फ्लॅशबॅक गिरगावातील ‘सेन्ट्रल प्लाझा ‘ थिएटरचा
‘गाठ पडली ठका ठका ” ( १९५६) या अगदी सुरुवातीच्या काळातील चित्रपटाच्या वेळची जयश्री गडकर यांनी आपल्या ‘अशी मी जयश्री ‘ या चरित्रात सांगितलेली सेन्ट्रल थिएटरची आपली आठवण..या चित्रपटाच्या प्रीमियरला पंधरा दिवस राहिले असताना आपल्या मैत्रीणींवर भाव मारावा म्हणून आपल्या राममोहन शाळेतील मैत्रीणीना घेऊन जयश्री गडकर मधल्या सुट्टीत आपले या चित्रपटातील फोटो दाखवण्यासाठी घेऊन गेल्या ( हा चित्रपट निर्माण होईपर्यंत जयश्री गडकर शालेय वयात होत्या).
सगळ्या जणी शाळेच्या युनिफॉर्ममध्ये असल्या तरी जयश्री गडकर यांना विश्वास होता की त्या या चित्रपटाच्या नायिका असल्याने त्यांना ओळखले जाऊन सोडले जाईल. पण झाले उलटेच. त्या शाळेच्या ड्रेसमध्ये असल्याने त्याने या सगळ्या जणीना साॅलीड दम भरला… प्रत्यक्षात प्रीमियरच्या दिवशी तर सकाळपासूनच जयश्रीजींची धकधक वाढत गेली.
आई वडिल त्यांना समजवत होते तरी प्रेक्षक आपल्याला कसे स्वीकारतील याची त्यांना धाकधूक होती. खरं तर सेन्ट्रल सिनेमा त्यांच्या घरापासून अवघ्या पाच सात मिनिटावर, पण आपण अभिनेत्री आहोत म्हणून त्या गाडीने गेल्या आणि बाल्कनीतून जेव्हा त्यानी पडद्यावर पहिल्यांदा आपले नाव वाचले तेव्हा त्यांच्या अंगावर रोमांच उभे राहिले.
गिरगावातील मूळचे सेन्ट्रल आणि नंतरचे नाव बदलेलेले सेन्ट्रल प्लाझा थिएटर बंदच्या बातमीने जयश्री गडकर यांची ही गोष्ट आठवली. याच सेन्ट्रल सिनेमासमोर सुंदर भवन ( पूर्वीची रामचंद्र बिल्डिंग) मध्ये जितेंद्र राह्यचा. गिरगावातच राजेश खन्ना, सीमा देव, गणेश सोळंकी, लक्ष्मीकांत बेर्डे, विजय पाटकर, जयवंत वाडकर असे अनेक कलाकार लहानाचे मोठे होताना त्यांनी याच सेन्ट्रलमध्ये अनेक चित्रपट पाहिले आणि कालांतराने त्यांचेच चित्रपट तेथे रिलीज झाले. जितेंद्रचे हमजोली, हिम्मतवाला, मक्सद अशा अनेक चित्रपटांनी येथे रौप्यमहोत्सवी यश संपादले.
मीही याच गिरगावात लहानपणापासून सेन्ट्रलची विलक्षण ओढ आणि सवय. सत्तरच्या दशकात मॅटीनी शोला स्टाॅल तिकीट एक रुपया पाच पैसे होते आणि बरेच जुने चित्रपट तेथे पाह्यला मिळाले. देव आनंद, शम्मी कपूर, त्याचप्रमाणे जुने संगीतमय रहस्यपट मॅटीनी शोला रिलीज होत. तर ‘दिवसा तीन खेळ ‘ याप्रमाणे मराठी ( अष्टविनायक , भालू येथेच हिट) आणि हिंदी चित्रपट ( आणि कालांतराने चक्क गुजराती चित्रपट, तोपर्यंत गिरगावातील मराठीपण घसरले ) येथे रिलीज होत. फार पूर्वी रविवारी सकाळी संताजी धनाजी, श्यामची आई अशा आदर्शवादी चित्रपटाचे शो असत. सत्तरच्या दशकात डेली शोचे तिकीट स्टाॅल तिकीट एक रुपया पासष्ट पैसे, अप्पर स्टाॅल दोन रुपये वीस पैसे तर बाल्कनी तीन रुपये तीस पैसे असे होते आणि खिशात मोजून स्टाॅलच्या तिकीटासाठी चिल्लर असे. ती मुठीत पकडून छोट्या खिडकीतून आत टाकून तिकीट मिळवण्यात थ्रील असे. गोरेगावकर लेनच्या बाजूने ही स्टाॅलच्या तिकीटाची करंट बुकिंगसाठी रांग लागे.
आजूबाजूला मराठी वस्ती असल्याने येथे सातत्याने मराठी चित्रपट येत. व्ही. शांताराम दिग्दर्शित ‘पिंजरा ‘ने पंचवीस आठवडे मुक्काम केला. दादा कोंडके यांच्या ‘एकटा जीव सदाशिव ‘पासूनचे सर्व मराठी आणि तेरे मेरे बीच मे, आगे की सोच वगैरे हिंदी चित्रपट याच पडद्यावर. महेश कोठारेचा नायक म्हणून पहिला चित्रपट ‘प्रीत तुझी माझी ‘ येथेच तर दिग्दर्शक म्हणून ‘धूम धडाका ‘पासून सगळेच येथे रिलीज. दिग्दर्शक राजा परांजपे, अनंत माने, कमलाकर तोरणे इत्यादी दिग्दर्शकांचे अनेक मराठी चित्रपट सेन्ट्रलचे! त्यानंतर सचिन पिळगावकर, सतिश रणदिवे, पुरुषोत्तम बेर्डे वगैरेंचेही चित्रपट याच पडद्यावर. तर आहुती, वजीर, लपंडाव या मराठी चित्रपटांचे प्रीमियर येथेच अनुभवले. सेन्ट्रलला हिंदी चित्रपटही यश मिळवत. प्यार का मौसम, परवरीश, चाचा भतिजा येथेच ज्युबिली हिट.
तसेच अमिताभचा ‘संजोग ‘ , संजीवकुमार राखीचा पारस, अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित यांच्या बटाटा वडा गाणे असलेला ‘हिफाजत ‘ असे अनेक चित्रपट येथे रिलीज झाले. तुलसी विवाह, अलख निरंजन वगैरे पौराणिक चित्रपटही येथेच. ‘तुलसी विवाह’साठी येथे शंकराची मोठी मूर्ती उभारली होती आणि मग येथेच प्रीमियर रंगला. बचपन, कहानी घर घर की, सबूत, दो हवालदार,, और कौन वगैरे वगैरे बरीच नावे घेता येतील. सगळेच चित्रपट चांगले नसतात, त्यामुळे असे अनेक चित्रपट तीन चार आठवड्यात गाशा गुंडाळत. आणि मग आम्ही गिरगावकर आता नवीन चित्रपट कोणता येतोय याची वाट पाह्यचो… एकेकाळी गिरगावात मराठी चित्रपटासाठी हुकमी असलेले मॅजेस्टिक थिएटर १९७२ साली पाडल्याने सेन्ट्रल, राॅक्सी थिएटरकडे मराठी चित्रपट वळला. मी मिडियात आल्यावर याच सेन्ट्रलमध्ये वजीरचा प्रीमियर अनुभवला.
एकीकडे मल्टीप्लेक्सचे युग आले तर दुसरीकडे मेन थिएटर ही काॅन्स्पेटच मागे पडली. इतकी की असे काही ‘मेन थिएटर ‘ खूप महत्वाचे होते हेच आजच्या ग्लोबल युगातील रसिकांना माहिती नाही. आणि त्यातच एकेक करत मुंबई तर झालेच पण एकूणच देशभरातील एकपडदा चित्रपटगृहे अर्थात सिंगल स्क्रीन थिएटर्स बंद होताना पाडलीही गेली. सत्तरच्या दशकात दूरचित्रवाणीवर जुने चित्रपट तर ऐशीच्या दशकात देशात व्हिडिओ आला आणि घरबसल्या नवीन चित्रपट पाहता येऊ लागला आणि मग प्रत्येक दशकात नवीन तंत्रज्ञान आले आणि त्याचा या जुन्या थिएटर्सना फटका वाढत गेला.
चॅनल आली, मागोमाग नवश्रीमंत वर्गात होम थिएटर सुरु झाले. असे करता करता मोबाईल स्क्रीनवर सिनेमा आला, यु ट्यूबवर वाढत गेला, ओटीटी प्लॅटफॉर्मवर अर्थात तिसरा पडदा पध्दतीने नवीन रिलीज होऊ लागले. स्थित्यंतर तर होणारच आणि अनेक जुन्या थिएटर्सवर कायमचा ‘पडदा ‘ पडणार.आणि मग राहणार फक्त आणि फक्त अशा जुन्या थिएटर्सच्या आठवणी. एकेकाळी अशा हजार बाराशे प्रेक्षकसंख्या असलेल्या थिएटरमध्ये हाऊसफुल्ल गर्दीत पिक्चर एन्जाॅय करण्याची संस्कृती हळूहळू का होईना पण मागे पडत आता कधी एकट्यानेच तर कधी कुटुंबाने आपल्याला हव्या त्या वेळी घरबसल्या चित्रपट पाहण्याची सवय वाढत जाणार असे दिसते.