ऋतुजा बागवेला मिळाला मानाचा उस्ताद बिस्मिल्लाह खाँ युवा पुरस्कार
जेव्हा सोंगाड्यालाच थिएटरमधून हाकललं जातं…
सोंगाड्या हा दादांचा पहिलावहिला सिनेमा. सूर्यकांत, चंद्रकांत यांच्यासारख्या रांगड्या नायकांचा जमाना होता. त्यात दादांसारखा साधासुधा हाफ पॅण्टवाला हिरो कसा चालणार अशी वितरकांपासून सगळ्यांना चिंता होती. जेमतेम एखादा आठवडा पिक्चर चालेल असं भाकीत होतं. पिक्चर प्रदर्शित करायला थिएटरची मारामार असताना एकदाचं थिएटर मिळालं म्हणून मुहूर्त वार काही न बघता दादांनी पिक्चर रिलीज केला. दिवस होता अमावस्येचा. आणि चित्रपट सुपरहिट झाला.
तेव्हा दादांचे नाटक विच्छा माझी पुरी करा जोरात चालू होतं. पिक्चर प्रदर्शित झाला आणि दादा नाटकाच्या दौ-यावर गेले. परतल्यावर चित्रपट जोरात सुरू असल्याची बातमी कळली. दादांना हे सगळं अकल्पनीय वाटत होतं.
दौ-यावरुन परत आल्यावर एक दोन दिवसांनी विच्छाचा प्रयोग संपताना दादांचे मोठे बंधू नाट्यगृहाजवळ आले आणि म्हणाले, “चल आपण थिएटरला जाऊन सोंगाड्या पाहू” रात्रीचे १० वाजले होते. चित्रपट ९ ला सुरू झाला होता. तरी भावाच्या आग्रहाने दादा भानुविलास थिएटरला आले. पिक्चर सुरू होतं. गेटवर कुणीच नव्हतं म्हणून थिएटरचा दरवाजा उघडून दादा आत शिरणार तोच एक डोअरकीपर तिथं आला. दादांची कॉलर धरून “विदाऊट तिकीट घुसतात साले” असे म्हणत त्याने दादांना आणि त्यांच्या भावाला बाहेर काढलं. बाहेर आल्यावर दादांच्या मोठ्या बंधुनी विचारलं, “तू सांगितलं का नाहीस? तू दादा कोंडके आहेस… या सिनेमाचा नायक!” त्यावर दादा म्हणाले,”जाऊदे नंतर येऊ. काळोखात चोरुन आत येणारा दादा कोंडके असेल यावर कोण विश्वास ठेवेल?” असे म्हणून दादा शिस्तीत बाहेर पडले.
मात्र नंतर सोंगाड्याची ज्युबिली पुण्यात जोरदार साजरी झाली त्यावेळी त्या भानुविलास थिएटरच्या डोअरकीपरचा त्यांनी आवर्जून सत्कार केला आणि भाषण करतेवेळी म्हटलं, “असे प्रामाणिक डोअरकिपर प्रत्येक थिएटरमध्ये हवेत, जे तिकिटाशिवाय प्रेक्षकांना आत सोडत नाही”.
हा प्रसंग एकूणच दादांचा साधेपणा आणि त्याचबरोबर माणसातील गुणग्राहकता दाखवणारा ठरतो. असा कलंदर नट होणे नाही.