दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
गुरुऋणातून मुक्तता नाही
पं. वसंतराव देशपांडे यांनी नाट्यसंगीत आणि मैफिली तर गाजवल्याच, त्याचबरोबर शिष्यवृंदांतून आपले वारसही घडवले. कला ही दिल्यानं वाढते, यावर अढळ श्रद्धा असलेल्या या अवलिया कलाकाराच्या सहवासात १२ वर्षं राहिलेले, त्यांच्याकडून बंदिशी आणि नाट्यगीतांचे धडे गिरवलेले प्रसिद्ध गायक चंद्रकांत लिमये त्यांच्या आठवणींना उजाळा देत आहेत. ‘तो माझ्या आयुष्यातला सुवर्णकाळ होता, माझ्यावर बुवांचे ऋण आहे आणि या गुरूऋणातून मुक्तता नाही,’ असं सांगताहेत त्यांचे हे गायकशिष्य…
पं. वसंतराव देशपांडे आणि ‘कट्यार काळजात घुसली’ हे नाटक यांना एकमेकांपासून वेगळं करता येणार नाही. शास्त्रीय संगीत, तालाची उमज, आवाजाची फिरत आणि सादरीकरणाचे कौशल्य या सर्व गोष्टींवर हुकमत असलेले वसंतराव माझ्या आयुष्यात आले, तेही या नाटकाच्याच निमित्तानं. ‘कट्यार काळजात घुसली’च्या निमित्तानं नटश्रेष्ठ प्रभाकर पणशीकर यांनी मला बोलावलं. त्यावेळी गोव्याचा दौरा होता. उस्मान किंवा चांदची भूमिका मी त्यामध्ये करायचो. दौऱ्याच्या वेळी वसंतराव देशपांडे सर्वांचा रियाझ घेत होते. मी दुरूनच बघत होतो. त्यावेळी प्रकाश घांग्रेकरांनी बुवांना सांगितलं, की यालासुद्धा शिकवा आणि मी तानपुरा हातात घेऊन त्यांच्याजवळ बसलो. हा तानपुरा हातात घेतला तो पुढे सलग बारा वर्षांसाठी. वसंतरावांशी जोडलं गेलेलं नातं पुढे आयुष्यभरासाठी टिकलं.
‘कट्यार’चे प्रयोग सुरू असताना वसंतराव देशपांडे या नावाचं गारूड सगळ्यांवर होतं. त्यावेळी बुवांच्या इतर मैफिलीसुद्धा सुरू होत्या. त्यावेळी मी त्यांच्यासोबत नेहमी जायचो. माझ्यासाठी तो एक वेगळाच अनुभव होता. एखादा छोटा कार्यक्रम असो किंवा गप्पांची मैफल असो, मी नेहमीच सोबत असायचो. वसंतरावांचा मित्रपरिवार दांडगा, त्यावेळी साहित्यिक, कलाकार आणि इतर अनेक थोर मंडळी त्यात असत. एखादवेळेस मी नसलो तर स्वतःहून चंदू नाही आला का, अशी विचारणा ते करत. वेगळेच दिवस होते ते. त्यावेळी माझ्या आयुष्यातली शुक्रमहादशा सुरू होती. ‘गोल्डन डेज’ असंच त्या बारा वर्षांच्या काळाला म्हणता येईल. त्यांच्या सहवासातला प्रत्येक क्षण आजही मनाच्या कोपऱ्यात कोरलेला आहे.
वसंतराव देशपांडे यांनी सुरेशबाबू माने यांच्याकडे जवळपास दहा वर्षं किराणा घराण्याचं शिक्षण घेतलं. त्यांच्या गायकीत पतियाळा घराण्याचा गंध आहे. असं असूनही कोणत्याही गायकीचा शिक्का त्यांच्या गाण्यावर आज बसलेला नाही. गायकी कोणतीही असो त्यांच्या गायकीमध्ये स्वतःचा सुगंध असतो. वसंतराव हे सर्वतः एक वेगळं रसायन म्हणून नेहमीच लोकांसमोर येतं. सर्व घराण्यांतील गायकीचे अंश त्यांनी घेतले, त्यातील सौंदर्यस्थळं हेरली आणि स्वतःच्या रियाजानं आणि शैलीनं त्याला एक वेगळा साज दिला. सर्व घराण्याच्या संयोगानं त्यांनी स्वतःचं एक स्वतंत्र अस्तित्व निर्माण केलं. त्यामुळेच त्यांच्याकडून शिकण्याची संधी मिळाल्याचा आनंद मला वाटतो.
बुवा आठवड्यातून एकदा कार्यक्रमासाठी किंवा मैफिलीसाठी मुंबईत यायचे त्यावेळी मी त्यांना आणायला जायचो. त्यानंतर मी त्यांना माझ्याकडे राहायला या सांगितलं. मात्र त्यांनी काही कारणानं टाळलं. एका कार्यक्रमाला माझे वडील ऐकायला आले होते. गंमत म्हणजे वसंतरावांनी माझे वडील हे त्यांचे बालमित्र असल्याचं ओळखलं. त्यांची स्मरणशक्ती अत्यंत तल्लख होती. ते स्वतःहून त्यावेळी माझ्या घरी राहायला आले आणि वडिलांना प्रश्न विचारायला लागले. लहानपणी वडील एका मुलाशी खेळायचे त्या मुलांचं नाव वसंता होतं, हे वडिलांनी बोलताना सांगितल्यावर ‘बच्चू मीच तो वसंता आहे’ हे बुवांनी सांगितलं आणि जुनी मैत्री पुन्हा जोडली गेली. असे अनेक किस्से आणि आठवणी सांगता येतील.
या संपूर्ण प्रवासात मी अनेक गोष्टी त्यांच्याकडून शिकलो. माझे मित्र, माझी आई, माझे गुरू सगळं तेच होते. माझे सर्वस्व वसंतराव झाले होते. मी कसा होतो हे त्यांना पूर्णपणे माहीत होतं. मैफिलीमध्ये माझ्याबरोबर प्रकाश गोरे तबला वाजवायचे. एकदा सहज मी बुवांना म्हटलं, प्रकाशला घ्या ना. त्यांनी कार्यक्रमात प्रकाशला घेतलं आणि कार्यक्रम सुरू झाला. गाणं रंगात आलं होतं. ‘सखी कलना’ ही बंदिश सुरू झाली आणि ठेका ऐकून बुवांनी प्रकाशच्या ठेक्याला दाद दिली. कार्यक्रम संपल्यावर तुझा सोलो ऐकायला यायचंय, असंही आवर्जून सांगितलं. साथीदार कलाकार, विद्यार्थी यांचे चांगले गुण त्यांना माहीत होते आणि नेहमीच त्यांचं कौतुक करण्याची दिलदार वृत्ती त्यांच्याकडे होती.
बऱ्याचदा लोकांना वाटतं, एवढ्या वर्षांच्या सहवासात मला बुवांनी अनेक नाट्यगीतं शिकवली असतील. पण गंमत म्हणजे प्रत्यक्षात एकच नाट्यगीत मला बुवांनी शिकवलं. ‘सूर सुख करी तू विमला’ हे गीत त्यांनी शिकवलं. एका कार्यक्रमात दिग्गज कलाकारांसोबत मी सादरीकरण करत होतो, त्यावेळी मी हे पद सादर केलं. पण, गाणं अत्यंत विलंबित लयीत मी मांडलं. दुसऱ्या दिवशी नाटकाचा प्रयोग होता. प्रकाशनं वसंतरावांकडे त्यावेळी तक्रार केली, की चंदू खूपच विलंबित गायला. त्यावेळी बुवा हसले आणि त्यांनी समजावून सांगितलं. नाट्यसंगीताची विशेष लय असते ते त्यांनी मला समजावलं. शिवाय नाट्यगीत म्हणजे काय, ते कसं दिसतं, हे व्यवस्थित माझ्यापुढे मांडलं. नाट्यगीतांचं संपूर्ण भांडार एका गीतातून त्यांनी त्यावेळी उलगडलं. एकच गाणं वेगवेगळ्या अंगानं मांडलं तर ते किती मोठं होऊ शकतं, ते बुवांनी माझ्यापुढे उलगडून दाखवलं.
बुवांची गायकी शिकावी म्हणून मी तीन वर्षं मैफलीमधलं गाणं बंद केलं होतं. गायकी गळ्यावर चढेपर्यंत मेहनत घेऊन मी गाणं आत्मसात केलं. यात अर्थात बुवांचा वाटा मोलाचा होता. गाणं अत्यंत सोपं करून ते सांगायचे. ‘बोलतोस तसा गा, अत्यंत सहजपणे गा’ असं ते सांगायचे. प्रत्येक गायकीनुसार आवाज कसा बदलला पाहिजे आणि हे करताना काय लक्षात ठेवलं पाहिजे याचे धडे त्यांनी मला दिले. शास्त्रीय संगीताचा किंवा नाट्यगीतांचा आवाज कसा असावा, भावगीत, ठुमरी अशा विविध गानप्रकारांमध्ये कसा आवाज लागला पाहिजे हे बुवांनी शिकवलं. गायकानं गाणं सुरू केलं की आवाज लावल्याबरोबर कळलं पाहिजे काय सादरीकरण पुढे होणार आहे, असं ते नेहमी म्हणत. हे आणि असे अनेक विचार त्यांनी माझ्या मनावर बिंबवले आहेत.
प्रभाकर पणशीकर यांनी वसंतराव देशपांडे यांच्यानंतर ‘कट्यार’मधली त्यांची भूमिका करशील का अशी विनंती केली. त्यावेळी मला आनंद झाला होता. शास्त्रीय संगीतातील ज्येष्ठांशी चर्चा करून निर्णय घेतो, असं मी त्यांना कळवलं. मला मनापासून हे काम करण्याची इच्छा होती. त्यावेळी चर्चेदरम्यान आता आहेस तसाच नम्र राहशील का, असा प्रश्न काही ज्येष्ठ मंडळींनी मला विचारला आणि गुरूंचे संस्कार असल्यानं अर्थातच यश आलं तरी हुरळून न जाता गायकी जपण्याचं वचन मी दिलं. ‘कट्यार’मधील भूमिका करण्याचं भाग्य मला त्यामुळे मिळालं आणि तो अनुभव उत्तम होता. ‘कट्यार’मध्ये काम करताना अनेक गोष्टी बुवांनी मला शिकवल्या आणि त्यांच्या शैलीत उलगडून दाखवल्या.
नाटकातल्या आवाजफेकीमुळे शास्त्रीय संगीताच्या आवाजावर परिणाम होईल, असं अनेकांचं मत पडलं. परंतु आवाजाची फेक बुवांनी शिकवली होती. स्टेजवर जसं गाईन, तसंच मैफिलीमध्ये गाईन, असं वचन मी मान्यवरांना दिलं आणि सर्वांची परवानगी मिळाली. त्यावेळी अमेरिकेचा दौरा ठरला होता. त्यामुळे तीन महिन्यांनी दौऱ्यावरून आलो की काम सुरू करू असं ठरलं. गुरुऋण फेडण्याचीच जणू ही एक संधी होती. वसंतरावांनंतर त्यांनी साकारलेली भूमिका करण्याचं भाग्य मला लाभलं याचं समाधान आजही वाटतं.
जसं गुरूंकडे मी शिकलो तसं गुरुकुलातून शिकवण्याचा प्रयत्न आता आहे. तोच विचार पुढे मांडण्याचा प्रयत्न आहे. यासाठी २००० साली ‘वसंतराव देशपांडे संगीत सभा’ स्थापन केली असून सर्वांना शास्त्रीय संगीताची आवड निर्माण झाली पाहिजे हा प्रयत्न आहे.
याच माध्यमातून वसंतराव देशपांडे यांची गायकी उलगडणारा एक लघुपट करण्याची इच्छा आहे. बुवांनी त्यांची गायकी कशी घडवली ते यामध्ये मांडायचं आहे. गुरूंचं कार्य जगभरात पोचवल्याचं समाधान मला त्यातून मिळेल.
शब्दांकन – आदित्य बिवलकर