महाराणी येसूबाईंच्या भूमिकेतले अमृता खानविलकरचे फोटो व्हायरल
प्रेक्षकांना नेमकं काय हवं आहे?
गेल्या काही दिवसांपासून एकूणच सिनेमे आणि त्याला येणारा प्रेक्षक यांच्यावर चर्चा सुरू आहे. त्यातच बॉयकॉटचं लोण (Boycott trend) आलं आहे. ‘लालसिंग चढ्ढा’ हा आमीर खानचा सिनेमा बॉयकॉट करायचा सूर जसा आळवला जाऊ लागला, तसं इंडस्ट्रीत खरंच सगळं आलबेल आहे का, हा प्रश्न निर्माण होऊ लागला. त्यात हा चित्रपट प्रेक्षकांनी फारसा डोक्यावर घेतला नाही. म्हणजे सामान्यतः आमीर खानचे चित्रपट जसे चालतात तसा तो चालला नाही.
यापूर्वी ‘ठग्ज ऑफ हिंदूस्थान’ हा आमीरचा एक पडेल चित्रपट सोडला, तर बाकी सगळे चित्रपट एका मर्यादेपर्यंत चालत होतेच. पण या बॉयकॉटच्या ट्रेंडने आमीरला स्टेटमेंट द्यायला भाग पाडलं. आमीरने स्टेटमेंट दिल्यावर बॉयकॉट करणाऱ्यांना आणखी बळ आलं आहे. आता ब्रह्मास्त्रपासून अनेक चित्रपटांना बॅन करण्याबद्दलची चर्चा सुरू झाली आहे. (Boycott trend & Aamir)
बॉयकॉटचा प्रकार (Boycott trend) बळावत असतानाच प्रेक्षकांनी इतर चित्रपटांकडेही पाठ फिरवली आहे. प्रेक्षकांच्या या औदासिन्याचा फटका रणबीर कपूर, अक्षयकुमार, सलमान खान आदी कलाकारांना बसला आहे. मग मुद्दा हाच येतो की, प्रेक्षक थिएटरकडे वळतोय की नाही?
प्रेक्षक जर थिएटरकडे वळत नसतील, तर ते का वळत नाहीयेत? त्याचं एक कारण केवळ सिनेमा हेच आहे की आणखी काही कारणं आहेत त्यांची? हाच नियम सगळ्याच चित्रपटांना लागू होतो. अगदी हिंदी, मराठी, तामीळ, तेलुगु, बंगाली, भोजपुरी असे सगळेच सिनेमे यात येतात. खरंतर लॉकडाऊननंतर आता सर्वकाही ‘न्यू नॉर्मल’ सुरू झालं आहे. गेल्या दोन वर्षात ओटीटीने आपलं स्वतंत्र अस्तित्व निर्माण केलं आहे. प्रत्येकाच्या फोनमध्ये मनोरंजनाची ही वेगवेगळी ॲप्स आहेतच, पण महत्त्वाची बाब अशी आहे की, लॉकडाऊन सुटल्यानंतर ओटीटी वापरण्याचं प्रमाण लक्षणीय घटलं आहे. कारण, प्रत्येकाचा उद्योगधंदा आता सुरू झाला आहे.
मनोरंजन ही आपल्या जगण्याची गरज असली तरी ती प्राधान्यक्रमात पहिल्या तीनमध्ये कधीच नव्हती. प्राधान्यक्रमामध्ये आजही रोटी, कपडा और मकान याच गोष्टी येतात. त्यानंतर मनोरंजन येतं. आता हा प्राधान्यक्रम लावताना तीन प्राधान्यक्रम झाल्यावर त्यानंतर जी काही यादी वाढते त्यात मनोरंजन येतं. मनोरंजनासाठी इंटरनेटही येतं. नेट हे खूप वरच्या क्रमावर आहे हे पुन्हा वेगळं सांगायला नको.
आता दैनंदिन जगण्यामध्ये ओटीटीचा वापर कमी झाला आहे. त्यामुळे मनोरंजनाच्या इतर माध्यमांनीही पुन्हा एकदा नव्यानं भरारी घेण्यासाठी कंबर कसली आहे. त्यातलाच एक महत्वाचा भाग आहे तो थिएटर्स, सिनेमा थिएटर्स! याशिवाय नाटकंही आहेतच. पण या नाटकांनी आपला असा एक पेस पकडला आहे. त्यांचा स्वतंत्र वर्ग आहे आणि ती एक जिवंत कला आहे. त्यामुळे नाटकांचा विषय आत्ता इथे नाहीय. आपण सिनेमाबद्दल बोलतो आहोत. सिनेमा थिएटर्समध्ये लोकांना खेचण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची बाब आहे ती उत्तम सिनेमे येण्याची. आता इथे मुद्दा आहे इच्छेचा.
सिनेमा केवळ चांगला बनवून चालणारा नाही, तर तो सिनेमा पाहण्यासाठी लोकांना उद्युक्त केलं पाहिजे. आपण हा सिनेमा थिएटरमध्येच जाऊन पाहायला हवा अशी इच्छा त्यांची झाली पाहिजे. आता यात दोन कारणं आहेत. पहिलं असं की, या चित्रपटाचं प्रमोशन तशा पद्धतीने झालं पाहिजे आणि दुसरं असं की, हा चित्रपट थिएटरमध्ये पाहिला नाही, तर आपण काहीतरी महत्त्वाचं पाहायचं राहून जाणार आहे, हे प्रेक्षकांना वाटलं पाहिजे. म्हणजे तो चित्रपट ‘लार्जर दॅन लाईफ’ असायला हवा.
काहीतरी भव्य.. काहीतरी दिव्य.. आणि तेही योग्य त्या तर्काच्या आधारे मांडलं गेलं असेल तर आणि तरच प्रेक्षक थिएटरमध्ये येेणार आहे. कारण तसं झालं नाही, तर त्यांच्यासाठी उद्या किंवा आणखी काही दिवसांनी तो चित्रपट ओटीटी किंवा टीव्हीवर दिसणार आहेच. त्यावेळीही त्यांना या चित्रपटाचा आनंद घेता येणार आहेच. पण थिएटरमध्ये मिळणारा जो अनुभव त्यांना तो चित्रपट पाहताना मिळेल तो टीव्हीवर मिळणारा नाही, हे प्रेक्षकांच्या माथी बिंबवलं पाहिजे.
अशा सिनेमांमध्ये बाहुबली, आरआरआर, केजीएफ, पुष्पा आदी चित्रपटांचा उल्लेख करता येईल. शिवाय आगामी ‘ब्रह्मास्त्र’ही अशाच पठडीत असल्याची चर्चा आहे. अर्थात केवळ भव्य करूनही चालणार नाही, तर आपण प्रेक्षकांना देऊ पाहात असणारा अनुभव महत्त्वाचा असेल. तो भव्यतेचा आहेच. पण केवळ भव्यतेचा नाही, तर आशयामध्येही तो अनुभव असावा. काहीतरी भिडणारं.. काहीतरी आनंदाने वेढून टाकणारं.. काहीतरी मनातलं चंदेरी पडद्यावर उमटलेलं असं.. असं काहीही.. पण तो अनुभव प्रेक्षकांना मिळणार असेल, तर प्रेक्षक थिएटरमध्ये जरूर जाईल.
आता याला इतरही बरेच कंगोरे आहेत. तिकीट दर, तिथे मिळणाऱ्या खाऊचा दर, हे मुद्दे न संपणारे आहेत. थिएटरवाले त्या दरांशी ठाम असतात हे उघड सत्य आहे. चित्रपट भिडणारा असेल, तर प्रेक्षक थिएटरवर गर्दी करतात हाही अनुभव आहेच. लॉकडाऊननंतर आलेल्या अनेक हिंदी, मराठी, दाक्षिणात्य सिनेमांनी ते दाखवून दिलं आहे, हे आपण लक्षात घ्यायला हवं.
सिनेमा प्रेक्षकांच्या मनाचा वेध घेणार असेल.. त्यांना त्यातून अनुभव मिळणार असेल, तर चित्रपट चालतोच.. आणि तो चालेलच. पण एकाच ठिकाणी.. दिवाणखानी पद्धतीने बनवले गेलेले चित्रपट कितीही उत्तम असले तरी प्रेक्षक असे चित्रपट केवळ घरी पाहील. त्याच्याकडे यासाठी मोबाईल आणि टीव्ही ही दोन माध्यमं असतील. पुढचा काही काळ भव्यतेकडे झुकणाऱ्या चित्रपटांचा असेल हे उघड सत्य आहेच. अर्थात, विजय देवरकोंडाचा लायगर या चित्रपटाचं काय झालं तेही विसरून चालणार नाहीये.
===============
हे ही वाचा: दाक्षिणात्य आणि मराठी चित्रपटांचा बोलबाला…. बॉलीवूडला मात्र ठेंगा
पत्रकारांसाठी खास शो आता नको.. असं का वाटतं निर्मात्यांना?
==============
‘लायगर’ पडला कारण प्रेक्षकांना अभिप्रेत असलेला कंटेंट हा चित्रपट देऊ शकला नाही. खरंतर ही ‘लिटमस टेस्ट’ आहे. केवळ भव्य दिव्य प्रेझेंटेशन आणि लोकांनी डोक्यावर घेतलेले कलाकार घेऊन सिनेमा बनणारा नाही, तर त्याला लॉजिकल गोष्ट हवी. तसं तिचं सादरीकरण हवं. तसं झालं तर आणि तरंच चित्रपट चालेल. आता येणारा चित्रपट हा प्रादेशिक भागांपुरता मर्यादित राहणारा नाही. सिनेमाचं आभाळ असं विस्तारत असताना कथा, पटकथा, संवाद, सादरीकरण या चारही विभागांमध्ये ताळतंत्र ठेवून झेप घेता यायला हवी, हेही तितकंच खरं. तसं झालं तरच प्रेक्षकाला एक परिपूर्ण अनुभव मिळेल.