शापित गंधर्व- कुंदनलाल तथा के एल सहगल
कुंदनलाल तथा के एल सहगल भारतीय सिनेमासंगीतातील ध्रुव तारा होते. आज ११ एप्रिल, त्यांची ११६ वी जयंती. (जन्म : ११ एप्रिल १९०४) त्यांची कारकिर्द केवळ १०-१२ वर्षाची; पण या छोट्याश्या कालखंडात ध्वनीमुद्रणाचे तंत्र पुरेसे विकसित झाले नसतानासुद्धा त्यांनी आपल्या स्वराने रसिकांना झुलविले. सैगल यांच्या स्वरांचा व गाण्यांचा हॅंगओव्हर पुढच्या दोन पिढ्यांवर कायम होता. त्यांची गाणी ऐकताना एक दमदार / उबदार / आश्वासक स्वर आपल्या कानी पडतोय अशी रसिकांची भावना असे. त्यांच्या एका गाण्याचा किस्सा तसा बराच लोकप्रिय असला तरी नवीन पिढीच्या वाचकांकरीता तो सांगणं आवश्यक ठरावे.
संगीतकार नौशाद अली यांनी आपल्या आत्मचरीत्रात याचा उल्लेख केला आहे. त्यांची आणि सैगल यांची पहीली भेट १९४५ साली कारदार स्टुडिऒत झाली. पूर्ण टक्कल, डॊळ्यावर जाड भिंगाचा चष्मा यामुळे त्यांनी सैगल यांना ओळखलंच नाही. त्या काळात सैगल पूर्णपणे मद्याच्या आहारी गेले होते. मद्य घेतल्या शिवाय ते गातच नव्हते. सैगलचा आवाज आपल्या सिनेमात पाहिजे या स्वार्थी विचारापोटी कुणीही त्यांना या व्यसनापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न तर सोडाच उलट उद्युक्तच करत होते. नौशाद यांना सैगल यांच्याकडून ’शहाजहॉं’ (१९४६) करीता गाणी गावून घ्यायची होती. गाण्याच्या रिहर्सलच्या वेळी सैगल टेकच्या आधी आपल्या ड्रायव्हरला बोलावून ’काली पांच लावो’ असं सांगायचे. ड्रायव्हर गाडीतून व्हीस्की घेवून यायचा आणि एका ग्लासात भरून द्यायचा. मद्य घेतल्यावर सैगल गायचे. दारू घेतल्याशिवाय मला गाता येणारच नाही असा त्यांचा ग्रह झाला होता. नौशाद यांनी त्यांचा हा समज खोटा आहे हे सिध्द करायचे ठरवले. पण सैगल म्हणजे त्या वेळचे टॉपचे गायक, तर नौशाद यांचा तो उमेदवारीचा काळ होता. दारू न घेता मी गाऊच शकणार नाही असं सैगल सांगू लागले.
नौशादनी एक प्रयोग करावयाचा ठरवले. ’जब दिल ही टूट गया, हम जी के क्या करेंगे’ या गाण्याच्या रेकॉर्डींगच्या वेळी ते सैगल यांना म्हणाले की आपण एक टेक ’काली पांच’ घेवून करूयात व एक टेक न घेता करूयात. नंतर दोन्ही टेक पैकी कोणता ठेवायचा ते तुम्ही ठरवा. हो नाही करत सैगल यांनी दोन्ही टेक केले. दुसर्या दिवशी सैगलयांना दोन्ही टेक ऐकवले. दारू न घेता गायलेला टेक सरस होता व तोच कायम झाला. सैगल यांच्या डोळ्यात पाणी आलं. ते नौशाद यांना म्हणाले ’काश आप मुझे इससे पहले मिलते… अब तो बहुत देर हो चुकी है.’ सैगल मद्य न घेता गाऊ शकतात ही त्या काळातली मोठी ब्रेकींग न्यूज ठरली. पण तोवर खूप उशिर झाला होता. अति मद्य सेवनाने सैगल आतून पोखरले गेले होते.
आपल्याला मृत्यु आपल्या गावी यावा म्हणून ते जालंदरला गेले व तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अति मद्यपानाने एका गुणी गायकाला अकाली वयाच्या ४२ व्या वर्षी मृत्युच्या समीप नेले आणि १७ जानेवारी १९४६ ला सैगल यांचे निधन झाले.
धनंजय कुलकर्णी, पुणे
(मुक्त पत्रकार आणि सिने अभ्यासक)