गाडीच्या टपावर पडणाऱ्या पावसाच्या थेंबाच्या आवाजातून सुचले हे गाणे!
गावात दादाचं पिक्चर आलं रे आलं….
ते दिवसच वेगळे होते. थेटरातला पिक्चर, मेळे, रंगभूमी, रेडिओ, लाऊडस्पीकर, इराणी हाॅटेलमधील ज्यूक बाॅक्स अशी मनोरंजनाची साधने होती. उच्चमध्यमवर्गीयांच्या घरात ग्रामोफोन होता आणि दूरध्वनी असलेले कुटुंब गल्लीत श्रीमंत मानले जाई. संपूर्ण गल्लीत दोन तीन फोन असत आणि सतत वाजत नसत…( दूरचित्रवाणी हा प्रकारही दूर होता.)
शहरातील पिक्चर गावाकडच्या बाल्कनी नसलेले सिंगल स्क्रीन थिएटर्स, तंबू थिएटर, टूरिंग टाॅकीज येथे पोहचायला वर्ष दीड वर्ष लागणे आश्चर्याचे नव्हते. जणू सिस्टीमचा व सवयीचा भाग होता. तोपर्यंत गावात लग्न, बारसं, पूजा, गृह प्रवेश यानिमित्त लागणाऱ्या लाऊडस्पीकरवर गाणी ऐकायला मिळत. गावात दोन चार घरे सोडल्यावर असलेल्या रेडिओचा आवाज खूप मोठा असे, त्यामुळेच तो शेजाऱ्यांनाही ऐकायला मिळे. अथवा कसोटी क्रिकेट सामन्याचे समालोचन ऐकण्यासाठी कुठे माळरानावर ट्रान्झिस्टर लावलेला असे. ग्रामीण भागातील चित्रपट रसिकांना नवीन जुन्या चित्रपटांची माहिती जाणून घ्यायची तर ग्रामपंचायतीचे वाचनालय अथवा मुंबईचा पेपर दुपारनंतर गावात येई याची वाट पहावी लागे. रसरंग साप्ताहिकाची आवर्जून वाट पाहिली जाई. ( झूम, चित्रानंद, मयूरपंख, लोकप्रभा, चित्ररंग खूप नंतर आले.) आणि अशातच आला शाहीर दादा कोंडके यांचा ‘सोंगाड्या ‘(songadya). पुणे शहरात हा चित्रपट १२ मार्च १९७१ रोजी प्रदर्शित झाला ( सेन्सॉर संमत झाला २४ फेब्रुवारी १९७१ रोजी) फर्स्ट शोपासूनच पब्लिक दादांच्या वेंधळेपण, हाफ पॅन्ट, भाबडेपण नि ग्रामीण ढंग यावर फिदा झाले.
त्या काळात प्रसार माध्यमे फार नव्हती तरी ‘पिक्चरची हवा पसरत असे’. मुंबई, नाशिक, कोल्हापूर, सांगली, सातारा वगैरे एकेक छोट्या मोठ्या शहरात दादांच्या कामाक्षी चित्र या वितरण संस्थेच्या वतीने गोविंद कुलकर्णी दिग्दर्शित ‘सोंगाड्या’ प्रदर्शित होत गेला आणि हाऊसफुल्ल गर्दीत एन्जाॅय केला जावू लागला. जोडीला सुपरहिट गाणी. वसंत सबनीस व जगदीश खेबूडकर आणि दादा कोंडके यांच्या गीतांना राम कदम यांचे संगीत. मळ्याच्या मळ्यामध्ये कोण ग उभी, काय ग सखू बोला दाजिबा, बिब घ्या बिब शिककाई, राया चला घोड्यावरती बसू गाणी ऐकता ऐकता केवढी तरी सुपरहिट. लहान मोठ्या वाद्यवृंदात या गाण्याना हुकमी स्थान. गावाकडचे पाहुणे अथवा नातेवाईक मुंबईकरांकडे आल्यावर गिरगावातील मॅजेस्टीक थिएटर अथवा दादरचे कोहिनूर थिएटर ( आताचे नक्षत्र) येथे त्यांना ‘सोंगाड्या ‘ दाखवायचे सामाजिक फॅड होते. पण आपल्या गावच्या थेटरात ‘सोंगाड्या ‘ कधी बरे येणार याची गावागावात प्रचंड उत्सुकता. ‘विच्छा माझी पुरी करा ‘ या लोकनाट्याच्या निमित्ताने दादा कोंडके यांनी जणू महाराष्ट्र पिंजून काढला होता. चित्रपटाची प्रिंट गावात पोहचणे तुलनेत सोपे. पण त्या काळात आपल्या चित्रपटाच्या अधिक प्रिंट काढणे निर्मात्याला परवडत नसे. त्यापेक्षा एका गावातून दुसर्या गावात प्रिंटचा प्रवास सोयीचा वाटे.
मी अगदी लहानपणी गिरगावातील मॅजेस्टीक थिएटरमध्ये सहकुटुंब ‘सोंगाड्या'(songadya) एन्जाॅय केला. त्या काळात बहुचर्चित चित्रपट पाह्यला सगळे कुटुंब एकत्र जाई. गावागावात सोंगाड्या पोहोचण्यापूर्वी त्याची गाणी जत्रांपासून गुणगुण्यापर्यंत लोकप्रिय होती. दादांचा पहिला चित्रपट भालजी पेंढारकर दिग्दर्शित ‘तांबडी माती ‘ ( १९६९) फारसा चांगला नव्हता. आशा काळे यांचाही हा पहिलाच चित्रपट. ‘सोंगाड्या’ची बातच वेगळी. त्याच्या गाण्यांमुळे दूरवर चित्रपट पोहचला होता पण आता आता हा पिक्चर पाहायचा होता.
अलिबाग तालुक्यातील थेरोंडा फाट्याजवळ गणेश चित्र मंदिर नावाचे अतिशय जुने थिएटर होते. स्टाॅल पन्नास पैसे ( हात नसलेली बाकडी), अप्पर स्टाॅल पंचाहत्तर पैसे ( हात असलेली बाकडी) आणि अगदी मागे सुशोभित खुर्ची सव्वा रुपया तिकीट. गावाकडच्या थेटरात चित्रपट प्रदर्शित होण्याचा हुकमी वार नाही. पुढचा चित्रपट आला की आताचा पिक्चरची प्रिंट पुढच्या गावाला निघे. चित्रपटाच्या प्रिंटचा प्रवासही रंजक. या मनोरंजन क्षेत्राची तेव्हाची वेगळी ओळख देणारा.
अशातच गावातील पाठारे क्षत्रिय समाजाच्या वतीने आमच्या गावातील गणेश टाॅकीजला ‘सोंगाड्या ‘ आणला, नेहमी दिवसा दोन खेळ असलेल्या या थिएटरला आता चक्क ‘सोंगाड्या ‘चे तीन खेळ आणि मुरुडपासून अलिबागपर्यंतचे पब्लिक सायकल, स्कूटर, घोडागाडी, बैलगाडी , टेम्पो अशा वाहनाने ‘सोंगाड्या’ (songadya) एन्जाॅय करायला, दादा कोंडके यांच्या इनोदाला मनापासून उत्फूर्त दाद द्यायला, जवळपास प्रत्येक गाण्याला मनसोक्त टाळ्या शिट्ट्या वाजवायला येऊ लागले. असे पिक्चर एकदा पाहून मन भरत नसे. थिएटरसमोरच्या शेतात बैलगाडी सोडून ठेवली जाई. तोपर्यंत रिक्षा अथवा टमटम गावात आली नव्हती. अगदी अलिबागला चित्रपट थिएटर नव्हते. महेश चित्रमंदिर १९७३ च्या दिवाळीत ‘बाॅबी’ने सुरु झाले.
आजूबाजूच्या गावात ‘सोंगाड्या’ (songadya) न पाहणारा प्रेक्षक शिल्लक राहिला नाही. आणि त्यावर चौकी, पारा, फाटा अशा ठिकाणी गप्पांचा फड जमवला नाही असे कोणी राहिले नाही. दादांचे वेंधळेपण आणि बोलण्याची शैली यावर फार बोलले गेले. निळू फुले यांचे निस्सीम भक्त त्यांच्या बाजूने हिरीरीने बोलत. दादा कोंडके आणि उषा चव्हाण जोडीला जणू धर्मेंद्र आणि हेमा मालिनी जोडीची सर असं प्रेमाने म्हटलं जाई. अधूनमधून ते वेगळे होत आणि अन्य एकाद्या अभिनेत्रीला दादांची नायिका बनण्याचा मौका मिळे. त्यात तीही खुश.
=========
हे देखील वाचा : अस्वस्थ करणारा चित्रपट ‘दो बिघा जमीन’
=========
गावातून पिक्चर गेला तरी अनेक वर्ष गप्पांसाठी ‘सोंगाड्या’ (songadya) होत्या. दादांचे मग एकटा जीव सदाशिव, आंधळा मारतो डोळा, पांडू हवालदार, तुमचं आमचं जमलं वगैरे चित्रपट कधी गावाकडच्या थिएटरला येत, कधी अलिबागच्या महेश आणि मग मेघा चित्रमंदिर या थिएटरला येत. आणखीन हमखास हाऊसफुल्ल गर्दीत ते एन्जाॅय केले जात. कारण दादा कोंडके हुकमी क्राऊड पुलर.
कालांतराने आमच्या गावातील गणेश चित्रमंदिर बंद पडले. आता तर कोणत्याच खाणाखुणा शिल्लक नाहीत. अशातच अनेक वर्षांनी एका गावात सत्यनारायण पूजेनिमित्त ‘सोंगाड्या ‘चा शो आयोजित केला. महिनाभर अगोदरच गावागावात तसे फलक लागले आणि पुन्हा एकदा पडद्याच्या दोन्ही बाजूला अक्षरश: प्रचंड गर्दी. टाळ्या, शिट्यांचा अखंड प्रचंड वर्षाव. अधिकृत मध्यंतरसह रिळ प्रोजेक्शनवर चढवायची आणखीन दोन मध्यंतरे. तरी पब्लिक सिनेमात रमलेला. आजूबाजूस चणे शेंगदाणे, वडापाव, उसाचे तुकडे विकणारे केवढे तरी. रात्री दहानंतर सुरु झालेला ‘सोंगाड्या'(songadya).उशिरापर्यंत चालला आणि संपल्यावर सायकल, स्कूटर, बैलगाडीतून घराकडे निघताना डोक्यात आणि डोक्यावर ‘सोंगाड्या ‘. पुढचे अनेक दिवस नाका, सलून येथे ‘सोंगाड्या’तील एकेका दृश्य, दादांच्या हाफ पॅन्टची नाडी, गाणी व संवादांवर न संपणारी चर्चा.
‘सोंगाड्या’ने अक्षरश: समाज ढवळून काढला. त्याच्या पुणे शहरातील प्रदर्शनास त्रेपन्न वर्ष पूर्ण होत असताना हे सगळेच सांगावेसे वाटले.
म्हटलं ना, ते दिवसच वेगळे होते. आठवणीत रहावेत असेच.