कुलाब्यातील स्ट्रॅन्ड आठवणीतच राहिले…
कुलाब्यातील स्ट्रॅन्ड सिनेमा थिएटरशी (Strand Cinema Theatre) माझा खूपच उशिरा संबंध आला, पण तो कायमच लक्षात राहण्यासारखा आहे. आणि तेच तर महत्वाचे असते.दक्षिण मुंबईतील स्टर्लिंग, रिगल, इराॅस, न्यू एम्पायर ही अनेक वर्षे इंग्लिश चित्रपटाची हुकमी थिएटर्स म्हणून ओळखली जात असल्याने तेथे माझ्यासारखा रेडिओवर कसोटी क्रिकेट सामन्याच्या काॅमेन्ट्रीपुरताच इंग्लिशशी संबंध असलेला या थिएटर्सच्या आसपास तरी कशाला जाईल? कधी एखादा हिंदी पिक्चर तेथे प्रदर्शित झालाच तर बघु असा सरळ सोपा दृष्टिकोन होता. त्यात स्ट्रॅन्डला एखादा हिंदी चित्रपट रिलीज होताना तो त्याबरोबरच ग्रॅन्ट रोड परिसरातील एकाद्या थिएटरमध्येही असे. स्ट्रॅन्डमधून एक दोन आठवड्यात तो हिंदी चित्रपट उतरायचा. ( पूर्वकरारानुसार दोन आठवडे असे त्या चित्रपटाच्या जाहिरातीत अनेकदा स्ट्रॅन्डच्या खाली म्हटले जाई.)
मला आठवतय सेन्सॉरने काही कटस सुचवलेला आणि धर्मेंद्र व रेखाच्या पोस्टरवरील धाडसी प्रणय दृश्यामुळे गाजलेला ‘किमत’ ( १९७३) हा रवि नगाईच दिग्दर्शित जेम्स बाँड स्टाईलचा पण अस्सल मसालेदार हिंदी चित्रपट स्ट्रॅन्डला रिलीज झाला होता आणि स्ट्रॅन्डचे या पिक्चरचे थिएटर डेकोरेशन पाहण्यासाठी जायचे आम्ही गिरगावातील खोताची वाडीतील काही सवंगड्यानी ठरवले तेवढ्यात समजले ‘किमत ‘ ड्रीमलॅन्डलाही येतोय. परवीन बाबीने एकामागोमाग दोन चित्रपटांतून रुपेरी पडद्यावर पदार्पण करतानाचा बी. आर. इशारा(Strand Cinema Theatre) दिग्दर्शित ‘चरित्र ‘ ( १९७३) ड्रीमलॅन्ड लागला तोच एकाच आठवड्यात उतरला ( क्रिकेटपटू सलिम दुराणी त्यात हीरो होता, बरं का?), आणि पुढच्याच शुक्रवारी तिची भूमिका असलेला ‘धुंए की लकीर ‘ ( १९७३) ड्रीमलॅन्डसह स्ट्रॅन्डलाही लागला इतकेच. प्रेक्षक म्हणून स्ट्रॅन्डला जाण्याचे योग मला येत नव्हते आणि त्याची चक्क आवश्यकताही नव्हती. अनेकदा तेथे इंग्लिश चित्रपट प्रदर्शित होत आणि मराठी वृत्तपत्रात इंग्लिश चित्रपटाच्या जाहिराती येत नसत. पण हे थिएटर नेमके आहे कुठे, कसे आहे, किती मोठे आहे ( इंग्लिश चित्रपटाचे आहे म्हणजे हायफाय असणार, रुबाबदार असणार हेही स्वाभाविकपणे त्यात आलेच. जसे चित्रपट तशी त्याची थिएटर्स असाही एक फंडा सिंगल स्क्रीन थिएटर्स अर्थात एकपडदा चित्रपटगृहांच्या काळात होता, त्यांच्या दीर्घकालीन इतिहासात तो आहे. त्यावर वेगळा फोकस होईल. ) , स्ट्रॅन्डचे पोस्टर डेकोरेशन कसे असते यांची उत्तरे हवी असतील, त्याचा ‘ऑखो देखा हाल ‘ अनुभवायचा तर कुलाबा मार्केटमध्ये जायलाच हवे. (Strand Cinema Theatre)
अनेक चित्रपटगृहे महत्त्वाच्या काॅर्नरला असताना हे भर भाजी, कडधान्य, फिश वगैरेच्या गर्दीत मार्केटमध्ये कसे हा प्रश्न पडत होता. कदाचित जेव्हा म्हणजे ३० ऑक्टोबर १९४२ साली अर्थात इंग्रजांच्या काळात सुरु झाले तेव्हा येथे छोटेसेच मार्केट असेल. स्ट्रॅन्डचा पहिला चित्रपट (Strand Cinema Theatre)होता, लक्झरी पिक्चर्स हाऊसचा ‘ Sergeant York’. यात गॅरी कपूर हा अमेरिकन हीरो होता आणि या चित्रपटात युद्धभूमीवरील थरारक प्रसंग आहेत असे तेव्हा बातमीत म्हटले होते. ( सहजच एक प्रश्न मनात येतोय, इंग्रंजांच्या काळात दक्षिण मुंबईत इंग्लिश कंपन्यांनी उभारलेली चकाचक पाॅलिश्ड सिनेमा थिएटर्स प्रामुख्याने आपल्याला विदेशातून येत असलेले इंग्लिश चित्रपट पाहण्यासाठी उभारली नाहीत ना? म्हणजे त्यांचा मुख्य हेतू तोच असावा का?) स्ट्रॅन्डसमोर(Strand Cinema Theatre) उभा राहिलो तेव्हा त्याचा साहेबी थाट आणि त्यावरची इंग्लिश पिक्चर्सचे होर्डींग्स, शो कार्ड्स मला परकेपणाची जाणीव करुन देत होता.
माझ्यासारख्या मध्यमवर्गीय चाळ संस्कृतीत वाढलेल्याने गेट वे ऑफ इंडियाला फिरायला आल्यावर जाताना थोडं पुढे येत स्ट्रॅन्ड पहावे असे माझ्या मनात घट्ट बसले. आणि स्ट्रॅन्डपासून मी मनाने कायमच दूर राह्यचे ठरवले. ( मै अपनी औकात को सही वक्त पहेचान गया असा सलिम जावेद स्टाईल संवाद माझ्या मनात आला.) हा झाला पूर्वार्ध. आता उत्तरार्धात याच गोष्टीने नवीन वळण घेतले आणि हेच स्ट्रॅन्ड कायमचे आठवणीत राहीले. म्हटलं ना, ‘टाॅकीजच्या गोष्टी’शी माझे असलेले नाते काही वेगळेच आहे. मी फक्त आणि फक्त चित्रपट पाहिले नाहीत, थिएटर संस्कृतीही जाणून घेतली.
मी मिडियात आलो आणि १९८४ च्या जानेवारीत मुंबईत भारताच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे अर्थात इफ्फीचे आयोजन करण्यात आले होते. आता पणजीत ( गोवा) नोव्हेंबर महिन्यात रंगत असलेला इफ्फी पूर्वी जानेवारीत आयोजित केला जाई आणि एक वर्ष नवी दिल्ली व एक वर्ष चित्रपट निर्मितीचे केंद्र असलेले शहर ( मुंबई, हैदराबाद, त्रिवेंद्रम वगैरे) असा तो आलटूनपालटून असे. मुंबईत या इफ्फीचे मुख्य केंद्र मेट्रो थिएटर होते. न्यू एक्सलसियरला पॅनोरमा, स्ट्रॅन्डला भारतीय आणि विदेशी सिनेमावाल्याच्या चित्रपटांचा सिंहावलोकन विभाग होते. अर्थात मी स्ट्रॅन्डला शक्य तितके भारतीय चित्रपट पाह्यचे ठरवले आणि त्यात गुरुदत्त दिग्दर्शित ‘प्यासा’, ‘कागज के फूल ‘ वगैरे चित्रपट होते. माझ्यासाठी यामुळेच स्ट्रॅन्डचे दरवाजे उघडले तरी माझ्या मनात मध्यमवर्गीय संकोच होताच. पडद्यावर ‘प्यासा ‘ सुरु होताच मी सिनेमाशी जोडला गेलो. स्ट्रॅन्डचा एकूणच रुबाब भारीच होता. बाल्कनी तर स्टाईलीश. इफ्फीच्या निमित्ताने स्ट्रॅन्डला आणखीन काही चित्रपट पाहताना थिएटरच्या (Strand Cinema Theatre)रेड कार्पेट संस्कृतीशी ओळख वाढवायचा प्रयत्न केला.
काही वर्षातच पुन्हा स्ट्रॅन्डजवळ जायचा योग आला. यावेळी कारण वेगळेच होते. बी. सुभाष दिग्दर्शित ‘टारझन ‘ ( १९८५) अचानक सुपर हिट झाला आणि किमी काटकारचा टेलिफोन नंबर मिळवण्यासाठी धडपड सुरु झाली ( पिक्चर हिटचे साईट इफेक्ट्स असे अनेक असतात. ) त्या काळात अनेक स्टार आम्हा सिनेपत्रकारांना मुलाखतीसाठी घरीच बोलवत. किमी काटकरची आई मला फोनवर म्हणाली, कोलाबा मे स्ट्रॅन्ड सिनेमा के सामने हम रहते है…आजही जेव्हा जेव्हा एकाद्या म्युझिक चॅनलवर किमी काटकरचे एकादे गाणे पाहतो तेव्हा स्ट्रॅन्ड थिएटर (Strand Cinema Theatre)पटकन आठवते ( आणि अर्थातच किमी काटकरची भेटही आठवते.)
========
हे देखील वाचा : स्टर्लिंगची पर्सनॅलिटी लयच भारी…
========
काही वर्षातच याच स्ट्रॅन्डमध्ये एक मिनी थिएटर (Strand Cinema Theatre)असून तेथील तन्वीर अहमद दिग्दर्शित ‘आकर्षण ‘ ( १९८८) या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये सहभागी होण्याचे आमंत्रण रजनी आचार्य याच्याकडून आले. दृश्य काय होते? तर ‘आकर्षण सिनेमात सिनेमा होता’ आणि त्या सिनेमाच्या ट्रायलला अकबर खान आणि सोनू वालिया यांच्यासोबत आम्ही सिनेपत्रकार आहोत. म्हणजे आम्हाला अभिनयाची संधी होती की आम्ही ओरिजनल भूमिकेत होतो? अकबर खान, सोनू आणि आम्ही सगळ्यांनीच शूटिंग एन्जाॅय केले. म्हणून शूटिंग आणि स्ट्रॅन्ड दोन्ही लक्षात राहीले.
नव्वदच्या दशकात कुलाब्यातील मुकेश मिलमध्ये एकाद्या हिंदी चित्रपटाचे शूटिंग रिपोर्टीग अथवा एकाद्या मुलाखतीसाठी गेल्यावर अधूनमधून स्ट्रॅन्डवर चक्कर मारायचो. आपली सिनेपत्रकारीतेची पाळेमुळे सिंगल स्क्रीन थिएटर्समध्ये खोलवर रुजलीत हे मी कधीच विसरणार नाही याच भावनेने स्ट्रॅन्डवर जायचो..कालानंतरने तेही बंद झाले आणि हळूहळू हे बंद थिएटर उदास, भकास वाटू लागले. अशी नि:शब्द इमारत काय पाह्यची. आज स्ट्रॅन्डचा शो सुरु असता तर थिएटर ऐंशी वर्षांचे झाले असते. अशा वेळी स्ट्रॅन्डशी निगडित जुन्या चांगल्या आठवणी काढाव्यात. त्याचीच ही ‘टाॅकीजची गोष्ट’.
दिलीप ठाकूर