हा अभिनेता करीत असे स्वतःच्याच चित्रपटांची तिकीट विक्री!
आजच्या पिढीला कदाचित हे खोटं वाटेल पण जागतिक सिनेमाच्या इतिहासात न घडलेली गोष्ट भारतीय सिनेमात आणि तेही मराठी सिनेमात घडली होती ! सिनेमाच्या पडद्यावर प्रमुख भूमिका साकार करणारा नायकच, त्याच थिएटर मध्ये बुकिंग क्लार्क म्हणून काम करीत होता आणि आपल्याच सिनेमाची तिकिटे तो प्रेक्षकांना विकत होता.
मित्रांनो हा किस्सा आहे आपले मराठीतील सुप्रसिद्ध अभिनेते राजा गोसावी (Raja Gosavi) यांचा. आज राजा गोसावी यांची आठवण नवीन पिढीला फारशी नसणार. परंतु या अभिनेत्याने एकेकाळी मराठी सिनेमाचा पडदा गाजवून सोडला होता.
१९५२ साली राजा परांजपे दिग्दर्शित ‘लाखाची गोष्ट’ हा चित्रपट पुण्याच्या लक्ष्मी रोड (नारायण पेठ) वरील ‘भानुविलास’ या थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. मराठी सिनेमातील कलावंतांना त्याकाळी फार काही पैसे मिळत नसत. त्यामुळे भट यांच्या मालकीच्या या थिएटरमध्ये राजा गोसावी (Raja Gosavi) त्याकाळी बुकिंग क्लार्क तर कधी चक्क डोअर कीपर म्हणून देखील काम करीत होता. हा सिनेमा प्रचंड हिट झाला. ह्या सिनेमाचे ‘ब्लॅक’ देखील राजा गोसावी यांनी केले होते अशी आठवण राजा भाऊ स्वत: नंतर अनेक कार्यक्रमात सांगत असतं. (Raja Gosavi)
प्रेक्षकांना देखील खूप गंमत वाटत होती कारण तिकीट खिडकीवर तिकीट वाटणारा बुकिंग क्लार्क सिनेमाचा प्रमुख नायक होता! राजा परांजपे हे राजा गोसावी (Raja Gosavi) यांचे खऱ्या अर्थाने गुरु ठरले. यांच्या अनेक चित्रपटातून राजा गोसावी यांनी विविधरंगी भूमिका साकारली. त्याचप्रमाणे अनंत , दत्ता धर्माधिकारी तसेच राजा ठाकूर यांच्या चित्रपटातून देखील राजा गोसावी चमकत होते.
राजा गोसावी यांनी सुरुवातीच्या काळी खूप स्ट्रगल केला. अक्षरशः निर्माता दिग्दर्शक मास्टर विनायक यांच्या कोल्हापूरच्या घरी ते चक्क घरगडी म्हणून राबत होते. मास्टर विनायक यांची कन्या अभिनेत्री नंदा हिला त्यांनी आपल्या अंगाखांद्यावर खेळवले होते. (Raja Gosavi)
गंमत बघा, ज्या मुलीला अंगाखांद्यावर खेळवले पुढे तीच नंदा त्यांची नायिका म्हणून १९५८ सालच्या ‘झालं गेलं विसरून जा’ चित्रपटात चमकली होती. राजा गोसावी (Raja Gosavi) यांची लोकप्रियता त्या काळात इतकी प्रचंड होती की, वसंत पिक्चर्सच्या एका चित्रपटात राजा गोसावी यांना ट्रिपल रोल देऊन ‘राजा गोसावीची गोष्ट’ या नावाचा एक चित्रपट बनवला होता.
स्वतःच्या नावावर चित्रपट असणे हे भाग्य फार कमी लोकांच्या वाट्याला येतं. ते भाग्य राजा गोसावी (Raja Gosavi) यांच्या वाट्याला आलं होतं. या सिनेमाचे दिग्दर्शन बाबुराव गोखले यांनी केले होते. राजा गोसावी यांचे रूढार्थाने शिक्षण चौथीपर्यंत झाले होते, पण ते स्वतःला बीए समजत- बोर्न आर्टिस्ट! आणि खरोखरच ते बोर्न आर्टिस्टच होते. त्यांच्या विनोदामध्ये एक नैसर्गिक सहजता होती. त्यांचा विनोद निरोगी असायचा त्यामुळे त्यांना मराठीतील डॅनी के म्हणत.
राजा गोसावी कायम म्हणायचे, “माझ्याकडे योगायोगाने पैसा आला आणि भोगाभोगाने पैसा गेला. पैसा असला की मी राजा असतो आणि नसला की गोसावी असतो!”
====
हे देखील वाचा: किस्सा तलत मेहमूद यांच्या पहिल्या गाण्याचा!
====
‘लाखाची गोष्ट’ नंतर राजा गोसावी यांच्या हिट सिनेमांची रांगच लागली. ‘इन मिन साडेतीन’, ‘आंधळा मागतो एक डोळा’, ‘दिसतं तसं नसतं’, ‘गाठ पडली ठका ठका’, ’पसंत आहे मुलगी’, ‘उतावळा नारद’, ‘बाप माझा ब्रह्मचारी’ (यात दामुअण्णा मालवणकर सोबत त्यांची अभिनयाची जुगलबंदी पाहण्यासारखी होती), चिमण्यांची शाळा… किती म्हणून सांगावीत? (Raja Gosavi)
पुढे साठच्या दशकात मराठी सिनेमात तमाशा पट आले आणि साहजिकच मध्यमवर्गीय शहरी नायकांचा चेहरा असलेले राजा गोसावी काहीसे (Raja Gosavi) मागे पडले. याच काळात काही हिंदी सिनेमात देखील त्यानी अभिनय केला.
‘स्कूल मास्टर’ या चित्रपटात ‘ओ दिल दर बोलो इकबार क्या मेरा प्यार पसंद ही तुम्हे’ हे तलत महमूद यांनी गायलेलं गाणं त्यांच्यावर चित्रित झालं होतं.(Raja Gosavi)
राजा गोसावी रंगभूमीवर चांगलेच रमले. भावबंधन, संशय कल्लोळ, एकाच प्याला या अभिजात संगीत नाटकांपासून अलीकडच्या सामाजिक नाटकातून त्यांनी अनेक भूमिकांमध्ये रंग भरला. वि वा शिरवाडकर यांच्या ‘नटसम्राट’ या नाटकात त्यांनी ‘अप्पासाहेब बेलवलकर’ रंगवला होता. (Raja Gosavi)
====
हे देखील वाचा: तब्बल अठरा वर्षाचा काळ लागला ‘हे’ गाणे बनायला
====
सत्तरच्या दशकात त्यानी केलेल्या ‘अष्टविनायक’, ‘हा खेळ सावल्यांचा’, या काही खलनायकी भूमिका रसिकांच्या पसंतीस उतरल्या होत्या. २८ मार्च १९२५ रोजी जन्मलेल्या राजा गोसावी यांनी अतिशय खडतर संघर्षातून आपली कला फुलवली. २८ फेब्रुवारी १९९८ रोजी त्यांचे निधन झाले. (Raja Gosavi)