गिरीशमुळे नसीरुद्दीन शाहांना मिळाला पहिला ब्रेक
सच्चा कलावंतांच्या काही कृती मधून त्यांचे मोठेपण अधोरेखित होत असते. अभिनेता आणि दिग्दर्शक गिरीश कर्नाड यांच्या बाबतचा हा एक खूप इंटरेस्टिंग असा किस्सा आहे. १९७३ ते १९७५ या काळामध्ये गिरीश कर्नाड पुण्याच्या फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट येथे डायरेक्टर म्हणून कार्यरत होते. याच काळात तिथे नसीरुद्दीन शाह अभिनयाचे प्रशिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी म्हणून दाखल झाला होता. खरंतर नासिर यापूर्वी दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा मधून विधिवत शिक्षण घेतले होते पण तरीही त्याने चित्रपटातील अभिनयासाठी या संस्थेत प्रवेश घेतला.
नासिर हा पहिल्यापासूनच काहीसा भडकू गरम डोक्याचा व्यक्ती होता. थोडं फार देखील मना विरुध्द घडलेलं त्याला चालत नसायचा. एफ टी आय आय मध्ये असताना डायरेक्टर साहेबांनी काढलेल्या एका परिपत्रकावरून तो प्रचंड चिडला आणि त्याने कॉलेज बंदची हाक दिली. त्याच्यासोबत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी त्याच्या या आंदोलनाला पाठिंबा दिला. एफ टी आय आय मधील सर्व कामकाज ठप्प झाले. स्वतः गिरीश कर्नाड आणि इतर प्रशासन हे आंदोलन संपवण्यासाठी प्रयत्न करत होते; परंतु नसीरुद्दीन शहा काही केल्या ते परिपत्रक मागे घेतल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही या भूमिकेवर ठाम होते. प्रशासन अक्षरश: वैतागले होते. त्यांचे दैनंदिन कामकाज देखील आता ठप्प पडले होते. ही कोंडी कशी फोडायची असा प्रश्न निर्माण झाला होता.(Naseeruddin Shah)
याच काळात श्याम बेनेगल यांनी पुण्याच्या एफटीआयला भेट दिली. गिरीश कर्नाड यांच्यासोबत ते गप्पा मारत होते. तेव्हा श्याम बेनेगल म्हणाले,” मी एक चित्रपट बनवत आहे. त्यासाठी मला कोणी चांगला अभिनय करणारा विद्यार्थी तुमच्या संस्थेत असेल तर नक्की सांगा.” त्यावर गिरीश कर्नाड म्हणाले,” आमच्याकडे नसीरुद्दीन शहा नावाचा एक चांगला अभिनय करणारा विद्यार्थी शिक्षण घेतो आहे. परंतु तो अतिशय भडक डोक्याचा आणि भांडखोर स्वभावाचा उद्धट व्यक्ती आहे.
आज या संस्थेत जे आंदोलन चालू आहे त्याचे तोच नेतृत्व करत आहे. तुमच्या रिस्क वर तुम्ही त्याची निवडा करा.” त्यावर शाम बेनेगल म्हणाले,” अरे यार , तुम्ही एकीकडे त्याला चांगला कलाकार म्हणता आणि दुसरीकडे त्याच्यावर टीका देखील करतात हे कसे काय शक्य आहे?” यावर गिरीश कर्नाड म्हणाले ,” दोन्ही ही बरोबर आहे. तुम्ही मला चांगला कलाकार कोण असे विचारले त्याचे उत्तर मी पहिल्या वाक्यात दिले. नसीरुद्दीन शहा खरोखरच चांगला कलाकार आहे. तो नक्की एक उत्तम अभिनेता होवू शकतो. पण एफ टी आय आय संस्थेचा संचालक म्हणून त्याच्या विषयीचे माझे मत मी तुम्हाला सांगितले कलाकार म्हणून तो नि:संशय चांगला आहे परंतु त्यांना ज्या पद्धतीने आता आंदोलन चालू केलेले आहे त्यावरून माझे त्याच्याविषयी हे मत झालेले आहे!” (Naseeruddin Shah)
या नंतर बेनेगल मुंबईला निघून गेले. त्यानंतर नसीरुद्दीन शाहा (Naseeruddin Shah) यांनी सुरू केलेल्या आंदोलन थांबले. त्याचा कोर्स पूर्ण झाला पण त्यापूर्वीच श्याम बेनेगल यांनी त्याला मुंबईला बोलून त्याची स्क्रीन टेस्ट घेतली आणि ‘निशांत’ या चित्रपटासाठी त्याची निवड केली. आणि तसे त्यांनी गिरीश कर्नाड यांना कळवले. गिरीश कर्नाड यांचे मोठेपण इथेच अधोरेखित होते की त्यांना त्या क्षणी त्रास होणाऱ्या व्यक्ति बद्दल देखील त्यांनी तो कलावंत म्हणून तो किती चांगला आहे हे बेनेगल यांना सांगितले आणि त्यामुळेच बेनेगल यांनी त्यांची निवड निशांत या चित्रपटासाठी केली.
गंमत म्हणजे नंतर या दोघांनी एकत्रित अनेक चित्रपटात कामे केली. निशांत, मंथन, हे राम, चायना गेट, इकबाल, पिपली लाइव्ह हे त्या दोघांचे एकत्रित सिनेमे रसिकांच्या लक्षात असतील. जाता जाता थोडंसं नसीरुद्दीन शहा यांच्या करिअरबद्दल. नासिर तीन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे मानकरी ठरले हे चित्रपट होते स्पर्श, पार आणि इकबाल. तसेच त्यांना फिल्मफेअरचे तब्बल सतरा वेळा नामांकन मिळाली आणि त्यापैकी तीन पुरस्कार (चक्र,आक्रोश आणि मासूम) त्यांना प्राप्त झाले. (Naseeruddin Shah)
===========
हे देखील वाचा : बीना रॉय : एक विसरलेली अनारकली
===========
नासिर ला भारत सरकारने पद्मश्री आणि पद्मभूषण हे सन्मान दिले. नासीरने वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी १९६९ साली त्याच्यापेक्षा तब्बल सतरा वर्षांनी मोठ्या असलेल्या एका घटस्फोटीत स्त्रीसोबत लग्न केले. तिच्यापासून त्यांना एक मुलगी देखील झाली. हे लग्न त्यांचे बारा वर्षे टिकले त्यानंतर नासिरने दिना पाठक यांची मुलगी रत्न पाठक हिच्यासोबत लग्न केले. अलीकडे मात्र नसीरुद्दीन शाह खूप वादग्रस्त विधाने करून कायम चर्चेत राहिलेला आहे.