मिलिंद गवळी यांनी त्यांच्या पोस्टमधून दिला ‘सवतीचे कुंकू’ चित्रपटाच्या आठवणींना
राहाचे डोळे पाहून आली राज कपूर यांची आठवण…
माध्यमांचा प्रचंड सुकाळ होण्यापूर्वीचे ते शांततामय दिवस. नेमके सांगायचे तर तब्बल पन्नास वर्षांपूर्वीचे ते दिवस. दररोज सकाळी पेपरवाला घरी पेपर टाकायचा तेवढंही अनेक घटनांची माहिती मिळणं पुरेसे होतं. ज्ञान प्राप्त होत होते. मध्यमवर्गीय महाराष्ट्रीय कुटुंबात दररोज फक्त एकच वृत्तपत्र येई. गिरगावातील खोताची वाडीतील आमच्या घरी लोकसत्ता येई. मुंबईत २ ऑक्टोबर १९७२ रोजी दूरदर्शन आले तरी बराच काळ दूरचित्रवाणी संच मात्र गल्लीतील चार सहा बिल्डिंगमध्ये कोणा एकाकडेच असे. तो वेगळा सामाजिक, सांस्कृतिक वातावरणातील विषय. माझे ते अगदी शालेय वय. हाफ पॅन्टमधलं. सणासुदीलाच गोडधोड खाण्याचे.(Raha kappor)
वाचनालयात नाव नोंदवून साप्ताहिके, मासिके, पुस्तके, दिवाळीत अंक वाचायला घरी आणणे ही रुजलेली, मनावर ठसलेली संस्कृती.
या सगळ्यातून चित्रपटविषयक वाचायला ते काय मिळे? वृत्तपत्रातील शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या नवीन चित्रपटाची समिक्षा, काही बातम्या, रविवारी एकादा लेख आणि रसरंग साप्ताहिकातून प्रामुख्याने मराठी चित्रपटविषयक मजकूर आणि जुन्या चित्रपटांवर फ्लॅशबॅक वगैरे बरेच काही. तेवढंही पुरेसे होते हो. लेखनही चांगले असे. मराठीत त्या काळात गाॅसिप्स जवळपास प्रसिद्ध होत नसे आणि खमंग गाॅसिप्स प्रसिद्ध करणारी ग्लाॅसी पेपरवरील मॅगझिन संस्कारक्षम मराठी कुटुंबाच्या घरात आणली जात नसत…शेजाऱ्यांना कळले तर? ही भीती. चाळीतील आयुष्यच वेगळे होते. ( आजही असेल. )
हे आजच का सांगतोय?
त्याला कारण ‘राहा कपूर’ हिचं सोमवारी सोशल मिडियातून झालेले दर्शन. रणबीर कपूर व आलिया हे राहाला घेऊन आलेत हे पाप्पाराझीना समजताच ते फ्लॅश रेडी करुन सज्ज झाले. रणबीरने अगोदर बाहेर येऊन पाप्पाराझीना अतिशय नम्रपणे सांगितले, घाई करु नका. राहाला घेऊन येतो. तसा तो व आलिया ख्रिसमस मूडमध्ये राहाला घेऊन आले. कोणी व्हिडिओ काढला, कोणी रिल तर कोणी फोटो. आणि जणू क्षणभरात ते अनेकांनी मोबाईलवर पाहिलेही. किती वेगात घडले हो. जणू लाईव्ह अनुभव. राहाचे निळे डोळे पाहून अनेकांना तिच्या आजोबांची अर्थात राज कपूरची आठवण आली. “राज कपूर नीली नीली ऑखो वाला” म्हणून या शोमनची ती वेगळी ओळख.(Raha kappor)
आज माध्यमांचा प्रचंड सुकाळ असल्याने समाजातील सर्व स्तरातील चित्रपट रसिकांना राहा कपूर कशी दिसते हे पटकन दिसले. पण पन्नास वर्षांपूर्वी काय? मला आठवतय, ‘मेरा नाम जोकर’ (१९७०) नंतर राज कपूर ऋषि कपूरला घेऊन ‘बाॅबी’ चित्रपट निर्माण करतोय हे रसरंग साप्ताहिकातून वसंत साठे यांच्या लेखातून समजले. तेच ‘बाॅबी’चे पटकथा लेखक.(Raha kappor)
‘मेरा नाम जोकर ‘मध्ये त्याने शालेय वयातील राज कपूर साकारलाय हेही समजले पण ‘जोकर’ व्यावसायिकदृष्ट्या फ्लाॅप ठरल्याने चित्रपटगृहातून लवकरच उतरला. ते दिवस ‘आपण कोणता चित्रपट पाह्यचा ‘ याची कुटुंबात एकत्र चर्चा होई. आणि महिन्यात एक चित्रपट सहकुटुंब पाहिला जाई. आज सिनेमाच हाती आलाय आणि त्यावर हल्ली सोशल मिडियात बोललं जाते. (Raha kappor)
असो. तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल, ‘बाॅबी ‘ प्रदर्शनास सज्ज झाला, २८ सप्टेंबर १९७३रोजी तो झळकणार हे घरी येत असलेल्या लोकसत्तात शरद गुर्जर यांच्या चित्ररंग सदरात प्रसिद्ध झाले तेव्हा पहिल्यांदाच ऋषि कपूर कसा दिसतो हे समजले. या तुलनेत आजची पिढी नशीबवान. ( मी मिडियात आल्यावर शरद गुर्जर यांच्याशी माझे अतिशय चांगले नाते निर्माण झाल्यावर त्यांना ही गोष्ट आवर्जून सांगताच ते छान हसले. ) तेव्हा रसरंग साप्ताहिकातून ऋषि कपूर अर्थात चिंटू व डिंपल कापडिया यांचा फोटो पहिल्यांदा पाहिला. नंतर लोकसत्तातही यांचा आणखीन एक रोमॅन्टिक फोटो पाहत असतानाच आपल्याला कोणी बघत नाहीत ना याची खात्री केली. त्या काळात घरी स्क्रीन अथवा सिने ॲडव्हान्स साप्ताहिक घरी येत असते तर ‘बाॅबी’च्या मुहूर्ताच्या फोटोतच हे दिसले असते. ‘बाॅबी’चा मुहूर्त शैलेंद्र सिंगच्या आवाजातील मै शायर तो नहीं या गाण्याच्या मेहबूब स्टुडिओतील रेकॉर्डिंगने झाला. गंमत म्हणजे, या गाण्यासंदर्भात राज कपूरला भेटेपर्यंत गीतकार आनंद बक्षी आणि संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल यांना ‘बाॅबी’ हे नाव मुलाचे की मुलीचे हेच माहीत नव्हते, हा किस्सा खूपच गाजला. संगीतकार लक्ष्मीकांत यांनीही मला तो सांगितला.
==========
हे देखील वाचा : महेश भट्टचा हा आहे सर्वोत्तम चित्रपट
==========
पन्नास वर्षांत मिडिया आंतर्बाह्य बदलला, कमालीचे वेगही आलाय. अनेक अनेक गोष्टी सहजपणे समाजासमोर पोहचाहेत. त्यात बेसब्रीसे एकाद्या गोष्टीचा इंतजार करण्यातील गंमत वा ओढ मात्र गेलीय. तैमूर खाननंतर आता बहुतेक राहाच्या बातम्यांचे दिवस येतील. सेलिब्रिटीजना खाजगी आयुष्य जगू द्यात असं आपण कितीही म्हटलं तरी टीआरपीच्या युगात खरंच ते शक्य आहे का ?