दिलीप प्रभावळकर – कमालीचा ‘सेन्स ऑफ ह्युमर’ असलेले मिश्किल अभिनेते
त्या सिनेमासाठी दिलीप प्रभावळकर (Dilip Prabhavalkar) यांच्यासाठी भूमिका निश्चित केली गेली. सिनेमा ठरला. लोकेशन ठरलं. दिलीप प्रभावळकरांच्या तारखा घेतल्या गेल्या. सिनेमाच्या चित्रिकरणासाठी सगळी टीम पुण्याला आली. आता शूट सुरू करणार तेवढ्यात या सिनेमात जो कलाकार मुख्य भूमिका साकारणार होता त्याने अचानक काही कारणाने आपल्याला ही भूमिका करता येणार नसल्याचं कळवलं. त्याने सिनेमाच सोडला.
कदाचित त्याचं कारण जेन्यूईन असेलही. पण आता सिनेमाचा क्रू आणि निर्माता, दिग्दर्शक चिंतेत पडला. आता काय करायचं… ? इतक्यात निर्मात्याला शक्कल सुचली. त्याने तडक दिलीप प्रभावळकरांना फोन लावला आणि तातडीने पुण्याला यायला सांगितलं. शिवाय झालेला किस्साही सांगितला. इतकंच नाही, तर पुण्याला येऊन त्या सिनेमातली मुख्य भूमिका आता तूच करायची अशीही गळ घातली. झालं..
प्रभावळकरांना काही कळेना. पण अखेर ते तयार झाले आणि पुण्याला आले. आले ते आले वर त्यांनी ती भूमिकाही चोख केली. इतकी चोख की तो सिनेमा आता त्यांचा सिनेमा म्हणून ओळखला जातो. त्यांच्या अनेक उत्तम कामांमध्ये ही भूमिका गणली जाते. त्या चित्रपटाचं नाव आहे ‘चौकट राजा’. या सिनेमाचे दिग्दर्शक होते संजय सूरकर आणि निर्मात्या होत्या स्मिता तळवलकर.
खरंतर या सिनेमात दिलीप कुलकर्णी जी भूमिका साकारतायत ती भूमिका प्रभावळकरांची होती. आणि चौकट राजाच्या भूमिकेत मराठीत पदार्पण करणार होते हिंदीतले अष्टपैलू कलाकार परेश रावल. पण त्यांच्या तारखांचे घोळ झाले आणि त्यांनी ती भूमिका नाकारली. ती थेट गळ्यात पडली प्रभावळकरांच्या. पण अत्यंत कमी वेळ असूनही प्रभावळकरांनी ही भूमिका चोख केली…असे आहेत आपले दिलीप प्रभावळकर (Dilip Prabhavalkar).
इतकं कशाला, ‘लगे रहो मुन्नाभाई’ या सिनेमात गांधीजींच्या भूमिकेत नेमकं कोण आहे ते संजूबाबाला कधीच कळलं नव्हतं…म्हणजे, सिनेमाचं चित्रीकरण सुरू असेपर्यंत. कारण, त्यावेळी गांधीजींच्या मेकअपसाठी वेळ लागे. म्हणून प्रभावळकर लवकर सेटवर यायचे. मेकअप करून रेडी झाले की, संजूबाबा यायचा. त्यामुळे बापूंच्या भूमिकेत नक्की कलाकार कोण आहे संजूबाबाला कळलं नव्हतं. पण नंतर या सिनेमाच्या सक्सेस पार्टीसाठी जेव्हा सिनेमाची टीम पुन्हा एकदा जमली प्रभावळकर तिथे गेले. राजकुमार हिरानीने संजूबाबाला त्यांची ओळख करून दिली. त्यांना पाहून संजूबाबा थक्क झाला. उंचीने इतका मोठा.. गोरापान इसम गांधीजी साकारू शकतो, हे पचायला त्याला पुढची काही मिनिटं जावी लागली.
एक डाव भूताचा, झपाटलेला, चौकट राजा, देऊळ, दिठी, नारबाची वाडी, पोस्टकार्ड अशा कितीतरी भूमिका प्रभावळकरांनी अजरामर केल्या आहेत. केवळ सिनेमाच नाही, तर रंगभूमी आणि छोटा पडदाही त्यांनी गाजवला. छोट्या पडद्यावरचे गंगाधर टिपरे, चिमणराव या व्यक्तीरेखा आता मालिका संपून कैक वर्ष झाली तरीही डोक्यातून गेलेल्या नाहीत. कारण या भूमिका करताना त्यांनी त्याच्या अभ्यासातून, निरीक्षणातून आणि चिंतनातून जी एक मोठी रेष मारून ठेवली आहे, ती केवळ ‘काबीले तारीफ’ आहे. इतकं करून प्रभावळकर कमालीचे ‘डाऊन टू अर्थ’ आहेत. अर्थात ती शिकवण नाटकातून आली आहे.
केवळ कलाकार म्हणून नव्हे, तर एक लेखक म्हणूनही ते प्रसिद्ध आहेत. प्रभावळकरांनी (Dilip Prabhavalkar) त्यांच्या पुस्तकात त्यांचे अनेक अनुभव कथन केले आहेत. आपल्यातल्या कलाकाराला पुरेसा वाव मिळत नसल्याचं लक्षात घेऊन प्रभावळकरांनी लेखणी हातात घेतली आणि हसवा-फसवी या नाटकाचं लेखन केलं. आपल्याला हवं तसं नाटक त्यांनी लिहून काढलं शिवाय त्यामध्ये कामही केलं. लेखनाचं आणि अभिनयाचं इतकं उत्तम ज्ञान असलेले जे मोजके कलाकार मराठीला लाभले आहेत त्यापैकी एक प्रभावळकर आहेत, हे निर्विवाद सत्य आहे.
केवळ कलाकार म्हणून नव्हे, तर माणूस म्हणून आणि एक अस्सल कलावंत म्हणूनही प्रभावळकर तितकेच महत्त्वाचे आहेत. ही गोष्ट आहे साधारण २०१३-१४ ची. त्यावेळी त्यांनी काम केलेल्या सिनेमाचं समीक्षण मी केलं होतं. या चित्रपटाचे दिग्दर्शक नामांकित दिग्दर्शक होते. पण सिनेमा तितका जमला नव्हता. सिनेमाचं समीक्षण छापून आल्यानंतर ज्या मोजक्या कलाकारांनी फोन करून या समीक्षणावर सखोल चर्चा केली त्यात प्रभावळकर होते.
दिग्दर्शकाचं नेमकं कुठं चुकलं.. काय झालं होतं.. काय व्हायला हवं होतं.. तू काय लिहिलं आहेस.. कसं लिहिलं गेलं आहे.. आदी अनेक बाबींवर त्यांनी विस्तृत चर्चा केली. मुद्दे ऐकून घेतले आणि शिवाय आपले मुद्देही सांगितले. प्रभावळकर असे आहेत. अत्यंत क्लिष्ट भूमिका करणारे साधे-सरळमार्गी आणि सोबत कमालीचा ‘सेन्स ऑफ ह्युमर’ असलेले. कलाकारांच्या गप्पांचा फड रंगात आला असेल, तर सगळं ऐकून त्या गप्पा एन्जॉय करणारे आणि एखादी जागा मिळाली की, त्या एका बॉलवर ह्युमरचा षटकार ठोकणारे.. मिश्कील प्रभावळकर.
======
हे देखील वाचा – पत्रकारांसाठी खास शो आता नको.. असं का वाटतं निर्मात्यांना?
======
आपल्याला या कलाकाराच्या निमित्ताने फार मोठा कलाकार लाभला आहे. त्यांना भूमिकांमधून जेवढी आव्हान मिळतात तितके ते फुलतात…आव्हानं स्वीकारतात. आता त्यांच्या वकुबाला साजेशी भूमिका.. एखादी कलाकृती आपण त्यांना देऊ शकतो की नाही हे मात्र जो तो दिग्दर्शक.. निर्माता ठरवेल. अशा अष्टपैलू.. संवेदनशील.. आणि तितक्याच मिश्कील कलावंताला वाढदिवसााच्या हार्दिक शुभेच्छा. (Dilip Prabhavalkar)