मिलिंद गवळींनी ‘समृद्धी’ बंगल्यातून बाहेर पडताना आठवण म्हणून नेली ‘ही’
फिल्मी पार्टीमुळे चित्रपट मिळतात यावर तिचा विश्वास नव्हता.
मौशमी चटर्जी… मिठ्ठास व्यक्तिमत्व
स्पर्धेच्या जगात टिकून राहण्यासाठी गुणवत्ता आणि मेहनती वृत्ती महत्वाची असतेच, पण पहिल्या क्रमांकावर ‘सकारात्मक वागणे’ असले तरी छान करियर आखता येते. होय ही वस्तुस्थिती आहे. आपण भलं नि आपलचं काम भले असा दृष्टिकोन असला की झाले….
अगदी सिनेमाच्या जगातही हा ‘फंडा’ उपयुक्त ठरतो, एका बाजूला आपल्याला मिळालेल्या चित्रपटावर लक्ष केंद्रित करावे आणि दुसरीकडे वाद विवाद, काॅन्ट्रोव्हर्सी यापासून व्यवस्थित दूर रहावे, आपला रस्ता आपोआप आखला जातो. कदाचित आपण ‘नंबर गेम’ मध्ये कुठेही नसू…..
मौशमी चटर्जी यासाठी ‘गुड रोल माॅडेल’ आहे.
वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी तिने तरुण मुझुमदार दिग्दर्शित ‘बालिका बधु’ (१९६७) या बंगाली चित्रपटात भूमिका साकारली. मग एका बाजूला शिक्षण, दुसरीकडे ‘परिणिता’, ‘अनिन्दीता’ अशा बंगाली चित्रपटात भूमिका आणि अशातच संगीतकार हेमंतकुमार यांचा मुलगा जयंत (ज्याला ती बाबू हाक मारे) याच्याशी प्रेमाशी नाते आणि मग लग्न हे सगळे होत असताना कोलकत्ता सोडून ती पतीसह हिंदी चित्रपटसृष्टीत आली. आल्या आल्या तिला शक्ती सामंता दिग्दर्शित ‘अनुराग’ (१९७३) आणि राज खोसला दिग्दर्शित ‘कच्चे धागे’ (यात सोबत पतीही, १९७३) असे बड्या अनुभवी दिग्दर्शकांचे चित्रपट मुंबईत पाऊल टाकताच मिळाले तर मग काय हवे? अर्थात, बंगाली चित्रपटाचा अनुभव उपयोगी पडलाच. ‘अनुराग’मध्ये अशोककुमार, नूतन असे बुजुर्ग, राजेश खन्नासारखा सुपर स्टार (तो फुलवाल्याच्या पाहुण्या भूमिकेत), विनोद मेहरा (मौशमीचा नायक), मा. सत्यजित यासोबत तिला नेत्रहीन युवतीची भूमिका मिळाली तर ‘कच्चे धागे’ या डाकूपटात विनोद खन्ना आणि कबिर बेदी असे तगडे हॅन्डसम हीरो होते. म्हणजे, मौशमीची हिंदी चित्रपटसृष्टीतील वाटचाल व्यवस्थित सुरु झाली, ‘अनुराग’ने मुंबईत ऑपेरा हाऊस थिएटरमध्ये रौप्यमहोत्सवी तर ‘कच्चे धागे’ने शालिमारला शंभर दिवसाचे यश मिळवले…
सिनेमाच्या जगात सुपर हिट चित्रपट हे खूपच मोठे प्रमाणपत्र असते तरी मौशमीला आव्हाने खूप होती. तेव्हा शर्मिला टागोर, तनुजा, मुमताज, सायरा बानू खूप स्थिरावल्या होत्या. हेमा मालिनी, राखी, जया भादुरी, रेखा, लीना चंदावरकर यांची चलती होती. झीनत अमान, परवीन बाबी अशा वेस्टर्न लूकच्या स्टार्सचे महत्व वाढत होते. सुलक्षणा पंडित, रिना राॅयही स्थिरावत होत्या. रेहाना सुलतान, राधा सलुजा, आशा सचदेव, पद्मिनी कपिला या “फक्त प्रौंढासाठी” चित्रपटाच्या म्हणून ओळखल्या जात होत्या. यात मौशमी नेमकी कुठे आणि कशी फिट बसणार? पारंपरिक भारतीय स्रीचं रुपडं आणि बंगाली रसोगुल्ला व्यक्तिमत्व अशी पर्सनालीटी, तसेच सत्तरच्या दशकात वाढलेली चित्रपट निर्मिती व दोन वा तीन नायिकांचे वाढते चित्रपट यात मौशमीला जागा मिळत गेली आणि आपल्या गोड वागण्याने तिला बरीच संधी मिळाली.
एकीकडे विनोद मेहराशी तिची जोडी जमली आणि त्याच्यासोबत उस पार, उमर कैद, दो झूठ, रफ्तार, सबसे बडा रुपय्या, जिंदगी, मजाक असे चित्रपट मिळाले. तर राजा परांजपे दिग्दर्शित ‘उन पाऊस’ (१९५४) या चित्रपटाची रिमेक रवि टंडन दिग्दर्शित ‘जिंदगी’ मध्ये संजीवकुमार आणि माला सिन्हा वृध्दांच्या भूमिकेत असताना विनोद मेहरा आणि मौशमी तरुण जोडपे होते.
मौशमीने आपल्या छान वागण्याने अनेक दिग्दर्शकांच्या चित्रपटात भूमिका साकारताना तिला अनेक मोठ्या नायकांसोबत संधी मिळाली आणि तेच तर महत्वाचे आहे. धर्मेंद्र (फांदेबाज इत्यादी), राजेश खन्ना (हमशकल, प्रेम बंधन, भोला भाला इत्यादी), जितेंद्र (प्यासा सावन, स्वर्ग नरक इत्यादी), अमिताभ बच्चन (बेनाम, मंझिल), विनोद खन्ना (हत्यारा), ऋषि कपूर (झहरिला इन्सान इत्यादी) वगैरे वगैरे… अगदी आपल्या सुषमा शिरोमणीने आपल्या ‘भन्नाट भानू’ या मराठी चित्रपटात मौशमीवर ‘तुम्ही अडकित्ता मी सुपारी’ असे ठसकेबाज लावणी नृत्यही करुन घेतले. हिंदी चित्रपटात अनेकदा प्रेम गीते साकारणारी मौशमी या लावणीमुळे फारच सुखावली आणि ते नृत्यात उतरले. आपल्या कामात आपण छान आनंद घ्यायचा हा मौशमीचा गुण तिला असा फळला की दिग्दर्शक तिला प्रत्येक शनिवार रविवारी सुट्टी देत आणि तिच्या अभिनयासाठी पहावा असा जवळपास एकही चित्रपट सांगता येत नसला तरी तिची करियर यशस्वी ठरली. फिल्मी पार्टीतूनही ती क्वचित दिसे. फिल्मी पार्टीमुळे चित्रपट मिळतात यावर तिचा विश्वास नव्हता.
त्या काळात शर्मिला टागोर आणि राखी यांच्यानंतर बंगाली चित्रपटातून सुरुवात करुन हिंदी चित्रपटसृष्टीत यश मिळवण्यात मौशमी चटर्जीही यशस्वी ठरली…
नायिकापदाची संधी संपताना योग्य वेळी चरित्र भूमिकांकडे वळण्याचे चातुर्य मौशमीने दाखवले. आणि ‘उधार की जिंदगी’च्या हैद्राबादच्या अन्नपूर्णा स्टुडिओतील शूटिंगच्या वेळी मौशमीशी माझी ‘पहिली भेट’ झाली. (शूटिंग कव्हरेजसाठी मुंबईच्या आम्हा काही निवडक सिनेपत्रकारांचे तेथे जाणे झाले होते). मौशमीला तिच्या ‘मजाक’, ‘फरेबी’, ‘गुलाम बेगम बादशहा’, ‘हत्यारा’, ‘आनंद आश्रम’ अशा अगदी दुर्मिळ चित्रपटांची आठवण करुन देताच ती खुलली…. याचाच अर्थ मला तिचे अनेक सुपर हिट चित्रपट माहित आहेत असा होतो… छान मिठ्ठास हसत हसत तिने गप्पा केल्या.
मौशमीने हिंदीबरोबरच बंगाली चित्रपटातही सातत्याने भूमिका साकारत आपली प्रादेशीक चित्रपटाशी असलेली बांधिलकी जपली. प्रार्थना, प्रतिज्ञा वगैरे बंगाली चित्रपटात तिने भूमिका साकारलीय…
सोबतचा फोटो तिची एका फिल्मी पार्टीत औपचारिक भेट झाली तेव्हाचा आहे, तेव्हाही तिचे छान हसणं कायम आहे बघा. आपल्या करियरबद्दलच्या समाधानातून ते येत असते. आणि हेच मौशमी चटर्जीचे वेगळेपण आहे…