त्या दिवशी मन्नाडे, गायिका कविता कृष्णमूर्ती वर कां इतके संतापले?
आयुष्यात आलेला प्रत्येक प्रसंग कळत नकळतपणे काहीतरी शिकवून जात असतो. प्रसंगाप्रमाणे आयुष्यात आलेली प्रत्येक व्यक्ती देखील तुम्हाला शिकवून जात असते. कलावंतांच्या बाबतीत तर हे हमखास घडते. ज्या सच्चा गुरु ने तुम्हाला काही ज्ञान दिलेले असते त्या गुरूला आपल्या शिष्याचे कान धरण्याचा देखील तितकाच अधिकार असतो. गुरु शिष्य हे नातं आयुष्यभरासाठी असते. ख्यातनाम गायिका कविता कृष्णमूर्ती यांना हा अनुभव आला होता. कविताचे वडील भारतीय प्रशासनात मोठे अधिकारी होते. तिचा जन्म जरी तमिळ कुटुंबात झाला असला तरी तिचं सर्व शिक्षण आणि बालपण दिल्ली आणि मुंबई या मेट्रो सिटी मध्ये गेलं. तिची एक मैत्रीण होती सुमिता नावाची. दोघींचं छान जमायचं. ज्यावेळी कविताला कळाले की, सुमिताची वडील प्रख्यात गायक आहेत तेव्हा कविताने आपल्या वडिलांकडे हट्ट धरला तुम्ही कृपया त्यांना मला गाणं शिकवायला सांगा. कविता कृष्णमूर्तीचे वडील त्या प्रख्यात पार्श्वगायकाच्या घरी गेले. चांगले स्वागत झाले पण त्यांनी शिकवण्याची असमर्थता दर्शवली. त्यावर कविता खूप रडवेली झाली. तिच्या डोळ्यातील अश्रू पाहून त्या पार्श्वगायकाने तिला जवळ घेतले आणि गायला सांगितले. जे थोडं बहुत तिला शिक्षण मिळालं होतं. तिथे तिने गाऊन दाखवलं. तिचे सूर स्वच्छ होते, सच्चे होते. तिचं जर चांगलं ग्रुमिंग झालं तर ती नक्की चांगल्या पद्धतीने जाऊ शकेल याची त्यांना खात्री वाटली. आणि त्यांनी तिला गाणं शिकवण्याचे ठरवले. ते पार्श्वगायक होते मन्नाडे. अशा पद्धतीने मन्नाडे आणि कविता कृष्णमूर्ती यांच गुरु शिष्याचे नातं झालं आणि मन्नादा तिला गाण्याची शिकवणी देऊ लागते.
हळूहळू कविता कार्यक्रमातून, मैफिलीतून , जिंगल्स मधून गावू लागली. दूरदर्शनवर देखील ती दिसू लागली नंतर तिचा चित्रपटात प्रवेश झाला. मन्नाडे यांना खूप आनंद झाला. आपली शिष्या चांगल्या पद्धतीने गाते आहे हे ऐकून ते खुश झाले. एकदा मन्ना डे आपल्या पत्नीसोबत बरीच वर्षे मुंबईच्या बाहेर होते. ज्यावेळी ते मुंबईला परत आले तेव्हा कविता त्यांना भेटायला गेली. आणि मोठ्या उत्साहाने ती त्यांना सांगू लागली,” दादा, माझे एक गाणे सध्या प्रचंड लोकप्रिय होत आहे. तुम्ही ते गाणे ऐकले? दादा तुमच्या आशीर्वादाने हे सर्व घडते आहे. तुम्ही शिकवलेल्या ज्ञानातूनच मी आज हे गाणे गाऊ शकले आहे.” त्यावर दादा म्हणाले,” बेटा मी मुंबईच्या बाहेर होतो . मला कल्पना नाही गाणे कोणते आहे आणि चित्रपट कोणता आहे.” त्यावर कविताने सांगितले,” हा चित्रपट राजीव रॉय यांनी दिग्दर्शित केलेला असून ‘मोहरा’ या चित्रपटातील हे गाणे आहे. गाण्याचे बोल आहेत ‘तू चीज बडी है मस्त मस्त’.”असे सांगून तिने त्या ओळी गुणगुणून दाखवायला सुरुवात केली. गाणे संपेपर्यंत मन्ना डे यांचा चेहरा कृध्द झाला. त्यांनी कविता कृष्णमूर्तीला तिथल्या तिथे प्रचंड फायर केले. ते म्हणाले,” तुला लाज कशी वाटली नाही अशा प्रकारचे गाणे गायला? आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये स्त्री काही उपभोगाची वस्तू आहे का? आणि तू खुशाल अशा प्रकारचे घाणेरडे गाणे गाऊन बसलीस! आणि एक लक्षात ठेव. तुला हे असलं मी काहीच शिकवलेलं नाही. त्यामुळे कृपया याच्यापुढे मी तुला गाण्याचे शिक्षण दिले हे सांगणं बंद कर. असले गाणे गायचे शिक्षण मी तुला कधीच दिलेलं नाही!” मन्नाडे त्यादिवशी ताड ताड ताड बोलत गेले. कविता कृष्णमूर्ती रडायला लागली. प्रसंग मोठा बाका होता. खाली मान घालून लज्जित कविता कृष्णमूर्ती घरातून निघून गेली.
=======
हे देखील वाचा : अभिनेता गोविंदाला ऑफिसमध्ये कुणी आणि का कोंडून ठेवले होते?
=======
ती गेल्यानंतर मन्नाडे यांच्या पत्नीने त्यांना समजावले ,”पोरीला इतके रागवायची काही गरज होती का? किती रडत होती बिचारी पोर.” मन्नाडे यांना देखील नंतर रियलाइज झाले की आपण जरा जास्तच रागात तिच्याशी बोललो. तिकडे घरी जाताना कविता देखील विचार करू लागली ,”दादांचे तरी काय चुकले? त्यांनी असे गाणे आपल्याला कुठे शिकवले ?” रात्री मन्नाडे यांनी उशिरा कविता ला फोन केला. आणि म्हणाले,” बेटा…” बेटा शब्द ऐकल्यानंतर त्यांना मोठा हुंदका ऐकू आला. कविता फोनवरच पुन्हा धाय मोकलून रडू लागली. म्हणाली “दादा माझे चुकले. मी यापुढे असले गाणे गाणार नाही!” मन्ना डे म्हणाले,” बेटा, उद्या भेटायला येशील?” त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी कविता कृष्णमूर्ती मन्ना डे यांच्या घरी गेली. मन्ना डे यांच्या कुशीत शिरून ती रड रड रडली. मन्ना तिच्या केसावरून हात फिरवत होते आणि मायेने तिला समजून सांगत होते,” माझे देखील चुकलंच मी इतक्या कडवटपणे तुला रागवायला नको होतं. अब बुढा हो गया हू. मुझे कुछ समझ मे नही आया.जी में आय वो बक दिया!” दोघांच्याही डोळ्यातून अश्रूंचा अभिषेक होत होता. दोघांच्याही मनातील किल्मिष, मळव अश्रूंच्या त्या अभिषेकात वाहून गेले. पुन्हा लक्ख वातावरण झालं. कविताने दादांना आश्वासन दिले,” यापुढे मी कायम गाण्यातील भाव आणि शब्द यांच्याकडे लक्ष देईल आणि तुम्हाला मान खाली घालावी लागेल असं कुठलंही गाणं मी गाणार नाही!” कविता कृष्णमूर्तीने दादांना दिलेलं वचन तत्वतः पाळले. आणि तिने स्वतःवर मर्यादा घालून घेतल्या.
धनंजय कुलकर्णी