धमाकेदार, भव्य व सुपरहिट फिल्मी मुहूर्ताची दिवाळी.
‘पिक्चर छोटी हो या बडी, त्याचा मुहूर्त म्हणजे जणू जबरदस्त दिवाळी धमाका!’
हिंदी चित्रपटाच्या अशा ‘दिवाळी धमाका’ चित्रपटांची भारी परंपरा होती (अरेरे, या दशकात ती मागे पडली). मोठ्या स्टुडिओत भला मोठा सेट लावून त्यावर नाट्यमय संवादाचे दृश्य चित्रीत करणे, मग मिठ्ठास पेढा, थंड शीतपेय, गले लगाओ संस्कृती, खूप खूप शुभेच्छा…
जवळपास अर्धा दिवस चालणारा हा मुहूर्त इव्हेन्टच. त्यात पुन्हा कोणत्याही मोठ्या निर्माता आणि दिग्दर्शकाला शुभेच्छा देण्यासाठी फिल्म इंडस्ट्रीतील अनेक निर्माते आणि दिग्दर्शक आवर्जून हजर. साधारणपणे सकाळी दहा साडेदहा वाजता मुहूर्त आहे असे भल्या मोठ्या आमंत्रण पत्रिकेत म्हटले असले तरी बारा साडेबारा वाजता मुहूर्त होई. ती तर कॉमन बाब होती. एकूणच वातावरणात दिवाळीचा गुड फिल जाणवे. भले त्या दिवशी कॅलेंडरमध्ये दिवाळी नसेल पण या फिल्मी मुहूर्ताची संस्कृती मात्र दिवाळीमय असे…
काही मुहूर्त मात्र दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर झाल्याचे अनुभवले, आणि ते अर्थातच आठवणीत राहणारे ठरले.
सोहराब मोदी दिग्दर्शित ‘गुरुदक्षिणा’ या चित्रपटाचा ऐन दिवाळीत मेहबूब स्टुडिओत मुहूर्त असल्याचे भले मोठे कार्ड हाती आले आणि माझी उत्सुकता वाढली. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे, ही माझ्या करियरची सुरुवात होती. १९८३ ची ही गोष्ट आहे आणि तोपर्यंत हिंदी चित्रपटाच्या मुहूर्त कल्चरबद्दल फिल्मी मॅगझिनमधून बरीच रंगतदार माहिती मिळाली होती. त्यातूनच माझ्या डोळ्यासमोर ‘चित्रपटाचा मुहूर्त म्हणजे सॉलिड काही तरी’ असते असे माझ्या माईंडमध्ये चित्र आकाराला आले होते आणि तेच डोक्यात आणि डोळ्यात ठेवून मेहबूब स्टुडिओत शिरलो. त्यात हा सोहराब मोदींचा चित्रपट म्हणजे मुहूर्तालाच जोरदार डायलॉगबाजी असणार हे मी गृहीतच धरले होते. फिल्मी दुनियेतील अनेकजण आपल्या इमेजमध्येच वावरतात. त्याना ते छान शोभते. या चित्रपटात पद्मिनी कोल्हापूरे नायिका होती आणि इतर स्टार निवडायचे होते. मुहूर्त अगदी शानदार झाला, पण सिनेमा मुहूर्तापलिकडे गेला नाही. तो बंद पडला. याचे कारण म्हणजे, सोहराब मोदी यांचे काही महिन्यातच म्हणजे जानेवारी १९८४ ला निधन झाले. मला मात्र दिवाळीच्या मुहूर्तावर झालेला सिनेमाचा मुहूर्त अनुभवायला मिळाला.
तर २४ ऑक्टोबर हा निर्माता आणि दिग्दर्शक सुभाष घईच्या मुक्ता आर्टसचा स्थापना दिवस. निर्माते एन. एन.सिप्पी यांचा ‘कालीचरण'(१९७६), पवनकुमार निर्मित ‘विश्वनाथ’ (१९७८), श्याम सुंदर शिवदासानी निर्मित ‘गौतम गोविंदा’ (१९७९), रणजित विर्क निर्मित ‘क्रोधी'(१९८०) गुलशन रॉय निर्मित ‘विधाता’ (१९८२) या चित्रपटाच्या दिग्दर्शनातच सुभाष घईने आपली चित्रपट निर्मिती संस्था स्थापन केली आणि ‘कर्ज ‘, ‘हीरो’ पासून धडाका लावला. यात योगायोगाने दोनदा २४ ऑक्टोबर रोजी दिवाळी आली आणि तेव्हा त्याने दणदणीतपणे अथवा त्याच्या शोमनशीप इमेजनुसार केलेले दोन मोठ्या चित्रपटाचे जंगी मुहूर्त केले. मी दोन्ही अनुभवले.
१९८४ च्या दिवाळीच्या मुहूर्तावर त्याच्या ‘कर्मा’ चा एका जबरदस्त भव्य सेटवर मुहूर्त झाला. आजही मला तो थरार जाणवतोय. अनिल कपूर, जॅकी श्रॉफ, नसिरुद्दीन शहा, अनुपम खेर आणि… आणि दिलीपकुमार एकेक जोरदार डायलॉगबाजी करत समोरच्या भव्य सेटवर आले आणि संपूर्ण वातावरण बदलून गेले. हा माझ्यासाठी एक जबरदस्त थ्रीलींगफूल अनुभव होता. कारण, मुहूर्त दृश्यापुरता का होईना पण दिलीपकुमारला प्रत्यक्ष अभिनय करताना पाहिले, (त्यानंतर त्याची भूमिका असलेल्या आणखीन काही चित्रपटाच्या मुहूर्ताचे असेच ‘लाईव्ह’ अनुभव घेतले तो प्रत्येक दिवस माझ्यासाठी दिवाळीचा होता.) या मुहूर्तासाठी डिंपल कपाडिया, पूनम ढीललॉंन आणि मीनाक्षी शेषाद्री आवर्जून हजर असल्या तरी तोपर्यंत या चित्रपटातील नायिका निश्चित झाल्या नव्हत्या. काही दिवसांनी श्रीदेवी आणि पूनम ढीललॉंन निवड झाली.
सुभाष घईने १९९३ च्या दिवाळीच्या मुहूर्तावर आपल्या ‘त्रिमूर्ती’ या चित्रपटाचा अतिभव्य मुहूर्त केला. या चित्रपटाचे दिग्दर्शन मुकुल आनंदचे होते. मला आजही आठवतेय, जुहूच्या एका पंचतारांकित हॉटेलच्या पूलसाईडवर समोरच्या समुद्राच्या लाटांचा आवाज सोबतीला येईल असा भव्य सेट लावताना काही भाग वाळूत गेला होता आणि बघ्यानाही हा मुहूर्त एन्जॉय करता येत होता. संध्याकाळी खूप उशीर केल्याने पडलेल्या अंधारात फिल्मी पध्दतीने ब्लास्ट झाला आणि जॅकी श्रॉफ, संजय दत्त व शाहरूख खान एकेक करत समोर आले तेच जोरदार डायलॉगबाजी करत. जंगी मुहूर्तानंतर बरेच फटाके फुटले. यावेळी संजय दत्त अगदी हरवल्यासारखा वाटला (त्याच वर्षी म्हणजे १९९३ ला मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील एक आरोपी म्हणून तो एप्रिल ते सप्टेंबर जेलमध्ये होता… हा विषय वेगळा आणि वळणावळणाचा आहे). तर आपल्या डॉ. मोहन आगाशे यांची यावेळी झालेली भेट लक्षात राहणारी. पण काही दिवसातच संजय दत्तला पुन्हा एकदा अटक झाली आणि ‘त्रिमूर्ती’ मध्ये त्याच्या जागी अनिल कपूर आला. असे काही ना काही कारणास्तव बदल होतच असतो.
हे हि वाचा : महेश लिमये घेऊन आले आहेत ह्यावर्षी आशेची रोषणाई.
असाच दिवाळीच्या शुभ मुहूर्तावरचा लक्षात राहिलेला मुहूर्त टीनू आनंद दिग्दर्शित ‘शिनाख्त’ या चित्रपटाचा. १९८९ च्या दिवाळीत चेंबुरच्या आर. के. स्टुडिओतील हा मुहूर्तही लक्षात राहिल असाच आहे. मला आजही आठवतेय, संध्याकाळची वेळ होती आणि अमिताभ बच्चन व माधुरी दीक्षित एकत्र आले म्हणून प्रचंड उत्सुकता होती. मालगाडीच्या डब्याचा सेट लागला होता. मुहूर्ताचे दृश्य चित्रपटात समाविष्ट होत नसले तरी ते जोरदार, भारी, सॉलिड वगैरे असावेच हा फिल्मी नियमच होता जणू. सिनेपत्रकार आणि पटकथा लेखक वसंत साठे यांच्या शुभ हस्ते क्लॅप दिला गेला आणि जखमी अवस्थेत साखळदंडाला बांधलेला जखमी, कपड्यांना शरीराला रक्त लागलेला अमिताभ दिसला. तेवढ्यात माधुरी दीक्षित आली आणि त्याला बिलगली. दोघांनी ‘या अन्यायाचा बदला घेतला जाईल’ अशा आशयाचे संवाद म्हटले आणि मुहूर्त दृश्य साजरे झाले. अमिताभसोबत भूमिका मिळाल्याने माधुरीला अक्षरशः प्रचंड आनंद झाल्याचे तिला याक्षणी शुभेच्छा देत असताना प्रकर्षाने लक्षात आले. तिच्यासाठी तो क्षण दिवाळीचा आनंद. हाही चित्रपट मुहूर्तालाच बंद पडला.
दिवाळीच्या शुभ मुहूर्तावरचे हे धमाकेदार फिल्मी मुहूर्त लक्षात राहण्यासारखेच. खरं तर आपल्या चित्रपटसृष्टीत अनेक चित्रपटांचे मुहूर्त आणि प्रीमियर हे एक प्रकारचे दिवाळी धमाकाच. मग पंचागात दिवाळीचा योग असो अथवा नसो, एक प्रकारची दिवाळीच तर साजरी होते. ही या फिल्म इंडस्ट्रीची भारी खासियतच तर आहे. कायमच पॉझिटीव्हिटीचा डोस घेऊन राह्यचे. दिवाळी सणही अशाच तर आनंदाचा!