‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
त्रिभंग: ‘आई’पण तीन पिढ्यांचं
शास्त्रीय नृत्य हा भारतीय संस्कृतीचा एक अविभाज्य घटक आहे. मणिपुरी, कथ्थक, कुचिपुडी, इत्यादी आठ नृत्यप्रकारांना अधिकृतरित्या अभिजात शास्त्रीय नृत्याचा दर्जा दिला गेलेला आहे. त्यापैकीच एक नृत्यप्रकार म्हणजे ओडिसी. मुख्यत्वे श्रीकृष्णाच्या जगन्नाथ स्वरूपाची नृत्यरूपात आराधना करणारा हा नृत्याविष्कार पद्मविभूषण सन्मानित ओडिसी नर्तक व गुरू केलुचरण मोहपात्रा यांनी भारतभर पोहचवला. ओडिसी ह्या नृत्यप्रकारात ‘त्रिभंग’ (Tribhanga) ही भावमुद्रा विशेष महत्त्वाची समजली जाते. इंग्रजी ‘S’ आकारासारखं शरीराला वळण देऊन ही मुद्रा साकारली जाते. रेणुका शहाणे दिग्दर्शित ‘त्रिभंग’ हा चित्रपट अशाचप्रकारे तीन पिढ्यांच्या नातेसंबंधातली मानसिक गुंतागुंत दर्शवतो.
हे देखील वाचा: जिंदगी विराट: जिद्द ‘बाप’हट्ट पुरवण्याची
आज्जी, आई व नात ह्या तीन पिढ्यांची आयुष्य जगण्याची व्याख्या, वैवाहिक नात्याबद्दल, कुटुंबपद्धतीबद्दल मतमतांतरे रेणुका शहाणे (Renuka shahane) त्यांच्या दिग्दर्शकीय कौशल्याने प्रेक्षकांसमोर मांडतात. ज्येष्ठ अभिनेत्री तन्वी आजमी (Tanvi azmi) यांनी एक प्रसिद्ध लेखिका नयनतारा आपटे ह्या आज्जीच्या तर काजोल (Kajol) ने नयनताराच्या मुलीच्या, अर्थात अनुराधाच्या भूमिकेत रंग भरलेले आहेत. ‘अभंग’ नयनतारा आणि ‘त्रिभंग’ अनुराधा यांच्यातील ‘समभंग’ दुवा असणारी माशा ही नातीची भूमिका ‘मुरांबा’ गर्ल मिथिला पालकर (Mithila Palkar) हिने साकारलेली आहे.
सुखी संसारापेक्षा लेखनाला प्राधान्य देऊन नयनतारा आपल्या मुलांना, अनुराधा आणि रोबिन्द्रो (वैभव तत्त्ववादी) ला सोबत घेऊन सासर सोडते व काही काळाने प्रेमविवाह करते. बालवयातच सावत्र बापाच्या वासनांधतेची शिकार झालेली अनुराधा, ती प्रेग्नंट असतानाही आईची कोरडी माया पाहून तिच्याशी बोलणं टाकून देते. आपल्या बहिणीवर जीवापाड प्रेम करणारा रोबिन्द्रोदेखील आईला सोडून अध्यात्माची वाट धरतो. माशाच्या जन्मानंतरही अनुराधा आपल्या आईशी तुटकच वागते. तिच्या वागण्याचे पडसाद आपोआप माशाच्या मनावर उमटत जातात. कालागणिक तिघांच्या नात्यात वाढत चाललेला तिढा सोडवायचा प्रयत्न ‘त्रिभंग’ हा चित्रपट करतो.
हे नक्की वाचा: समर्थ आणि मुखर्जी घराण्याचा वारसा समर्थपणे सांभाळणारी गुणी अभिनेत्री म्हणजे काजोल.
लग्न म्हणजे पितृसत्ताक समाजाने स्त्रीवर लादलेलं जोखड अशी समजूत असलेली नयनतारा आणि लग्नाला सोसायटल टेररीजम (सामाजिक दहशतवाद) समजणारी अनुराधा अशी दोन उदाहरणं डोळ्यांसमोर असूनही लग्नाला मानसिक व भावनिक आधार समजणारी माशा ही तिन्ही पात्रं अनुक्रमे तन्वी आजमी, काजोल आणि मिथिला पालकर यांच्या अभिनयाने जिवंत झालेली आहेत. वैभव तत्त्ववादी, मानव गोहिल, कंवलजीत सिंह, श्वेता मेहेंदळे, निशांक वर्मा, शीतल शुक्ला इत्यादींनीही आपापल्या वाट्याला आलेल्या भूमिका उत्तमरीत्या वठवल्या आहेत. मिलन या लेखकाची भूमिका साकारणाऱ्या कुणाल रॉय कपूरचा मात्र विशेष उल्लेख करावा लागेल. त्याने साकारलेला शांत, सुस्वभावी, शुद्ध हिंदी भाषेत बोलणारा लेखक एक वेगळीच छाप पाडून जातो.
वर्षानुवर्षे चालत आलेल्या पितृसत्ताक समाजाच्या दृष्टीने पाहिलं तर लग्नसंस्था व वैवाहिक जीवनावरील नयनतारा, अनुराधा व माशाची मतमतांतरे जरूर खटकतात पण त्याचवेळी त्यांच्या या विचारांमागील पार्श्वभूमी पाहिल्यास त्यांचे निर्णय पटू लागतात. हा चित्रपट आस्तिकत्व-नास्तिकत्व, स्त्री-पुरुष समानता, कर्म, पलायनवाद इत्यादी विषयांवर भाष्य करतोच, त्याचबरोबर लैंगिक अत्याचार, गर्भलिंगनिदान चाचणी, ओपन रिलेशनशिप्स, पत्रकारितेचे खालावत चाललेले स्तर, इत्यादी संवेदनशील विषयही हाताळतो.
हे वाचलंत का: डिडिएलजे २५ वर्षांचा झाला!
मराठी कलाकारांसोबतच चित्रपटाच्या संवादातही सहजसोप्या पद्धतीने मराठी भाषेचा केलेला वापर वातावरणनिर्मितीसाठी पोषक ठरला आहे. पात्राची गरज असली तरीही काजोलची शिवराळ भाषा सुरुवातीला थोडी खटकते कारण त्या उगाच ओढूनताणून दिल्यासारख्या वाटतात. मद्यपान व धूम्रपान याबद्दल संवैधानिक इशारा न देणे ही आता नेटफ्लिक्सची जुनीच सवय होऊन बसलेली आहे.
कथानकात थोड्या कमतरता असल्या तरीही तीन पिढ्यांचा हा तिढा ‘आई’च्या दृष्टिकोनातून सोडवण्याचं शिवधनुष्य सर्व कलाकारांनी अगदी व्यवस्थित पेललं आहे आणि याचं सर्व श्रेय निर्विवादपणे दिग्दर्शिका रेणुका शहाणे यांनाच जातं. हळव्या आणि भावुक प्रसंगानुसार कानावर येणारं परिणामकारक पार्श्वसंगीत ही आणखी एक जमेची बाजू. तीन पिढ्यांच्या ‘आई’पणाची एक वेगळी कथा सांगणारा हा ९५ मिनिटांचा अनुभव नक्कीच न चुकवण्यासारखा झालेला आहे.