Ustad Bismillah Khan: उस्ताद बिस्मिल्ला खान यांच्याबद्दलच्या या ७ गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?
लग्नसमारंभ किंवा कोणतंही शुभकार्य असलं की, त्या मंगलमय वातावरणाला सनईचे सूर अधिकच प्रसन्न बनवतात. भारतामधील सनई या वाद्याला जगभर खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळवून दिली ती उस्ताद बिस्मिल्ला खान (Ustad Bismillah Khan) यांनी.
उस्ताद बिस्मिल्ला खान यांचा जन्म 21 मार्च 1916 रोजी बिहारमधील डुमरोन येथे झाला. त्याचे वडील भोजपूरच्या राजाच्या दरबारी संगीतकार होते. घरात संपूर्णपणे कलेचं वातावरण असल्यामुळे बिस्मिल्ला खान (Ustad Bismillah Khan) अगदी लहान वयातच शहनाई वाजवायला शिकले.
उस्ताद बिस्मिल्ला खान (Ustad Bismillah Khan) यांनी आपले आयुष्य संगीतासाठी वाहून घेतले. प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचल्यानंतरही त्यांनी आपला रियाज कायम ठेवला होता. “हमारे दिल से ना जाना, धोखा ना खाना….” हे त्यांचं अत्यंत आवडतं गाणं होतं. बिस्मिल्ला खान यांच्याबद्दलच्या अशाच काही रंजक गोष्टींची माहिती घेऊया.
१. बिस्मिल्ला खान नावामागची अनोखी कहाणी (Ustad Bismillah Khan)
उस्ताद बिस्मिल्ला खान यांच्या नावामागे एक अनोखी कहाणी आहे. असं म्हटलं जातं की, जेव्हा त्यांच्या जन्माबद्दल त्यांच्या आजोबांना कळलं तेव्हा त्यांनी अल्लाहचे आभार मानत ‘बिस्मिल्लाह’ असं म्हटलं आणि तेव्हापासून त्यांचं नाव बिस्मिल्ला झालं. पण प्रत्यक्षात त्यांचं नाव कमरुद्दीन खान असं होतं.
२. बिस्मिल्ला खान (Ustad Bismillah Khan) यांचे प्रथम गुरु
लहान वयातच बिस्मिल्ला खान वाराणसीला त्यांच्या मामाकडे म्हणजेच अलिबक्ष विलायती यांच्याकडे राहायला गेले.अलिबक्ष काशीच्या बाबा विश्वनाथ मंदिरात शहनाई वाजवत असत. त्यामुळे त्यांनी बिस्मिल्ला खान यांनाही शहनाई वाजवायला शिकवली. अगदी लहान वयातच बिस्मिल्ला खान ठुमरी, चैती, कजरी, स्वानी असे विविध राग शिकले होते. मामाच्या मृत्यूनंतर उस्ताद बिस्मिल्ला खान यांनी बाबा विश्वनाथ मंदिरात अनेक वर्षे शहनाई वाजवली. पुढे त्यांनी ख्याल संगीताचाही अभ्यास केला आणि विविध रागांवर प्रभुत्व मिळवले.
३. बिस्मिल्लाह खान यांचा प्रथम कार्यक्रम
सन 1937 मध्ये कोलकाता येथील भारतीय संगीत परिषदेत त्यांनी सर्वप्रथम सार्वजनिक कार्यक्रमात शहनाई वादन केले होते. या कार्यक्रमानंतर त्यांचे देशभरात कौतुक झाले आणि तिथूनच त्यांना खरी ओळख मिळाली. त्यानंतर, त्यांना 1938 मध्ये लखनौ, ऑल इंडिया रेडिओमध्ये कामाच्या रूपाने त्यांना सर्वात मोठा ब्रेक मिळाला. पुढे एडिनबर्ग म्युझिक फेस्टिव्हलमध्ये आपली कला सादर केल्यानंतर त्याला जगभरात प्रसिद्धी मिळाली.
४. स्वातंत्र्य सोहळ्याचे साक्षीदार
सन 1947 रोजी देश स्वतंत्र झाल्यांनतर देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी लाल किल्ल्यावर तिरंगा फडकावला. त्यावेळी उस्ताद बिस्मिल्ला खान यांना शहनाई वाजवून लोकांना अभिनंदन करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. 26 जानेवारी 1950 रोजी, भारताच्या पहिल्या प्रजासत्ताक दिनानिमित्त, त्यांनी लाल किल्ल्यावरून राग कैफी देखील सादर केला. त्यांनतर 1997 साली स्वातंत्र्यदिनाच्या 50 व्या वर्धापनदिनानिमित्त उस्ताद बिस्मिल्ला खान यांनी लाल किल्ल्यावर शहनाई वाजवली होती. आजही प्रजासत्ताक दिनाच्या समारंभात त्यांचे सनईवादन आवर्जून ऐकले जाते.
====
हे देखील वाचा: चित्रपटसृष्टीला व्यापून राहिलेला कवी…साहिर लुधियानवी!
====
५. हिंदी चित्रपटांमध्ये भूमिका
बिस्मिल्ला खान यांनी काही हिंदी चित्रपटांमध्ये शहनाई वादकाची भूमिकाही साकारली होती. त्यातील एक चित्रपट म्हणजे ‘गुंज उठी शहनाई’.
६. इराण मधील सभागृहाला नाव
तेहरान (इराण) मध्ये 1992 मध्ये एक मोठे सभागृह बनविण्यात आले आणि त्याला ‘तलार मौसीकी उस्ताद बिस्मिल्ला खान’ हे नाव देण्यात आले.
====
हे देखील वाचा: महेंद्र कपूर आणि आशा भोसले यांचं पहिलं गाणं…
====
७. सर्वोच्च नागरी सन्मान
एम एस सुब्बलक्ष्मी आणि रविशंकर यांच्यानंतर, उस्ताद बिस्मिल्ला खान हे सर्वोच्च नागरी सन्मान प्राप्त करणारे तिसरे शास्त्रीय संगीतकार होते. त्यांना पद्मश्री (1961), पद्मभूषण (1968), पद्मविभूषण (1980) आणि भारतरत्न (2001) या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
उस्ताद बिस्मिल्ला खान यांनी आपले संपूर्ण आयुष्य संगीत साधनेला वाहिले. अखेर 21 ऑगस्ट 2006 रोजी वयाच्या 90 व्या वर्षी त्यांचे निधन झाले.