ऋतुजा बागवेला मिळाला मानाचा उस्ताद बिस्मिल्लाह खाँ युवा पुरस्कार
देवदासला २२ वर्ष पूर्ण !
बरोब्बर बारा वर्षांपूर्वी म्हणजे २००२ सालच्या एका दिवाळी अंकात संजय लीला भन्साली दिग्दर्शित “देवदास” ( मुंबईत रिलीज १२ जुलै २००२) वर भला मोठा “फोकस” टाकलेल्या लेखाचे ठळक शीर्षक होते, “देवढास!“. यातूनच स्पष्ट झाले की, लेखकाला या चित्रपटात कथेचा आत्मा, पटकथेची बांधणी, साहित्यिक मूल्य, कलात्मकता असे काहीही न दिसता (कारण ते या चित्रपटात नव्हतेच) फक्त आणि फक्त चकाचक महागडे देखणे सेटस (जे पोस्टरपासूनच दिसत होते), आकर्षक, बहारदार गीत संगीत व नृत्य, पूर्वप्रसिध्दीचा अफाट दणका (मिडिया हाईप) हेच दिसले…. त्याची दृष्टी वेगळी. त्याचा “देवदास” वेगळा.
“देवदास”च्या (Devdas) प्रदर्शनास बावीस वर्ष झाली देखिल, तरी “देवदास” म्हणताक्षणीच त्याची झळाळी, त्याचं ग्लॅमर, डोला रे डोला रे धमाकेदार गाण्यावरील माधुरी दीक्षित व ऐश्वर्या राय यांचे बहारदार नृत्य चापल्य, शाहरुख खानचा स्टारडम, त्याची शैली, भव्य दिव्य सेटच्या खर्चाचे आकडे, निर्मितीच्या बजेटचे भले मोठे आकडे, कमालीचा मिडिया हाईप, हाऊसफुल्ल गर्दीचे कौतुक हेच डोळ्यासमोर येते.
चित्रपटातील तरलता आठवत नाही. बरं या “चित्रपटाची गोष्ट” पुन्हा वेगळी सांगायलाच नको. देवदास (शाहरुख खान) आणि पार्वती अर्थात पारो (ऐश्वर्या राय) यांच्या प्रेमाला तीव्र विरोध होतो म्हणून देवदास दारुच्या आहारी जातो, त्यातच त्याची भेट चुन्नीलाल (जॅकी श्राॅफ)शी होते, हा चुन्नीलाल देवदासला चंद्रमुखीच्या (माधुरी दीक्षित) कोठ्यावर नेतो. तिच्या गीत संगीत व नृत्यात “देवदास” (Devdas) आपलं दु:ख विसरण्याचा प्रयत्न करतो….
शरदचंद्र चॅटर्जी यांची “देवदास” (Devdas) ही बंगाली साहित्यकृती. त्यात भरपूर नाट्य आहे. मूकपटाच्या काळात पहिला “देवदास” (१९२८) सर्वप्रथम पडद्यावर आला. कोलकात्याच्या ईस्टर्न फिल्म सिंडिकेट या कंपनीच्या वतीने हा चित्रपट निर्माण झाला. नरेश मित्रा त्याचे दिग्दर्शक होते. तर फणींद्रनाथ बर्मन “देवदास” होते, तर निनकौरी पारो तर निहार बाला चंद्रमुखी होती. याला ९६ वर्ष पूर्ण झाली देखिल.
तेव्हापासून आजतागायत भारत व पाकिस्तान असे दोन्हीकडून मिळून “देवदास”वर बावीस चित्रपट आले. एकाच विषयावर इतके चित्रपट हा नक्कीच कधीच न मोडला जाणारा विक्रम असावा. हिंदी, बंगाली, उर्दू, तमिळ अशा विविध भाषेत “देवदास” (Devdas) पडद्यावर आला. काही वर्षापूर्वी मराठीत ही घोषणा झाली. पुढे काहीच झाले नाही. पडद्यावर न आलेले मराठी चित्रपट हा एक वेगळाच विषय.
हिंदीत सर्वप्रथम १९३२ साली एकाच वेळेस हिंदी व बंगालीत न्यू थिएटर्स (कोलकत्ता) यांनी “देवदास” (Devdas) पडद्यावर आणला. बंगालीत बारुआ तर हिंदीत कुंदनलाल सैगल यांनी शीर्षक भूमिका साकारली. जमुनाने पारो तर राजकुमारीने चंद्रमुखी साकारलीय. त्या काळातील संथगतीत हा “देवदास” दिसतो .
दिग्दर्शक बिमल रॉय यांचा “देवदास” (Devdas) (१९५६) गाजला. दिलीप कुमारचा सखोल ह्रदयस्पर्शी अभिनय आणि दर्दभरी संवादफेक यावर तात्कालिक चित्रपट समीक्षक व रसिक फिदा झाले. मै तुम्हे पहचान न सका लेकिन तुम्हारी सेवा को जान गया था…. देवदास चंद्रमुखीला ज्या पध्दतीने बोलतो ते थेटरातील अंधारात ऐकताना प्रेक्षकांना कापरं भरे असे खूप मागील पिढी सांगत असे. सुचित्रा सेनने पारो तर वैजयंतीमालाने चंद्रमुखी साकारलीय.
संजय लीला भन्सालीचा “देवदास” (Devdas) घोषणेपासूनच गाजला. शाहरुख खानवर दिलीप कुमारचा विलक्षण प्रभाव आहे (पण नक्कल करत नाही) ही गोष्ट कायमच चर्चेत असल्यानेच दिलीप कुमारच्या सर्वोत्तम भूमिकांतून एक “देवदास” शाहरुख साकारणार या दृष्टिकोनातून याकडे पाहिले गेले. आपणास “देवदास” साकारायला नक्कीच आवडेल असे मनोज वाजपेयी एका मुलाखतीत म्हणाला तर होता. पण त्याला चुन्नीलालची भूमिका ऑफर झाली. अर्थात त्याचा नकार. गोविंदालाही ही भूमिका दुय्यम वाटली. जॅकी श्राॅफ असे कसलेही नखरे करत नाही.
स्मिता जयकर (कौशल्या मुखर्जी), मिलिंद गुणाजी (काली बाबू) यांच्यासह मनोज जोशी, किरण खेर, अन्यना खरे, दिना पाठक, विजयेंद्र घाटगे घाटगे इत्यादींच्या प्रमुख भूमिका. निर्माता भरत शहा हा त्या काळातील सर्वात मोठा फायनान्सर म्हणून ओळखला जाई. असा थैली मोकळी ठेवणारा निर्माता व प्रत्येक गोष्टीत बारकाईने लक्ष देणारा दिग्दर्शक संजय लीला भन्साली असा योग म्हणजे पडद्याभरचे मनोरंजन याची हमी. एका दिवसाचा शूटिंगचा खर्च सात लाख रुपये होता.
महालांच्या भव्य दिमाखदार सेटसाठीची कला दिग्दर्शक नितिन चंद्रकांत देसाईची मेहनत या चित्रपटाची ठळक ओळख ठरली. सेटवर अडिच हजार लाईट्स, सातशे लाईटमन, बेचाळीस जनरेटर, तीस लाख वाॅट पाॅवर सप्लायर्स असा महाप्रचंड तामझाम. चंद्रमुखीचा कोठाचा सेट बारा लाखाचा. पारोचा महलचा सेट तीन कोटीचा. (हे देखणे सेट पाहण्यासाठीच काहींनी हा चित्रपट पाहिला असावा), काहे छेड छेड मोहे या गाण्यासाठीचा चंद्रमुखीचा लेहंगा तीस किलोचा होता. संदीप घोसला फॅशन डिझायनर होता. ऐश्वर्य राॅयची ड्रेस डिझायनर नीता लुल्ला होती. ऐश्वर्यासाठी कोलकात्याहून चक्क सहाशे बंगाली साड्या आणल्या. या गोष्टींची अशी काही रंगवून खुलवून वाढवून चर्चा झाली की जणू हेच पाह्यला प्रेक्षक येणार आहेत.
चित्रपट पूर्ण होत असतानाच त्याच्या गाण्याची तबकडी व ध्वनिफीत मार्केटमध्ये येताच गाणी लोकप्रिय. इतकी की प्लॅटिनम डिस्क मिळण्या इतपत त्याची विक्री कधी झाली हे समजलेच नाही. लोकप्रिय गाण्यांमुळे चित्रपटाची हवा आपोआप वाढत वाढत जाते. नुसरत बद्र यांच्या गीतांना ईस्माईल दरबारचे संगीत. सिलसिला यह चाहत का (पार्श्वगायिका श्रेया घोषाल), मार डाला (कविता कृष्णमूर्ती), बैरी पिया (श्रेया घोषाल व उदीत नारायण), छलक छलक (उदीत नारायण, विनोद राठोड, श्रेया घोषाल), हमेशा तुमको चाहा (कविता कृष्णमूर्ती व उदीत नारायण), वो चांद जैसी लडकी (उदीत नारायण), डोला रे डोला (श्रेया घोषाल व कविता कृष्णमूर्ती) तसेच काहे छेड…हे गाणे बिरजू महाराज यांचे असून ते कविता कृष्णमूर्तीनी गायलेय. गीत संगीत नृत्य या चित्रपटाची जान आहे, ओळख आहे. पण चित्रपटाचा आशय एका निस्सीम प्रेमाची शोकांतिका आहे. ती पातळ झाली. पारो आणि चंद्रमुखी डोला रे डोला नाचतात ही गोष्ट व्यावसायिक गणित, अर्थात जमलेले.
हा चित्रपट एकाच वेळेस हिंदीसह इंग्रजी, गुजराती, फ्रान्सिस, थाई, पंजाबी अशा अनेक भाषेत डब करीत जगभरातील अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहचला. चित्रपटाचे लेखन प्रकाश कापडिया व संजय लीला भन्साली यांचे. कला दिग्दर्शन नितिन चंद्रकांत देसाई यांचे, छायाचित्रकार बिनोद प्रधान, संकलन बेला सहगल यांचे… संवाद हमखास टाळी घेणारे, प्यार का कारोबार तो बहुत बार किया है, मगर प्यार सिर्फ एक बार….
========
हे देखील वाचा : एक वर्ष झाले तरी ‘बाईपण भारी देवा’ची सक्सेस स्टोरी सुरुच….
========
मेकिंगमध्ये कशा कशाचीही कमतरता नव्हती. चित्रपट प्रदर्शित होण्याअगोदर मुंबईतील आम्हा काही सिनेपत्रकारांना ही सगळी गाणी परेल येथील राजकमल कलामंदिर स्टुडिओतील मिनी थिएटरमध्ये दाखवण्यात आली तेव्हा भपकेबाज लूक थक्क करुन टाकणारा वाटला. अतिशय दणकेबाज पूर्वप्रसिध्दीने “देवदास” प्रदर्शित झाला. मुंबईत मेन थिएटर न्यू एक्सलसियर होते… एकदा पाह्यला हरकत नाही. एकदाच पाहण्यासारखा आहे ही प्रतिक्रिया खरी होती. पण शाहरुख खानचे फॅन्स पुन्हा पुन्हा “देवदास” (Devdas) पाह्यला गेले… आणि डायलॉगबाजीवर फिदा झाले, कौन कंबख्त बर्दाश्त करने को पिता है, हम तो पीते है कि यहां पर बैठ सके, तुम्हे देख सके, तुमे बर्दाश्त कर सके….
अनुराग कश्यप लिखित व दिग्दर्शित “देव डी” ( २००९ ), सुधीर मिश्रा दिग्दर्शित “दास देव” ( २०१८) हे “देवदास”ला वेगळ्या पठडीत पडद्यावर घेऊन आले. प्रत्येकाचा “देवदास” (Devdas) वेगळा म्हणावा. “देवदास” एक दर्जेदार साहित्यकृती, त्यावर आधारित चित्रपट निर्माण होण्याची उर्मी व इच्छा स्वाभाविकच. आपण चित्रपट एन्जाॅय केलाय आणि आजच्या डिजिटल युगात तो यूट्युबवर पाहता येतोय. शाहरुख खानच्या चाहत्यांना या चित्रपटाचे विशेष कौतुक…