पाकिस्तानी शायर कतील शिफई लता मंगेशकरांचे कायम ऋणी का राहिले?
विनोदवीर जेव्हा डोळ्यात अश्रू आणतो….
मेहमूद (Mehmood) म्हटलं की किस्सा आलाच. तसेच किशोर कुमारबद्दलही प्रसिद्ध असलेल्या किश्श्यांतील हा एक मेहमूदसोबतचा इमोशनल किस्सा. मेहमूद दिग्दर्शित “कुंवारा बाप” या चित्रपटातील ‘आरिया जा निंदीया तू ले चल कही उडन खटोले मे दूर दूर यहां से दूर’
या चित्रपटाच्या ध्वनिमुद्रणाच्या वेळची गोष्ट. मजरुह सुलतानपुरी लिखित हे गाणे राजेश रोशन संगीतबद्ध करीत होता. (त्याचा हा पहिलाच चित्रपट) किशोर कुमारने आपल्या नेहमीच्या पध्दतीनुसार गाण्याच्या रेकाॅर्डिंगला आल्यावर गाण्याचे चित्रपटातील स्थान, गाण्याचा मूड, ते कोणावर चित्रीत करण्यात येणार आहे हे सगळे समजून घेतल्यावर रिहर्सलला सुरुवात केली. ही लोरी आहे आणि पडद्यावर रिक्षाचालक महेश (मेहमूद) (Mehmood) आपल्या लहान मुलाला झोपवताना ही लोरी गातो. त्यात त्याचे मुलावरचे निस्सीम प्रेम व्यक्त होतेय.
किशोर कुमारने रिहर्सलला सुरुवात केली आणि तो गात असतानाच मेहमूदच्या (Mehmood) डोळ्यात पाणी येवू लागले. किशोर कुमारही मग रिहर्सलला रडला. किशोर कुमार रेकाॅर्डिंगच्या वेळेस थट्टा मस्करी विनोद करण्याबाबत प्रसिद्ध. आज मात्र त्याचा मूड वेगळाच होता (कोणी त्याच्या मूडला लहरीपणा म्हणत). प्रत्यक्षात टेकच्या वेळेस किशोर कुमारने एकाच टेकमध्ये गाणे गायले आणि तो रेकाॅर्डिंग स्टुडिओतून बाहेर पडला. मेहमूदच्या डोळ्यात मात्र अश्रू होते. या गोष्टीची त्या काळात बरीच चर्चा रंगली. मेहमूद हा चित्रपटसृष्टीच्या चौफेर वाटचालीत सर्वोत्कृष्ट अष्टपैलू विनोदवीर. त्याच्या दिग्दर्शनातील हळवा चित्रपट “कुंवारा बाप” (मुंबईत रिलीज २९ नोव्हेंबर १९७४. मुंबईत मेन थिएटर राॅक्सीत ज्युबिली हिट. चित्रपटाला पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत. )
चित्रपटाची थीम अशी, बंगलोर शहरात रिक्षा चालवत असलेल्या महेश (मेहमूद)चे आयुष्य कष्टप्रद तरी छोट्या छोट्या गोष्टीत आनंद घेणारे. “मेरी रिक्षा सबसे निराली” हा त्याचा बाणा. अशातच महेशला देवळाबाहेर ठेवलेले एक तान्हुले बाळ मिळते. महेश या मुलाच्या माता पित्याचा बराच शोध घेतो. पोलीस स्टेशनमध्ये जावून पोलीस इन्स्पेक्टरची (विनोद खन्ना) भेटही घेतो. पण तरी मार्ग सापडत नाही. त्यामुळे त्या मुलाच्या पालनपोषणाची जबाबदारी महेश व त्याच्या पत्नी शीलावर (दक्षिणेकडील प्रादेशिक चित्रपटातील मनोरमा) येते.
अशा अनपेक्षितपणे आपल्या पदरात पडलेल्या मुलाचे नाव काय ठेवायचे? असा प्रश्न असतानाच तो ठेवतो, हिन्दुस्तान. तो संपूर्ण देशाचा आहे, अशीच त्यामागची भावना. मुलाला वाढवत असतानाच डाॅक्टरांकडून (संजीव कुमार) समजते की मुलगा पोलीयोग्रस्त आहे. महेश या मुलाला शिकण्यास शाळेत घालतो. एकदा धावण्याच्या स्पर्धेत हा मुलगा धावू शकत नाही म्हणून महेशच त्याला उचलून घेऊन धावत सुटतो. या मुलाचे माता पिता (विनोद मेहरा व भारती) आपल्या मुलाचा शोध घेत घेत महेशपर्यंत पोहचतात आणि मग? चित्रपटाचा क्लायमॅक्स खूप महत्वाचा आहे. पिता (Mehmood) म्हणून जबाबदारी असलेला रिक्षाचालक व हा पुत्र या गोड नात्यातील एक उत्तम कलाकृती म्हणजे कुंवारा बाप. या चित्रपटातील क्रीडा दिवसाचे (स्पोर्ट्स डेचे) चित्रीकरण बंगलोर येथील बिशप काॅटन बाॅईज स्कूलमध्ये झाले. मला आठवतय हा प्रसंग थिएटरमध्ये भरपूर टाळ्या मिळवत असे.
मेहमूद (Mehmood) चित्रपटाच्या पोस्टरपासून त्याच्यावर चित्रीत झालेल्या गाण्यापर्यंत हमखास हसवणार हे हुकमी समिकरण. त्याची गाणी आठवून बघा. (त्याच्यासोबत काम करणाऱ्या अनेक नायकांनी त्याची फारच धास्ती घेतली आणि मग आपल्या चित्रपटात मेहमूद नको असे त्यांना वाटू लागल्याचे किस्से अनेक.) कुंवारा बापमध्येही तो नेहमीप्रमाणेच मनापासून हसवतो आणि हसवता हसवता तोच गंभीर होतो. आपल्यालाही अंतर्मुख करतो. चित्रपट रसिकांना असा “कुंवारा बाप” आपलासा वाटला आणि सुपरहिट ठरला हे पुन्हा वेगळे सांगायलाच नको.
मेहमूद (Mehmood) हा बेहतरीन एन्टरटेनर. रसिक प्रेक्षकांचे मनसोक्त मनमुराद मनोरंजन करण्यात ख्यातनाम. कुंवारा बाप हा त्याचा वेगळाच चित्रपट. चित्रपटातील मुलाच्या भूमिकेत त्याचाच मुलगा मकबूल उर्फ मॅकी अली. त्याशिवाय भूषण तिवारी, नासिर हुसैन, मुमताज अली (हे मेहमूदचे पिता. या चित्रपटात त्याच्या सासराच्या भूमिकेत), अब्बास अली, मुकरी, लकी अली ( हा देखील मेहमूदचा मुलगा. लहानपणीचा मॅकी त्याने साकारलाय.). नामवंत तारे पाहुणे कलाकार आहेत. धर्मेंद्र, हेमा मालिनी, संजीव कुमार, विनोद खन्ना, अमिताभ बच्चन , योगिता बाली, दारासिंग, ललिता पवार). आपल्या चित्रपटाने रसिकांना अंतर्मुख करतानाच त्यांचे भरपूर मनोरंजन करावे याचे भान मेहमूदने ठेवले आणि त्याला रसिकांची दाद मिळालीच.
चित्रपटाच्या सुरुवातीला श्रेयनामावलीसह गाणे सुरु होते, मै हू घोडा यह है गाडी (पार्श्वगायक किशोर कुमार व मेहमूद)(Mehmood). या चित्रपटातील हिजडा गीत प्रचंड लोकप्रिय ठरले. सज रही गली मेरी (पार्श्वगायक मोहम्मद रफी व मेहमूद). याशिवाय जय भोले नाथ जय हो प्रभू (किशोरकुमार, लता मंगेशकर) हेही गाणे लोकप्रिय. प्रभाकर निकळंकर यांचे छायाचित्रण व भगवंत देशपांडे यांचे संकलन यांचा खास उल्लेख हवाच. तात्कालिक चित्रपट समीक्षकांनी या दोघांच्याही कामाची भरपूर तारीफ केली. प्रभाकर निकळंकर हे त्या काळात ग्रॅन्ट रोड परिसरातील शिवसेनेचे नगरसेवकही होते.
बालाजी फिल्म निर्मित, निर्माते अमरलाल छाब्रिया यांचा “कुंवारा बाप” चित्रपट चार्ली चॅप्लीनच्या “द किड” या चित्रपटावर बेतला असला तरी मेहमूद (Mehmood)ने तो हिंदी चित्रपट शैलीत झक्कास मांडला. त्याच्या या चित्रपटातील दिग्दर्शनाचा प्रभाव त्यानंतर तो जीनी और जानी, एक बाप छे बेटे, जनता हवालदार आणि मग अनेक वर्षांनी दुश्मन दुनिया का या चित्रपटात दाखवू शकला नाही.
===============
हे देखील वाचा : खुबसुरतला २५ वर्ष पूर्ण
===============
मी मिडियात आल्यावर अंधेरीतील फिल्मालय स्टुडिओत दुश्मन दुनिया का या चित्रपटांच्या सेटवर शूटिंग रिपोर्टिंगसाठी गेलो असता, मेहमूद (Mehmood) मधील दिग्दर्शकापेक्षा त्याच्यातील उत्तम विनोदबुध्दी असलेला कलाकार जाणून घेतला. हमजोलीतील त्याची शिवराम, बलराम व परशुराम अशी धमाल तिहेरी भूमिका, गुमनाम चित्रपटातील नोकर, प्यार किये जामधील आत्मा, पडोसनमधील मास्टर पिल्लई, दो फुलमधील पुत्तन आणि मणि अशी दुहेरी भूमिका, मै सुंदर हैमधील सुंदर तर जुगनू, नया जमाना, दो कलिया अशा अनेक चित्रपटांतील महेश अशा अनेक भूमिकेत मेहमूद फर्मास.
कुंवारा बाप या सगळ्यात वेगळा. या चित्रपटाच्या खणखणीत यशानंतर पोलीयो जागरुकता अभियानाला बरेच महत्व आहे, हेही या चित्रपटाचे सर्वात मोठे देणे…. रसिकांच्या किमान तीन पिढ्यांना या चित्रपटाने हसवता हसवता अंतर्मुख केले आहे…. विनोदवीराला (Mehmood) फारसं कोणी सिरीयसली घेत नाहीत, पण तो इमोशनल गोष्ट जास्त चांगल्या तर्हेने मांडतो याचे हे उत्तम उदाहरण.