वेद मंत्राहून आम्हा वंद्य वंदेमातरम…
मराठी सिनेमाच्या सुवर्णकाळातील मानाचं पान होतं सुधीर फडके! १९५० ते १९७५ या पंचवीस वर्षातील त्यांच्या स्वरातील आणि सूरातील रचनांनी मराठी संगीतातील एक लुभावणारा सुरीला कालखंड निर्माण केला. अत्यंत हलाखीच्या परीस्थितीशी संघर्ष करीत त्यांनी आपली संगीताची आराधना पूर्ण केली. हा एक सच्चा कलावंत होता. बाबूजींच्या चैतन्यांनी भारलेल्या सुरांनी मराठी मनाला जवळजवळ साठ वर्षे रिझवले, फुलवले, जोपासले, त्यांचे भावजीवन समृद्ध केले.
‘वंदे मातरम्’, ‘सीता स्वयंवर’, ‘माया बाजार’, ‘पुढचं पाऊल’, ‘लाखाची गोष्ट’, ‘जगाच्या पाठीवर’, ‘सुवासिनी’, ‘प्रपंच’, ‘मुंबईचा जावई’ या त्यांच्या चित्रपटांतील अवीट गोडीच्या गाण्यांनी जर साथ दिली नसती तर हे मध्यमवर्गीय प्रापंचिक जीवन किती बेसूर व भेसूर झाले असते याची कल्पनाही करवत नाही. त्यांनी आधुनिक वाल्मिकी गदीमा यांच्यासोबत केलेले ‘गीतरामायण’ म्हणजे गेल्या शतकातील चमत्कारच म्हणावा लागेल! त्यांच्या सुरेल माधुर्यपूर्ण स्वरांनी मराठी मनाला अध्यात्माची गोडी लावली, सात्त्विक आनंद दिला.
सुधीर फडके-आशा-गदीमा अशी एक त्रयी त्या काळात निर्माण झाली. हिंदीत रफीच्या स्वराचे जे स्थान होते तेच मराठीत फडकेंच्या स्वराचे होते. एकाच वेळी ते गायक ही होते आणि संगीतकार ही होते ! त्यांनी या कालखंडात इतर गायिकांसोबत गायलेल्या युगल गीतांनी तर मराठी संगीताचं दालन भरजरी केलं. धुंदी कळ्यांना धुंदी फुलांना, फिटे अंधारचे जाळे, जे वेड मजला लागले, नवीन आज चंद्रमा नवीन आज यामिनी, डोळ्यात वाच माझ्या तू गीत भावनांचे, बघत राहू दे तुझ्याकडे, अपराध मीच केला शिक्षा तुझ्या कपाळी, आज चांदणे उन्हात हसले तुझ्यामुळे, नाही खर्चली कवडी दमडी…. या गाण्यांनी मराठी मनावर कायमच अधिराज्य गाजवलं.
बाबूजींना हिंदीत मात्र म्हणावं तसं यश मिळालं नाही. तरी पण ’मालती माधव’ या चित्रपटातील ’बांध प्रीत फूल डोर’ या अप्रतिम रचनेने संगीतकार अनिल विश्वास यांना मोहून टाकले. त्यांनी स्वरबध्द केलेले ’ज्योती कलश छलके हुये गुलाबी लाल सुनहरे रंग दल बादल के’ (फिल्म- भाभी की चुडिया, गायिका – लता). आजही सकाळच्या प्रहरी भूप रागातील हे गाणे ऐकताना मन मोहरून जाते. याला स्वामी हरिदास पुरस्कार मिळाला होता.
फक्त गायक आणि संगीतकार म्हणूनच नव्हे तर एक माणूस म्हणून देखील बाबूजी फार मोठे होते हे तमाम मराठी रसिकांना माहीत आहे. त्यांची जाज्वल्य राष्ट्रभक्ती, त्यांचं सावरकर प्रेम, गोवा, दादरा-नगरहवेली मुक्तीसंग्रामासाठी त्यांनी दिलेला लढा या सार्यातून मागे उरतो तो एक सच्चा माणूस, सच्चा कलावंत. वीर सावरकर हा त्यांचा ध्यास होता. हा सिनेमा पूर्ण होई पर्यंत मी मरणार नाही अशी खूण गाठ त्यांनी मनाशी बांधून ठेवली होती. हे महाकाव्य पडद्यावर त्यांनी आणलं आणि काही दिवसातच त्यांनी २९ जुलै २००२ ला अखेरचा श्वास घेतला. मराठी भावविश्वाला साद घालणार्या या महान कलाकाराचे त्याच्या अठराव्या स्मृतीदिनी हे स्मरण!