्षकाची वाट पाहत पाहत कंटाळा आलेल्या सिनेमाच्या आठवणी वेगळ्या. जसे सिनेमाचे सगळे दिवस सारखे नसतात तसेच सिनेमा थिएटरचेही सगळे दिवस सारखे नसतात. पण हेच थिएटर हाऊसफुल्ल गर्दीने राजेश खन्नासारखा ‘सुपर स्टार’ घडवतो आणि हेच थिएटर अमिताभ बच्चनच्या अॅन्ग्री यंग मॅनला आपलेसे करतो. हेच थिएटर शाहरूख खानला पडदाभर कन्फर्ट झोन देते आणि हेच थिएटर कंगना रानावतचे अष्टपैलू अभिनयाचे अनेक पैलू दाखवते. सिनेमाच्या वाटचालीत अथवा इतिहासात ‘त्याची थिएटर संस्कृती’ खूपच महत्वाची आहे, पण दुर्दैवाने दुर्लक्षित राहिलेली आहे. आपल्याकडे ‘सिनेमाचे जग’ म्हणजे गॉसिप्स/ग्लॅमर/गल्ला पेटी/गप्पा या फोर ‘जी’ पुरतेच विचारात घेतले जाते. खरं तर, प्रत्येक चित्रपटगृहाला आपले एक स्वतंत्र व्यक्तीमत्व आहे. क्षणभर तुम्हीदेखिल आपल्या आवडत्या थिएटरला डोळ्यासमोर आणा, बघा तेच लक्षात येईल. पूर्वीचे अनेक फिल्म दीवाने तर आपल्या आवडत्या हिरोचा चित्रपट अमूकच थिएटरमध्ये आणि अमूकच सीटवर बसून बघत. तरच तो पिक्चर हिट होतो अशी त्यांची प्रामाणिक भावना. अनेक फिल्म क्रेझी तर सिनेमाची तिकीटे संग्रही ठेवत. हे सगळे पाहिल्यावर ‘प्रेक्षकांना सिनेमातले काय कळतेय?’ असे उठसूठ म्हणत असलेल्या जागतिक सिनेमाच्या स्वयंघोषीत अभ्यासकांचे आश्चर्य वाटते. अहो, आपल्या रसिकांना ‘गाईड’, ‘श्री ४२०’, ‘शोले ‘, ‘हम आपके है कौन ‘, ‘दिलवाले दुल्हनिया ले जाऐंगे’ अशा चित्रपटांना काळ मागे सरला तरी डोक्यावर घ्यायचे हे सांगावे लागले नाही.
आपल्या देशातील कानाकोपरातील सर्व थिएटर्स ही प्रामुख्याने पारंपरिक लोकप्रिय मसालेदार मनोरंजक चित्रपटांनी जगवलीत, जपलीत. आज दोन महिने ती ‘गप्प’ आहेत. पण त्यांचा इतिहास मात्र बोलतोय. असंख्य चित्रपटातील संवाद, गीत संगीत व नृत्य यांची पुढील पिढीत पोहचलेली लोकप्रियता याच थिएटरमध्ये घडलीय. यापूर्वी १९८६ साली १० ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर असा महाराष्ट्रातील चित्रपटसृष्टीचा अतिशय कडकडीत बंद होता. नो शूटिंग, नो रिलीज असा तो सर्वच स्तरांवर होता. मनोरंजन करात कपात आणि व्हिडिओ चोरीला आळा घाला वगैरे मागण्यांसाठी तो होता. यावेळी अगदी वेगळ्या सामाजिक परिस्थितीचा विचार करता थिएटर बंद ठेवण्यात आली आहेत. हाच शो आणखीन किती काळ असाच शांततेत राहिल या प्रश्नाचे उत्तर कोणाकडेही नाही. याची पटकथा आणि संवाद तयार नाहीत. हा अनाकलनीय असाच ‘नो शो’ आहे….
दिलीप ठाकूर