‘आई तुळजाभवानी’च्या पौराणिक गाथेत उलगडणार एक नवा अध्याय; चिंतामणी पाषाणाचा
“पिकू” ची २५ कोटी ते १४१ कोटींची पडद्यामाग ची कहाणी…
विनोदी चित्रपटांची चाकोरी मोडत मिश्कील हास्याला अर्थपूर्ण जोड देणारा चित्रपट म्हणजे “पिकू”. ८ मे २०१५ रोजी प्रदर्शित या सुपरहिट चित्रपटाची ही पडद्यामागची कहाणी. १९८० साली सुप्रसिद्ध दिग्दर्शक “सत्यजित रे” यांनी दिग्दर्शित केलेल्या शॉर्ट फिल्मवर “पिकू” आधारीत आहे. कथा पटकथा जुही चतुर्वेदी यांची तर दिग्दर्शन शुजित सरकार यांनी केलं आहे. चित्रपट लिहिताना त्यातून मध्यांतर काढून टाकण्याचा अभिनव प्रयोग करण्याचं शुजित सरकार यांच्या डोक्यात होतं पण भारतीय चित्रपटगृह मालकांनी या संकल्पनेला अजिबात प्रतिसाद दिला नाही आणि त्यांच्या दबावामुळे मध्यांतरासह सरकार यांना चित्रपटाची स्क्रीप्ट पुन्हा लिहून काढावी लागली.
“पिकू” च्या मुख्य भूमिकेसाठी परिणिती चोप्रा हीचा विचार शुजित यांनी केला होता. पण परिणितीने नकार दिल्याने दीपिका पदुकोण हिची मुख्य भूमिकेसाठी निवड झाली. या भूमिकेसाठी दीपिका बंगाली भाषा शिकली. एक व्यावसायिक अभिनेत्री म्हणून इरफान खान सारखा अभिनेता चित्रीकरणादरम्यान आपल्याशी फार हसून खेळून वागणार नाही अशी दीपिकाला भीती होती, जी अर्थातच खोटी ठरली. या चित्रपटातील त्यांची जोडी म्हणजे शुजित सरकारने घेतलेली मोठी रिस्क होती, पण ही जोडी सुपरहिट ठरली. दीपिका आणि अमिताभ बच्चन या बाप-लेकीची गंमतीशीर जोडी देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. चित्रपटातील अमिताभ, इरफान, दीपिका यांची जुगलबंदीही खास होती.
या चित्रपटातील अनेक प्रसंग खास चित्रीकरणाने लक्षात राहिले. त्यापैकी एक म्हणजे भाश्कोरदा झालेल्या अमिताभ यांचा सायकलप्रवास. आपल्याला राहून राहून आश्चर्य वाटतं की एवढ्या गर्दीत शुटींग होऊनही अमिताभना गर्दीचा त्रास कसा झाला नाही??? तर त्याचं कारण म्हणजे १०० कोलकाता पोलिस आणि ६०० एक्स्ट्राज अमिताभ यांना त्रास होऊ नये याची खबरदारी घेत वाहतूक सांभाळत होते. त्यामुळे ते शुटींग उत्तम पार पडलं.
हे हि वाचा : बेगम पारा: भारताची पहिली बोल्ड अभिनेत्री…
“पिकू” ची एक खास गोष्ट म्हणजे दीपिकाला ड्रायव्हिंग येत होतं, पण गाडी चालवायचा आत्मविश्वास कमी होता. शुटींग दरम्यान शुजित सरकारने खात्रीपूर्वक दीपिकाच्या ड्रायव्हिंगचा सीन जेव्हा सिनेमात टाकला तेव्हा तो हायवेवर ड्राईव्ह करण्याचा अनुभव दीपिकाला खूप काही शिकवून गेला आणि चित्रपटाच्या शुटींग नंतर मुंबईतील रस्त्यांवर ती आत्मविश्वासाने गाडी चालवू लागली. “पिकू” अनेक गोष्टी सहजपणे मांडतो.
बाप-मुलीचं नातं, स्त्री म्हणून नायिकेचं वेगळेपण, चाकोरीबाहेरचा रोमान्स आणि कोलकत्याचं देखणं सौंदर्य. या चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षक दोघांची उत्तम प्रतिक्रिया लाभली. दीपिका पदुकोण आणि अमिताभ बच्चन या दोघांनाही राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. अमिताभ यांचा तर तो चौथा राष्ट्रीय पुरस्कार ठरला. २५ कोटीत बनलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १४१ कोटींची कमाई केली. ॠषिकेश मुखर्जी, बासू चॅटर्जी यांच्या पठणीतल्या चित्रपटांची आठवण करुन देणारा पिकू सर्वार्थाने खास ठरतो…