महाराणी येसूबाईंच्या भूमिकेतले अमृता खानविलकरचे फोटो व्हायरल
‘या’ कपूरने आर के फिल्म्स मध्ये काम करायला दिला नकार
पूर्वीच्या काळात नीतीमत्ता होती, एकमेकांविषयी आदर होता, शब्दाला खूप किंमत असायची. दिलेला शब्द म्हणजे एक प्रकारचे वचनच असायचे आणि त्या शब्दाप्रमाणे त्या व्यक्तीचे वर्तन देखील तसेच असायचे. काहीसा असाच प्रकार चित्रपती व्ही शांताराम आणि अभिनेता पृथ्वीराज कपूर यांच्याबाबत झाला होता. अतिशय रंजक असा हा किस्सा आहे. ज्यातून त्या काळामध्ये लोक आपल्या दिलेल्या वचनाला किती प्रामाणिक राहत होते याचा प्रत्यय आपल्याला यातून येतो. आज धकाधकीच्या जीवनामध्ये सर्वत्र मूल्यांचा ऱ्हास होताना दिसतो. अशावेळी आपल्याला त्या काळातील त्या लोकांचे वर्तन आठवते आणि माणुसकी, प्रामाणिकपणा यावर विश्वास बसू लागतो ! काय होत हा किस्सा? कोणत्या चित्रपटाच्या वेळी ही घटना घडली होती ? (R. K. Film)
दिग्दर्शक व्ही शांताराम प्रभात चित्र संस्थेतून चाळीसच्या दशकाच्या आरंभी बाहेर पडले आणि त्यांनी राजकमल कला मंदिर याची स्थापना मुंबईला केली. लोअर परळ मध्ये राजकमल स्टुडिओ आज देखील कार्यरत आहे. या राजकमल चित्र संस्थेद्वारे त्यांनी अनेक उत्तमोत्तम चित्रपट निर्माण केले. त्यांच्या ‘डॉ कोटणीस कि अमर कहानी’ या सिनेमाची नोंद जगभरात घेतली गेली. (R. K. Film)
याच काळात समांतरपणे पृथ्वीराज कपूर आपल्या पृथ्वी थिएटरच्या माध्यमातून भारतभर विविध सामाजिक, ऐतिहासिक, पौराणिक विषयांवरील नाटके सादर करीत होते. शेक्सपियर यांच्या जीवनावरील अनेक नाटके पृथ्वी थिएटरच्या वतीने सादर होत होती. शांताराम बापू आणि पृथ्वीराज कपूर यांचा परस्परांशी परिचय जरी असला तरी एकत्र काम करण्याचा योग त्यापूर्वी कधी आला नव्हता. १९५० साली प्रदर्शित झालेला ‘दहेज’ या चित्रपटात पहिल्यांदाच ते एकत्र आले.
‘दहेज’ हा एक सामाजिक प्रश्नाला वाचा फोडणारा चित्रपट होता. हा सिनेमा निर्माण करताना शांताराम बापू यांच्या डोक्यात त्यातील एका महत्वाच्या भूमिकेसाठी पृथ्वीराज कपूर यांना घ्यायचे त्यांनी नक्की केले होते. ही व्यक्तीरेखा लखनौ मधील ठाकूर यांची होती. या ठाकूरची देहबोली पूर्णपणे पृथ्वीराज कपूर यांच्याशी मॅच होत होती; म्हणून त्यांनी पृथ्वीराज कपूर यांच्याशी संपर्क साधून आपल्या ‘दहेज’ या चित्रपटात काम करण्याची विनंती केली. (R. K. Film)
या मीटिंगमध्ये काही गोष्टी ठरल्या. त्यात पहिली गोष्ट अशी होती की, जोवर हा ‘दहेज’ नावाचा चित्रपट पूर्ण होत नाही तो पर्यंत पृथ्वीराज कपूर यांनी इतर कुठल्याही सिनेमात काम करायचे नाही. पृथ्वीराज कपूर यांनी ही अट मान्य केली आणि ते बापूंना म्हणाले,”जोपर्यंत तुम्ही स्वतः मला सांगत नाहीत की, आपला चित्रपट पूर्ण झाला आहे तोवर मी दुसऱ्या कुठल्याही चित्रपटात काम करणार नाही !” दुसरी अट शांताराम बापूंनी जी टाकली होती ती अशी होती की, या चित्रपटासाठी मानधन म्हणून पृथ्वीराज कपूर यांना ते दहा हजार रुपये देतील. त्यावर मात्र पृथ्वीराज कपूर म्हणाले,” अहो मी एका चित्रपटाचे पन्नास हजार रुपये घेत असतो”. (R. K. Film)
पण शांताराम बापू म्हणाले,” माझ्या चित्रपटाचे बजेटच खूप कमी आहे त्यामुळे कृपा करून तुम्ही एवढ्या पैशातच काम करा.” पृथ्वीराज कपूर ने होकार दिला पण त्यांनी एक अट टाकली ते म्हणाले,” ठीक आहे. मी आपल्या चित्रपटात काम करेन. पण हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर जर हिट झाला तर तुम्ही मला आणखी दहा हजार रुपये द्या जे मी माझ्या नाटक कंपनीला काम करणाऱ्या कलावंतांना देण्यासाठी वापरेन.” दोघेही आपापल्या अटी शर्तीवर राजी झाले. आणि १९४९ साली चित्रपटाचे ‘दहेज’ चे रीतसर शूटिंग सुरू झाले. (R. K. Film)
याच काळात आणखी एक घटना घडली. १९४९ साली पृथ्वीराज कपूर यांचे चिरंजीव राज कपूर यांनी आर के फिल्म च्या द्वारे बनवलेल्या ‘बरसात’ ला उदंड यश मिळाले आणि त्यांनी आपल्या नवीन ‘आवारा’ या चित्रपटाची आखणी करायला सुरुवात केली. या चित्रपटात राज कपूर यांनी आपल्या वडिलांना पृथ्वीराज कपूर यांना प्रमुख भूमिका द्यायचे ठरवले. त्या पद्धतीने राजकपूर आपल्या वडिलांकडे गेले आणि त्यांनी स्टोरी चा प्लॉट सांगायला सुरुवात केली.
त्यावर पृथ्वीराज कपूर म्हणाले,” ते सर्व ठीक आहे. पण मी शांताराम बापूंना शब्द दिला आहे जोपर्यंत ‘दहेज’ या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण होत नाही; तोपर्यंत मी दुसऱ्या कुठल्याही चित्रपटात काम करणार नाही! सध्या ‘दहेज’ चे चित्रीकरण चालू आहे त्यामुळे मी तुझ्या चित्रपटात काम करू शकत नाही!” त्यावर राज कपूर म्हणाला,” लेकीन पापाजी ये दुसरे की फिल्म थोडी है. ये तो अपने घर की फिल्म है!” परंतु शांताराम बापू यांना दिलेला शब्द पृथ्वीराज कपूर यांनी तंतोतंत पाळला. आपल्या स्वतःच्या मुलाच्या चित्रपटात काम करायला देखील त्यांनी नकार दिला! पुढे काही काळातच ‘दहेज’ या चित्रपटाचे शूटिंग संपले, आणि चित्रपट प्रदर्शनासाठी तयार झाला. (R. K. Film)
===========
हे देखील वाचा : प्रवास श्याम बेनेगल यांच्या कारकिर्दीचा…
===========
हा चित्रपट पूर्ण झाल्यानंतर शांताराम बापूंनी पृथ्वीराज कपूर यांना सांगितले की,” आपल्या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले आहे. तुम्ही आता इतरांच्या चित्रपटात काम करू शकता!” पृथ्वीराज कपूर यांनी हसत हसत शांताराम बापूंना सांगितले,” खूप चांगले झाले आता मी माझ्या मुलाच्या चित्रपटात काम करायला मोकळा झालो!” ‘दहेज’ हा चित्रपट भारतभर प्रदर्शित झाला आणि सुपरहिट झाला. शांताराम बापूंनी ठरल्याप्रमाणे वेगळे दहा हजार रुपये पृथ्वीराज कपूर यांना दिले. या दोन महान कलावंतांनी फक्त या एकाच चित्रपटात एकत्र काम केले. शांताराम बापू दिग्दर्शक म्हणून तर पृथ्वीराज कपूर अभिनेता म्हणून. फक्त ‘दहेज’ याच एका चित्रपटात एकत्र दिसले नंतर पुन्हा ते कधीच एकत्र आले नाही.
जाता जाता ‘दहेज’ या चित्रपटाबद्दल या चित्रपटाला संपूर्ण भारतात इतके प्रचंड यश मिळाले की, यातील भावना लक्षात घेऊन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लोकसभेत हुंडा विरोधी बिल आणून मंजूर करून घेतले. जनरली चित्रपटामुळे समाज बिघडतो असे एक सरसकट विधान केले जाते. पण एका चित्रपटांमुळेच एक समाज उपयोगी कायदा बनला. ‘दहेज’ या चित्रपटात सासूकडून हुंड्यापायी सुनेचा होणारा छळ पाहून भारत सरकारने हुंडाविरोधी कायदा केला. चित्रपटाचे हे मोठे यश म्हटले पाहिजे.