ऋतुजा बागवेला मिळाला मानाचा उस्ताद बिस्मिल्लाह खाँ युवा पुरस्कार
भाऊबळी: वर्गीय लढ्याची प्रासंगिक गोष्ट
‘फिनिक्सच्या राखेतून उठला मोर’ हा कथासंग्रह नक्कीच तुम्ही वाचला असेल किंवा त्याविषयी ऐकले तरी असेल. समीक्षक, पत्रकार, नाटककार जयंत पवार यांचं लेखन हे समाजातील दुर्लक्षित घटकांवर भाष्य करणारे होते. त्यांच्या लेखनातील दाहकता अनेकदा बोचणारी होती, तर पिडीतांना पांघरुणात घेणारी होती. अशा या लेखकाच्या कथेवर त्याच्या पश्चात सिनेमा होताना नक्कीच अनेक प्रश्न तुम्हा आम्हाला पडलेले असणार; ती व्यक्ती आज आपल्यात असती तर? असा सवाल नक्कीच तुमच्या मनात आला असेल. पण, त्यांच्या शेवटच्या दिवसांमध्ये हा त्यांच्या कथानकावर आधारित सिनेमा घडला आहे. त्यांनीच अर्थात जयंत पवार यांनीच या सिनेमांची पटकथा आणि संवाद लिहिले आहेत. त्यामुळे या कलाकृतीकडे आपण निरखून पाहण्यास बांधील आहोत. (Bhau bali Marathi Movie Review)
ज्यांनी यापूर्वी हे पुस्तक किंवा ही कथा वाचली आहे; त्यांना तो व्यवस्थेवर भिरकावलेला ‘दगड’ आठवत असेल. तसाच दगड नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘फॅन्ड्री’ सिनेमात जब्याने देखील व्यवस्थेवर भिरकावला होता. तोच ‘दगड’ पुन्हा एकदा आपल्यावर (समाजावर) भिरकावलेला ‘भाऊबळी’मध्ये दिसतो.
सोपारवाडीची.. मुंबईची, तिथल्या गिरणगावाची, कामगारवस्तींची, चाळसंस्कृतीची, तिथल्या सामान्य माणसाची आणि त्याच्या छोट्या मोठ्या आनंदाची, दु:खाची, शल्यांची, ताणांची आणि माणसाच्या कोतेपणाची, त्याच्याच लपलेल्या अहंपणाची गोष्ट प्रासंगिक विनोद शैलीने ‘भाऊबळी’मध्ये लेखक, दिग्दर्शकाने मांडली आहे. हा सिनेमा प्रथमदर्शी व्यक्तिकेंद्री दिसतो. पण, तो तसा नसून समूहकेंद्री अधिक आहे.
सिनेमांच्या नावावरून सांगायचं झालं तर ‘भाऊ’ आणि ‘बळी’ या दोन व्यक्तींमधील, घटकांमधील, समाजामधील किंबहुना वर्गातील ही संघर्षकथा आहे. फ्लॅटमध्ये रहाणारे भाऊ आवळस्कर (मनोज जोशी) हे कनिष्ठ वर्गासमोर आपल्या मध्यमवगीर्य गंडाचा माज दाखवणार्या लोकांचं प्रतिनिधित्व करताना दिसतात. आपले दुधाचे पैसे बुडवणार्या आवळस्करांना कसं नामोहरम करायचं या विचारानं अस्वस्थ असलेल्या जिजाबाईनगरमध्ये (कामगार वस्ती) रहाणार्या बळी जंगमला जेव्हा आपल्या मुलानं आवळस्करांच्या मुलीशी लग्न केल्याचं कळतं तेव्हा काव्यात्म न्याय मिळाल्याचं समाधान त्याला मिळतं. आपल्याला तुच्छ लेखणार्या आवळस्करांच्या मुलीच्या पोटात आता खालच्या वर्गातील मुलाच्या वंशाचा दिवा वाढणार या कल्पनेनं खूश झालेला बळी जंगम समाजवृत्ती दर्शवतो.
उच्चवर्ग आणि कनिष्ठ वर्गातला वर्गसंघर्ष सिनेमात प्रकर्षाने दिसतो. लेखनाच्या पातळीवर सिनेमा उजवा आणि भक्कम आहे. पण, पटकथेत सिनेमा काही ठिकाणी रेंगाळतो. परिणामी सिनेमांची प्रेक्षकांवरील पकड उत्तरार्धात निसटते. सिनेमांचे एक बलस्थान म्हणजे; सिनेमा काही मुद्दे ‘अंडर प्ले’ होऊन सुचवू पाहतो. स्वत:ला सहिष्णू म्हणवणारा पांढरपेशा वर्ग मानभावीपणे आपण सर्व पातळ्यांवरच्या समानतेसाठी आग्रही आहोत असं भासवत असला तरी आजही जातीय, वगीर्य विषमता मनात बाळगून आहे. त्याच्या ह्या ढोंगी, मानभावी मानसिकतेवर ‘भाऊबळी’ नेमकं बोट ठेवतो.
सिनेमात दिग्दर्शकाने काही प्रसंगांमध्ये केलेले स्वप्नरंजन खटकवणरे आहे. सिनेमाची पटकथा पूर्णतः वास्तवाशी धरुन असती, तर कदाचित सिनेमाचा प्रभाव अधिक गडदपणे प्रेक्षकांवर पडू शकला असता, असा विचारही सिनेमा पाहताना डोक्यात येतो. दिग्दर्शकाने त्याची गोष्ट त्याच्या पद्धतीनं पडद्यावर मांडली आहे; त्यामुळे तो दृष्टिकोन देखील महत्त्वाचा आहे, हे नाकारता येणार नाही.
सिनेमात दाखवण्यात आलेले सत्यस्थितीचे हे चित्रण समाजाला आरसा दाखवणरे नक्कीच आहे. अभिनयाच्या पातळीवर सर्व कलाकारांची कामं उत्तम झाली आहेत. मनोज जोशी आणि किशोर कदम यांनी आपापल्या भूमिका लीलया निभावल्या आहे. सोबतच मेधा मांजरेकर, ऋषिकेश जोशी आणि संतोष पवार यांची कामं विशेष अधोरेखित होतात. त्यांची संवादशैली चेहऱ्यावर हसू आणणारी आहे. बाकी सिनेमा तांत्रिकदृष्टया चांगला झाला आहे. सिनेमा जे सांगू पाहतोय ते आपल्यापर्यंत पोहोचते, पण सिनेमाला मूळ पुस्तकातील कथानकाची दाहकता आलेली नाही. बाकी सिनेमा जरुर पाहण्याजोगा आणि मनोरंजक आहे.
सिनेमा : भाऊबळी
निर्मिती : नितीन वैद्य, निनाद वैद्य, अपर्णा पाडगांवकर
दिग्दर्शन : समीर पाटील
लेखन : जयंत पवार
कलाकार : मनोज जोशी, मेधा मांजरेकर, किशोर कदम, रसिका आगाशे, राजन भिसे, विजय केंकरे
छायांकन : सुहास गुजराती
संकलन : किरण क्षीरसागर
दर्जा: २.५ स्टार