‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
कोरोनामुळे सिनेपत्रकारितेत होणारा बदल
शिर्षक वाचून काहीजण बुचकळ्यात पडले असतील. कोरोनाने सामाजिक, उद्योग, सांस्कृतिक, आर्थिक, पर्यटन, मिडिया, राजकीय अशा अनेक क्षेत्रांवर बरे वाईट परिणाम होत असल्याचे दिसतेय. पण चक्क सिनेमा पत्रकारितेवर कसा काय असा प्रश्न नक्कीच त्यांच्या मनात निर्माण झाला असेलच. तुमच्या मनातील गोंधळाला/ शंकाना/ प्रश्नांना उत्तरं नक्कीच देतोय.
फ्लॅशबॅकमध्ये जाऊन पाहिल्यास सिनेपत्रकारिता अधेमधे निश्चित कात टाकत असतेच. सांधा बदलत असते. पण त्याचा खडखडाट होत नाही. पण बदल तर होणारच आणि कळत नकळतपणे तो स्वीकारलाही जातो.
तुम्हाला खूपच मागे नेत नाही. पारंपरिक सिनेपत्रकारितेत पहिला निर्णायक बदल आणला तो बाबुराव पटेल या पत्रकारानी आणि त्यात रंग भरला तो देवयानी चौबळनी ! अगदी सुरुवातीच्या काळातील सिनेपत्रकारितेत सिनेमाच्या मुहूर्तापासून रिलीजपर्यंत बातम्या, त्यात माहिती आणि संदर्भ याकडे जास्त कल होता. सिनेमाच नवीन होता, त्यामुळे हे अगदी स्वाभाविक होतेच. एखाद्या चित्रपटाचे परीक्षण आणि एकादा लेख यावर सगळा भर असे.
परीक्षण म्हणजे अतिशय बारीकसारीक गोष्टीची दखल त्यात घेतली जाई. आणि लेख म्हणजे अतिशय सखोल विश्लेषण आणि भाष्य असे. हे वाचून प्रेक्षकांची त्या चित्रपटाकडे पाहण्याची दृष्टी तयार होणार आहे याचे भान त्यात असे. कलाकाराच्या वाटचालीचा सविस्तर आढावा घेण्याचे लेखन याच काळात सुरू झाले. मग दिग्दर्शक, गीतकार, पाश्वगायक, संगीतकार यांच्या कर्तृत्वाचा सविस्तर आढावा घेण्याचे लेखन सुरू झाले. ही एक प्रकारची वाढ आणि सामाजिक हिताची गोष्ट होती.
बाबुराव पटेल यांनी आपल्या ‘मदर इंडिया ‘ या नावाच्या नियतकालिकामधून चित्रपटसृष्टीतील आतील घडामोडींवर फोकस टाकणे सुरु केले. हे ‘बातम्यांच्या पलिकडचे’ वाचनीय होऊ लागले आणि तुम्हालाही माहित्येय जे आवडले जाते ते हळूहळू इतरत्रही सुरु होते.
आता सिनेपत्रकारितेत थोडासा रंग आला. आणि अशातच सत्तरच्या दशकाच्या थोडे अगोदरपासून फिल्मी गाॅसिप्स पत्रकारीता सुरु झाली आणि ती ‘वाचता वाचता’ प्रचंड लोकप्रिय झाली आणि त्यात अतिशय महत्त्वाचा वाटा होता, देवीचा! म्हणजे देवयानी चौबळचा आणि साथ होती राजेश खन्नाची. देवी फिल्म स्टारच्या अफेअर, ब्रेकअप, बेडरूम स्टोरीज, पार्टी किस्से यावर खरोखरच मोकळेढाकळेपणाने अथवा खुल्लम खुल्ला लिहायची. ही एक प्रकारची फिल्मी मिडियात कल्चरल शाॅक देण्याची क्रांती होती.
राजेश खन्ना ऐन भरात असल्याचे ते दिवस होते. त्याच्या डिंपल कपाडियासोबत लग्न होणार असल्याची बातमी देवीनेच सर्वप्रथम ब्रेक केली. फिल्मी पार्टीत स्टार्स कोणत्या स्टाईलच्या वस्रात येतात, कोणती दारु किती पितात, कसे वागतात, कसे टाईट होतात यावर खमंग स्टोरी येऊ लागल्या आणि वाचकांना हे आवडले.
धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्या प्रेम प्रकरणावर देवीने ‘काय वाट्टेल ते’ लिहिले. स्टारडस्ट या मॅगझिनने या गाॅसिप्स पत्रकारीतेला रुजवले आणि मग इतरही ग्लाॅसी पेपर्सवरील मॅगझिनमधून अशा अनेक गोष्टी येऊ लागल्या. अशातच स्टारचे फोटो सेशन हे फॅड रुजले. आकर्षक, देखण्या फोटो सेशनप्रमाणेच हाॅट, बोल्ड, सेक्सी लूक फोटो सेशनला आता गती आली. झीनत अमान, परवीन बाबी अशा वेस्टर्न लूकच्या अभिनेत्रींच्या आगमनाने यात वाढ झाली. आशा सचदेव, शीतल, श्यामली, केटी मिर्झा, कोमिला विर्क, प्रेमा नारायण अशा बोल्ड ॲण्ड ब्युटीफूल फोटो सेशनच्या हुकमी ॲक्ट्रेस या काळात खूप आल्या.
इंग्लिश मिडियातील गाॅसिप्स मराठीतही थोडे थोडे येऊ लागले. देवयानी चौबळ ‘स्टार पत्रकार’ म्हणून ओळखल्या गेल्या. इतक्या की अनेक वर्षे तरी सिनेपत्रकारितेत आलेल्याना ‘तू देवयानी चौबळसारखे लिहिले पाहिजे ‘ असे फुकटचे सल्ले दिले जात. अगदी मलाही दिले, पण देवी इंग्रजी मिडियात लिहित असल्याने तिला मोठ्या स्टार्सचा थेट रिस्पॉन्स मिळतोय हे विसरले जाई. मराठी नियतकालिकांच्या वाचकांना असे काही फारसं आवडत नव्हते. त्यांना चित्रपटसृष्टीच्या इतिहासात अर्थात जुन्या आठवणीत आणि अकॅडमी लेखनात रस आणि तेच तर महत्वाचे आहे ना?
न्यू व्हेव अर्थात ‘समांतर’ चित्रपटाच्या प्रवाहातून वेगळे चित्रपट येऊ लागले आणि मिडियात त्यांनाही स्थान मिळाले. आपल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची सुरुवात झाली आणि चित्रपटाकडे गांभीर्याने पाहिले जाऊ लागले.
आताच जुन्या काळातील चित्रपटाच्या आठवणी आणि किस्से सांगण्याचे ‘गुजरा हुआ जमाना, फ्लॅशबॅक, कहा गये वो लोग, घुंघट के पट खोल’ अशी सदरे सुरु झाली.
आता सिनेमा मिडियाचा विस्तार झाला, विविधता आली. प्राॅडक्सन्सच्या बातम्यांपासून मुलाखतीपर्यंत आणि शूटिंग कव्हरेजपासून काॅन्ट्रोव्हर्सीपर्यंत अशी चौफेर वाटचाल सुरू झाली.
नव्वदच्या दशकापासून यात बदल होत गेले. आता काही स्टारचे अंडरवर्ल्डशी असलेले /नसलेले संबंध, गॅन्गस्टरच्या काही फिल्मवाल्यांना धमक्या, मुंबई बाॅम्बस्फोट प्रकरणी संजय दत्तला अटक, अंडरवर्ल्डकडून गुलशनकुमारची हत्या अशा गोष्टींचे सावट सिनेपत्रकारितेवर पडले आणि बदलला सुरुवात झाली. अर्थात, अगोदरपासूनच जे सुरु होते, रुजले होते ते कायमच राहिले.
खुली अर्थव्यवस्था आणि जागतिकीकरणाच्या काळात सिनेपत्रकारीतेत बदल होत गेलेच. ऐश्वर्या राॅय, सुश्मिता सेन या जगत सुंदरी, विश्व सुंदरी म्हणून निवडल्या गेल्या आणि मग सिनेमाच्या जगात आल्याने फिल्मी मुलाखतीत लूक, फिटनेस, ब्यूटी यावर प्रश्न वाढले. आणि मग जगत सुंदरी, विश्व सुंदरी यात भारतीय युवतीची निवड हे काही काळ सातत्य राहिले. या स्थित्यंतरात फिल्म स्टारना अभिनयाविषयीची प्रश्न विचारणे बरेचसे साईट ट्रॅक होत गेले हादेखील मोठाच बदल.
उपग्रह वाहिनींच्या आगमनाने आणखीन बदल झाले. पूर्वी आम्ही प्रिन्ट मिडियाचे पत्रकार स्टारच्या घरी जाऊन अथवा चित्रपटाच्या सेटवर मुलाखती घेत असू, त्यामुळे अनेक स्टार आम्हाला नावाने ओळखत. अनेक स्टारच्या कुटुंबियांशी माझी ओळख झाली आणि आजही कायम आहे. पत्रकार आणि स्टार यात थेट संवाद असे. एकाद्या स्टारला त्याच्या सेक्रेटरीमार्फत भेटता येई. आता जवळपास प्रत्येक स्टारला पीआरओच्या माध्यमातून भेटण्याचे युग आले. चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी आता मुलाखती दिल्या जाऊ लागल्या. पत्रकारांच्या ज्ञानापेक्षा त्याच्या बॅनरला अर्थात मिडिया ग्रुपला महत्व आले. हे खूपच मोठे स्थित्यंतर घडले आणि चित्रपटांमध्ये नेमके काय दाखवलं आहे यावर चित्रपट पाहून जे आम्ही सिनेपत्रकार प्रश्न करत असू ते कालबाह्य झाले.
पूर्वी अनेक स्टार ‘मुलाखत देण्यापूर्वीच आपला चित्रपट पाहिला का’ असा प्रश्न करे. राजकुमार तर सांगायचा, पहिले होमवर्क करके आना…. आता जणू ‘मुलाखत देणे आहे’चा जुलूस असतो. त्यामुळे सिनेमा खरंच प्रेक्षकांपर्यंत पोहचतो का? बहुतेक असेलच, कारण पूर्वी चित्रपटाच्या गुणवत्तेवर उलटसुलट लिहिले जाई आता थिएटर रिकामं असले तरी किती कोटी कमावले यांच्या ब्रेकिंग न्यूज येऊ लागल्या. बदल होतच असतो, तो असादेखिल असू शकतो.
‘श्वास’ या मराठी चित्रपटाची भारताची ऑस्करसाठीची प्रवेशिका म्हणून निवड झाली आणि अनेक गोष्टींसह माध्यम क्रांती झाली. ऑस्करचे कव्हरेज आणि त्यातील भारतीय चित्रपट ( मराठी, हिंदी अथवा अन्य भाषिक) ऑस्करसाठीची भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून निवडीचे बातमी महत्वाची झाली. ही एक सकारात्मक गोष्ट घडली. काही चांगले तर काही भलतेच घडत घडतच प्रवाह पुढे जात असतो.
पूर्वी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील काही स्टार छान फ्रेन्डली पार्टी देत. त्यातून रिलेशन मेन्टेन होई. त्या खास पार्ट्यां बंद झाल्या. मोठे जाऊ दे. आता माध्यमे वाढली. वेबसाईट, पोर्टल यांच्या अफाट पिकात सिनेमाचे प्रमोशन आणि स्टारचे ग्लॅमर याना मोठेच महत्व आहे. देशातील विविध भागातील आणि एकूणच जगभरातील चित्रपट महोत्सवांचे कव्हरेज एकूणच मिडियात बाजूलाच राहिले.
कोरोनाने वर्क फ्राॅम होम आणल्याचा मोठा फटका सिनेमा मिडियाला बसला. मुहूर्त, फस्ट लूक, प्रीमियर इव्हेन्टस, पार्टी या माध्यमातून चालणारी सिनेमा पत्रकारितेला स्पीडब्रेकर बसला. काही स्टारनी तरीही छान फोटो सेशन केली. अनेक स्टारनी स्वतःची यु ट्यूब चॅनल सुरू करुन थेट आपल्या फॅन्स आणि फाॅलोअर्सपर्यंत जाणे पसंत केले आहे. ट्वीटर, इन्टाग्राम अशा सोशल मिडियात आपले नवे जुने फोटो, आठवणी शेअर करत आपले कम्युनिकेशन वाढवले. तेथील फोटोना जेवढ्या प्रमाणात लाईक्स मिळताहेत तेवढे मल्टीप्लेक्समध्ये प्रेक्षक का येत नाहीत असा अडचणीचा प्रश्न न केलेला बरा. खरं तर आता ‘गोड गोड गुलाबी ‘ प्रश्नांचे युग आले. चित्रपट हे फार दिलखुलास क्षेत्र आहे अशा प्रतिमेमुळे तसे झाले असावे.
आता मोठा बदल होतोय तो सुशांतसिंग राजपूतची आत्महत्या, तसेच रिया चक्रवर्तीचे ड्रग्ज प्रकरण, तिने घेतलेली नावे, कंगना रानावत काॅन्ट्रोव्हर्सी यात आता सिनेपत्रकाना कमी अधिक प्रमाणात भाष्य करावे लागतेय. बातमी द्यावी लागतेय. ऐशीच्या दशकाच्या सुरुवातीला संजय दत्तचे व्यसन प्रकरण प्रामुख्याने गाॅसिप्स मॅगझिनमधून रंगले. ते मुख्य प्रवाहात नव्हते. आता मात्र मुख्य प्रवाहात ‘सिनेमाव्यतिरिक्त सिनेमाचे आणि स्टारचे बरे वाईट धक्कादायक वगैरे वगैरे बरेच काही असलेले जग ‘ हाच सिनेमा पत्रकारीतेत मोठा प्रवाह असेल. त्यालाच वाचकसंख्या, टीआरपी, लाईक्स, काॅमेन्टस भरपूर असणार, त्यामुळे मॅनेजमेंटच ‘हेच आता हवे. फेस्टीवल मुव्हीज, गुलाब जाम मुलाखती, आवडती रेसिपी हे फार नको, गाजत असलेला चर्चेत असलेला विषय हवाय.
एकूणच मोठ्या प्रवाहात अनेक लहान लहान नाले आणि नद्या आहेत. त्या या सगळ्यात मिसळत गेल्या. आणि मूळ गोष्टी कमी अधिक प्रमाणात चालत राहतच काळासोबत नवीन गोष्टींची भर पडली आहे.
हे सगळेच स्वाभाविक आहे. एखाद्या स्टारचा आगामी चित्रपट माहित नसला तरी चालेल पण तो काही वाह्यात गोष्टीत रस घेत नाही ना याची माहिती मिळवा असा बदल होत जाईल असेच दिसतेय. आणि नवीन चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर अर्थात तिसरा पडदा पध्दतीने रिलीज होत असल्याने तर रिव्ह्यूचेही महत्व कमी कमी होत चाललेय. आणि आजची फिल्म इंडस्ट्री अनेक वादग्रस्त गोष्टीत रस घेत आहे असे चित्र निर्माण झाल्याने तर त्याचे काही दुष्परिणाम सिनेमा मिडियावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पुरे झाले प्रमोशन, बसं झाल्या गोडीच्या मुलाखती, तुमच्या चित्रपटसृष्टीत हे चाललय काय याचे उत्तर द्या, असा प्रश्न आता फार दूर अंतरावर नाही.