नालासोपारा रेल्वे स्टेशनवर सुचलेल्या ट्यूनवर बनले हिट गाणे!
संगीतकार मदन मोहन म्हणजे फ्लॉप चित्रपटांचा हिट संगीतकार(Hit Song)! याचा अर्थ त्यांच्या चित्रपटातील गाणी अतिशय अप्रतिम असायची. अतिशय मेलडीयस. कर्णमधुर. पण चित्रपटाला यश मात्र अजिबात मिळत नसे. चांगले बॅनर, चांगले नायक त्यांच्या वाट्याला तसे फार कमी आले त्यामुळे त्यांचे संगीत सुमधुर असून देखील चित्रपटांना व्यावसायिक यश मिळाले नाही. १९५० साली ‘आंखे’ या चित्रपटापासून त्यांनी हिंदी सिनेमाला संगीत द्यायला सुरुवात केली. तब्बल १४ वर्षानंतर १९६४ साली ‘वह कौन थी?’ या चित्रपटाला त्यांना पहिल्यांदा मोठे घवघवीत असे यश मिळाले. १४ वर्षाच्या काळात त्यांनी किमान ५० ते ५५ चित्रपटांना संगीत दिले होते पण त्यातील अगदी किरकोळ अपवाद (भाई भाई , देख कबीरा रोया, अनपढ) वगळता इतर सर्व चित्रपटांना अपयशच आले. पण या अपयशी चित्रपटातील गाणी मात्र अतिशय नितांत सुंदर होते. गोल्डन इराला आणखी समृध्द करणारी होती. संगीतकार मदन मोहन यांचे एक सहाय्यक होते घनश्याम. (संगीतकार श्यामजी घनश्याम जी वेगळे!) त्यांना देखील आपल्या बॉसला मदन मोहन यांना यश मिळायला पाहिजे असे वाटत होते घनश्याम यांची एका साधू वर खूप श्रद्धा होती. हे साधू महाराज नालासोपाराला राहत होते. एकदा त्यांना भेटून आपण त्यांच्या आशीर्वाद घेऊन असे त्यांनी मदन मोहन यांना सुचवले. हे साधू खूप तपस्वी साधू आहेत आणि त्यांच्या आशीर्वादाने आपले भाग्य बदलेल असे सांगितले.
अशा पद्धतीने संगीतकार मदन मोहन आणि घनश्याम साधू महाराजांना भेटायला नालासोपाराला जायला निघाले. विरारच्या अलीकडे असलेले नालासोपारा त्याकाळी एक छोटं गाव होतं. हे दोघे नालासोपारा रेल्वे स्टेशनवर रात्री साडेदहा अकरा वाजता पोहोचले. तिथून साधू महाराजांकडे जाण्यासाठी कुठलेही सुविधा उपलब्ध नव्हती. त्यामुळे त्यांनी रात्री स्टेशनवरच मुक्काम करायचे ठरवले. त्यावेळी म्हणजे साठच्या दशकाच्या मध्यावर (१९६६ साली) नालासोपारा स्टेशन देखील अतिशय छोटे स्टेशन होते. निर्जन होते. चिटपाखरू देखील तिथे फिरत नव्हते. दोघांनी स्टेशनवर पथारी पसरायचे ठरवले. परंतु घनश्याम यांनी स्टेशनमास्तरला भेटून रिटायरिंग रूम उघडून घेतली आणि तिथे झोपायचे ठरवले. परंतु संगीतकार मदन मोहन यांना जागा बदलल्यामुळे झोप येत नव्हती. (Hit Song)
रात्री दोन अडीच वाजता ते उठून प्लॅटफॉर्मवर आले सर्वत्र अंधार होता. अधून मधून एखादी ट्रेन पास होत होती. बाकी स्टेशनवर कोणीच नव्हते. पण ती रात्र पौर्णिमेची होती. टिपूर चांदणं पडलं होतं. थंड गार वारा सुटला होता. ते उल्हासित करणारे वातावरण होते. मदन मोहन यांची प्रतिमा त्या वातावरणात खुलली. ते प्लॅटफॉर्मवर येरझरा करू लागले. त्यांच्यासोबत घनश्याम देखील फिरू लागले. मदन मोहन यांच्या डोक्यात अनेक चाली त्यावेळेला येत होत्या आणि डमी शब्द वापरून त्या सुरावटी आपल्या तोंडातून गाऊन दाखवत होते. त्यातील एक चाल घनश्याम यांना खूप आवडली(Hit Song). त्यांनी लगेच त्याचे स्वर लेखन नोटेशन्स करून घेतले. दुसऱ्या दिवशी त्यांनी साधू महाराजांची भेट घेतली आणि पुन्हा ते मुंबईला परत आले.
त्यावेळी ‘दुल्हन एक रात की’ या चित्रपटाचे संगीत (Hit Song) मदन मोहन करत होते. या चित्रपटात एका रोमँटिक हळुवार गाण्यासाठी ही चाल त्यांनी वापरायचे ठरवले. खरं तर मदन मोहन ही चाल पूर्णपणे विसरून गेले होते परंतु घनश्याम यांनी त्याचे स्वर लेखन केल्यामुळे त्यांच्याजवळ ती चाल होती. लगेच त्यांनी राजा मेहंदी अली खान यांना बोलावले आणि त्यावर साजेसे शब्द लिहून घेतले आणि एक अतिशय हळुवार नाजूक तरल असं प्रेमगीत तयार झाले. हे गीत रफीच्या स्वरात रेकॉर्ड केले. ‘एक हसीन शाम को मेरा दिल खो गया…’ गाणं (Hit Song) त्या काळात खूप लोकप्रिय ठरलं होतं. आज देखील अनेक कार्यक्रमाचे हे गाणे गायलं जातं. पण चित्रपट पडल्यामुळे हे गाणं हीच या चित्रपटाची आठवण करून दिली आहे. या गाण्याला सुरसिंगारचे पारितोषिक मिळाले. राग झिंजोटी वर आधारित हे गाणं एक अप्रतिम प्रेम गीत आजही लोकप्रिय आहे.
======
हे देखील वाचा : सलीम जावेद यांनी रातोरात पेंटर कडून काय रंगवून घेतले?
======
जाता जाता थोडं या चित्रपटाबद्दल. ‘दुल्हन एक रात की ‘ हा चित्रपट थॉमस हर्डी यांनी लिहिलेल्या Tess of the d’Urbervilles या कलाकृतीवर आधारीत होता.धर्मेंद्र नूतन आणि रेहमान हे प्रमुख कलाकार होते. हेच तिघे १९६६ साली आलेल्या ‘दिल ने फिर याद किया‘ चे कलावंत होते. पण या सिनेमाला मिळालेलं यश ‘दुल्हन एक रात की ‘की लाभलं नाही. या सिनेमात तब्बल १० गाणी होती. आणि गमंत म्हणजे यातल्या बऱ्याचशा चाली आणि नंतरच्या चित्रपटातील अनेक चाली नालासोपारा रेल्वे स्टेशनवर मध्यरात्री नंतर सुचलेल्या होत्या. साधू महाराजांच्या भेटीचा हा शुभ संकेत होता कां? कल्पना नाही. परंतु कलावंताची प्रतिभा कधी आणि कुठे कशी बहरेल सांगता येत नाही.