यश चोप्रांचे चित्रपट म्हणजे अलवार प्रेमकहाणी, नयनरम्य लोकेशन्स; इथे स्वप्नं विकली जात असत…
यश चोप्रांचे जुने चित्रपट बघताना अनेकदा असं जाणवतं की, काही चित्रपटांचं कथानक अत्यंत साधं होतं तरीही ते चित्रपट लोकांनी डोक्यावर घेतले. त्यांचे चित्रपट म्हणजे हलक्या फुलक्या प्रेमकहाण्या असत. यामध्ये बहुतांश वेळा ‘लव्ह ट्रँगल’ ही संकल्पना दाखवण्यात आली होती. यश चोप्रा म्हणजे सुपरहिट चित्रपट असं जणू एक समीकरण तयार झालं होतं; खरंतर अजूनही आजही आहे. (The King of Romance)
धर्मपुत्र, कानून, वक्त, मशाल यासारखे वेगळ्या वळणावरचे चित्रपटही चोप्रांनी दिले. पण तरीही यश चोप्रा ओळखले जातात ते रोमँटिक चित्रपटांसाठीच. ‘किंग ऑफ रोमान्स’ ही पदवी त्यांना उगाच का मिळाली? बॉलिवूडचे ९० ते ९५% चित्रपट प्रेमकहाणीच तर दाखवतात. मग ते सर्वच चित्रपट सुपरहिट झाले का, तर नाही. मग यश चोप्रांच्या चित्रपटामध्ये असं काय होतं की, कित्येक आठवडे ते बॉक्स ऑफिसवर ठाण मांडून बसत असत?
यश चोप्रांनी आपल्या चित्रपटांमधून प्रेमाचे सगळे रंग अगदी अलगदपणे उलगडून प्रेक्षकांना दाखवले. मग तो चांदनी असो, सिलसिला असो, DDLJ असो किंवा डर सारखा एकतर्फी प्रेमावर आधारित चित्रपट. प्रत्येक प्रेमकहाणीचा रंग वेगळा होता. तसंच चोप्रांच्या चित्रपटातील गाणी म्हणजे संगीतप्रेमींसाठी एक मेजवानीच असत. त्यांचे कित्येक चित्रपट निव्वळ गाण्यांवर हिट झाले आहेत. त्यांच्या चित्रपटांतील गाणी केवळ श्रावणीयच नाही, तर प्रेक्षणीयच असत. या साऱ्यासोबत अजूनही एक कारण होतं ते म्हणजे त्यावेळची सामाजिक परिस्थिती.
तो काळ वेगळाच होता. सर्वसामान्यांचं आयुष्य अगदी साधं सरळ होतं. गावांमध्ये सोई सुविधांची वानवा, नोकरीच्या संधी जवळपास नाहीतच अशी परिस्थिती. त्यामुळे कित्येकांनी शहर खास करून महानगरं गाठली. याच काळात मोठ्या शहरांमध्ये चाळ संस्कृती उदयास आली. चाळीच्या दोन खोल्यांमध्ये सर्वसामान्य माणसाचा संसार सुरु होत असे आणि तिथेच तो बहरतही असे. हळूहळू फ्लॅट संस्कृती अस्तित्वात आली आणि चाळीत- भाड्याच्या दोन खोल्यांमध्ये राहणाऱ्या मध्यमवर्गीय माणसाच्या आयुष्याचं एकच स्वप्न बनलं ते म्हणजे ‘वन रूम किचन!
आता तुम्हाला वाटेल, या साऱ्याचा यश चोप्रांच्या चित्रपटांशी काय संबंध? खूप जवळचा संबंध आहे. कारण त्यावेळी हा मध्यमवर्गीय गट समाजात मोठ्या प्रमाणावर उदयास आला. शिक्षण, नोकरी, काटकसर, भविष्याची चिंता अशी आयुष्यातली आव्हानं स्वीकारणाऱ्या या गटाला दोन घटकांची करमणूक आणि भरपूर स्वप्नरंजन करायला शिकवलं ते बॉलिवूडच्या खास करून यश चोप्रांच्या चित्रपटांनी. (The King of Romance)
तारुण्याच्या उंबरठ्यावर लागणारी अलवार प्रेमाची चाहूल, मोठ मोठे बंगले, महागड्या कार आणि देशातल्या किंवा परदेशातल्या नयनरम्य लोकेशन्सवर चित्रित झालेल्या चोप्रांच्या चित्रपटांनी नवपरिणीत जोडप्याच्या आणि अविवाहित तरुणांच्या आयुष्यात नवे रंग भरले. आधी या गटाची स्वप्नंही अगदी साधी सरळ होती, पण या छोट्या घरांमध्ये राहणाऱ्या तरुण पिढीला मोठी स्वप्नं दाखवली ती चोप्रांच्या चित्रपटांनी. आणि ही स्वप्नं प्रत्यक्षात आकार घेतील न घेतील पण ती पडद्यावर का होईना, पण अनुभवण्याचा आनंद दिला तो चोप्रांच्या चित्रपटांनीच. सामान्य तरुण जिथे तरुण, सुंदर मुलींशी बोलायचीही हिंमत करत नव्हते तिथे तिच्यासाठी गाणी गायला शिकवलं, तेही याच चित्रपटांनी. बजाज स्कुटर म्हणजे बरी परिस्थिती, तर राजदूत म्हणजे श्रीमंती असं मानणाऱ्या मध्यमवर्गीय समाजातल्या तरुणांनी स्वतःची कार घेण्याचं स्वप्न बघितलं ते देखील याच चित्रपटांमुळे.
चोप्रांच्या संगीतमय चित्रपटांमधील प्रेमकहाणीमध्ये अनेकांना स्वतःची प्रेमकहाणी दिसत असे. गावातल्या लोकांना जिथे जवळच्या शहरात किंवा मुंबई, पुण्याला राहणं स्वप्नवत वाटायचं तिथे या चित्रपटांमधून त्यांनी थेट स्वित्झर्लंड, इंग्लंड सारखे देश बघितले. त्यामुळे यश चोप्रांचे चित्रपट तरुणाईने डोक्यावर घेतले. इतकंच नाही, तर चोप्रांच्या कित्येक चित्रपटातील प्रेमकहाण्या नंतर सर्वसामान्यांच्या आयुष्यात प्रत्यक्षात अवतरल्या; इतका या चित्रपटांचा तरुणाईवर प्रभाव पडत होता.
त्या काळात बॉलिवूडच्या चित्रपटांतील हिरो म्हणजे तरुणांचे आदर्श, तर तरुणींच्या ‘सपनों के सौदागर’ बनले होते. यामध्ये चोप्रांच्या चित्रपटातील अभिनेते विशेष आघाडीवर होते. म्हणूनच चोप्रा कॅम्पमध्ये आलेल्या प्रत्येक अभिनेत्याची कारकीर्दही बहरली. (The King of Romance)
उच्च मध्यमवर्गीय ही संकल्पना तेव्हा अस्तित्वातच नव्हती. त्यामुळे मध्यवर्गानंतर थेट श्रीमंत असंच समाजातलं वर्गीकरण होतं. या श्रीमंत वर्गाला आपलीशी वाटावी अशी प्रेमकथा पडद्यावर बघता आली. त्यामुळे चित्रटातील प्रेमाची चाहूल लागण्यापासून ते विरहापर्यंतचा सर्व प्रवास या गटानेही सारखाच एन्जॉय केला. प्रेम या संकपनेमध्ये जे काही पडद्यावर दाखवणं शक्य होतं ते सर्व चोप्रांनी आपल्या चित्रपटांमधून दाखवलं.
हे ही वाचा: बॉलिवूडचे हे १० लोकप्रिय चित्रपट आहेत हॉलिवूड चित्रपटांचे ‘अनऑफिशिअल रिमेक’
सलमानने विनंती करूनही ‘हम दिल दे चुके सनम’ चित्रपटाचा शेवट भन्साळींनी बदलला नाही कारण…
थोडक्यात तो काळ वेगळा होता म्हणून ते चित्रपट हिट झाले. त्यावेळी कोणी क्रश नव्हतं, तर कोणीतरी ‘खास’ आवडत होतं, त्यावेळी ‘प्यार हो जाता था..’ रिलेशनशिप तयार होत नव्हती. त्यावेळी ‘दिल तूट जाते थे’ ‘ब्रेक अप’ होत नव्हते, त्यामुळे ‘मूव्ह ऑन’ करणंही सहज शक्य नव्हतं. याच मानसिकतेचा यश चोप्रांचे चित्रपट हिट करण्यात मोठा वाटा होता. अर्थात असं नाही की, यश चोप्रा सोडून इतर दिग्दर्शकांचे रोमँटिक चित्रपट अयशस्वी ठरले. पण रोमँटिक चित्रपट म्हटल्यावर चोप्रांचंच नाव समोर येतं.आज ते चित्रपट कसेही वाटत असले, तरीही अनेकांना ते भूतकाळ आठवायला भाग पाडतात.