जाहिरात कलेत रमलेले चित्रपट कलाकार.
जाहिरातीतील चित्रपट तारे/ तारका असं म्हणता क्षणीच तुमच्या डोळ्यांसमोर अमिताभ बच्चन ते स्वप्निल जोशी आणि हेमा मालिनी ते पूजा सावंत, गौरी नलावडे असे बरेच चेहरे मोहरे अगदी अनेक प्रकारच्या जाहीरातींसह आले असतील. पण अशी फक्त नावे सांगायची, तपशील द्यावेत, सूची अथवा लिस्ट करावी इतका हा सोपा विषय नाही. त्यात ग्लॅमर, इकाॅनामी, मागणी, गुणवत्ता आणि सतत फोकसमध्ये राहणे असे अनेक घटक आहेत. ही एक वेगळी आणि चहुबाजूने विकसित गोष्ट आहे. जाहिरात ही एक कला आहे आणि त्याही कलेत चित्रपट कलाकार रुजायला हवे होते, तसे ते छान मुरलेत.
जुन्या चित्रपटांवर अथवा आजही ब्लॅक ॲण्ड व्हाईट अर्थात कृष्ण धवल चित्रपटांवर प्रेम करणारा वर्ग अगदी कौतुकाने म्हणतो की, दिलीपकुमार, देव आनंद आणि राज कपूर यांनी कधीही कुठल्याही जाहिरातीत काम केले नाही, त्यांना त्याची गरजच भासली नाही. पण खरं तर त्या काळात चित्रपटसृष्टी आणि जाहिरातीचे जग यात नियमित जीवन आणि लाॅकडाऊन असेच प्रचंड अंतर होते. अशातच एखादा कलाकार जाहिरातीत दिसला की एकाच वेळेस आश्चर्य आणि कौतुक वाटे. पण काळ जस जसा पुढे सरकला तसे जणू ‘जाहिरातीचे विश्व अवाढव्य’ झाले. फार पूर्वी एखाद्या क्रिकेट कसोटी सामन्यात कोणी एखादा षटकार मारला तरी ती जणू हेडलाईन असे, आज आयपीएलच्या काळात ‘छक्के पे छक्का’ ही अगदी सकाळी चहा प्यावा इतकी सवयीची गोष्ट झाली आहे. तसेच या जाहिरातींचे झाले आहे आणि त्यात फिल्म स्टारचा सहभाग झाला आहे. एकाही जाहिरातीत न दिसलेले कलाकार यांची एक वेगळी यादी करायला हवी.
रस्त्यावरच्या होर्डींग्सपासून सोशल मिडियापर्यंत आज जाहिरातींचा सुकाळ आहे. चित्रपट वाहिनीवर जाहिरातींच्या अधेमधे जमेल तितका आणि तेवढाच चित्रपट दाखवला जातो, अशाने त्या चित्रपटात गुंतता येत नाही याचे दुःख असेल तर चॅनल बदला. काही काही जाहिरातीही बघण्यासारख्या असतात, त्यामुळे भविष्यात ‘फक्त जाहिरातीचे एक स्वतंत्र चॅनल’ सुरु होईल आणि त्यावर ‘जाहिराती कशा बनतात, कल्पना कशा सुचतात, कुठून सुचतात, त्याचे अर्थकारण, त्या जाहिरातींचा सामाजिक प्रभाव’ अशा अनेक गोष्टींचा उहापोह होईल.
या सगळ्यात जाहिरातीच्या विश्वात खान हीरोंपासून सचिन पिळगावकरपर्यंत (अगदी सचिन तेंडुलकरही) कधी स्टार आले आणि दररोज दर्शन देऊ लागले हे समजलेच नाही. ज्याप्रमाणे जुने चित्रपट लोकप्रिय गाण्यांमुळे एका पिढीतून पुढील पिढीत जात राहिलेत तसेच जाहिरातीत चमकत राहिल्याने सतत लोकांसमोर राहता येते. स्टारच्या अनेक गरजांपैकी एक सूक्ष्म असते की आपण ‘आऊट फोकस’ होऊ नये. आपण सतत रसिकांसमोर असायला हवे. ती एक प्रकारची मानसिक सवय आणि व्यावसायिक गरज असते. आपण बाजूला अथवा मागे पडलेलो नाही हे अधोरेखित करावे लागते हा अलिखित नियम फारसा कोणाला चुकत नाही. पूर्वी एखादा पीआरओ ठेवून मिडियाला मुलाखत देत देत ‘फोकस’मध्ये राहता येत होते. आज सोशल मिडिया तीच भूक पुरी करतेय आणि वाढवतेय. त्याला उत्तम पर्याय म्हणजे जाहिरातीत चमकणे आहे.
पूर्वी झीनत अमान, परवीन बाबी सिनेमात आल्या तेव्हा त्यांना माॅडेल म्हटलं, तसे आता राहिलेले नाही. ऐश्वर्या रायच्या बाबतीतही तीच रेकाॅर्ड लावली होती. पण संजय लीला भन्साली दिग्दर्शित ‘हम दिल दे चुके’मध्ये तिने नंदीनीच्या भूमिकेत असा काही बेहतरीन अभिनय आणि नृत्य केले की तिला ‘अभिनेत्री’ म्हणून मान्यता मिळाली. मला आजही आठवतेय, गोरेगावच्या फिल्मीस्तान स्टुडिओत ‘ताल’च्या रमता जोगी या गाण्याच्या शूटिंगच्या वेळी दिग्दर्शक सुभाष घईने सेटवर रिपोर्टींगसाठी आम्हा सिनेपत्रकाराना बोलावले असता ऐश्वर्या रायची नृत्यावरची मेहनत पाहून थक्क झालो. अभिनयाच्या क्षेत्रात यशस्वी ठरण्यासाठी नशीब नव्हे तर गुणवत्ता आणि मेहनत लागते याचा लाईव्ह प्रत्यय मी मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील भटकंतीत अनेकदा घेतलाय. आता माॅडेलिंगमधून आली म्हणून सुश्मिता सेन अॅक्ट्रेस बनू शकत नाही असे बोलणं नंतरच्या काळात मागे पडत गेले. कधी काळी किमी काटकर आणि मग सोनाली बेंद्रे माॅडेलिंगमधूनच चित्रपटात आल्या आणि गुणवत्तेच्या जोडीला व्यावसायिक रणनीतीने यशस्वी ठरल्या.
माॅडेलिंगमधून सिनेमात येताना कदाचित मानधन कमी मिळतही असेल पण करिना कपूर, हृतिक रोशन, अक्षयकुमार वगैरे स्टार चित्रपटात भूमिका साकारत असतानाच जाहिरातीतही चमकधमक दाखवतात त्याची प्राईज नक्कीच उंची असणार. कारण एव्हाना ते ब्रॅण्ड नेम असतात. दीपिका पदुकोणचा प्रवास माॅडेलिंग ते सिनेमा रिटर्न्स जाहिराती असा असताना पहिल्यापेक्षा नंतर तिला चांगले उत्पन्न मिळाले असणार. याबाबतचे आकडे किती खरे नि किती खोटे हे फक्त त्यांच्या बँक अकाऊंटलाच माहित.
रणबीरसिंग आणि दीपिका असे दाम्पत्य एकत्र म्हणजे उत्तम पॅकेज आणि कदाचित त्यात काही सवलतही असेल. त्यांनी मानधन स्वतंत्रपणे घेतले की कसे हे त्यांनी ठरवले असेल. पण त्यांच्या नवीन जाहिराती अतिशय दिलखुलास आहेत. पुन्हा पुन्हा पाहून कंटाळा येत नाही. मृणाल कुलकर्णीने फार पूर्वी केलेली एक सौंदर्य प्रसाधनाची जाहिरात बरीच वर्षे सुरु होती. कोणी गंमतीने म्हटलं की, म्हणून काय झालं आजही ती तशीच तर आहे. तात्पर्य, जाहिरात पाहून सोडून दिली जात नाही. (मग करायची कशाला?) ‘माझ्या आवडीचे पदार्थ मी नेहमीच खातो’ हे सचिन पिळगावकरचे जणू घोषवाक्य झाले आहे आणि चला हवा येऊ द्या मध्येही त्यावर पंच झालाच. तर शासनाच्या सामाजिक गोष्टींच्या प्रचार जाहिरातीत काम केल्याने समाजाच्या अगदी खालच्या स्तरापर्यंत जाता येते. ती एक प्रकारची सामाजिक बांधिलकीच असते. हाही एक वेगळा पैलू आहे.
इतके असूनही एकही स्टार असे म्हणत नाही की, मला एखाद्या चांगल्या उत्पादनाच्या जाहिरातीत काम करायला आवडेल. त्या मिनिटा दोन मिनिटातही अभिनयाची संधी आहे आणि मी प्रेक्षकांना जोडलेला अथवा जोडलेली राहिन. काही वर्षांपूर्वी मीच मराठी मालिकेतून चित्रपटात आलेल्या एका अभिनेत्रीला सहज म्हटले, एका जाहिरातीत काम कर, कालांतराने तुला सगळीकडे रिस्पॉन्स मिळेल. आणि मग तसेच झाले. महत्वाचे आहे ते, तिने माझा फोन अटेण्ड केला. अन्यथा, सिनेमाच्या प्रमोशनच्या वेळीच मी मुलाखत देते असे एका ‘माॅडेलिंगमधेही चमकू शकेल’ अशा अभिनेत्रीने मला सांगितलयं. आपल्या ग्लॅमर आणि गुणवत्तेची एखाद्या जाहिरातीत चांगली गुंतवणूक होऊ शकते याचे अनेक कलाकारांना आजही व्यावसायिक व व्यवस्थित भान नाही.
खरं तर, एकाच वेळेस चित्रपट / मालिका / वेबसिरिज / इव्हेन्टस / म्युझिक अल्बम यामध्ये भूमिका साकारण्याच्या लवचिक धोरणात जाहिरातपटही हवा. त्यानिमीत्ताने हिंदीतील एखाद्या बड्या स्टारसोबतही काम करण्याचा छान अनुभव येतो. दीपाली पानसरेला तसा तो आहे. एखाद्या मागील पिढीतील कलाकार आपणास जाहिरातीत काम करायचेच नाही असे म्हटले तर समजू शकते. लोकसत्ताच्या २०१२ च्या दिवाळी अंकासाठी राखी गुलजारची पेण तालुक्यातील तिच्या फार्महाऊसवर जाऊन मुलाखत घेतली तेव्हा तिने मला तसे सांगितल्याचे अजिबात आश्चर्य वाटले नाही. याचे कारण म्हणजे ती सत्तरच्या दशकात स्टार म्हणून घडली तेव्हा जाहिरात हे क्षेत्रच परके मानले जात होते. अगदी नव्वदच्या दशकात ‘मालिकेत भूमिका साकारणेही’ हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकारांना प्रतिष्ठेचे वाटत नव्हते. पण काळ बदलत राहतो, नवीन समीकरण जुळतात आणि त्याच्याशी जुळवून घ्यावे.
आजच्या ग्लोबल युगात आपणच आपल्या गुणांची पब्लिसिटी करायची असते, हा मार्केटिंगमधील अलिखित नियम आहे. जाहिरातीत काम करणे म्हणजे त्याच नियमाचे पालन करणे आहे. सोनाली कुलकर्णी (छोटी) ने एका ज्वेलर्सच्या जाहिरातीत भूमिका केल्याचे विशेष कौतुकाचे आहे. त्यामुळे ती तिच्या फॅन्स आणि फाॅलोअर्सच्या सतत नजरेत येत राहिल. श्रृती मराठेचे असेच काही देखणे फोटो पुणे शहरात एका ज्वेलर्सच्या जाहिरातीत होते हे तिने तेव्हा मला अतिशय आनंदाने सांगितले हा गुण खूप महत्वाचा. माध्यम प्रिन्ट असो अथवा चॅनल अथवा होर्डींग्स, यू ट्यूब वगैरे वगैरे, जाहिरातीत सतत काम करण्याचा अमिताभ बच्चनचा स्टॅमिना जबरदस्त आहे. या क्षेत्रातही तो ‘महागुरु’च , त्याबाबतही तो आदर्श.
महाराष्ट्रीय अभिनेत्रीत वर्षा उसगावकरच्या ग्लॅमरस लूकला एका वाॅशिंग पावडरच्या जाहिरातीत छान स्कोप मिळाला. मिता सावरकरने उत्तम माॅडेल म्हणून छान करियर केले. या विषयाला अनेक बाजू आहेत हे तुमच्या लक्षात आले असेलच. प्रत्येक कलाकाराचे अनेक चित्रपट येतात आणि पडद्यावर येता येताच जातात, पण जाहिरात टिकून राहते (उत्पादन अर्थात ते प्राॅडक्ट हा वेगळा विषय आहे). व्यावसायिक कलाकार टिकून राहण्यास प्राधान्य देतो, तेव्हा वर्षभरात एका तरी जाहिरातीत काम करण्याचे ध्येय असावेच. आजच्या स्पर्धेच्या युगात त्यात गैर काहीच नाही..